संत तुकाराम महाराज म्हणतात,
“भावबळे फल इच्छेचे ते |
अंतरीचे बीज जाणे कळवळा |
व्यापक सकळा ब्रम्हांडाचा ||”
आपल्या भावबळावर, उदात्त विचारसरणीने आणि आपुलकीच्या शब्दाने समोरच्याचे भावविश्व ओळखून त्यांना लीलया आपलंसं करणारे ओजस ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे श्री. महादेव गोविंद रानडे !
शिक्षणक्षेत्रात अनेकजण हिरीरीने झटून कार्ये करतात. पण श्री. महादेव रानडे हे शिक्षणक्षेत्रातील एक अग्रणी नाव ठरले कारण त्यांनी आपले वडील आदरणीय गोविंदराव रानडे यांचे शिक्षणक्षेत्रातील झपाट्याने व झपाटून केलेले कार्य जवळून पाहिले होते. त्याचा एक अमीट ठसा त्यांच्या व्यक्तित्वावर व कार्यावरही उमटला. ही शिक्षणाची पवित्र मशाल त्यांनी वडिलांकडून घेऊन ती जाज्वल्य देशभक्ती, शिक्षणावरील प्रेम व समाजसेवेची कास या सर्व गोष्टींसाठी ती जोमाने प्रज्वलित ठेवून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पसरवला.

बोरीवलीतील सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री. रानडे सर यांनी सन १९७० ते १९९७ या कालावधीत रिझर्व बँकेत सेवा केली. यानंतर वडिलांनी स्थापन केलेल्या या संस्थेत, शिक्षणक्षेत्रात कार्यरत होण्यासाठी त्यांनी सन १९९७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर या क्षेत्रात प्रचंड घोडदौड केली.

तब्बल २८ वर्षे त्यांनी संस्थेचे नेतृत्व केले व अनेक नवनवीन शैक्षणिक विभाग सुरू करून संस्थेचे नाव अजरामर केले. अद्ययावत क्रीडा सुविधांचीही त्याला जोड दिली. वडिलांनी सुरू केलेल्या संस्थेची गेल्या २८ वर्षात श्री. रानडे सरांनी प्रचंड प्रगती केली. चार शाळा, एक कनिष्ठ महाविद्यालय आणि आर्किटेक्चर पदवी महाविद्यालयाची स्थापना करून सुविद्या प्रसारक संघ खऱ्या अर्थाने ‘सुविद्येचे माहेरघर’ बनले. कुशाग्र बुद्धिमत्ता, सामाजिक कार्याची आवड आणि जमिनीशी घट्ट जुळलेली नाळ यामुळे सरांचे ओजस व्यक्तिमत्व सर्वांसाठी मार्गदर्शक बनले.

शैक्षणिक कार्यासोबतच रानडे सरांच्या लेखणीने तेजस्विता धारण केली आणि विपुल लेखन या लेखणीतून प्रसवले. याची सुरुवात संस्थेच्या सुवर्ण जयंती वर्षात इंग्लिश व मराठीतून अनुक्रमे ‘Golden Memoirs’ व ‘सुवर्णस्मृती’ ह्या ग्रंथांनी केली. श्री. जितेश धायवट यांच्या चित्रकारितेच्या साहाय्याने आदरणीय रानडे सरांनी ‘मोत्यांची जपमाळ’ या पुस्तकाचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून लेखन केले व करवून घेतले. घरात आध्यात्मिक व शैक्षणिक वातावरण असतानाच सरांना विद्यार्थीदशेपासूनच गीतेची गोडी लागली. याचेच पर्यवसान म्हणून पुढे सरांनी भगवद्गीतेवरील निरूपणात्मक पुस्तिका लिहिल्या. गीतेच्या ७०० पैकी २२५ श्लोकांचे यात त्यांनी सहजसोप्या शब्दांत अप्रतिम निरूपण केले. महाराष्ट्राच्या पारंपारिक श्रेष्ठ संतांच्या निवडक अभंगांचे श्री. रानडे सरांनी सर्वांना समजेल-उमजेल असे रसाळ पध्दतीने विवेचन केले व ते पुस्तकरूपात प्रकाशित केले. दोन विचारप्रवर्तक निबंधसंग्रहाची सरांनी निर्मिती केली.

समाजाच्या विविध क्षेत्रात एका उदात्त ध्येयाने-ध्यासाने कार्य करणा-या महाराष्ट्र भरातील व्यक्ती व संस्थांना सरांच्या अनुभवी व गुणग्राहक नजरेने हेरले आणि त्यांचे हात लिहिते केले. यात अनेक संस्थांच्या संचालकांनी सरांच्या फक्त शब्दाखातर लेख लिहिले आणि यातूनच सरांनी ‘देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती’ या बारा भाग मिळून 108 लेखरूपी जपमाळेची (लेखमालिकेची) निर्मिती केली. एवढेच नाही, तर समाज सेवाव्रतींचे राज्यव्यापी जाळे तयार केले.

शिक्षणकार्यातील निमग्नता व अविरतपणे लेखन करीत समाजाभिमुख राहणे, हाच जणू रानडे सरांचा ध्यास बनला आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, ऊर्जेलाही ऊर्जावस्था देणारे उत्साही व तेजोमय व्यक्तिमत्व श्री. महादेव गोविंद रानडे हे फक्त शैक्षणिक क्षेत्रातीलच महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व नाही, तर जिथे जिथे सरांचे अस्तित्व असते तिथे तिथे आपुलकीचा, प्रेमाचा, आनंदाचा झराच उत्पन्न होतो.
सरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्री. रानडे सरांना निरामय, निरोगी आयुष्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना व पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !

— लेखन : डॉ. सुचिता पाटील.
संचालिका, सर्वद फाऊंडेशन. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान लेख सुचिता ताई!👍💐
अभिनंदन रानडे महोदय!🙏🙏💐