आपल्या पोर्टल वर श्री प्रकाश चांदे यांनी लिहिलेला “अशा प्रकारे पुरस्कार “: सन्मान की अपमान” हा जळजळीत वृत्तांत वाचून, लेखिका सुजाता येवले यांनी देखील त्यांचे स्वानुभव कथन हलक्या फुलक्या पद्धतीने केले आहे. आपले ही असेच काही अनुभव असल्यास, अवश्य लिहा….
— संपादक
अस्मादिकांना प्रमुख पाहुणे म्हणून काव्यसंमेलनासाठी आमंत्रित करण्यासाठी कॉल आला. केव्हढे हुरळलो आम्ही !
हरळीगत वाऱ्यावर उडत, नाचत, गात कार्यक्रमाच्या दिवसाची म्हणजे रविवारची टुकूटुकू वाट बघू लागलो. तोपर्यंत पूर्ण सोसायटीत बातमी आमच्या एक्झॉस्ट फॅन्स वाटेने बाहेर पडली होती. सोसायटी मीटिंग आणि महिला भिशीमध्ये आमच्या कवितांचे नाव काढताच चेहऱ्यावर बारा वाजवणारे, एरंडेल तेल पिल्यासारखा चेहरा करणारे किंवा दुसरा विषय काढून माझ्या कवितांना कल्टी मारणारे अत्यंत अरसिक लोक माझ्यातल्या साहित्यिकेची वाखाणणी वुईथ स्माईली ॲन्ड प्रसन्न चेहऱ्याने ग्रुप वर करू लागले. सोसायटीचे भाग्य म्हणून माझ्यासारखी साहित्यिका या सोसायटीत राहते, माझा चेहरा नेहमीच हसतमुख आहे वगैरे वगैरे…. पूर्वी ज्यांच्याकडे किंचितस स्माईल करून पाहिल्यावर ते तोंड वेंगाडत होते ते आता माझ्या नकळतशा स्मित कटाक्षाने कृतार्थ झाल्यासारखे वागू लागले.
भिशीच्या मैत्रिणींकडून केसांना मेहंदी, चेहऱ्याला असंख्य क्रीम गाल दात दुखेपर्यंत चोळून अश्श्श्शी तयार झाले. मग हळूच सस्मित वदनाने नेमेचि रविवार उगवला. ‘सभागृह अंमळ लांबच आहे’ असा बहाना करत टू व्हीलर चे हँडल फिरवायला नकार देऊन मिस्टरांपुढे फोर व्हीलर ची स्टिअरिंग व्हील फिरवत पोहोचण्याचा हट्ट धरला. हो ना करता करता माझ्या छातीत थोडीशीच धडधड, मिस्टरांच्या छातीत ट्रक धडधड वाढून देऊन मोठ्या हिमतीने गाडी चालवत सभागृहाच्या दाराशी पोहोचले. संयोजिका मॅडम दाराशीच उभ्या होत्या. चेहऱ्यावर आभाळाएवढे दंतस्माईल जणू आम्ही कार्यक्रमाला आल्यामुळे त्यांचे जीवन कृतार्थ झाले असावे. अगदी हाताला धरून त्यांनी आम्हाला स्टेजवर नेले. आदराने खुर्चीवर बसवले आणि माईक वरून आमचे स्वागत अनाउन्स केले. समोर कवींमधून टाळ्यांचा नाजूक कडकडाट की किनकिनाट झाला. स्टेजला आणखी एका प्रमुख पाहुण्याची वाट बघायची होती. तोपर्यंत नाश्ता करायचे ठरवले. संयोजिका तिथपर्यंत घेऊन गेली आणि समोर आला वडापाव! माझ्या प्रिय नाशिकची ‘आन-बान-शान’. घरी पोहे खाल्ले होते म्हणून जरा बिचकत बिचकत खात होते. हे बघुन संयोजिका मॅडमने आम्हाला खालून वर, वरून खालपर्यंत न्याहाळत म्हटले पण, ‘तुमचे डाएट सुरू आहे का? आज पथ्य जरा बाजूला ठेवा वगैरे वगैरे…’ बिचारीला आमचा पोह्यांवर आडवा हात मारण्याची सवय माहित नसावी. मिरची अंमळ तिखटच होती.
त्यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे दंपती आगमनले. आमच्या कॉटनच्या चापून चोपून पिनअप केलेल्या साडीपुढे मला तिला विचारावेसे वाटले, ‘तुम्हारी साडी मेरी साडी से इतनी भरजरी कैसी? और तुम इतना बडा पदर लटका के कैसे चलती हो? तुम तुम्हारा घर साडीके भरजरी पदर से झाडती हो क्या?’ मनातले प्रश्न चालू असतानाच तसाच पदर लटक्कानेवाली संयोजिकाने त्या प्रमुख पाहुण्याच्या पदरामागे खाण्यासाठी अस्मादिकांना कल्टी मारली. आम्ही वडापाव संपवून समोर स्टेज कडे नजर टाकली. मोठ्या अक्षरातला ‘अलबत प्रकाशन’ चा बॅनर! तसे व्हॉ. ॲ. वर पत्रिका बघितली होती जी आम्ही आजपर्यंत रोज स्टेट्सला ठेवत पण होतो जिच्यापायी रोज अभिनंदनाचे पाच पन्नास मेसेज येत होते आम्ही पण पाच पन्नास वेळा हात जोडतही होतो. पण परत मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले ‘अलबत प्रकाशन’ म्हणजे काय? सोबत सूत्रसंचालक चालत होते. आम्हाला वाटले स्टेजपर्यंत आदराने, मानापानाने नेत आहेत की काय.? पण डायस दिसतात त्यांनीही आम्हाला कल्टी मारली. आणि अलबत शब्दाचा विचार करत स्टेजवर चढलो. पण लगेचच ब्रह्महत्या, गोहत्या, राजहत्या झाल्यासारखा सूत्रसंचालक धावत आला आणि म्हणाला ‘अजून प्रमुख पाहुणे नाही आलेत तोपर्यंत आपण खालीच बसा’. खाली कवींच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा आणि अंतर्मनातली खसखस अचूक टिपली. ते प्रमुख पाहुणे ,मग आम्ही कोण ? ठीक आहे; तेवढेच मोबाईल मध्ये डोकं खुपसायला मिळेल.
वडापावचा खमंग सुगंध आता दूर गेल्यासारखा वाटला. आम्ही मान वर केली. आणि प्रमुख पाहुणे दंपती माझ्या खुर्ची जवळ आल्याचे मला लटकत्या भरजरी पदरामुळे समजले. मग संयोजिकेने आम्हाला प्रेमाने हाताला धरून, अंमळ ओढतच स्टेज कडे नेले. सूत्रसंचालक आणि संचालिका सज्ज झाले. जणू ‘होश्शियार, बा अदब.. बा मुलाहिजा….’ वगैरे थाटात सगळ्यांचे स्वागत केले. मग सत्कारांचे चमत्कार सुरू झाले. दरवेळेला अंगावर शाल आणि किंचित तिरके झुकत (फोटोपोझ साठी हो) दोन्ही हातात बुके घेणारे आम्ही या वेळेला डोक्यावर भलीमोठी झिरमुळ्या वाली पेशवे स्टाईल पगडी आणि अश्शी चिकमोत्याची माळ गळ्यात घालून टेबल क्लॉथ (कालानुरूप लोपपावत चाललेले टेबलावरचे भरतकाम केलेले आच्छादन) टाईप शाल आणि नॅपकिन बुके हातात धरून अनेक मोबाईलमध्ये कॅमेराबंद होत खुर्चीवर परत बसलो. आमची ओळख करून देताना समोर कवींसमोर आमचे असंख्य नसलेले गुणही उधळले गेले. गुणांचं वर्णन जितकं जास्त होत होतं तितके आम्ही खुर्चीवर अवघडून बसत होतो.

आमच्या नंतर सुरू झाले प्रमुख दंपतींचे गुण उधळणे. खरे खोटे त्यांनाच माहित. हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून संयोजिका मॅडमकडे बघत होते. दोघींच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून मन मोकळे खो-खो हसणारे आम्ही आता निदान कबड्डी हास्य करावेसे वाटत होते. पण सूत्रसंचालकाच्या तोंडून ‘अलबत प्रकाशन’ नाव बाहेर पडले आणि आम्ही परत शब्द व्युत्पत्तीच्या जंजाळात गंभीर चेहऱ्यासहित अडकलो. तत्पूर्वी आमचा मोबाईल आम्ही स्वतःच समोर एका कवी सोबत दोनशे रुपये भरून आलेल्या व्यक्तीला दिला होता आमचे फोटो काढण्यासाठी. तो बऱ्याच वेळा कळत नकळत असे शुक शुक करून आमचे लक्ष मोबाईलच्या कॅमेरा कडे वेधत होता. आणि त्याला आम्ही कधी तोंडावर बोट ठेवून तर कधी डोळे वटारुन गप्प बसवत होतो. दुर्दैवाने जवळ जवळ आमच्या सगळ्याच फोटो त्या दोन्ही रीॲक्शन व्यवस्थित कॅमेराकैद झाल्या. घरी दाखवण्याची हिम्मत नाही झाली. नाहीतर घरातलेच अंगवळणी पडलेले प्रयोग बाहेरही करते म्हणून बट्टा लागला असता. स्टेट्सवर ठेवण्याचा विचार तिथल्या तिथे मनातून काढला. संयोजिकेचे गुणवर्णन जरा कान देऊन ऐकले. त्यांचा पुस्तक प्रकाशक म्हणून प्रवास, पुस्तकांचा व्यासंग, कवी लेखकांची असलेली मैत्री, उदार हस्ते दानशूरता, अर्ध्या रात्री उठून कोणालाही मदत करण्याची वृत्ती, फक्त काल रात्री अकरा वाजता फोन केल्यावर त्या थकुन गाढ झोपी गेल्याचे त्यांच्या यजमानांनी सांगितले. सद्गतीत झाले होते. गदगदून आले होते. डोळ्याला रुमाल लावून स्फुंदत स्फुंदत अक्षी साष्टांग दंडवत घालावेसे वाटत होते. दोघींच्या चेहऱ्यावरची स्माईल मात्र काही केल्या कमी होत नव्हती. शेवटी दोघींकडे बघणे टाळण्याचे ठरवले.
मग झाले कवीसंमेलन सुरू. कार्यक्रम पत्रिकेत ज्या नावाजलेल्या कवींची नावे होती ते सगळेच आश्चर्यकारकरीत्या अनुपस्थित होते. पण जशी कवी संमेलनाला सुरुवात झाली दोघींच्या चेहऱ्यावरचे स्माईल छूमंतर झाल्यासारखे आश्चर्यकारकरित्या गायब झाले.समोर जवळजवळ पंचेचाळीस कवी होते. प्रत्येक सात-आठ कवीं नंतर एकेक प्रमुख पाहुण्यांचे भाषण; भाषणाच्या वेळेला परत दोघींच्या चेहऱ्यावर स्माईल रिस्टोअर होत होते. तीन ते पाच मिनिटांच्या भाषणानंतर परत ते गायब होत होते. खरे तर काव्य संमेलनाचा विषय होता ‘श्रावण मास’ काही कविता खरोखर श्रावण महिन्यावरच होत्या. पण बऱ्याच कवितांचे विषय आईपासून बायकोपर्यंत, बाजारापासून शाळेपर्यंत, मित्रापासून शत्रूपर्यंत, महालापासून झोपडीपर्यंत असे विविध होते.
साधारण दहा कविता झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली. जेवण खरोखर अप्रतिम होते. संयोजिका आणि प्रमुख पाहुणे दंपतीच्या समोरच्या टेबलवर दोन कवींच्या समोर बसून जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. कवींच्या गप्पा सुरू होत्या दोन्ही बऱ्याच दूरवरच्या जिल्ह्यांमधून आलेले वाटले. पण प्रमुख पाहुणे या अटीट्यूडमध्ये त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी न होता त्यांच्या गप्पा मात्र कान देऊन ऐकू लागले. दोन्ही नवोदित पण प्रगल्भ कवी होते. त्यांच्या कविता आधी झाल्या होत्या ज्या मनाला खुप भावल्या. आता जेवता जेवता ते हिशोब लावत होते. संमेलनासाठी म्हणे सातशे रुपये भरले, येणे जाण्याचे भाडे सहाशे रुपये, रिक्षा आणि बस मिळून दोनशे. म्हणजे एक कविता सादर करण्यासाठी पंधराशे रुपये आणि संपूर्ण एक दिवस. मग मी पण बसल्या बसल्या हिशोब करू लागले; कार्यक्रमाला जवळ जवळ साठ कवींची नोंदणी झालेली असे सूत्रसंचालक म्हणाला. त्याच्यात पंधरा आलेलेच नव्हते. ज्या कवींची नावे ऐकून आम्ही कार्यक्रमासाठी हुरळलो होतो ते तर कोणीच नव्हते. म्हणजे 75 कवींचे एकूण बावन्न हजार पाचशे रुपये, शंभर रुपयांची एक ट्रॉफी याप्रमाणे पंच्चाहत्तर कवींच्या ट्रॉफीसाठी सात हजार पाचशे रुपये, जेवणही शंभर रुपये प्रति प्लेट पकडले तरी त्याचा खर्च जवळजवळ फक्त आठ हजाराच्या घरात, एक ते दीड हजार रुपयाचा नाश्ता असा हा नुसता खाणे पिणे ट्रॉफीचा सगळा खर्च अठरा हजारापेक्षा जास्त नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे अशा कार्यक्रमांसाठी हे कार्यस्थळ मोफत मिळते म्हणे! प्रमुख पाहुणे दंपतीचे माहीत नाही पण आम्ही मात्र विना अनुदानित तत्त्वावर अवघडून का असेना मिरवत होतो. सूत्रसंचालक त्यांच्याच प्रकाशन ऑफिसमध्ये काम करणारे होते. मग डोळ्यापुढे अश्श्शा चीक मोत्याच्या माळा, पगड्या आणि नॅपकिन बुके फेर धरू लागले. सोबत त्यांनी त्यांच्या शहरापासून माझ्या शहरापर्यंत केलेला प्रवास, मग उरलेल्या पैशाच्या मागे ‘अलबत प्रकाशन’ चमकले आणि जेवण संपवून हात धुवून आम्ही परत स्टेजवर स्थानापन्न झालो. संचालक प्र. पा. दं. ला जोजवत स्टेज कडे आणत होते. उरलेल्या कवींमध्ये काही कविता दर्जेदार, काही सुमार काही असंबंध तर काही कविता म्हणजे गद्य आणि पद्य यामधला फरक शोधावा लागत होता. काही कवितांनी खरोखर मनामध्ये घर केले तर काही कवितांनी मन आणि आत्मा दोघींना विचारात पडले. किती कवी झाले लक्षात नाही आले. पण प्रमुख पाहुण्यांचे भाषण म्हणून मला उभे राहावे लागले. आत्तापर्यंत ‘अलबत प्रकाशन’ बद्दल बरेच काही ऐकले तेच बोलले. अगदी आपोआप ज्ञानदेवांच्या रेडयागत आमच्या मुखातून बाहेर पडले. शेवटी एक माझ्या आराध्य दैवताची म्हणजे माझ्या ‘विठू माऊली’ची स्वरचित आरती म्हटली. माझ्या प्रकाशित साहित्याविषयी सांगितले. टाळ्यांचा कडकडाट झाला. स्मित हास्यवाले चेहरे मात्र माझ्या भाषणाच्या वेळेला एरंडेल तेल प्याल्यासारखे होते. कारण मी माझ्या पुस्तकांच्या प्रकाशकाचे मनःपूर्वक कौतुक केले होते. पण ‘हे म्मा माताजी’ माझ्या मनातला पैशांचा हिशोब यांना समजला की काय? भाषण संपले, मिस्टरांचा फोन आला होता. संध्याकाळी दुसरा कार्यक्रम होता. समोरच्या रांगेतल्या दोन वृद्धाही थकल्या होत्या. आणि त्यांना आणणारी तरुण (?) कवयित्री जरा जास्तच थकली होती. मग संयोजकांची माफी एरंडेल प्यायलासारख्या चेहऱ्याने मागून कार्यक्रम अर्धा सोडून निघाले. विशेष म्हणजे त्यांनी आनंदाने निरोप दिला. मग त्या वृद्धांना आणि अतिशय जास्त थकलेल्या तरुण कवयित्रीला घेऊन पैशांचा शोध लावत का(?)व्य संमेलन सोडून गाडी हायवेला दामटली. हुश्श्श्श्श्श्…….

— लेखन : सौ. सुजाता येवले. नाशिकरोड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
