Wednesday, September 17, 2025
Homeयशकथाआनंदयात्री योगेश कासार

आनंदयात्री योगेश कासार

अथक प्रयत्नांची कास व जोडीला आत्मविश्वास असेल की जग देखिल जिंकता येते.जीवनाच्या वाटेवर कितीही काटे असले तरीही ते पार करत एक दिवस सुंदर फुलांनी अंथरलेला गालिचा आपली वाट पाहत असतो. या सर्व गोष्टी सिद्ध करून दाखवणारे आजचे हे आनंदयात्री, यशस्वी युवा उद्योजक म्हणजे नाशिक येथील श्री योगेशजी कासार, ज्यांनी ही काटेरी बोचणारी वाट पार पाडत यशाचे शिखर गाठले.

वडील श्री यादवराव रघुनाथ कासार व आई मिराबाई यादवराव कासार यांचे सुपुत्र श्री योगेश यादवराव कासार यांचा जन्म नंदुरबार येथे १०, फेब्रुवारी १९७२ रोजी झाला.

शालेय शिक्षण नंदुरबार येथील शाळेत झाले. पुढे एफ. वाय. बी. ए.ला ऍडमिशन घेतली मात्र घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शिक्षण मधेच सोडून नोकरी करावी लागली. दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण होते. घरात आई, वडील व लहान भाऊ अशी जबाबदारी त्यांच्या वर होती.
नंदुरबार येथे एका दुकानात तीनशे रुपये महिन्याला ते काम करत होते पण त्यातून घरचा खर्च भागत नव्हता.

स्वतः काहीतरी करावे हा विचार करून योगेशजींनी नाशिक येथे जाण्याचे ठरवले. त्या वेळी ओझर बस स्टॉप वर अक्षरशः वडा पाव खाऊन दोन दिवस काढले. पुतणीच्या घरी देखील सात दिवस काढले पण मुळातच स्वाभिमानी स्वभाव असल्याने अडगाव येथे सहा बाय सहा ची एक खोली भाड्याने घेऊन ते रस्ते खोदण्याचे काम करू लागले. पत्नी सौ. वनिता योगेश कासार गरोदर असून देखील कामात मदत करत होती, कारण दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ते दिवस खूप कठीण होते. कोणाचीही मदत मिळत नव्हती. तीन महिन्यांचे खोलीचे भाडे देखील थकले होते.

हातात काहीही नसताना नवीन ठिकाणी येऊन नव्याने सुरवात करणे खरच खूप कठीण असते. अनेक वेळा पुन्हा गावी जाण्याचे विचार ही मनात येत होते पण पत्नीने खचू दिले नाही. तिची खंबीर साथ होती व तिला आपल्या पतीवर त्याच्या कर्तबगारीवर विश्वास ही होता जो योगेशजींना सार्थ ठरविला.

चौधरी यात्रा कंपनीची जाहिरात पाहिली. यात्रा दर्शन पेपर वर एका घरचा पत्ता लिहिला की पाच पैसे लिहिण्यासाठी मिळत. असे दोघे पती पत्नी मिळून दिवस रात्र एक करत १६०० पत्ते लिहत असत. त्या वेळी पोस्ट कार्ड वर लेखी स्वरूपात यात्रा कंपनीचा मजकूर जो बावीस ओळीचा असे ते लिहिण्यासाठी साधारण एका पोस्ट कार्ड साठी २५ पैसे मिळत असे हे काम त्यांनी दोन वर्षे केले.

योगेशजींच्या कामातील प्रामाणिकपणा, चिकाटी व कष्ट पाहून चौधरी यात्रा कंपनीचे पोस्टल डिपार्टमेंट मॅनेजर गिरधारी सिंग यांनी विचारपूस करून योगेशजीना आर्थिक मदत केली. चौधरी यात्रा कंपनी चे मालक श्री चतुर्भुज चौधरी यांनी कामावर ठेवून घेतले. महिन्याला ८०० रुपये व जाण्या येण्यासाठी खर्च देखील ते देत होते. त्यावेळी त्यांनी पडेल ती कामे केली. अनेक दिवस आचारीच्या हाताखाली देखील काम केले.

योगेशजी यांचे काम पाहून मालकांनी तीन दिवसांच्या कोकण टूर्सची जबाबदारी सोपवली. कोणताही अनुभव नसताना देखील टूर्सचे आयोजन व नियोजन छान केले. त्यामुळे मालक खूप प्रभावित झाले व त्यांची बढती होऊन टूर्स मॅनेजर ची पोस्ट दिली. त्यावेळी महिन्याला २५०० रुपये मिळू लागले.

आई, वडील व लहान भाऊ गावी असल्याने महिन्यातून एकदा तरी घरी जाऊन त्यांची विचारपूस करून १००० ते १२०० रुपये देत होते.

असेच एकदा गावी गेले असतानाची एक अविस्मरणीय गोष्ट, जी आजही त्यांच्या मनात घर करून आहे. त्यावेळी आईने त्यांना जेवायला वाढले होते. योगेशजींनी आईला त्यांच्या सोबत जेवण्याचा आग्रह केला. मात्र तू आधी जेव मी, नंतर जेवते असे म्हणत त्यांना पोट भर जेवू घातले. नंतर निरोप घेऊन ते घराबाहेर पडले. थोडे पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचे पाकीट ते घरी विसरले आहेत. त्यामुळे पुन्हा घराची वाट धरली तेव्हा जे काही दिसले ते निश:ब्द करणारे होते. त्यांचे डोळे पाणावले कारण आई राहिलेल्या भातामध्ये पाणी व तिखट मीठ घालून तो खात होती. हिच आईची माया असते जी मुलांना नेहमी पोट भर खाऊ घालून उरलेले जे काही तिच्या वाट्याला येईल ते खाऊन पोट भरते. या माउलीने आजपर्यंत खऱ्या परिस्थितीची जाणीव कधीही मुलाला होऊ दिली नाही. त्यावेळी लहान भाऊ देखील परिस्थिती बिकट असल्याने शिकू शकला नाही.

हे सत्य पाहून योगेशजींना खूप वाईट वाटले. मात्र त्यांनी मनात एक निर्धार केला की आता स्वस्थ बसायचे नाही ! हा निर्णय घेऊन डोळेपुसत ते घरा बाहेर पडले. मालकांशी बोलून नवीन काम देण्याची विनंती केली व घरी घडलेला प्रकार ही सांगितला. मालक मोठया मनाचे व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी योगेशजींना टूर्सचे बुकिंग डिपार्टमेंट मध्ये काम दिले. सर्व माहिती दिली. मार्गदर्शन केले व व्यवसायातील सर्व बारकावे देखील शिकवले. अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे हुशार केले. ते आर्थिक मदत ही वेळोवेळी करत होते. त्यावेळी योगेशजी दिवसरात्र एक करून काम करत. शाळेच्या टूर्सचे नियोजन, लग्नसराईच्या गाड्या व इतर सर्व टूर्स ची जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली. मालकांचा त्यांच्यावर व त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास होता जो त्यांनी सार्थक केलाही.

पुढे २००७ साली मालकांच्या मुलाने म्हणजे, श्री राम गोपाल चौधरी यांनी त्यांना स्वतःचे घर घेण्याचा आग्रह केला मात्र त्यावेळी पगार ११,००० तर भाडे २५०० व घरचा खर्च ही होता. त्यामुळे आर्थिक गणित बसत नव्हते. मालकांसारखे त्यांचे चिरंजीव मोठया मनाचे, उदार वृत्तीचे होते.स्वतः चार लाख रुपये डाऊन पेमेंट करून त्यांना हक्काचे घर मिळून दिले व जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा दे असे प्रेमाने सांगितले. तो क्षण ते कधीही विसरू शकले नाही. खरंच काही तर पुण्य पदरी होते म्हणून असे दिलदार व प्रेमळ माणसं त्यांना मिळाली असे त्यांना वाटते.

पुढे काही वर्षे काम करून तीन मुलांचे शिक्षण व वाढता प्रपंच खर्च लक्षात घेऊन मालकांची परवानगी घेऊन स्वखुशीने नोकरीतून निवृत्ती घेतली. मालकांचे ऋण, त्यांनी केलेले सहकार्य ते आजही विसरू शकले नाही. आजही ते त्यांच्या संपर्कात आहेत. मालक आज देखील त्यांची विचारपूस करायला व त्यांच्या घरी जेवायला येतात.

योगेशजींनी २०१३ साली स्वतःची श्री.साई बालाजी यात्रा कंपनी सुरू केली. ओझर येथील कासार समाजाने मोलाची साथ दिली व आज जे काही करू शकलो, ते शक्य झाले समाजाच्या सहकार्यामुळे. त्यामुळे ते सदैव कासार समाजाच्या ऋणात आहेत व ते कधीही ऋणातून मुक्त होणार नाही असे प्रांजळपणे सांगतात.

आज जेष्ठ नागरिक सहल, शाळेच्या सहली, हनिमून टूर्स व इतर अनेक टूर्स वर्षभर सातत्याने चालू आहेत. वर्षातून अशा ४० ते ४५ टूर्स चे सुयोग्य आयोजन व नियोजन केले जाते. ज्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, दोन्ही वेळचा चहा, सकाळचा नाश्ता व दोन वेळचे स्वच्छ घरच्या सारखे जेवण दिल्या जाते. सध्या त्यांची स्वतःची एक गाडी आहे. अनेक टूर्स या विमानाने व रेल्वेने देखील असतात. प्रत्येकाला लागणाऱ्या सोयीप्रमाणे देखील टूर्स आखून दिल्या जातात.

श्री साई बालाजी यात्रा कंपनी यांच्या अनेक टूर्स जशा की चारधाम यात्रा, कैलास मानस सरोवर, त्रिस्थळी काशी गयासह, शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा, स्पेशल राजस्थान दर्शन, केरळ दर्शन, हैदराबाद दर्शन, काश्मीर वैष्णोदेवी, म्हैसूर उटी, कुलू मनाली, लेह लडाख अशा एक न अनेक लहान मोठया यात्रा व सहली वर्षभर चालू असतात.

२०१६ साली अतिशय अल्प दराने म्हणजे केवळ ३५०० रुपयात त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठी काशी यात्रेचे नियोजन केले होते ज्यामध्ये केवळ गरीब कामगारांच्या
आईवडिलांचा समावेश होता. यात्रेची माहिती घरात व दुकानात जाऊन, मालकांशी बोलून देण्यात आली. त्यावेळी योगेशजी व त्यांचे सहकारी खूप फिरले.

शिक्षण संस्थेत देखील गेले. १२५७ जेष्ठ व्यक्तींनी या संधीचा लाभ घेतला. त्यावेळी योगेशजींना असा अनुभव आला की, या जेष्ठ लोकांकडे कपडे ठेवण्यासाठी बॅगही नव्हती. साध्या कापडी पिशवीत त्यांनी कपडे ठेवले होते. ही एक पिशवी त्यांची १२ दिवसांची सोबती होती. योगेशजींनी गरिबी स्वतः अनुभवली होती त्यामुळे या जेष्ठ व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान, आनंद पहाताना आनंदाश्रू तरंगले. हा अनुभव त्यांच्या साठी लाखमोलाचा होता. ज्यांना आपल्या आई वडिलांना एखाद्या यात्रेसाठी आर्थिक परिस्थिती अभावी पाठवता येत नाही त्यांच्यासाठी योगेशजींना खूप मोठी भेट दिली होती. कदाचित त्यांच्या आशीर्वादामुळे आज पर्यंत योगेशजी कर्जबाजारी न होता प्रत्येक संकटातून बाहेर पडू शकले. फक्त एकच खंत त्यांच्या मनात आहे की त्यांचे यशस्वी वाटचाल पाहण्यासाठी त्यांचे आई वडील नाही.

आज परमेश्वराच्या कृपेने सर्व काही आहे हे केवळ आई वडिलांच्या आशीर्वादामुळे व पत्नीच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास सुखकर होऊ शकला. कारण आयुष्याच्या वाटेवर आलेल्या प्रत्येक सुख दुःखाची वाटेकरी ही त्यांची पत्नी होती जी वेळोवेळी त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवत होती. कितीही संकट आली तरीही हार न मानता त्यांना हिंमत देत होती असे योगेशजी आवर्जून सांगतात.

समाजात काम करायला योगेशजींना नेहमीच आवडते. तरुण वर्गाला समाज कार्यातफारसा रस नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी इंडियन आयडॉलच्या धर्तीवर “कासार आयडॉल” ही कल्पना योगेशजींना सुचली जेणे करून कासार समाजाचा तरुण वर्ग बाहेर पडेल व समाजात सक्रिय सहभाग घेईल.

श्री केशव कुंभकर्ण यांचा ऑर्केस्ट्रा असल्याने त्यांच्याशी संपर्क करून पुढे महिला अध्यक्षा स्मिताताई धारूरकर, अमरावतीचे मनीष चुटके व स्वतः योगेशजींच्या पुढाकाराने व समाजाच्या सहकार्यामुळे २०२० साली कासार आयडॉल ची घोषणा करण्यात आली. ऑडिशन घेताना परिक्षक बाहेरचे घेतले जेणे करून कोणावर अन्याय होऊ नये व योग्य व्यक्तीची निवड व्हावी. यास अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातुन १९८ नावांची नोंदणी झाली. त्यातून २६ मुला मुलींची निवड करण्यात आली. कोरोनाच्या महामारीमुळे स्पर्धा पुढे घेण्यात आली. सर्व नियम पाळून २० फेब्रुवारी २०२१ रोजी नाशिक येथील परशुराम नाट्यगृहात उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

त्यावेळी लहान व मोठया गटातून प्रत्येक तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामुळे युवावर्ग समाजात ओढला गेला. आता कासार आयडॉल २ करण्याचा त्यांचा मानस आहे व तशी तयारी देखील सुरू झाली आहे. अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ३४३ स्पर्धकांची नोंद झाली आहे. ३० एप्रिल २०२२ ही अंतिम तारीख असल्याने अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

योगेशजींना पर्यटनाची खूप आवड आहे. त्यांनी २०२० साली भारत नगर जेष्ट नागरिक संघाची स्थापना केली, ज्यामध्ये ३४८ सदस्यांनी नोंदणी केली आहे. त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रम आखले जातात.आरोग्य शिबीर घेतले जाते. अनेक स्पर्धांचे आयोजन व पुरस्कारांचे कार्यक्रम देखील होतात जेणे करून त्यांचे मनोबल वाढेल. एक सकारात्मक ऊर्जा मिळेल व काही प्रमाणात का होईना त्यांचा एकटेपणा कमी होऊ शकेल.सध्या तरी महानगरपालिकाकडून भाडे तत्वावर जागा घेतली आहे.अनेक दाते सढळ हाताने मदत ही करतात.घरातील नको असणाऱ्या टेबल खुर्ची व इतर काही गरजेच्या वस्तू समाजाला देण्याचे आव्हान करण्यात आले. त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला.

योगेशजींची पत्नी अतिशय साधी आहे. जे काही आहे त्यामध्ये अतिशय संतुष्ट व आनंदी आहे.त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे.

योगेशजी युवकांना असा संदेश देतात की आई वडिलांना कधीही दुरावू नका .कायम त्यांची सेवा करा. त्यांना अंतर देऊ नका कारण आई वडिलांचे ऋण मुलं आजन्म फेडू शकत नाही हेच एक अंतिम सत्य आहे. तरुणांनी नेहमी समाजात सक्रिय सहभाग घ्यावा जेणेकरून नवीन ओळखी होतील व समाजाच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळेल व त्यांच्या कला गुणांना न्याय ही मिळेल.

असे हे योगेश कासार ज्यांनी एक वेगळी वाट निवडून स्वबळावर, जिद्दीने स्वतःला सिद्ध केले व स्वतःची समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य कौतूकास्पद आहे. अनेक लोकांना निसर्गाच्या सानिध्यात आनंद देण्याचे मोलाचे काम ते करत आहे. त्यांच्या भावी योजनांसाठी अनेक शुभेच्छा.

रश्मी हेडे.

– लेखन : रश्मी हेडे. सातारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. योगेश यांचा लेख खुप प्रेरणादायी आहे, आजचा युवा वर्गासाठी हे खुप गरजेचे आहे हे समजुन घेणे आवश्यक आहे,
    रश्मी जी पुन्हा एकदा उत्तम लिखाण आणि चोख मांडणी बद्दल मनस्वी अभिनंदनस आपण पात्र आहेत,,,💐💐

  2. “आनंद यात्री योगेशजी कासार नाशिक” हा सौ रश्मी उल्हासशेठ हेडे सातारा यांनी लिखानबद्ध केलेले जीवन संघर्षाचे लिखाण आताच वाचले अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुद्धा न डगमगता खास करून त्यांच्या पत्नीने व आई वडिलानी जे त्यांना संघर्षातून यश मिळविण्याकरिता धैर्य दिले तेही वाखाणण्यासारखे आहे खास करून या लिखाण करीता, आत्मकथानाकरिता स्वतः व्यक्त होण्याकरिता लेखिका जी युक्ती वापरते तीच वाखाणण्यासारखी आहे ,लिखाण उत्तम आहे असेच उत्तमलिखाण होवो एवढीच आमची महाकालिका माते कडे प्रार्थना

  3. 💦 रश्मी ताई….
    माननिय श्री. योगेश कासार…..

    यांचा हृदयस्पर्शी परिचय, आपल्या लेखणीतून उतरलेल्या लेखा साठी काय प्रतिक्रिया द्यावी ? हा लेख हा परिचय वाचतांना हृदय हेलावून जाते. योगेश जी माझे नातलगच आहेत. तरी पण.. त्यांच्या प्रत्येक कार्यात यश लाभो. हि मनापासून शुभेच्छा..🎉
    तसेच माननिय श्री. देवेंद्र जी यांचे ही आभार. रश्मी ताई.. आपल्या लेखणीस दाद द्यायलाच पाहिजे. उत्कृष्ठ शब्दात परिचय देणे. हे कौशल्य… अंधारातील व्यक्तींना सतत उजेडात आणण्यासाठी उपयोगी पडावे.
    अभिनंदन व शुभेच्छा..🎉

    – सुभाष कासार.
    नवी मुंबई….💦

    🙏🌹🙏

  4. सततची धडपड, जिद्द ,घेतलेली मेहनत आणि मनातील आत्मविश्वास या जोरावर योगेश कासार यांनी जीवनात मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं