१. देवा तुझे जग आता
देवा तुझे जग आता
गेले फार पुढे रे
मात्र तुझ्या प्रतिमेला
गेले फार तडे रे
देवा तुझ्या गाभा-यात
वीज आता प्रकाशते
आणि तुझ्या आरतीला
आशा उषा लता गाते
मात्र तुझ्या आभुषणाशी
पोलीसांचे कडे रे
देवा तुझे जग आता
गेले फार पुढे रे
देवा तुझ्या पालखीला
चारचाकी भोई रे
आणि पुढे नाचताती
‘तराट’ले भाई रे
काळ्या संपत्तीचा धूर
आकाशाला भिडे रे
देवा तुझे जग आता
गेले फार पुढे रे
देवा तुझ्या माणसाला
जगण्याची सक्ती आहे
मरणाच्या भितीपायी
तुझ्यावर भक्ती आहे
वरवरचा भक्तिभाव
मन आत सडे रे
देवा तुझे जग आता
गेले फार पुढे रे
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई
२. नमन तुला मोरया
नमन तुला मोरया
तुझ्या कृपेची मिळू दे छाया
नमन तुला मोरया
आंग्ल देश हा रम्य मनोहर
मूषकापरी इवला सुंदर
तुला घेऊन फिरे धरेवर
तुझीच ही माया नमना
नमन तुला मोरया
मर्सी तमसा मोहवी नयना
अमुच्या या जणु कृष्ण कोयना
कृष्णातटीच्या भक्त जणांना
मिळू दे तुझी माया
नमन तुला मोरया
तुझ्या कृपेने इथवर आलो
तव भक्तांच्या संगे रमलो
तुझ्या दर्शने धन्य जाहलो
आज आम्ही मोरया
नमन तुला मोरया
–– रचना : श्रीकांत पट्टलवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800