Homeलेखआमचे चुकलेच…

आमचे चुकलेच…

जे कृष्णमूर्ती यांच्या एका पुस्तकातलं विधान आहे, ”जगात जो काही धुमाकूळ सुरू आहे, अराजकता माजली आहे, अशांततेचं वातावरण आहे, त्याला वडीलधारी, स्वतःला शहाणी म्हणवणारी मंडळी कारणीभूत आहेत”. त्यात आमच्यासारखी शिक्षक, प्राध्यापक ही बिरूद मिरवणारी मंडळी देखील आलीत. कारण आम्ही आमचे संस्कार करण्याचे, उत्तम वागण्याचे धडे गिरविण्याचे स्वतःचे कर्तव्य नीट बजावले नाही. आम्ही चुकलो. पावलोपावली चुकत आलो. आमचे लक्ष भलतीकडेच केंद्रित राहिले. उत्तम अभ्यासक्रम, कडक परीक्षा, त्यात उत्तम मार्क्स, श्रेणी.. पदव्याची प्रमाणपत्रे या भोवतीच आमची शिस्त, आमची शिकवण, आमची गुणवत्तेची मापं फिरत राहिली. माणूस म्हणून आपण आधी माणसासारखे वागायला शिकले पाहिजे यावर भर दिलाच नाही. आपण वेगळ्याच गोष्टीना महत्व दिले, देत राहिलो. त्यामुळे स्पर्धा वाढली. एकमेकांविषयी द्वेष, मत्सर भावना वाढली, दुसऱ्याला खाली खेचल्याशिवाय आपल्याला वर चढता येणार नाही असा समज निर्माण झाला. समाजात तेढ निर्माण झाली.. जाती धर्माच्या पोलादी भिंती उभारल्या राजकारणी पुढाऱ्यांनी.. ज्यांना आपणच निवडून दिले त्या नेत्यांनी. बघता बघता कार्यकर्त्यांचे नेते झाले. ज्यांना निवडून देणे आपल्या हातात होते, आहे त्यांच्याच हातचे आपण खेळणे झालो. तेच नाचवायला लागले आपल्याला कठपुतलीसारखे ! आपला त्यांच्यावर काही कंट्रोल राहिला नाही. तेच आपल्यावर सत्ता गाजवायला लागले.

एकूण काय आपल्या वडीलधारी मंडळीचे सगळेच चुकले. ना आपण धड शिकलो ना आपण पुढच्या पिढीला नीट शिकवले. म्हणून काहीच नीट झाले नाही. सगळेच वाईट होत गेले.

आता एकमेकावर दोषारोपण करणे अधिकच सोपे झाले आहे. आम्हाला नावे ठेवता, पण तुम्ही काय केले, किती दिवे लावले हे आधी सांगा, हिशेब द्या असा प्रश्न विचारला की संपले. कर्तव्य निभावले. जबाबदारी झटकल्या गेली. म्हणजे पासिंग द बग .. एकमेकाकडे ढकलायचा दोष, आरोप..अन् आपले हात झटकायचे. हे पिढ्यान् पिढ्या चालत आलेले तंत्र मंत्र.. त्यातही संस्कार नीट केले नाही म्हणजे नेमके काय केले नाही, कुठे काय चुकले यातही मतभेद आहेतच. कारण काल परवाचे संस्कार, अन् आजच्या जेन झी वर करायचे संस्कार यात जमीन अस्मानचा फरक असणार हे आम्हाला कळलेच नाही. काळानुसार सारे काही बदलते हे आम्हाला मान्य नाही. नीती मूल्ये, संस्कार, ही तत्वे कशी बदलतील ? ती तर कालातीत असायला हवीत हा आमचा युक्ति वाद. त्याला विरोध करणे, प्रतिवाद करणे तसेही कठीणच. कालचे चांगले आज वाईट ठरते. कालचे नीती नियम आज कालबाह्य होतात.. हे कुणी कुणाला कसे समजवायचे हा प्रश्नही उरतोच.एकूण काय सगळाच गोंधळ आहे.

जे युद्ध करायला उठले ते सुशिक्षित आहेत. अणु बाँब, न्युक्लिअर शस्त्रे, मिसाईलस तयार करणारे विद्वान शास्त्रज्ञ आहेत. भ्रष्टाचार करणारे, अत्याचार करणारे देखील सुशिक्षित शहाणे आहेत. मोठमोठ्या पदव्या धारण करणारे आहेत. म्हणजे शिक्षणाचा, शाळा कॉलेजात जाण्याचा काहीच फायदा नाही ? काहीच पोझिटीव्ह इम्प्याक्ट नाही ? तसे दिसते खरे ! हे आजचे ढळढळीत सत्य आहे. पचायला कठीण असले तरी वास्तव आहे.
स्वातंत्र्य म्हणजे काय, लोकशाहीची आजची व्याख्या काय, संविधानाचे पावित्र्य काय, ते कसे जपायचे, कायदेच हातात घेऊन अनियंत्रित धुमाकुळ माजविणाऱ्या झुंडशाहिला कसे नियंत्रित करायचे, कुणी कुणाला नीतीचे धडे द्यायचे, शहाणपण शिकवायचे, कसे शिकवायचे हे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत.

थोडक्यात पुन्हा नव्या जे कृष्णमूर्तीची,नव्याने स्वामी विवेकानंदांची गरज निर्माण झाली आहे. खरे तर नव्याने महात्मा गांधीजी हवे आहेत, अन् डॉ बाबासाहेब देखील हवे आहेत आमचे कान धरायला, आम्हाला मार्ग दाखवायला. कारण आपण सत्याग्रह म्हणजे काय ते विसरलो, आपण संविधान देखील विसरत चाललो. त्यामुळे पुन्हा या महापुरुषांची, त्यांच्या शिकवणीची गरज निर्माण झाली आहे. नीती मूल्ये, संस्कार, संविधान यांचे पावित्र्य, महत्व बदलत नाही हे खरेच. पण भरकटत चाललेल्या पिढीला नेशन फर्स्ट, देशाची प्रतिष्ठा प्रथम, बाकी सगळे दुय्यम हे बिंबवणे,मान्य होणे तितकेच गरजेचे.हक्क अधिकार नंतर,आपली जबाबदारी, आपले राष्ट्र कर्तव्य प्रथम हे प्रत्येकाला कळले पाहिजे, वळले देखील पाहिजे.
हे संस्कार करण्यात, शिकवण्यात, आम्ही कमी पडलो, चुकलो हे जे कृष्णमूर्ती म्हणतात त्या प्रमाणे मान्य करायलाच हवे. इतरांचे माहिती नाही. मला ते मान्य आहे.मी चुकलोच.. कुठेतरी कमी पडलोच.. शिक्षक म्हणून.. पालक म्हणून.. कुटुंब प्रमुख म्हणून.. चुकलोच !!

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments