गेल्या ३९ वर्षांत किती नागपंचम्या आल्या आणि गेल्या ! आता तुम्ही म्हणाल किती काय,३९ ! तर ते बरोबरच आहे म्हणा. पण कायमची लक्षात राहिली ती, १९८६ सालची नागपंचमी. आता ती नागपंचमी तर लक्षात राहिली पण इंग्रजी तारीख काही आठवत नाही, आठवते ते इतकेच की, त्या वर्षीची नागपंचमी ही ऑगस्ट महिन्यात आली होती.
त्या दिवशी मी मुंबईतील चेंबूर टिळकनगर येथील इमारत क्रमांक ८३ मध्ये रहात असलेल्या माझ्या, सौ कालिंदी बागेवाडीकर या सख्या मावस बहिणीकडे, माझ्या आईचा निरोप देण्यासाठी गेलो होतो. तो निरोप म्हणजे माझ्या मावशीचे, कालिंदी आक्काच्या आईचे निधन झाले असल्यामुळे, कालिंदीने माहेरपणासाठी काही दिवस नगर येथे यावे; कारण त्यावेळी माझी आई नगरच्या भावाकडे रहात होती.
खरं म्हणजे, कालिंदी आक्काचे मिस्टर, नानासाहेब बागेवाडीकर हे स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट होते. टिळकनगर येथील तसे ते बडे प्रस्थ होते. त्यामुळे अख्ख्या इमारतीत बहुधा त्यांच्याकडेच फोन होता. (आजच्या सारखा मोबाईल फोन नाही तर, लँडलाइन फोन!) पण तो फोन काही कारणांनी बंद पडलेला असल्यामुळे मला फोन करून निरोप देता येत नसल्याने समक्ष घरी जाऊन निरोप द्यावा लागला.
मी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बागेवाडीकरांच्या घरात बसतो न बसतो, तेव्हढ्यात कालिंदी आ क्काने तिच्या मुलीला (तेव्हाची बाळ्या; आताची सौ कांचन कंदले, सोलापूर) हिला सांगितले, “जा ग, त्या शेटे काकूंना सांग, आमचा टिव्ही मामा आला म्हणून”. बाळ्याही लगेच उड्या मारत गेली. आता तुम्ही म्हणाल, टिव्ही मामा ही काय भानगड आहे ? तर त्यावेळी मी मुंबई दूरदर्शन केंद्रात काम करीत होतो. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी होती. त्यामुळे दूरदर्शन ची क्रेझ भयंकर होती. त्यामुळे मी दूरदर्शन केंद्रात काम करतो, याचा मला जितका अभिमान वाटत नसेल, त्यापेक्षा कैकपटीने माझ्या नातेवाईकांना वाटत असे. त्यामुळे ज्यांचा मी मामा लागत असे, ते मला टिव्ही मामा म्हणत असत तर ज्यांचा मी काका लागत असे, ते मला टिव्ही काका म्हणत असत. असो…
तर बाळ्या आपली कामगिरी चोख बजावून आली. थोड्याच वेळात शेटे काकू आणि त्यांचा मुलगा विजय, असे दोघेही मला त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायला आले. आमंत्रण होते, ते त्यांची मुलगी बघण्यासाठीचे.
आता त्यावेळी मी लग्न करण्याच्या मानसिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीच नव्हतो, म्हणून मी त्यांना नम्रपणे नकार दिला. तसे श्रीयुत शेटे दोनतीनदा दूरदर्शन केंद्रात येऊन, मला घरी येण्याची गळ घालून गेलेले होते. पण माझा निर्णय ठाम होता, तो म्हणजे आपण लग्नासाठी तयारच नाही आहोत, तर उगाचच मुली का बघायच्या ? नंतर खोटी नाटी कारणं सांगून त्यांना नकार का द्यायचा ? त्यामुळे मी काही त्यांच्या सोबत त्यांच्या घरी गेलो नाही. थोड्या वेळाने माझी निघण्याची वेळ झाली म्हणून मी तिथून निघालो. तळमजल्यावर आलो तर, तिथे श्रीयुत शेटे, बहुधा माझी वाट पहात उभेच होते. मला पाहून त्यांनीही घरी चलण्याच्या आग्रह केला. तेव्हा मी माझी नेहमीचीच टेप ऐकवली. तर ते म्हणाले, “अहो, मुलगी पहायला म्हणून नका येऊ, तर एक समाजबांधव म्हणून घरी या. तसे यायला काय हरकत आहे ?” मीही विचार केला, खरंच तसे यायला काही हरकत नाही !
मानसिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीबरोबर मी स्वतःला प्रागतिक विचारांचा समजत असल्याने, जातीतील मुलीशी लग्न करायचे नाही, असेही मी ठरविले होते. तर शेवटी त्यांच्या मागेमागे त्यांच्या घरी पोहोचलो. तर न बघायची ठरवलेली मुलगीच प्रथम दर्शनी मॅक्सी घालून, खुर्चीत बसलेली, राजस्थानी चित्रात दिसतात, तशी सुंदर मुलगी दिसली. मग आल्या सरशी इतरांच्या नोकऱ्या, त्यांच्या कामाचे स्वरूप, तिच्या नोकरीचे स्वरूप, माझ्या नोकरीचे स्वरूप असे सर्व काही औपचारिकच बोलणे झाले. चहापाणी घेऊन मी तिथून निघालो.
दोन तीन दिवस गेले. आमच्या ऑफिसमध्ये छाया नावाची टेलिफोन ऑपरेटर होती. तिला मी, शेटे यांच्या मुलीला बाहेर भेटणार का ? म्हणजे निवांत बोलता येईल, असा निरोप द्यायला सांगितले. तिनेही निरोप देऊन तिचा भेटण्यासाठी होकार असल्याचे कळविले. त्यानुसार फोर्ट भागातील एका छान हॉटेलमध्ये आमची भेट झाली.
मी माझ्या बाबतीत असलेली सर्व “वस्तुस्थिती” सांगितली. मला अपेक्षा होती की, सर्व काही ऐकून आपल्या पदरी नकारच पडेल. पण झाले उलटेच ! सर्व काही ऐकून घेऊन मला होकार मिळाला ! पुढे परत एकदा भेटायचे आम्ही ठरविले. असे भेटता भेटता १४ फेब्रुवारी १९८७ रोजी कुमारी अलका कुमार शेटे ही सौ अलका देवेंद्र भुजबळ झाली.
आता गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचे फॅड खूप वाढले आहे. सर्व म्हणतात, अरे व्वा, तुम्ही लग्नासाठी काय मस्त तारीख निवडली ! मी आपलं हसून कौतुक स्वीकारतो. पण मनात म्हणत असतो, अहो तेव्हा व्हॅलेंटाइन डे वगैरे असे काही नव्हते. त्या १४ फेब्रुवारी रोजी दुसरा शनिवार होता. आम्ही दोघेही केंद्र सरकारच्या नोकरीत असल्याने आम्हाला आणि आमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनाही त्या दिवशी आणि त्याला जोडून रविवारची सुट्टी अशा दोन सुट्ट्या लागोपाठ मिळणार होत्या. त्यात लग्नात आमच्या गणगोताची सोय आणि सर्वांची व्यवस्था मुंबईत होणार नाही म्हणून पुणे येथे ठेवले होते. असो…. तर पुढचे, पुढे केव्हातरी !

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
एका लग्नाची सुरेख गोष्ट जिने एका पोर्टलला जन्म दिला.
अतिशय सुंदर आठवण आहे
आणि शब्दांकन ही सुंदर