Thursday, November 21, 2024
Homeयशकथाआणि मी एम एस झाले !

आणि मी एम एस झाले !

आपलं एम एस होण्याचं स्वप्न वयाच्या चाळीशीत पूर्ण करणाऱ्या डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे यांची स्वप्नपूर्ती त्यांच्याच शब्दांत……-संपादक.

प्रत्येकाचं आयुष्यात एक स्वप्न असतं, त्या स्वप्नाचा पाठलाग करत आपण ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत असतो.असंच माझं पण एक स्वप्न होतं.
पदव्यूत्तर एम एस / एम डी करण्याची माझी पहिल्या पासून इच्छा होती. पण लग्न लवकर झाले आणि मनामध्ये असलेली इच्छा तशीच दबून राहिली. लग्नानंतर कौटुंबिक आणि हॉस्पिटलची जबाबदारी माझ्यावर पडली. हॉस्पिटलही चांगलं चालत होतं. पती डॉ. प्रशांत यांची पण प्रॅक्टिस चांगली होती.पण आतून सारखं काहीतरी नवीन शिकण्याची तीव्र इच्छा असलेली मी सारखी नाराज रहात होते, आणि मग मी माझ्यात असलेली सर्जनशील ऊर्जा वेगवेगळ्या गोष्टी करुन बघण्यासाठी वापरु लागले. कारण शांत बसणं हे माझ्या स्वभावात नव्हते. आरोग्याची आणि सामाजिक विषयाची ६ पुस्तके मी लिहून प्रकाशित केली. वेगवेगळी औषधं शोधून काढली. अनेक वृत्तपत्रे, मासिके यांच्यामध्ये लेख लिहिले. आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती झाल्या. आयुर्वेद क्षेत्रात संशोधन केल्यामुळे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळाले. गर्भिणी प्राशचा शोध लावणारी पहिली महिला डॉक्टर म्हणून माझी विश्व विक्रम यादीत नोंद झाली. समाजात एकल, विधवा महिलांसाठी सामाजिक कार्य सुरु केले.

संपूर्ण महाराष्ट्रात अनेक आरोग्य विषयक कार्य शाळा घेतल्या. हे सर्व कार्य करुनही कुठे तरी माझ्या मनाच्या कोपऱ्यात नाराजी होती. मधून मधून माझे पी.जी. राहिले आहे, हे आठवायचे. माझे बाबा, आई, डॉ. प्रशांत यांच्याशी पण मी या विषयावर कळवळीने बोलायची. पण सर्व जण म्हणायचे… नको मुलं खूप लहान आहेत, तुझी प्रॅक्टिस चांगली आहे, तुझे, मुलांचे हाल होतील… नको करु पी.जी. मी पण माझी मनापासून असलेली तीव्र इच्छा घरच्यांसमोर व्यक्त करायला कुठे तरी कमी पडत होते. मला ही वाटायचे मला नाही जमणार. पण एकदा माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ सर, त्यांच्या गगनभरारीसाठी माझी मुलाखत घ्यायला आमच्या घरी आले होते. ही मुलाखत माझ्या आयुष्याच्या या वळणावर खूप महत्वाची ठरली. त्यांनी मला विचारले, डॉक्टर तुम्हाला एवढे पुरस्कार मिळाले, तर तुमचं पदव्युत्तर शिक्षण कशामध्ये झाले आहे ? कोणीतरी माझ्या मर्मावर बोट ठेवल्यासारखे मला वाटले. जी सल माझ्या मनात खूप दिवसापासून होती त्यावरच आज बोलल्या गेले होते. मी म्हटले, “सर माझी खूप इच्छा होती पण लग्न लवकर झाल्यामुळे स्वप्न अपूर्ण राहीले.मी स्त्री रोग विषयात पहिली आले होते. पण पुढे सांसारिक आणि हॉस्पिटलच्या जबाबदाऱ्यांमुळे शक्य झाले नाही मला”. तेव्हा सर म्हणाले, मग आता करा की मॅडम तुम्ही पी.जी., काही हरकत नाही. ते हे सांगताना माझे पती डॉ. प्रशांत देखील होते. त्यांनी पण हा सवांद ऐकला आणि प्रशांत यांना पण जाणवले की आपण खरंच काही तरी करायला हवे. ते मला म्हणाले, तुझी खूपच इच्छा आहे तर बघु यात आपण तुझा नंबर लागतो का कुठे ? फक्त तु अभ्यास करायची तयारी ठेव. मी पण विचार केला की आपण प्रयत्न तर करुन बघु यात.

पदव्यूत्तर शिक्षण घेण्यासाठी आधी आपल्याला पी जी ची वैद्यकीय प्रवेश परीक्षा पास व्हावी लागते. मी या परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास केला. मुंबईला जाऊन मी ती परीक्षा दिली. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यासोबत होते. मी मात्र एकटीच होते. त्यात मी ओळख पटविण्यासाठी लागणारे आधार कार्ड मी सोबत नेले नव्हते, त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये मला प्रवेश दिला गेला नाही. खूप टेन्शन आले. माझे तब्बल पंधरा मिनिट वाया गेले होती. एक क्षण असा होता की आता परीक्षा न देता मला पुन्हा नगरला माघारी जावे लागते की काय ? खूप टेन्शन आलं होत मला. माझी अवस्था बघुन गेट वरील सर म्हणाले की , कोणाला तरी घरून बोलवा मॅडम! पटकन आधार कार्ड मागवून घ्या. मी म्हणाले “सर मी अहमदनगर वरुन आले आहे, खूप दुर आहे येथून. मग पटकन मला आठवले की माझ्या पर्समध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आहे. मी त्यांना लगेच विचारले , सर ड्रायव्हिंग लायसन्स चालेल का तुम्हाला ? ते हो म्हणाले. मला खूप आनंद झाला आणि परीक्षेच्या हॉल मध्ये अर्धा तास उशिराने का होईना प्रवेश केला.

पहिल्याच प्रयत्नात मी पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा पास झाले आणि मला एम एस ( जनरल सर्जरी ) प्रवेश मिळाला. परंतु या पुढेही माझ्या पुढे अनेक आव्हाने उभी राहिली. प्रवेश घेण्यासाठी दहावी, बारावीची मार्कशीट आणि पदवीच्या सर्व वर्षांच्या मार्कशीट पाहिजे होत्या . एवढ्या वर्षात आम्ही अनेक वेळा घर बदलले होते .त्यामुळे सर्व कागदपत्रे गहाळ झाली होती. खरं तर मी ती सर्व व्यवस्थित ठेवली होती. पण कुठे हरवली ते समजलेच नाही. पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन १७ वर्ष झाली होती. मी पुणे विद्यापिठातून पदवी मिळविली होती आणि आत्ता सर्व आरोग्य शाखेसाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ झाले होते. त्यामुळे मायग्रेशन सर्टिफिकेट पाहिजे होते. हे सर्व सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कमीत कमी तुमच्या कडे झेरॉक्स प्रत तरी पाहिजे, म्हणजे त्यावरील नंबर पाहून ओरिजिनल कागदपत्रे मिळविता येतात. पण माझ्याकडे झेरॉक्ससुद्धा नव्हत्या. मी कधी बोर्ड आणि पुणे विद्यापीठ बघितलेसुद्धा नव्हते. पुन्हा सर्व जण म्हणाले, खूप अवघड आहे कागदपत्रे मिळविणे. हा विषय सोडुन दे तु. शेवटी मी पुणे विद्यापीठ गाठले. एक ओळखीतील व्यक्ती तिथे भेटली. त्यांना कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया विचारली. तेव्हा ते म्हणाले, काय मॅडम झेरॉक्स कॉपी तरी हवी ना? कसे काय शोधायचे आम्ही? मग त्याच व्यक्तीने मला कॉलेजशी संपर्क साधून बैठक क्रमांक शोधायला सांगितला.

मग मी पुन्हा अहमदनगरला आले. दहावीची शाळा, बारावीचे कॉलेज आणि पदवीचे कॉलेज सर्व ठिकाणी मुख्याध्यापकांना विनंती पत्र लिहिले आणि तिथे जाऊन, ऑफिसमध्ये प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली. सर्वांनी माझी तीव्र इच्छा बघुन मला मदत केली. अनेक कागदपत्रांचे गठ्ठे उघडून माझा बैठक क्रमांक शोधला. मग मी पुन्हा पुणे बोर्ड आणि विद्यापीठ गाठले आणि साधारणपणे महिन्याभरात सर्व कागदपत्रे मिळविले. एम. एस.च्या प्रवेशासाठी मी अनेक गोष्टी पहिल्यांदाच हिमतीने केल्या. कधीही घर न सोडणारी मी पुणे – मुंबई चा प्रवास एकटीने करु लागले. म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडतो. महाराष्ट्रात माझा नंबर लागला नाही तर कर्नाटकात पण जाण्याची मी तयारी ठेवली होती . पण सुदैवाने राहुरीच्या संत विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद कॉलेजला माझा नंबर लागला.

सर्व घराची, पेशन्टची जबाबदारी सांभाळून एम एस करणे खूप जड जात होते. पहिल्या वर्षी रिसर्च आणि मेथोडोलॉजी विषय खूप अवघड होता. पण नियमितपणे अभ्यास करुन पहिल्याच प्रयत्नात मी तो सोडविला. एम. एस.च्या तीन वर्षात मी लग्न, कार्य, सोहळे हे कार्यक्रम एकदम कमी केले. हॉस्पिटल, घरची जबाबदारी सांभाळून माझे लक्ष जास्तीत जास्त अभ्यासावर केंद्रित केले. मी शेवटच्या वर्षाला असताना माझी मुलगी बारावीला होती. तिला पण मी अभ्यासाला बसवत होते आणि तिच्या सोबत मी पण अभ्यास करत होते. कोरोनामुळे परीक्षा सारखी पुढे जात होती. नंतर तर अभ्यास करण्याचा खूप कंटाळा यायला लागला होता. कोरोनामुळे घरातील कामाला कोणी मदतनीस मिळत नव्हती. हॉस्पिटलच्या वरच रहात असल्यामुळे घाबरुन कोणी यायलाच तयार नव्हते. शेवटी परीक्षेच्या आधी माझी आई आली. आईची मला खूप मदत झाली. मला मानसिक आधारही मिळाला होता. कारण कधी कधी मला खूप खचल्यासारखे व्हायचे.

चाळीशी पार केल्यामुळे खूप वाचन केले की, माझे डोळे खूप दुखायचे. शेवटी डोळे तपासले तर नंबर लागला होता ! मग चष्मा लावून अभ्यास सुरु केला. पण सुरुवातीला सवय नसल्याने त्याने पण डोकं दुखत होते. त्यात परीक्षेच्या आधी २ महिन्यापूर्वी कोरोनाची लागण होऊन मी स्वतःच आजारी पडले होते. जेवण अजिबात जात नसल्याने खूप अशक्तपणा आला होता. मला प्रचंड थकवा, अंगदुखी, नैराश्य जाणवत होते. पण पुन्हा एकदा मी फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आणि सगळ्या संकटावर मात करीत मी शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली.आनंदाची गोष्ट म्हणजे मी एवढा अभ्यास केला होता की, प्रश्न परीक्षेतील सर्व प्रश्नांची उत्तरे मला येत होती. शेवटी लग्नानंतर २० वर्षांनी मी माझे स्वप्न पुर्ण करु शकले. इच्छा असेल तर अशक्य असे काहीच नाही, तुमच्यासाठी सर्व शक्य होते याचा प्रत्यय मला या निमित्ताने आला…

माझी आई,पती डॉ. प्रशांत, मुलं -दुर्वा आणि अंकुर, माझे काका, काकु, सासु बाई -सासरे, सर्व नातेवाईक, धन्वतरीं देवता, माझे वडील, गुरुजनांचे आशीर्वाद, आणि तुमच्यासारख्या सर्व व्यक्ती माझ्या सोबत आहेत. या मुळेच मी हे यश संपादन करु शकले…
– डॉ. शारदा निर्मळ – महांडुळे
एम एस ( आयु – जनरल सर्जरी – )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments