Thursday, February 6, 2025
Homeयशकथाआणि अलका डॉक्टर झालीच

आणि अलका डॉक्टर झालीच

डॉक्टर झाल्याचा अलकाचा आनंद गगनांत मावेनासा झाला होता. आनंदाने नाचू का गाऊ असे तिला वाटत होते. या आनंदाची पार्श्वभूमी तेव्हढीच कष्टदायक होती. खुप मेहनत आणि जिद्धीने अलका डॉक्टर झाली होती. अशिक्षित आई वडील. त्यात वडील गिरणी कामगार म्हणून कामाला होते. अलकासह एकंदर पाच भावंडे, त्यांच्या खर्चाचा ताळमेळ कसाबसा रेटत आईने नेटाने संसार केला.

खरं तर अलकाचा पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजला नंबर लागला होता .पण एव्हढ्या लांब मुलीला शिक्षणासाठी पाठवायचे म्हणजे मनाला पटण्यासारखे नव्हते. पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हाही एक विचार मनात होताच. वैद्यकीय अभ्यासक्रमाचा खर्च, हॉस्टेलचा खर्च कसा परवडणार ? म्हणुन अलका स्वत: मुंबईत नायर हॉस्पिटल येथे ऍडमिशनसाठी गेली. तेथे बी.डी.एस.साठी तिचा नंबर लागला होता . पण ऍडमिशन फी भरायला आठशे रुपये लागणार होते ते कुठून आणणार ? तरीही ती मनाचा हिय्या करून         एडमिशनच्या रांगेत उभी होती. काऊंटरवर गेल्यावर बोलून बघू असे तिने ठरवले. तिचा स्वभाव बोलका असल्यामुळे तिच्या पाठीमागे श्री. अहिरे हे सदगृहस्थ त्यांच्या मुलीच्या एडमिशन साठी रांगेत होते, बोलता बोलता त्याना आपल्या परिस्थितीची अलकाने कल्पना दिली, आणि त्यांनाच एडमिशनचे आठशे रुपये भरण्याची विनंती केली. मी लवकरात लवकर तुमचे पैसे परत करेन, अशी तिने त्यांना ग्वाही दिली. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, असे अलकाच्या लक्षात आले होते. तिची अभ्यासूवृत्ती पाहून श्री. अहिरे यांनी अलकाची फी भरली. अशावेळी तिच्यासाठी ते देवदूतच ठरले.

खरं तर अलका लहानपणापासुन अभ्यासात खुप हुशार आणि चुणचुणीत होती. पण दादरला त्यांचे चाळी वजा घर होते. घरासमोर जांभळाच्या झाडाखाली ती अभ्यास करीत असे. सर्वाना माहिती झाली होती की अभ्यासातील या किड्याला कुठे शोधायचे, तर जांभळाच्या झाडाखाली !

चार पैसे मिळावेत म्हणून आई लिज्जत पापड लाटण्यासाठी जात असे. अलकाचे इयत्ता ७ वी पर्यंत शिक्षण म्युन्सिपालटी शाळेत आणि नंतरचे हायस्कूलमध्ये झाले. एकूण ५ भावंडांमध्ये अलकाचा नंबर ४ था होता. ३ बहिणी आणि २ भाऊ, पण आई अशिक्षित असूनही खुप हुशार होती. तशीच अलका, अगदी तिच्या आईसारखी. इयत्ता ६ वी पर्यंत त्यांच्याकडे लाईटसुद्धा नव्हती. ती रात्री रॉकेलचा दिवा लावून अभ्यास करायची. १० वीला ७५% मार्क मिळवून ती शाळेत पहिली आली होती.

मुंबईला नायर हॉस्पिटल मध्ये बी. डी. एस ला एडमिशन घेतल्यानंतर खर्चाचा ताळमेळ बसण्यासाठी ती वरळी येथे शासकीय वसतिगृहात रहायला गेली. कारण शासकीय ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध असल्यामुळे पुस्तकांचा खर्च वाचत होता. परिस्थितीशी हात मिळवणी करत बी.डी.एस. च्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्याचा तिला खूपच आनंद झाला होता. तसेच तिच्या हायर सेकंडरी शाळेतूनही अलका एकमेव विद्यार्थी होती की जी सर्व प्रथम डॉक्टर झाली होती. तो आनंद अवर्णनिय होता.

२३ व्या वर्षी बी.डी.एस.

अलका बी.डी.एस. च्या शेवटच्या वर्षाला असताना तिला लग्नासाठी स्थळं सांगून यायला लागली. अलका अभ्यासातील किडा असली तरी एकीकडे तिचे आणि तिच्या चाळीतील मित्र किरण, याच्या बरोबर प्रेम फुलत होते. खर तर अलका १० वी ला असताना परिस्थिती मुळे रु.४०/- परीक्षेची फी भरायलाही पैसे नव्हते. किरण च्या आईने परीक्षेची फी भरली होती आणि त्याबद्दल तिने घरच्यांचा ओरडा ही खाल्ला होता. १२ वीला असताना किरण आणि ती एकाच ट्युशन क्लासमध्ये जायचे. तेव्हा पासुन दोघांची मैत्री होती. पुढे किरण सोलापूर येथून १२ वी पास झाला तर परत मुंबई येथून त्याने बी.एस्सी. केले. १२ वी च्या तिच्या उत्कृष्ट निकाल मुळे तिच्या मोठ्या भावाने मिरज येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच पुण्याला सुद्धा बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रवेश फॉर्म भरला, पण घरच्यांनी त्याला प्रचंड विरोध केला, मग तिने मुंबई येथून बी.डी.एस. केलं. या दरम्यान किरण चा आणि तिचा  पत्रव्यवहार सुरू होता. पण म्हणतात ना लांब गेल्यामुळे मैत्री की प्रेम याचा अंदाज येतो. अलकाला खरं तर प्रेमात अडकायचे नव्हतेच पण त्याच्यापासुन दुरही जायचे नव्हते. किरण आणि अलका लहानपणी एकाच चाळीमध्ये रहायचे . त्यामुळे त्यांची मैत्री दृढ होत होती पण अलकाच्या आणि किरणच्या आईचे चाळीतील भांडणामुळे दोन्ही घरामध्ये अजिबात संवाद नव्हता. शेवटी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तिने किरण बरोबर पळून जाऊन लग्न केले. सासरच्याकडे या लग्नाला संपूर्ण संमती होती.

लग्नानंतर ते दोघेही पुण्याला नणंदेकडे रहायला आले, कारण तिचे घर मोठे आणि त्यात तिचे पती बाहेरगावी असल्या कारणाने एव्हढया मोठ्या घरात ती एकटीच रहायची. अनुभव म्हणुन तिने पिंपरी येथे डॉ.मोहन पानसे यांचे हॉस्पिटल जॉईन केले. तर किरणने डी.टी.पी. सॉफ्टवेअरचा व्यवसाय सुरु केला. डॉ पानसे कडे 2 वर्षाच्या अनुभव घेऊन, पिंपरी येथे नवीन स्वतःचा दवाखाना सुरु केला दरम्यान बाळाची, रोनित ची चाहूल लागली असल्यामुळे एम.डी.एस.करायचा विचार सोडून तिने घर व क्लीनिकलाच प्राधान्य दिलं.

क्लिनिक मध्ये उपचार करताना.

पिंपरी येथील ९ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर अलका ने नवीमुंबईला शिफ्ट होऊन, जुईनगर येथे नवीन दवाखाना सुरु केला तर तिच्या पतीने, किरण ने मुंबईत विक्रोळी येथे, एक मिनी थिएटर सुरु केले. पण काळाच्या ओघात मनोरंजन उद्योगातील बदलांमुळे त्या मिनी थिएटरचे डॉ. खाडे चारिटेबल ट्रस्ट सुरु करून तिकडे दातांचे सर्व उपचार अगदी कमी खर्चात उपलब्ध करून समाजाचे ऋण फेडण्याची संधी अलकाने साधली. त्यासाठी तेथे एक डॉक्टरांची एक टीम तयार केली, तर किरण ने ‘डेंटल कॉमप्रेसर मॅन्यूफॅकचर, रिपेरिंग आणि सर्विसिंग’ चा व्यवसाय सुरु केला.

नवी मुंबई येथे तिच्या क्लिनिकमध्ये उपचारापेक्षा माणसं जोडणे या तिच्या गोड, आपलेपणाच्या स्वभावामुळे पैशापेक्षा आलेल्या दाताच्या उपचारार्थींना घरच्यासारखे वाटावे व हक्काने उत्तमरित्या त्यांना सेवा द्यावी यावरच तिचा भर असतो. या तिच्या प्रवासात तिच्या पतीची, किरण ची मोलाची साथ होती. तो तिला फुला सारखा जपत होता.

या ३० वर्षाच्या प्रधिर्घ क्लीनिकल अनुभवा बरोबर अलकाला डान्सची आणि झाडांची सुद्धा तिला प्रचंड आवड, अगदी खत सुद्धा ती घरीच करते. टाकाऊ पासुन टिकाऊ कसे करावं ही कला सुद्धा अलका ला अवगत आहे. तिने कॉलेज मध्ये ऍ्थलॅटिक मध्ये सुवर्ण पद मिळवले होते तर, वयाच्या ४० व्या वर्षी ती सायकलिंग, स्वमिंग आणि स्केटिंग शिकली. फॅशन शोमध्ये तिने भाग घेऊन उपविजेत्याचे बक्षीस देखील पटकावले. प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे स्त्री असते तर अलका च्या बाबतीत, तिच्या प्रत्येक नविन यशा मागे तिच्या पतीची, किरण ची मोलाची साथ तिला मिळतेय. तिच्या मते आयुष्यात प्रेत्येक क्षण आनंदाने जगा, जीवन खुप सुंदर आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी “Beautiful life” आणि दातांच्या समस्येवर  “Oral health management” या नावाचे यु-ट्यूब चॅनलही तिने सुरु केले आहे.

स्केटिंग

आज तिचा मुलगा डॉ. रोनित खाडे, रूट कॅनल आणि कॉसमॅंटिक डेंटिस्ट्री ह्यात एम.डी.एस. झाला असून तोही शासकीय दंत महाविद्यालयात, सहाय्यक प्राध्यापक आहे. रोनित लहान असताना, एकदा तिच्या सासरच्या चाळीतील जुन्या घरी ती गेली असता शेजारच्यांनी रोनितला तिच्या आईच्या मांडीवर ठेवले तेव्हा, नातवाला बघून चाळीतील जुने भांडण विसरून आई आणि सासू दोघीही एकत्र आल्या. दोन्ही घराचे दुरावलेले संबंध परत जुळून आले. अलकाचा स्वभाव आणि तिची हुशारी तिला तिच्या आईकडूनच मिळाली असे वाटते.

डॉ. रोनित आणि डॉ.अलका खाडे.

आईसारखीच ती हरहुन्नरी आहे. पण तिच्या मनात एक सल बोचतेय. लग्नाच्या वेळी आईचे मन मोडले, आईने आम्हा मुलांसाठी खुप कष्ट घेतले म्हणूनच आज मी डॉक्टर होऊ शकले. पण आज अलका संसारात खुप रमलीय आणि तिची दिवसेंदिवस होणारी प्रगती बघून आईच्या चेहऱ्यावरचे समाधान तिला अजुन उंच उडायला बळ देते.

– लेखन : अलका भुजबळ. 9869043300.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुप्रभात मॅडम,

    काय योगायोग आहे, एक अलका दुसऱ्या डॉक्टर अलकाचा आपल्या लेखणीच्या माध्यमातून तिच्या मेहनतीचे , धडपड्या – हरहुन्नरी स्वभावाचे, कौतुक केले आहे.

    हा लेख वाचताना प्रथम मला भुजबळ साहेबांची अलका या वयात डॉक्टर झाल्या की काय ? असे वाटले असतांनाच संपूर्ण लेख वाचल्यावर माझ्या शंकेवर पडदा पडला !!

    मॅडम, अप्रतिम विचारांचा लेख आहे, आपले मनःपूर्वक अभिनंदन !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी