“सुषमा, मी निघतो. तू आज जुईला पाळणा घरात सोडून, तुझ्या ऑफिसला जा. जरा लवकरच निघ, नाहीतर नेहमीची गाडी चुकेल बरं ! मी येतो. सांभाळून जा. जुई, टाटा !”
जुईचे मात्र सुरात रडणे चालू होते. सुषमा घरात आवराआवर करण्यात घाई करत होती. त्यामुळे जुईजवळ येऊन तिच्याशी लाडात बोलणे, सुषमाला अशक्यच होते. तिची बॅग भरून, स्वतःचा डबा भरून, स्वयंपाक घर नीट लावून, झाकून ठेवणे, गॅस बंद करणे, लाइट्स-नळ बंद करणे सारेच काम लक्षपूर्वक करणे भाग होते. सुरज एव्हाना निघून गेला होता. सुषमाचा हा नित्यक्रम चालूच असे. बिचारी सुषमा थकून जात असे. पण सांगणार कुणाला ? सूरज तसा त्याच्या कामात नेहमीच व्यस्त असे, पण रोज घराची आवराआवर करून जुईला पाळणाघरात सोडण्याचे काम, सूरज नियमित करत असे. पण आज त्याच्या महत्त्वाच्या सभेमुळे, जुईचे काम सुषमावर पडले होते. कामावरून येताना भाजीपाला, कधी किराणामाल घेऊन यावे लागत असे. दुपारी घरकामवाली बाई लादी पुसून, बेसिन मधील भांडी घासून जात असे. बाकी सारी कामे सुषमालाच करावी लागत असत.
कंटाळून एकदा सुषमाने विचारलेच. “सूरज आपण आई-बाबांसोबत राहिलो तर खूप बरे होईल ! जुईवर त्यांना लक्ष ठेवता येईल. त्यांचाही विरंगुळा होईल. तिच्याशी खेळून त्यांचा दिवस खूप आनंदातही जाईल. आपली धावपळ कमी होईल. जुईला आजी-आजोबांचे प्रेमही मिळेल.”
सूरजलाही हे सारे पटले. तोही या गोष्टीला तयार झाला. ती तर खूप आनंदित झाली. त्याला वाटले होते, सुषमाच या गोष्टीला तयार नसावी. वादविवाद होतील, म्हणून तो लग्नानंतर लगेचच कामाचे निमित्त सांगून, वेगळा राहू लागला होता. मनोमनी सुषमाला हे काही पटत नव्हते. पण रागीट, हट्टी सूरज समोर, आपले मत ठेवणे तिला भीतीदायक वाटत असे. आजच्या या ठरावामुळे दोघेही खुश होते. बिछानावर पडताच सूरजने त्याच्या आई-बाबांना फोन लावला. सुषमाचे व स्वतःचे मत, आई-बाबांसमोर मांडले. त्यांनाही जुईची फार आठवण येत होती. तेही आनंदी झाले आणि पटकन त्यांनी या गोष्टीला होकार दिला.
रविवारची सुट्टी साधत, सामानांची बांधाबांध करून आवश्यक तेवढेच सामान सोबत घेऊन, सूरज, सुषमा आणि जुई, आई-बाबांच्या घरी राहण्यास गेले. जुईला खऱ्या अर्थाने आजी-आजोबांचे प्रेम मिळू लागले. स्वतःच्या घरात खेळणे, बागडणे तिला आवडू लागले. सुषमाची धावफळ कमी झाली. सूरजला सुद्धा पूर्ण वेळ ऑफिसच्या कामाला देणे सोपे होऊ लागले. खऱ्या अर्थाने कुटुंबाच्या सुव्यवस्थेची घडी बसली होती. एका आई-वडिलांना स्वतःच्या मुलासोबत राहण्याची इच्छा पूर्ण करता आली होती. जुईची हेळसांड थांबली. खऱ्या अर्थाने प्रेमाने काळजी करणाऱ्या, आजू-आजोबांची माया मिळू लागली होती.
मित्रहो !
कुटुंब पद्धती कशा राखाव्या ?
तर एकत्रित कुटुंब पद्धतीने राहिलो तर कुटुंब व्यवस्थापनाची घडी योग्य बसते. एकमेकांना आधार मिळतो. खऱ्या अर्थाने, वृद्धावस्थेत जाणारे आईबाप मुलांच्या प्रेमाला परके होत नाहीत. त्यांच्या आरोग्याची सुव्यवस्था राहते. मुलांपेक्षा त्यांनी अधिक पावसाळे पाहिलेले असतात. काय चांगले? काय वाईट ? याचा त्यांना चांगला अनुभव असतो. त्यामुळे अनुभवाची तिजोरी मुलांसाठी उपयोगी पडते. कुटुंबाचे सुनियोजन सांभाळले जाते.
जुई आता चांगलीच आजी-आजोबांमध्ये रूळली होती. तिला त्यांचा लळा लागला होता. आजी-आजोबाही तिच्यात रममान होऊन, स्वतःचे बालपण आठवू लागले होते. सुषमाही सासू-सासर्यांना काय हवे-नको पाहत होती. सुरज आता बिनधास्त झाला होता. कामामध्ये जीव ओतून नवनवीन प्रकल्पांना वेळ देत होता. त्यामुळे त्याला पदोन्नत्ती प्राप्त होत होती. असेच एकदा सुट्टीच्या दिवशी दुपारचे जेवण आटोपून, सगळे टीव्ही समोर बसले होते.
बोलता बोलता सुषमाने सासूबाईंना विचारले, “अहो ! आई, तुम्ही लग्न होऊन या घरी आला, तेव्हा खूप मोठा परिवार होता असेल ना !”
तेव्हा सासू हसून म्हणाल्या, “अगदी पंधरा जण होतो आम्ही सगळे ! त्यामुळे घर कसं भरलेलं असायचं. कधी दिवस उगवायचा आणि कधी मावळायचा, कळतच नसे.
सुषमा: ” तुमच्या सासू कशा होत्या ? आई.”
सासू : “तशा कडकच ! पण शिस्तीच्या होत्या. तेवढ्याच प्रेमळही होत्या. स्वतः घरातील कामांवर लक्ष देऊन, स्वतःही तेवढ्याच कामात हातभार लावायच्या. वयानुसार थोड्या मग थकल्या. पण शेवटपर्यंत घर तुटू दिले नाही.”
सुषमा: “मग आता का सारे वेगळे झाले ?
आई : “मुलं मोठी झाली. शिक्षण झाले. काही ना परदेशात नोकऱ्या मिळाल्या आणि तेथे स्थायिक झाले. काहींना म्हाताऱ्या माणसांची अडगळ वाटू लागली. म्हणून प्रत्येकाने आपापले वेगळे संसार थाटले. काही ना वाटू लागले की, आपण येथेच थांबलो तर कौटुंबिक समारंभ, सण, उत्सव याची आपल्यावरच जबाबदारी पडेल. या विचाराने दूर गेले.” असे सासूबाई म्हणाल्या “छोटे कुटुंब सुखी कुटुंब” या सरकारी सुविचाराने खरे तर एकत्रित कुटुंबे दुभंगली. असे मला वाटते.
सासुबाईंचे सारे ऐकून सुषमाही विचार करू लागली. खरंच! एकत्रित कुटुंबाचे खूप फायदे असतात. गावात साजरा होणारा गणेशोत्सव, होळी या सणांसाठी बाहेर पडलेली कुटुंबे (कामधंदया साठी) मुद्दाम गावाला येतात. पुन्हा मोठा परिवार गोळा होतो. अगदी पंधरा दिवस एकत्रित कुटुंब पद्धतीत राहून, खूप मजा लुटतात. मुले एकत्र येतात. त्यांना त्यांची नाती कळायला लागतात. लहान-मोठे एकमेकांकडून विचारांची देवाणघेवाण करतात. शेती-बागा, घरदार यावर विचार विनिमय करून, त्यावर उत्पादन वाढवण्यासाठी उपाय करतात. खेळीमेळीने एकमेकात मिसळतात. आदराने, आनंदाने आणि कोणत्याही दबावाखाली न राहता, आनंदी जीवन उपभोगण्याचे सुख प्राप्त करून घेतात.
जुई आता बरीच मोठी झाली होती. आजी आजोबांच्या आणि आई वडीलांच्या सहवासात, एकत्रित बसून संवाद साधत असे. रोज वेगवेगळ्या विषयावर त्यांचे बोलणे होत असे. यातूनच जुईला कुटुंबपरंपरेविषयी मौल्यवान माहिती मिळत असे. जुईने एकदा आपल्या मैत्रिणीचा विषय काढला. ती म्हणाली, “अग, माझी ती दहावीची मैत्रीण श्रेया, तिने एका वेगळ्या धर्म जातीतील मुलाशी लग्न केले म्हणे ! आता ती येथे राहत नाही. तिच्या आई-बाबाचा, आम्हाला फोन आला होता. तेव्हा हा प्रकार मला कळला. कारण तशी ती आता आमच्या ग्रुपमध्ये नसते. ती काहीतरी इंजीनियरिंग करत होती. खूप चुकीचे झाले !”
त्यावर आजीने, या घटनेला मुख्यत्वे जबाबदार कोण ? यावर माहिती दिली.

आजी म्हणाली, “मुलांचे आई-वडील जातात दिवसभर कामावर. घरात मुलं एकटीच ! त्यांच्याशी बोलायला कोणीच नसतं. मग टीव्ही पाहणे, सिनेमा लावून पाहणे, गेम्स खेळणे, भ्रमणध्वनीवर चॅट करणे, आपली सुखदुःखे मित्र मैत्रिणींना शेअर करणे. या गोष्टी करू लागतात. संध्याकाळी आई बाबा थकून झोपी जातात. आपली मुलं काय करतात ? त्यांना काही हवं का ! त्यांना काही बोलायचं आहे का ! यासारख्या गोष्टींची विचारपूस करण्यास त्यांना वेळच नसतो. मग ही मुले आपलेपणा, प्रेम मिळवण्यासाठी मित्र-मैत्रिणींमध्ये शोधू लागतात. मग कशाचाही विचार न करता ते प्रेमात फसतात. आणि विद्रूप जगातील माणसावर विश्वास ठेवून, आपल्या माणसांपासून दूर जातात. आजच्या या विविध माध्यमांद्वारे कुटुंब परंपरा तुटत चालली आहे. विद्रुपरूपी जग हे, मुलींना संतती प्राप्त करण्यासाठी आणि शरीर सुख भागवण्याचे गॅझेट झाले आहे. हे समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मागे फिरणे, अशक्य असते. म्हणून घरातील सर्व कुटुंबांचा एकमेकांशी संवाद होणे, फार गरजेचे आहे. मुलांची विचारपूस करणे, त्यांना वेळ देणे, त्यांच्याशी मैत्रीची वागणूक ठेवून, मोकळेपणाने वागणे, आजच्या घडीची गरज आहे.”
कुटुंब परंपरेला तडा जाऊ नये असे सर्वांनाच वाटतं, नाही का ! मग सर्वांनी निश्चय केला पाहिजे आणि तसेच वागले पाहिजे. एकत्रित कुटुंब पद्धतीत उद्याची परंपरा जगवणारी नवीन पिढी तयार होणार आहे. जुई हे सारे ऐकून स्तब्ध झाली. तिनेही मनोमनी निश्चय केलेला असावा, असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने पटकन आजीला घट्ट मिठी मारली.
ही कथा वाचून तुमच्या लक्षात नक्कीच येईल, की कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब परंपरा या दोन्ही गोष्टी एकत्रित नांदत असतील, तर सुख- समाधानाचे नि सुसंस्काराचे ओहळ वाहतील. प्रत्येक घरात लक्ष्मी आणि सरस्वती वास करतील. कुणी ऐरागैरा आपल्या मुलांची फसवणूक करू शकणार नाही. संस्काराची मूळे त्याच्या मनात रुतून घट्ट बसलेली राहतील.
कुटुंबाचे महत्व म्हणजे काय ? याचे ज्ञान शाळेतून मुद्दाम घ्यावे लागणार नाही.
कुटुंब सदस्य जेवढी काळजी घेतात, तशी काळजी या जगी कुणीच घेऊ शकत नाही. म्हणून म्हणतात ना, आई- बाप बाजारात विकत मिळत नाही नि त्यांच्यासारखी वेडी माया कुणी देऊ शकत नाही. म्हणून कुटुंबाला फार महत्व आहे, बाळांनो !
कुटुंब महत्वाचे का आहे ?
त्याचे एक सुंदर उदाहरण देते.
एक देखणी मुलगी आहे. सुशिक्षित आहे. कुटुंबात आजी आजोबा, आई बाबा, भावंड काका काकी सर्व आहेत. एकदा तिच्या आजोबांनी त्यांच्या मित्राकडे नातीच्या लग्नाचा विषय छेडला. त्यावर मित्राने विचारले, ” नातीच्या अपेक्षा काय आहेत?” त्यावर आजोबा म्हणाले, “विशेष काही नाहीत. मुलगा एम टेक असावा. मोठे घर, गाडी, नोकरचाकर असावेत नि मुलगा एकटा असावा.”
मित्र म्हणाला, ‘असे आहे एक स्थळ.’ मग ठरवून टाक मित्रा !
हे ऐकून मित्र हसून म्हणाला, “स्वतःचे पूर्ण कुटुंब हवे पण वर मुलगा एकटाच हवा ! हे कसे ?”
यावरून कळते की कुटुंब सर्वांनाच महत्वाचे आहे. कारण- जगात चांगले काम करण्यासाठी आपलेपणाची भावना निर्माण होऊ शकते.
कुटुंब हे असे स्थान आहे जिथे आधार मिळतो. आयुष्यात अपयश आले तरी थोडा काळ विसावून, पुन्हा यशाच्या वाटचालीस सुरुवात करण्यास कुटुंब प्रोत्साहन देते. आत्मविश्वास निर्माण करणारी जागा म्हणजे कुटुंब होय. कुटुंब अशी जागा आहे जिथे प्रत्येक जण पहिला धडा शिकतो. तेव्हा तो जगाशी चार हात करू शकतो.
मूल्ये, श्रद्धा आणि वर्तणूक घडविण्यात महत्वपूर्ण भूमिका कुटुंब करते. जीवनातील आव्हानांना नाकारताना कुटुंबच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देते. कुटुंब म्हणजे एक कुंभार होय. जसा कुंभार मातीला विविध आकार देऊन, त्याची सूंदर भांडी बनवतो, त्याप्रमाणे कुटुंब आपल्या मुलांचे संगोपन करताना योग्यवेळी चांगले संस्कार करत असतो. त्यांच्या मनावर संस्काररूपी साचा तयार करत असतो. त्यातूनच संस्कारूपी मुलांचा विकास घडत असतो.
कुटुंब परंपरा म्हणाल तर कुणीच मातेच्या गर्भातून शिकून येत नाही. सज्जन नि सुसंस्करीत घरातच याचे धडे, बाळ घेत असते. “जसे पेरतो तसे उगवते. “म्हणून कुटुंब हे नाती जोडून एकत्रित राहत असेल, तर तेथे जन्माला येणारे मूल, परंपरेचा वारसा पुढे नेईल.
कथेचा गाभा म्हणजे, बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण या तीन अवस्थेतून कुणाचीच सुटका नाही. सर्वात वाईट (म्हटलं) तर वृद्धा अवस्था ! असे काहींना वाटते. पण मित्रांनो, तोच खरा आधार नव्या पिढीचा असतो. हे विसरू नका. त्यांचे अनुभव म्हणजे म्हणजे तरुणांसाठी समस्यांवर तोडगा काढणारे औषध होय.
म्हणूनच एक म्हण आहे, “जुनं तेच सोनं”
मित्रहो !
कुटुंबाला जपा. एकोपा ठेवा. सुरक्षित राहा.

— लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
