प्रसिध्द साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या विमलताई गाडेकर यांच्याविषयीच्या त्यांच्या साहित्यिक कन्या अर्चना शंभरकर यांनी जागविलेल्या या काही हृद आठवणी…..
विमलताई गाडेकर यांनी शारिरिक दृष्ट्या या जगातून निरोप घेतला त्याला आता एक महिना होईल. या एका महिन्यात अनेक लोकांनी फोन केले. आम्हाला माहित नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या आईबद्दल लोकांनी सांगितल्या .
विमलताई गाडेकर यांना आपण अत्यंत जवळून ओळखत होतो, त्यांच्या कार्याचा प्रवास आपण अत्यंत जवळून अनुभवला आहे असं सांगणाऱ्या त्यांच्या मैत्रिणींनी त्यांच्या विषयी वेगळी वेगळी माहिती दिली . यावरुन विमलताई गाडेकर ही व्यक्तीच नव्हे तर एक संस्था होती असं म्हणने चुकीचे ठरणार नाही.
विमलताई गाडेकर या केवळ प्रेम कविता लिहीतात असा आरोप काही तत्कालिन साहित्यिकांनी त्यांच्यावर केला होता. त्यात नुकतेच निधन झालेले लेखक विचारवंत विरा साथिदार यांच्या सोबत झालेले तात्विक भांडण त्यांच्या मैत्रिणीने, श्रीमती सुलभा शिरसाट यांनी सांगितले. विरा साथिदार यांना ‘तुम्हाला माझी कविता कळली नाही’ असे विमलताईंनी ठणकावून सांगितले. विमलताईंची कविता वरकरणी प्रेमाची कविता वाटत असली तरी त्याला वेदनेची किनार आहे. कोणत्याही व्यक्तीच्या मनातील भाव मांडण्यासाठी जणू त्या परकाया प्रवेश करुन कागदावर उतरवत असत. कवितेत त्या कधी पावसाला दटावत असत..
‘तुझे आहेत दिवस
हवा तेवढा बरस
थेंबानंही मागे उरु नकोस
पुन्हा तिच्या डोळ्यात दिसू नकोस’
तर कधी निग्रहाने लिहायला जातात दुसरी व्यक्ती बनुन आणि तरिही लिहितात,
‘स्वताःसाठी नाही
आता तिच्यावर लिहायचे
दुनिया फिरले तरी
तिने काय माझ्यातच असायचे?’
शब्दांच्या आधाराने स्मृद्धीत जगणाऱ्या विमलताई गाडेकर. शेवटी तर त्यांनाही प्रश्न पडू लागला होता
‘शब्दात असायची
मग काळजात आली
आता तुझा पत्ता काय?
माझी ओळख हरवली’
साहित्यिक म्हणून विमलताई आपल्या एका शब्दाचीही खाडाखोड सहन करित नव्हत्या. त्यांच्या कवितांवर त्या दुसरा हाथ देखील फिरवत नसायच्या. श्वास घ्यावा इतक्या सहजतेने शब्द त्या कागदावर उतरवायच्या. त्यांना चालता बोलता कविता सुचायची. शब्द तर एवढे चपखल वापरायच्या की त्यांच्या कवितेवर एकाही संपादकाची कात्री फिरवायची हिम्मत होत नसे.
चंद्रपूरला आल्यानंतर प्रा सुरेश द्वादशिवार आणि प्रा. विमलताई गाडेकर ह्या सोबत एकाच महाविद्यालयात नौकरी करीत होते. डाॅ. जया द्वादशिवार मॅडम विमलताईंच्या अत्यंत जवळची मैत्रीण झाल्या होत्या. कवितेत नव्याने शिरकाव करणाऱ्या एका नवकवीला डाॅ. द्वादशिवार मॅडमने मुद्दाम सांगितले, ‘गाडेकर मॅडमला भेटून ये. त्यांची भाषा ऐक, मग कविता लिहायचा विचार कर.’
व्यवसायाने प्राध्यापक असल्याने आणि सामाजिक कार्यकर्ता व आंबेडकरी विचारवंत म्हणून राष्ट्रीय स्तरावरून विचार व्यक्त करतांना अस्खलित इंग्रजीतुन बोलणाऱ्या विमलताई सहज साधं बोलतांना आवर्जून मराठी शब्दांचा वापर करत. ‘माझा मुलगा ‘चित्रपटात’ काम करतो’, ‘मला महाविद्यालयात जायचे आहे’. ‘परस्पर सामंजस्याने प्रश्न सोडवा’.. अशा प्रकारची वाक्य त्या सहजतेने बोलत असत.
नागपूरला सुरेश भट, इतर काही नागपूरचे कवी आणि हृदयनाथ मंगेशकर हे मिळुन भीम गितांची एकत्रित कॅसेट तयार करणार होते. आशा भोसले काही गाणी गाणार होत्या. त्यात विमलताई गाडेकर यांची
‘प्रकाश पर्वा सुर्यफुला तू..
भारत भू नंदना,
भीमा तुला शतकांची वंदना’
ही कविता त्यांच्या अंतिम यादीत होती. त्यातील काही शब्द बदलून द्या म्हणुन विमलताईंना सांगण्यात आले. माझा प्रत्येक शब्द योग्य आणि अचूक आहे. यात मी बदल करणार नाही असे त्यांनी खंबीरपणे सांगितले. हे गाणे त्या कॅसेट मध्ये आले नाही. मात्र नंतर इतर संगीतकारांनी आणि गायकांनी या गाण्याचे सोने केले.
सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे हे विमलताई गाडेकर यांचे तसे तर आधी पत्र, मित्र पण नंतर त्यांच्यात प्रत्यक्ष भेटी आणि त्यातून साहित्यावर विश्लेषणात्मक चर्चा होत असत. मुंबई दौऱ्यात वपु काळेंच्या साहित्य सहवास मध्ये ‘झपुर्झा’ इथे विमलताईंची भेट ठरलेली असे. वपु काळे यांनी त्यांच्या ‘वाट पाहणारं दार’ या पुस्तकाची पहिली प्रत विमलताईंना दिली होती.
कवी ग्रेस यांची मैत्री असावी अशी लालसा कोणताही संवेदनशिल कवी बाळगून असू शकतो. मात्र कवी ग्रेस हे गुरु पौर्णिमेला विमलताईंना फोन करून वंदन करित असत. ही बाब त्या दोघांपुरती खासगी होती. कवी ग्रेस पुण्याला दवाखान्यात भरती असतांना शेवटपर्यंत संपर्कात होते.
चंद्रपूरला अनेक साहित्यिक एकत्रित येऊन अनेक साहित्यिक उपक्रम करित असतात. त्यातीलच ‘एक वार- कवी वार’ या उपक्रमांतर्गत विमलताईंच्या कविता सादर झाल्यानंतर त्यांच्या कवितांचे टिपण घेऊन दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमात उपस्थित एक रसिक भेटायला आले. विमलताईंनी कवितेत वापरलेल्या नाविन्यपुर्ण शब्दांचे अर्थ त्याने केवळ विचारुन घेतले नाही तर लिहूनही घेतले.
बाबासाहेबांवरच्या कविता, महिलांच्या वेदना किंवा देशप्रेमाची कविता विमलताई गाडेकर या आपल्या लेखणीतून हळूवार शब्दांसह नेमकेपणाने भावना व्यक्त करित असत. साहित्याच्या क्षेत्रातील विदर्भात तरी विमल गाडेकर या बाप माणूस म्हणाव्या लागतील.मात्र त्यांच्या लिखाणातील भावना आईच्या हृदयातून बाहेर पडल्या आहेत. प्रत्येक शब्दाला मातृत्वाचे कोंदण लाभत असल्याने त्या खरे तर साहित्याच्या प्रातांतील ‘आई- माणूस’ आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल रसिक म्हणून आम्ही कृतार्थ आहोत.
– लेखन: अर्चना शंभरकर.
-संपादक: देवेंद्र भुजबळ.9869484800.
खूप छान संकलन आणि मांडणी
खूप हृद्य संस्मरण. समर्पक शब्दांकन. 💐🙏❤