Wednesday, October 15, 2025

कथा

“निर्मळ आनंद”

मी दारावरची बेल वाजवली आणि नीलूने दार उघडलं.
मला पाहताच आनंदाच्या उकळ्या फोडणारं मोठ्ठं हसू देत म्हणाली,
“का कुणास ठाऊक पण मला आज सारखं वाटत होतं की तू यावंस !”

“का गं ? इतकी का आठवण आली आज ?” मी हॉलमधल्या छोट्याशा सोफ्यावर टेकत विचारलं.
“काही नाही गंsss आज सकाळीच बेसनाचे लाडू केले तेव्हा तुझी आठवण झाली.
तुझ्याइतके खमंग नसतील झाले पण तुझे ऐकून हल्ली बऱ्याच दिवाळसणात मी दोन-चार पदार्थ का होईना पण घरी काही ना काही फराळाचं करतेच !
सगळंच बाहेरचं आणायचं नको वाटतं !”

“म्हणजे स्वत: करण्यातला आणि आपल्या माणसांना खाऊ घालण्यातला आनंद मिळवताहेत वाटते बाईसाहेब!” मी थट्टेने म्हटले.
त्यावर नीलू म्हणाली, “अगं करावंसं खूप वाटायचं गंऽऽ पण घरची कामं आणि जबाबदाऱ्या जड होत चाललेल्या. आता तर गेली चार वर्षे सासूबाईंचंही सगळंच करावं लागतं. भरवावं लागतं, पथ्यपाणी पहावं लागतं आणि बाया माणसं नेहमीच मिळतात असंही नसतं.
त्यामुळे स्वतःच सिद्ध रहावं लागतं ! पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं ना की सगळी मेहनत फळली असंही वाटतं ! माझी मुलं लहानाची मोठी होताना त्यांनी मला दिलेली साथ किती मोलाची होती हे ठाऊक आहे मला !”

नीलूच्या स्वभावाचा हा पैलू मला नेहमीच लोभवणारा होता.
कुणीही तिच्यासाठी अगदी जराऽऽसं सुध्दा काही केलं तरी ती ते कायम स्मरणात ठेवून वागणारी नीलू म्हणूनच मला इतरांपेक्षा वेगळी वाटत होती. जास्त जवळची मैत्रीण होती. तिची सगळी सुखं-दु:खं मला सांगणारी आणि सगळ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारी नीलू म्हणूनच खूप आपली वाटायची.

तिच्या हातचे बेसनलाडू खाता खाता मग बऱ्याच गप्पाही झाल्या.
तेवढ्यात ती म्हणाली, “अगं आज दिवाळी आहे तरी घरातला पसारा मात्र जेमतेमच आवरता आला हो, कारण धुण्याभांड्याची बाईपण आठ दिवसासाठी गावाला गेली आहे. त्यामुळे सगळंच माझ्यावर पडलंय !”

खरंतर नीलूने तिच्या घरातल्या पसाऱ्याबद्दल सांगितल्यावर माझं लक्ष गेलं की खरंच ! छोट्याश्या हॉलमध्येही डायनिंग टेबलवरच्या
बऱ्याच विखुरलेल्या वस्तू आणि कोपर्यातल्या रॅकवरही अनेक पुस्तके आणि वर्तमानपत्रे मुक्तपणे लोळताना दिसली.

पण खरंतर मी नीलूला भेटून, तिच्याशी बोलून इतकी भरुन पावले होते की, मला हे सगळं तिने सांगेपर्यंत जाणवलेही नव्हते.

आपण कुणाच्या घरी त्यात राहणार्‍या आपल्या माणसांना भेटायला जातो आणि फार नाही पण गेल्या 20/25 वर्षांपूर्वी जर पाहिले तर पूर्वी घरं ही घरासारखीच होती आणि विशेष म्हणजे पूर्वी कुणाकडे जाताना हल्लीसारखे आधी फोन करुन किंवा व्हॉट्सॲप मेसेज करुन ‘कधी येऊ?’ असं विचारुन ठरवून जायची पद्धत फारच कमी होती आणि कुठल्याही वेळी मित्रमैत्रिणी, नातेवाईकांकडे अचानक टपकायची पद्धत पण कॉमन होती.

मग कित्येकदा जेवणाच्या वेळी आलेल्या पाहुण्याला, पाहुणा कसला, घरच्यासारखाच असलेला कुणी, ऐनवेळी ताटावर बसेही आणि पोटभर जेवून तृप्ततेचा ढेकर देऊन निघून जाई आणि ऐनवेळी आलेल्यासाठी जे घरच्यांसाठी बनवलेलं असे तेच त्यालाही वाढलं जाई आणि त्यात कुणालाच काही वावगं वाटत नसे.

ह्या नीलूकडेच मी ही कित्येकदा दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेल्यावर गेलेली असूनही मी अजून जेवले नाही कळल्यावर ‘दोन मिनिटं बस हं’ असं म्हणत नीलू आत जाऊन मुगडाळीची बटाटा घातलेली खिचडी गॅसवर चढवून येई आणि पुढच्या 15 मिनिटात गरमागरम खिचडीवर तुपाची धार टाकून वाफाळती खिचडीची डिश घेऊन येई.
पापड, लोणच्याबरोबर दहा मिनिटात खिचडीचा फडशा उडे आणि तोवर आमच्या गप्पांना ऊत आलेला असे. मनमुराद हसत आणि अनेक गोष्टींवर चर्चा करत वेळ कसा जाई कळतही नसे.

हा प्रेमाचा ओलावा, ही आपल्या माणसांना भेटून आनंदी होण्याची वृत्ती का कुणास ठाऊक पण हल्ली-हल्ली बऱ्याचदा कमी कमी झालेली जाणवायला लागलीय. कदाचित हल्ली आपल्या माणसांना भेटायला जाण्यापेक्षा हल्ली त्यांच्या ‘घराला’ भेटायला जाण्याची नवीन पध्दत सुरु झालेली दिसतेय.

म्हणजे घरात पाऊल टाकलं की त्यांच्या घरात काय काय सुखसोयी आहेत ?
रंग-बिंग लावून घर चांगलं डेकोरेट केलंय की नाही ?
शोभेच्या वस्तू किती महागड्या आहेत ?
सोफा किती किमतीचा आहे ?
टिव्ही कुठला आहे? किती मोठा आहे ? इत्यादी गोष्टींचेच मोजमाप जास्त होताना दिसते.

म्हणूनही बहुतेक वेळा घराचं हॉटेलात रुपांतर करण्याचीही अनेक ठिकाणी चढाओढ लागलेली दिसते. हॉटेलात सगळं जागच्या जागी टापटीप असतंच पण घर हे घर असतं. ते ही 365 दिवस आणि 24 तास टापटिपच असावं असा आग्रह धरणाऱ्या लोकांचं खरंतर कौतुकंच वाटतं.

पण का कुणास ठाऊक ? अशा घरात गेलं की आपलेपणाची भावना काहीशी गुदमरल्यासारखीही वाटते.

महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी आपल्या नातेमंडळीत आणि जवळच्या मित्रमैत्रिणींकडे तरी त्यांना भेटण्याचा आनंद द्विगुणीत करणारा असावा.

पण थोडा थोडा परकेपणा या अशा बाहेरील दिखाव्यांमुळे डोकावत राहतो मात्र!

खरं तर कुठलेही सण-वार हे माणसांना एकमेकांजवळ आणणारे, नात्याचे स्नेहबंध घट्ट करणारे, हक्काने हाक मारायला मोकळीक देणारे, मनामनातून प्रेमाची शिंपण करणारे, असायला हवे असतात.

एखाद्या उत्तम सजवलेल्या अपटूडेट घरात जाऊनही तिथल्या यजमानाला आपण कधी लवकर परततो अशी भावना असेल तर ते संबंध नात्याचे असोत की मैत्रीचे, हळूहळू संपुष्टातच येतात, दूरावतात.

उरतात ती फक्त नात्याची नावे. आतमध्ये काहीही पत्र न लिहिलेल्या बंद लिफाफ्यासारखी.

म्हणूनच वाटते की, नीलूसारखी निखळ मैत्रीण मिळणं हे भाग्य नाही तर सौभाग्य आणि माणसांना भेटणं हाच खरा आनंद.

— लेखन : शोभा सुभेदार. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप