Homeलेखखिडकी : 6

खिडकी : 6

“वो बारिश का पानी….”

खिडक्या, घरांच्या, हॉटेलच्या, कारखान्याच्या, इतर मोठ्या मोठ्या इमारतीच्या, वाहनांच्या आणि मोबाईलच्या, या प्रत्येक खिडकीतून जे दिसतं ते बघायची सवयच आपल्याला लागली आहे. त्यातही खास करून मोबाईलच्या खिडकीतून स्क्रोल करून करून अजून काय काय बघता येईल याचा प्रयत्न आपण करत असतो. काही लोक मुद्दाम आपले आयुष्य लोकांनी जास्तीत जास्त बघावे म्हणून प्रयत्न करत असतात. रोज काही ना काही नवीन बनवून मोबाईलच्या खिडकीवर रिल्सच्या नावाखाली स्वतःचे आयुष्य पब्लिकली अवेलेबल करून देतात. तर इतर काही लोक अशा प्रकारे सहज दिसणारे बघत असतात. ज्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही अशा गोष्टी बघणे आणि दाखवणे यात आजच्या तरुण आणि मध्यमवयीन पिढीचा किती वेळ आणि ऊर्जा वाया जात असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
असो, आजच्या आपल्या खिडकीत मात्र मला दिसतोय तो पाऊस….
आणि हा असा तसा पाऊस नाहीये, यात आहेत काही आठवणी, पावसाच्या आठवणी….

लहानपणी शाळेत असताना मार्च महिन्यात शेवटी शेवटी परीक्षा संपायच्या. अगदी काही थोडके पेपर्स कधीकधी एप्रिल पर्यंत लांबायचे. पण ते देखील फार फार तर चार पाच तारखेपर्यंत संपायचे. मग वेध लागायचे ते गावी जाण्याचे. कसाही असला तरी आपला गाव आपल्याला आवडतोच. आमचे गाव म्हणजे विदर्भ! रणरण ऊन, संध्याकाळचा गरम चटका देणारा वारा ज्याला आमच्या विदर्भात ऊन्हाच्या झावा असे म्हणतात. अशाही परिस्थितीत परीक्षा संपली की आम्हाला गावी जाण्याची घाई असायची.

साधारण फेब्रुवारी महिन्यातच वडील पैशांची जुळणी करून रेल्वेचे तिकीट काढून आणत असत. ‘गीतांजली एक्सप्रेस’ काय शाही गाडी वाटायची ती त्यावेळी. तिचे आमच्या गावचे म्हणजे अकोल्याचे तिकीट मिळायचे नाही. पुढचे बडनेराचे तिकीट काढावे लागायचे. त्याचेही वेगळे कौतुक आम्हाला वाटायचे. वडील संपूर्ण मे महिन्याची सुट्टी घ्यायचे. त्यामुळे गावी जाण्याचा मुहूर्त हा मे महिन्याचा असायचा. तिकीट फेब्रुवारी महिन्यात यायचे, जेव्हा शाळेत वार्षिक परीक्षेचे वातावरण सुरू झालेले असायचे. त्यामुळे त्या टेन्शनच्या वातावरणात हे तिकीट आम्हाला एक दिलासा, एक आधार देण्याचे काम करायचे.
उन्हाने रणरण तापलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब जशी जादू करतात, अगदी तसेच ते वार्षिक परीक्षेच्या टेन्स वातावरणात गावी जाण्याचे तिकीट बघून आम्हाला वाटायचे. एप्रिल महिन्यात परीक्षा आटोपली की मग रोज कॅलेंडर बघून गावी जाण्याचे दिवस मोजण्यात मजा यायची.

आमची परीक्षा संपली की मग गावी जाण्याची खरेदी सुरू व्हायची. नवीन कपडे, चपला, टॉवेल, नातेवाईकांना कुणाला काही हवे असेल मुंबईहून तर त्या गोष्टी. अर्थात त्यामुळे गावी जाण्याचा एक छान माहोल तयार व्हायचा. मग यायचा प्रत्यक्ष प्रवासाचा दिवस, भल्या पहाटे उठून कल्याण स्टेशन गाठायचे. ही गाडी सकाळी सात वाजता असते, तेव्हाही हीच वेळ होती आणि आजही तीच वेळ आहे. तेव्हा वर्षातून एकदाच होणारा हा प्रवास खूप मोठा वाटायचा. कुठेतरी वेगळ्या जगात, देशात आपण जातोय असे वाटायचे. मग महिनाभर रणरण उन्हात मोठ्या माणसांचा ओरडा खात भटकणे, मैदानात किंवा गच्चीवर खेळणे सुरू असायचे. ओरडा हा आम्ही बाहेर उन्हात खेळू नये म्हणून असायचा. पण अख्या सुट्टीत एखाद्यावेळी तरी ऊन लागल्याशिवाय आम्हाला समज यायची नाहीच.

या सुट्टीतच 15 मे नंतर एखाद्या संध्याकाळी अचानक आकाशात ढगांची गर्दी दिसायची. आणि सोसाट्याचा वारा सुटायचा. हा मान्सूनपूर्व पाऊस असायचा. त्या तापलेल्या जमिनीवर थंडगार टपोरे थेंब पडल्यावर होणारा आवाज, आणि त्यानंतर त्या मातीतून निघणारी वाफ व मातीचा एक मनमोहक सुगंध…. आहाहा वातावरण मस्त होऊन जायचे.

एकदा दर्यापूर येथे बहिणीकडे असताना संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. तास दोन तास निसर्गाचे रौद्ररूप आम्ही अनुभवले. आजूबाजूच्या घराची कौले, पत्रे उडाली होती. कितीतरी वृक्ष उमळून पडली. आम्ही खिडकीतून अंधारात जितके दिसेल तेवढे बघत होतो. चमकणाऱ्या विजा जिवाचा थरकाप उडवत होत्या. असा अनुभव सरत्या उन्हाळ्यात आम्हाला यायचाच. पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून जैसे थे ऊन सुरू व्हायचे.

साधारण अर्धा मे संपला की मग मात्र आम्हाला पुन्हा मुंबईची आठवण येऊ लागायची. आज आश्चर्य वाटतं पण माझ्या लहानपणी खरोखर मुंबईला यावेसे वाटायचे. आज माझा अनुभव व भावना दोन्ही थोड्या बदलल्या आहेत. आज बरेचदा ‘गड्या आपला गाव बरा’ असे वाटते. पण नशीबाने मुंबई हीच माझी कर्मभूमी असल्याने आता इलाज नाही. पण असो, त्याकाळी मे अखेरीस आम्ही अगदी पुन्हा मुंबई बघायला आसुसलेलो असायचो.

दोन-तीन जून ला आम्ही परत निघायचो. तापलेल्या विदर्भातून जेव्हा ट्रेन नाशिकपर्यंत यायची तोपर्यंत उन्हाच्या झावा असायच्याच. नंतर मात्र इगतपुरी पर्यंत वातावरण पूर्णपणे बदललेले असायचे. जादूची कांडी फिरावी तसे वातावरण व्हायचे. अल्हाददायक वारा, शांत पावसाची संततधार आम्हाला फारच कमाल वाटायची. कारण पाऊस हा पाऊसच असला तरी तो कसा कोसळतोय त्याप्रमाणे मनात भाव निर्माण व्हायचे. वादळी वाऱ्यासह कोसळताना तो जीवाचा थरकाप उडवायचा आणि आता इगतपुरी ते कसारा दरम्यान संथ छान अलगद कोसळताना मनावर हळुवार मोरपीस फिरावे तसा आनंद व्हायचा. दोन्ही अनुभव अगदी भिन्न, परस्पर विरुद्ध !

जून महिन्यात इथे मुंबईत परतल्यावर जेव्हा शाळा सुरू व्हायच्या तेव्हा कोसळणारा पाऊस आणि त्याचा अनुभव हा अजूनच वेगळा असायचा. आम्ही मुंबईत असलो तरी त्याकाळी आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. तेव्हा उपनगरे ही गाव-खेड्यासारखीच होती. आम्ही तेव्हा डोंबिवली येथील काटई गावात राहायचो. तेथे जिल्हा परिषदेची एकच शाळा होती. पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट आणि खाकी झोळीसारखे दप्तर जे खांद्यावर एका बाजूने लटकवून आम्ही शाळेत जायचो. त्यावेळी रेनकोट किंवा छत्री हे श्रीमंतीचे लक्षण वाटायचे. आम्हाला मोठ्या प्लास्टिकची एक घोंगडी वडील आणायचे. ती डोक्यावर घेऊन मी व माझी मोठी बहीण आम्ही पावसात शाळेत जायचो. त्यावेळी शाळेत जातानाचा तो पाऊस अजूनच वेगळा भासायचा.

प्लास्टिकच्या घोंगडीवर पडणारे ते थेंब, त्यांचा टप टप होणारा आवाज, त्या गावातील गल्लीतून जाताना दोन्ही बाजूंच्या कौलारू घरांच्या छपरावरून खाली ओघळणारे पाणी, त्याचा एक वेगळाच विशिष्ट आवाज, हे सर्व आजही कानात जसेच्या तसे ऐकू येतात. ते अगदी कोरल्या गेले आहेत. शाळेत जाण्याच्या वाटेवर काही भाग शेतीचा, माळरानाचा होता. पावसाचे पाणी या शेतातून, माळरानातून वाहताना खळखळ असा येणारा आवाजही किती गोड वाटायचा. छोटे छोटे मासे खेकडे इकडे तिकडे फिरताना दिसायचे. शाळेला सुट्टी असली की आम्ही मुलं माळरानावर साचलेल्या डबक्यात मासे व खेकडे पकडायला जायचो. यात खेकडे पकडून त्याच्या नांग्यांना दोरी बांधून त्याला पाळीव प्राण्याप्रमाणे गावभर घेऊन भटकायला वेगळीच मजा यायची. याच माळरानावरील चिखलात लोखंडी सळई फेकून ती खोचण्याचा खेळही आमच्या वेळी लोकप्रिय होता. त्यासाठी सळई मिळवायला आम्ही खूप भटकायचो.

या सर्व आठवणीत माझी मोठी बहीण ही नेहमी सोबत होती. पाण्यात भिजत हिंडताना ती सतत माझी काळजी घ्यायची. शाळेत जात असताना प्लास्टिकच्या घोंगडीतून मी भिजू नये म्हणून ती माझ्यावर जास्त पांघरायची. सुट्टीच्या दिवशी चिखलात, शेतात फिरताना माझ्या मागे सतत असायची. मला कुठलीही इजा होऊ नये, मी कुठे पडू नये, म्हणून सतत मला सोबत करायची. ती पाठीशी आहे हे माहित असल्यानेच मी त्या पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायचो.

पावसाळा आजही येतो… आणि कदाचित तो अजूनही तसाच असतो. त्यात कदाचित बदलही झालेला नसेल. पण माझ्या बाबतीत काही गोष्टी आता बदलल्या आहेत. पावसात भिजणे मी सोडून दिले आहे. अगदी क्वचितच नाईलाजाने पावसाने मला गाठलेच, तर मी मक्खपणे अंगावर पाणी झेलत घरी परततो. कारण आज माझी ती बहीण माझ्यासोबत नाही. आज काही बाबतीत जग आणि समाज हा कुठेतरी कृत्रिम झाल्यासारखा वाटतोय. ज्या निरागस भावनेने आम्ही त्यावेळी बरसणाऱ्या धारांचा आनंद घ्यायचो, आज तसा अनुभव येत नाही.

आज जेव्हा खिडकीतून पाऊस कोसळताना दिसतो, तेव्हा दूरवर कुठेतरी मनातल्या कोपऱ्यात गाण्यांच्या काही ओळी उमटतात…
“ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो…
भले छिन लो मुझसे मेरी जवानी,
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन,
वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी…..
वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी…..”
क्रमशः

— लेखन : किरण आचार्य. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments