Monday, June 30, 2025
Homeलेखकर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे

कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे

देवेंद्र भुजबळ यांच्या लवकरच प्रसिद्ध होत असलेल्या “माध्यम भूषण” या पुस्तकातील अमेरिकेत गेली ४० वर्षे कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आणि विविध प्रकारच्या माध्यमांद्वारे कर्करोगाविषयी जनजागृती करणाऱ्या डॉ सुलोचना गवांदे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी…
— संपादक

कर्करोगाचे आपल्याला मागच्या दशकात प्रामुख्याने चार पाच प्रकारच माहिती होते. पण आता समजतेय की ही संख्या १०० च्या वर आहे.

कर्करोग आणि इतर आजार यातील मूळ फरक म्हणजे बहुतांश इतर रोग हे आपल्या शरीराच्या बाहेरून येणाऱ्या जीवजंतूंमुळे होतात अथवा शरीरातील इंद्रिये, स्नायू इत्यादी दुर्बळ झाल्यामुळे होतात. कर्करोग हा मात्र स्वतःच्या शरीरातील पेशीतूनच निर्माण होत असतो.

कर्करोग झाल्याचे निदान कळताच केवळ रुग्णच नव्हे तर त्याचे कुटुंबीयही गर्भगळीत होतात, इतकी या रोगाची धास्ती आहे. अशा या वेगळ्या आणि विलक्षण रोगावर सखोल संशोधन करणाऱ्या, तो होऊच नये म्हणून आणि झालाच तर त्याच्याशी कसा सामना करायचा यासाठी जनजागरण करणाऱ्या डॉ सुलोचना गवांदे यांच्याशी न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या माध्यमातून आमचा संबंध आला आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन आम्ही त्यांना यथाशक्ती मदतii करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि करीत आहोत.

डॉ सुलोचना गवांदे या मूळ मुंबईकर आहेत ही आपल्या सर्वांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. त्यांनी टाटा मेमोरियल सेंटरशी संलग्न कर्करोग संशोधन संस्थेतून एम एससी व पीएचडी या पदव्या प्राप्त केल्या. पुढे कर्क रोगावर प्रगत संशोधन करण्यासाठी ४० वर्षांपूर्वी अमेरिकेत जाण्याचे धाडस त्यांनी केले.

डॉ सुलोचना गवांदे मॅडम सुरुवातीला फार बिकट परिस्थितीत कर्क रोगावरचे संशोधन करीत राहिल्या आणि अजूनही करीत आहेत. पण त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ संशोधन, शास्त्रीय अभ्यास आणि या विषयावर होणाऱ्या जागतिक परिषदांपुरतेच स्वतःला बंदिस्त करून ठेवले नाही तर सामान्य माणसाला कर्करोगाची, त्या विषयी सुरू असलेल्या संशोधनाची अद्ययावत माहिती मिळावी, त्यांना धीर – दिलासा मिळावा म्हणून त्या अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतात. त्यांचे दीर्घकाळ परदेशात वास्तव्य असले तरी त्यांनी त्यांची मायभूमीशी आणि माय मराठीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. त्यामुळेच कर्करोगाविषयीची जाणीव, जागृती ही मराठी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्या भरीव कामगिरी करीत असतात.

“रिव्हिलिंग सिक्रेटस ऑफ कॅन्सर ” या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

डॉ सुलोचना गवांदे यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात पंधरवाड्याला एक लेख असे सदर वर्षभर लिहिले. या सदरातून त्यांनी कर्करोगाचा इतिहास, कारणे व लक्षणे, उपचार हे सर्व विषय अतिशय सोप्या भाषेत मांडले. वाचकांना ही लेखमाला अत्यंत उपयुक्त वाटली. नंतर या लेखनावर आधारित त्यांचे “कर्करोग : माहिती आणि अनुभव” हे पुस्तक प्रकाशित झाले. पुढे या पुस्तकात अधिक भर घालून त्याचे इंग्रजी रूपांतर Revealing the Secrets of Cancer या नावाने २०२२ मध्ये अमेरिकेत व नंतर भारतात प्रकाशित केले गेले. गेल्या वर्षीच्या (२०२४) मराठी व इंग्रजी कालनिर्णयच्या पृष्ठभागावर कर्करोगाची कारणे आणि तो टाळण्यासाठी काय करावे याबद्दल त्यांनी लिहिलेले लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या जानेवारी २०२५ मधील रविवार पुरवणीत त्यांचा कर्करोगाच्या लसीबद्दल सद्यकालीन शास्त्रीय माहिती देणारा लेख प्रसिद्ध झाला आहे.

कर्करोगाविषयी बोलण्यासाठी गवांदे मॅडम यांना विविध प्रसार माध्यमांद्वारे निमंत्रित करण्यात येत असते. त्या नेहमीच “योग्य” माहिती देण्याचा आग्रह धरतात. इथे योग्य शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे, तो अशासाठी की अनेक व्यक्ती, संस्था कर्करोग बरा करण्याविषयीचे अवास्तव दावे करीत असतात. त्यांच्या उपचारांमुळे रुग्ण बरा तर होत नाहीच उलट त्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसानच होत असते.
कर्करोगाचे अनेक प्रकार योग्य औषधोपचारांनी पूर्ण बरे होतात किंवा कित्येक वर्षे आटोक्यात राहतात. नको त्या गोष्टींच्या मागे लागण्याने हे इलाज वेळेवर होत नाहीत, परिणामी रुग्णाचा आजार अधिक गंभीर होतो आणि कित्येकदा रोग कह्यात आणणे अशक्य होते. ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे आणि याबद्दल लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे. म्हणून गवांदे मॅडम मुद्रित माध्यमापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत तर आकाशवाणी, दूरचित्रवाणी, समाज माध्यमे, प्रत्यक्ष व्याख्याने, संवाद,मुलाखती अशा विविध प्रकारच्या माध्यमांद्वारे त्या कार्यरत आहेत. अर्थात खरं म्हणजे ही काही फक्त त्यांचीच किंवा सरकार, संशोधक आणि डॉक्टरांची पण नाही तर ही जागरूकता वाढवणे हे काम तुम्हा आम्हा सर्वांचेच आहे. इतकी ही कर्करोगाची समस्या भीषण आहे.

गवांदे मॅडम यांच्या “कर्करोग : माहिती आणि अनुभव” या पुस्तकातील सर्व लेख मुंबई आकाशवाणीच्या निवेदिकांनी वाचून महाराष्ट्रातील केंद्रांवर प्रसारित केले. अमेरिकेत येल (Yale) विद्यापीठाच्या कर्करोग समितीने NPR रेडिओवर या पुस्तकावर आधारित डॉ गवांदे यांचा कार्यक्रम प्रसारित केला.

डॉ गवांदे मॅडम गेल्या वर्षी मुंबईत आलेल्या असताना, त्यांचे विचार एबीपी माझा वाहिनीवर प्रसारित होण्याचे महत्व मी ज्या वेळी या वाहिनीचे संपादक श्री राजीव खांडेकर यांना सांगितले, त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता डॉ गवांदे मॅडम यांची मुलाखत घेतली. या त्यांच्या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळाला. त्यांची ही मुलाखत आपण आजही यू ट्यूब वर पाहू शकता आणि आपण ती अवश्य पाहावी देखील. त्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पॉडकास्ट प्रसिद्ध झाले असून ते देखील यू ट्यूब वर उपलब्ध आहेत.

कर्करोगाविषयी प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती करीत असतानाच गवांदे मॅडम लहानमोठ्या सभांतून लोकांना प्रत्यक्ष भेटून बोलत असतात. न्यूज स्टोरी टुडे च्या ठाणे येथील मेघना आणि हेमंत साने यांच्या घरी झालेल्या स्नेह मिलन कार्यक्रमात मेघना साने यांनी त्यांची घेतलेली उस्फुर्त मुलाखत आणि त्या नंतरची प्रश्नोत्तरे खूपच उद्बोधक ठरली. आकाशवाणीचे निवृत्त सहसंचालक भूपेंद्र मिस्त्री यांनी त्यांच्या कॅमेराटीमद्वारे या मुलाखतीचे चित्रीकरण करून ती समाज माध्यमातून प्रसिद्ध केली. ही मुलाखत त्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे मोठेच वैशिष्ट्य ठरले.

कर्करोगासारखे आजार हे विश्वव्यापी आहेत. ते कधीही, कुणालाही, कुठेही होऊ शकतात. त्यांची लक्षणे, उपाय आणि मुख्य म्हणजे प्रतिबंधक प्रयत्न हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचले तर रुग्णांना तर दिलासा मिळेलच परंतु या रोगाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढेल. हे ज्ञान बहुसंख्य लोकांपर्यत पोचावे म्हणून गवांदे मॅडमचे “कर्करोग : माहिती आणि अनुभव” हे पुस्तक जगातील अन्य भाषेत अनुवादित करण्यासाठी त्या त्या भाषिक व्यक्ती आणि संस्था यांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे.

गवांदे मॅडम इतक्या गंभीर विषयाशी निगडित असल्यामुळे त्या खूप कडक स्वभावाच्या, चेहऱ्यावर अती गंभीर भाव असलेल्या असतील, असे आपल्याला वाटेल. प्रत्यक्षात मात्र त्यांचा वागण्या-बोलण्यातील सहजपणा, आत्मियता पाहून पहिल्याच भेटीत त्या आपल्या आणि आपण त्यांचे होऊन जातो. गर्व आणि अहंकाराचा लवलेश देखील त्यांच्यात नाहीये. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या, त्या विषयी लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, जगभर होणाऱ्या परिषदांना सातत्याने उपस्थित राहणाऱ्या गवांदे मॅडम त्या याच का असा प्रश्न त्यांना पहिल्यांदाच भेटणाऱ्या व्यक्तीस निश्चितच पडत असणार यात मला तरी काही शंका वाटत नाही. कर्करोगासारख्या गंभीर विषयावर संशोधन आणि सामाजिक जागरूकता करीत असतानाच ललित लेखन ही त्या खूप सुंदर करतात. मराठी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. त्यांचे काही ललित लेख न्यूज स्टोरी टुडे पोर्टल आणि अन्य ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.

आम्हा भुजबळ कुटुंबीयांसाठी गवांदे मॅडम यांची एक अविस्मरणीय आठवण आहे. आमची कन्या देवश्री हिने कोलंबिया विद्यापीठातून दोन वर्षांपूर्वी जेव्हा एम एस जर्नालिझम ही पदवी मिळवली होती, तेव्हा आम्ही पदवीदान समारंभासाठी अमेरिकेत गेलो असता त्यांनी आम्हा तिघांनाही त्यांच्या न्यू जर्सी येथील घरी अतिशय अगत्याने बोलावले होते. पोर्टलच्या दुसऱ्या लेखिका, न्यू जर्सी येथीलच डॉ गौरी आणि त्याचे पती आशिष कंसारा यांना देखील आमंत्रित केले होते. त्यामुळे देवश्री चे एम एस चे सेलिब्रेशन आणि पोर्टलचे स्नेहमिलनच त्यांच्या घरी झाले.

या लेखाचे परीक्षण करताना गवांदे मॅडम यांनी एकच इच्छा व्यक्त केली, ती म्हणजे वाचकांनी त्यांचे पुस्तक किंवा यू ट्यूबवर उपलब्ध असलेले कार्यक्रम पाहून कर्करोगाबद्दल यथायोग्यरित्या जाणून घ्यावे आणि त्याबद्दल इतरांशी बोलावे. त्यातून बोध घेऊन या भयंकर व्याधीपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कसे दूर ठेवता येईल हे शिकावे, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. वाचकांना तर्कनिष्ठ विचार करण्यास प्रवृत्त करावे, त्यांनी अंधश्रद्धा किंवा भूलथापांना बळी पडून पैसे अथवा मूल्यवान वेळ वाया घालवू नये, जर कुणाला कर्करोगाचा सामना करण्याची वेळ आली ते सुजाणपणे, धैर्याने करण्यास मार्गदर्शन मिळावे, या हेतूने कर्करोगाच्या उपचारांवर चालणारे संशोधन व नवीन औषधे यांची माहिती दिली आहे. यामुळे सर्वसाधारण व्यक्तीची कर्करोगाविषयीची जाण वाढावी अशी त्यांची सार्थ अपेक्षा आहे.

मी, माझे कुटुंब, माझी नोकरी, माझा व्यवसाय इतकेच आपले जग सीमित न ठेवता या अवघड आणि गहन रोगाबद्दल साध्या भाषेत शास्त्रोक्त माहिती देत असलेल्या आणि आपल्याला कर्करोग होऊच नये म्हणून आपली जीवनशैली कशी असावी, या विषयी आंतरिक तळमळीने काम करीत असलेल्या डॉ सुलोचना गवांदे या “स्वार्थ आणि परमार्थ” याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या या मानवतावादी प्रयत्नांमध्ये, उपक्रमांमध्ये आपण काही हातभार लावू शकत असल्यास अवश्य लावू या.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन

    प्रेरणादायी लेख 🙏 पुस्तक रुपाने डॉक्टरांनी अनेकांना एकप्रकारे मदतीचा हातच दिला आहे.

  2. डॉ. सौ. गवांदे मॅडम यांनी कर्करोगावरील संशोधन याचा पाठपुरावा करता करता, या विषयावर लेखन करून, न घाबरता या रोगाशी सामना करण्यास, विविध माध्यमातून मुलाखती देत आहेत. त्यांच्या कार्यास सलाम !
    सर आपण त्यांचा जीवनप्रवास अगदी थोडक्यात उत्तम मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील
अविनाश ब.हळबे. on अष्टपैलू सुचिता पाटील