भारतातील कामगार वर्गाची विशेषता गोदी कामगारांची तसेच दीनदुबळ्यांची निरपेक्षपणे सेवा करणारे परंतु प्रसिद्धीच्या मागे कधीही न धावणारे, सानेगुरुजीच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असणारे ॲड. एस्. के. शेट्ये यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख.
ॲड. एस्. के. शेट्ये यांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांचे लढाऊ व ज्येष्ठ कामगार नेते ॲड. सदानंद कृष्ण शेट्ये हे आज, ३१ जुलै २०२५ रोजी ९४ वर्ष पूर्ण होऊन ९५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
ॲड. एस्. के. शेट्ये यांचा जन्म ३१जुलै १९३१ रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य अशा वाकेड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मूळगावी तर सुरुवातीला माध्यमिक शिक्षण राजापूर व देवरुख येथे झाले.शालेय जीवनात ते राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते तर काही काळ शाखाप्रमुख होते. राष्ट्रसेवादलात असतांना त्यांना सानेगुरुजी, एस.एम.जोशी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे इत्यादी मान्यवरांची बौध्दिके ऐकण्याची संधी मिळाली. राष्ट्रसेवादलातील संस्कारामुळे त्यांना सामाजिक कार्य करण्याची आवड निर्माण झाली. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी राष्ट्रसेवा दलातर्फे राजापूर, देवरुख या ठिकाणी निघालेल्या प्रभात फेऱ्यांमध्ये ते न चुकता हिरीरीने भाग घेत असत.
पुढील शिक्षणासाठी ॲड. एस्. के.शेट्ये १९४७ साली मुंबईला आले आणि विल्सन हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतले. १९५० साली ते एस.एस.सी. मध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. १९५२ साली त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमधून इंटर सायन्स उत्तीर्ण केले. त्यांना एन. सी. सी.मध्ये लान्ससार्जन्टच्या पदापर्यंत बढती मिळाली होती. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांना आपले पुढील शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्यांनी ३ जानेवारी १९५३ साली मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भंडार विभागात कारकुनाची नोकरी स्वीकारली. नोकरी मिळाल्यानंतर पुन्हा रुपारेल कॉलेजमध्ये इंटर आर्टसला प्रवेश घेतला, कारण सायन्स कॉलेज नोकरीमुळे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांना आपल्या जीवनाचा मार्ग बदलावा लागला. १९५६ मध्ये ते रुपारेल कॉलेजमधून बी.ए. उत्तीर्ण झाले. विल्सन हायस्कूल व एल्फीस्टन कॉलेजमध्ये असतांना ते कबड्डी टीमचे कॅप्टन होते. त्यांनी १९६१ साली सिध्दार्थ लॉ कॉलेजमधून एल. एल. बी. व नंतर बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखेर १९६२ साली वकीलीची सनद घेतली. दरम्यान जानेवारी १९५९ रोजी त्यांचा विवाह झाला. ॲड. सदानंद शेट्ये यांना चार मुली, दोन नातू, पाच नाती व तीन पणत्या आणि चार जावई आहेत. त्यांची पत्नी सौ. नीला शेट्ये यांचे २ मे २०१३ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने माहीमच्या राहत्या घरी निधन झाले.
कामगारांमधील नेतृत्व :
अँड. एस. के. शेट्ये हे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भंडार विभागात क्लार्कची नोकरी करीत असतांना बी.पी.टी.एम्प्लॉईज युनियनचे (आताचे नाव- मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन) सभासद झाले. लवकरच ते युनियनमध्ये कार्यकर्ते म्हणून कार्य करू लागले. भारत सरकारच्याकेंद्रीय कामगार शिक्षण योजनेअंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टचे पहिले कामगार शिक्षक म्हणून एस्. के. शेट्ये यांची निवड झाली. भारत सरकारतर्फे महाराष्ट्रात चालणाऱ्या कामगार शिक्षक वर्गाच्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नोकरीमध्ये असतांनाच त्यांनी ९ महिने युनियनचे डेप्युटेशनवर काम पाहिले. ॲड. एस्. के. शेट्ये यांच्यातील सेवाभावीवृत्ती व धाडसीपणा ओळखून स्वातंत्र्यसैनिक व युनियनचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी व अध्यक्ष डॉ. शान्ति पटेल यांनी त्यांना युनियनमध्ये काम करण्यास पाचारण केले. डॉ. शान्ति पटेल यांच्या हाकेला साथ देऊन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीचा तात्काळ राजीनामा देऊन १९६२ पासून युनियनमध्ये पूर्णवेळ काम करण्यास सुरवात केली.

ॲड .एस्. के.शेट्ये यांना कायद्याचे ज्ञान असल्यामुळे युनियनला त्यांचा चांगलाच फायदा झाला. थोड्याच अवधीत ते युनियनचे जनरल सेक्रेटरी झाले. युनियनतर्फे लेबर कोर्टामध्ये कामगारांची बाजू मांडू लागले. कामगारांच्या खातेनिहाय चौकशीमध्ये त्यांनी यशस्वीपणे काम करुन कामगारांची मने जिंकली. प्रत्येक खात्यातील कार्यकर्त्याना नावाने ओळखणारे व त्यांची नाळ जाणणारे म्हणून सदानंद शेट्ये यांची ख्याती आहे. विनोद बुध्दी असणारे ॲड. शेट्ये यांना फोटोग्राफीची आवड असून ते आपल्या मोबाईल फोनवर सुंदर फोटो काढतात. ज्या संघटनेचे कार्यकर्ते जागृत व कार्यक्षम असतात, ती संघटना चांगले कार्य करु शकते हे त्यांचे मत आहे. ॲड. शेट्ये नेहमी आपल्या भाषणातून सांगतात की, संघटनेकडे पैसे किती आहेत हे महत्त्वाचे नाही तर जागृत, निष्ठावंत व कार्यक्षम कार्यकर्ते किती आहेत ते महत्त्वाचे आहे. ॲड. शेट्ये यांनी स्वत: गोदीत काम केल्यामुळे त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. प्रत्येक खात्यात काय काम चालते, ह्याची त्यांना चांगली जाणीव आहे. अनुभवाची शिदोरी साथीला असल्यामुळे प्रामाणिकपणा व निष्ठेने ते आजही माझगाव येथील युनियनच्या कार्यालयात येऊन ९५ व्या वर्षी देखील कामगारांची कामे समर्पित भावनेने करतात.

१९६४ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर कामगारांचे प्रतिनिधी म्हणून भारत सरकारने त्यांची नियुक्ती केली. ३१ मार्च १९७२ पर्यत ते सतत ८ वर्ष मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर कामगार प्रतिनिधी होते. तसेच मार्मागोवा बंदराच्या विश्वस्त मंडळावर १९८० ते ३१ मार्च २०१० पर्यंत सतत ३० वर्ष त्यांनी कामगारांचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या अभ्यासू स्वभावामुळे त्यांना १९६८ मध्ये फेलोशिप इन वर्कर्स एज्युकेशनसाठी भारत सरकारतर्फे चार महिने अमेरिकेमध्ये जाण्याची संधी मिळाली. १९९३ मध्ये जागतिक कामगार संघटनेच्या परिसंवादात भाग घेण्यासाठी ते बँकॉकला गेले होते.
आणीबाणीला विरोध :
भारत सरकारने २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहिर केली. त्यामुळे कामगार संघटनेच्या हक्कावर गदा आली. कामगार हक्कांच्या रक्षणासाठी ३० जून १९७५ रोजी डॉ. शान्ति पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बी.पी.टी. एम्प्लॉईज युनियनच्या वर्किग कमिटीची माझगाव येथील कामगार सदन सभागृहात मिटींग होऊन आणीबाणीला विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अशा प्रकारचा आणीबाणीला विरोध करणारा ठराव करणारी भारतातील ही एकमेव कामगार संघटना असावी. आणीबाणीला विरोध करुन कामगार हिताची बाजू घेतल्याबदल डॉ. शान्ति पटेल, ॲड. एस्. के. शेट्ये यांच्या सहीत २५ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी नाशिक जेलमध्ये मिसाखाली अटक करण्यात आली. २६ जानेवारी १९७७ ला सर्व पदाधिकाऱ्यांची नाशिक जेलमधून सुटका झाल्यानंतर व्ही.टी. रेल्वे स्टेशनवर (आताचे सी.एस.एम.टी.) गोदी कामगारांनी आपल्या नेत्यांचे पुष्पहार घालून प्रचंड जल्लोषात स्वागत केले.

१९७७ ला आणीबाणी उठल्यानंतर १९७८ साली डॉ. शान्ति पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स) ची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस ॲड. एस. के.शेट्ये यांची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली. डॉ. शांती पटेल यांच्यानंतर ॲड. शेट्ये हे युनियनची तसेच फेडरेशनची अध्यक्ष म्हणून धुरा समर्थपणे पार पाडत आहेत.

सामाजिक विधायक कार्य :
ॲड. एस्. के. शेट्ये हे टांकसाळ मजदूर सभा या सरकारमान्य संघटनेचे गेली ३७ वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गोवा बंदरातील कामगार पतपेढीचे ते संस्थापक असून मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज कन्झुमर को.ऑप.सोसायटीचे ते १९६६ पासून आजतागायत संस्थापक अध्यक्ष होते. डॉ. शांती पटेल आणि ॲड. एस. के. शेट्ये यांनी गोदी कामगारांना सहकारी तत्त्वावर स्वत:च्या मालकीची मुलुंड येथे शान्ति कॅम्पस हाऊसिंग सोसायटी स्थापन करुन घरे मिळवून दिली. गोदी कामगारांना घरे मिळण्याची मागणी त्यांनी युनियन तर्फे मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन व मंत्री महोदयांकडे केली आहे. युनियनचे मुखपत्र असलेल्या “पोर्ट ट्रस्ट कामगार” या दिवाळी विशेषांकाचे संपादक म्हणून गेली २८ वर्ष ते यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. या अंकाला अनेक मान्यवर संस्थाची पारितोषिके मिळाली आहेत. गेली ५३ वर्षाहून अधिक काळ कामगार चळवळीतील योगदानाबद्दल भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे ॲड. एस्. के.शेट्ये यांचा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १ मे २०१२ रोजी कामगार दिनानिमित्त कामगार क्रीडा भवनाच्या मैदानावर “भीष्माचार्य” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चिपळूण तालुका बौध्दजन पंचायत समितीतर्फे “कर्मयोगी” पुरस्कार मिळाला असून कोकणस्थ वैश्य समाज, मुंबई व राजापूर लांजा नागरिक संघ, मुंबई या सामाजिक संस्थाच्या वतीने “जीवनगौरव” पुरस्कार मिळाले आहेत. पत्रकार संघटनेतर्फे महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला आहे. एक कोटीहूनही अधिक सभासद संख्या असलेल्या हिंद मजदूर सभेचे ते उपाध्यक्ष आहेत.
त्यांना अनेक लहान – मोठे पुरस्कार मिळालेले आहेत हे खरे आहे. त्याबद्दल पुरस्कार देणाऱ्या त्या सर्व संस्थांचे विनम्रपणे ते आभार मानतात. परंतु हजारों कामगारांचा मिळालेला विश्वास व प्रेम हा त्यांना मिळालेला सर्वोत्तम पुरस्कार आहे. असे ॲड. शेट्ये यांचे उद्गार नेहमी ऐकायला मिळतात.

जन्मगावाची ओढ :
ॲड. एस्. के. शेट्ये यांचे आपल्या जन्मगावावर अवीट प्रेम आहे. आजही ते आपल्या वाकेड या गावी अधून मधून न चुकता भेटी देतात. कोकणातील अनेक ग्राम संस्थांशी त्यांचे चांगले घनिष्ट संबंध असून कोकणच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याना ते नेहमी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करतात. रत्नागिरी जिल्हयाच्या विकासासाठी झटणाऱ्या अनेक संस्थाना ते सहकार्य करतात. उत्कृष्ट वक्तृत्व व मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. अनेक गरजुंना त्यांनी आर्थिक सहाय्य करुन त्यांना जीवदान दिले आहे. त्यांच्या मनमिळावू व निस्वार्थी स्वभावामुळे त्यांनी लहानापासून मोठयापर्यत अनेक मित्र जोडले आहेत. माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे चांगली आहे. शत्रूला देखील मित्र बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्या गोड वाणीमध्ये व वागण्यात आहे. आपल्या तेजस्वी छोट्याशा भाषणातून ते सभा जिंकून नेहमीच टाळ्या मिळवितात . त्यांची भाषणे स्फूर्तिदायक व प्रेरणादायी असतात, आजही ते पहाटे उठून वाचन करतात, वाचनाची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे ते आपल्या भाषणातून नेहमी वेगवेगळी उदाहरणे देऊन कार्यकर्त्याना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करतात. योग्यवेळी कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारुन त्यांचा आत्मविश्वास बळकट करतात.
ॲड. एस्. के. शेट्ये यांच्या हातून श्रमिकांची, समाजाची व रंजल्या गांजल्याची सेवा यापुढेही अशीच होत राहो. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या कामगार चळवळीतील एका तपस्वी नेतृत्वाला गोदी कामगारांचा सलाम. त्यांचे आरोग्य चांगले राहून परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं ही त्यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त देशातील तमाम गोदी व बंदर कामगारांतर्फे तसेच भारत सरकारच्या टांकसाळीतील कामगारांतर्फे प्रार्थना !

— लेखन : मारुती विश्वासराव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800