१. वृत्त~ स्त्रग्विणी ~गालगा गालगा गालगा गालगा
पाहता मी तुला भूल पडली कशी
अंतरी भावना प्रीत फुलली कशी
लोचनातून तू तीर का सोडला
विद्ध मी जाहलो साथ धरली कशी
मेनका उर्वशी तू मला भासते
संगती मी तुझ्या तार जुळली कशी
टेकले ओठ मी काय ओठावरी
स्वर्ग तो भासला खूण कळली कशी
सांगना तू सखे हात धरलास ना
पेटती चूल मग आत विझली कशी
२. सारे मिळून आपण
वृत्त~ आनंदकंद
आता असे करूया सारे मिळून आपण
नाती अशी जपूया सारे मिळून आपण
जोडावयास प्रेमा नसते मुळीच सोपे
त्या भावना स्मरूया सारे मिळून आपण
का भांडणे ऊगाची विश्वात चाललेली?
बंधुत्व पाजळूया सारे मिळून आपण
शालेय सोबतींनो जमलो पुन्हा नव्याने
चल मोकळे हसूया सारे मिळून आपण
हा डाव मांडलेला मोडू नकाच कोणी
ऐक्यातची रमूया सारे मिळून आपण
३. आतातरी
वृत्त ~ देवप्रिया
नाद तू माझा असा आतातरी सोडून जा
मी तुझी होणार नाही सत्य हे समजून जा
चंद्र तू मी रोहिणी नाते असे काव्यातले
जीवनी हे शक्य नाही साथ ही उमजून जा
दाटला अंधार नित हा लोचने पाणावली
अंतरी ती साठलेली प्रीत तू विसरून जा
धर्म जाती बंधने ही का अशी पाळायची ?
एक जाती माणसाची माणसा सांगून जा
एक ईश्वर माय असता भेद का मग हा असा?
लागलेली ही समाजा कीड तू मारून जा
सोसवेना रीत मजला ह्या समाजाची अशी
बंध सारे तोडुनी अन् फोडुनी मोडून जा
सांगते मी ही अरूणा दोन गोष्टी चांगल्या
चांगले तू कर्म कर अन् दुष्टता त्यागून जा
४. तू सांग ना
भेद कारे हा असा तर वाढतो तू सांग ना
लोचने पाणावती का भांडतो तू सांग ना
तू नको जखमी करू माझ्या अशा हळव्या मना
का दिल्या वचनास राजा मोडतो तू सांग ना
राहिले मौनात मी अन् बोलणेही खुंटले
हट्ट का पण हा तुझा ना सोडतो तू सांग ना
वाद आपण संपवावा एक आशा ही मनी
आस का माझ्या मनीची तोडतो तू सांग ना
दाखवावे स्वप्न मोठे हे तुला जमते बरे
दाखवोनी स्वप्न मज का भंगतो तू सांगना
वाट मी बघते किती ठेवून आशा ही उरी
एकटीला सोडुनी का धावतो तू सांग ना
मी तुझ्या साथीस आहे तू नको चिंता करू
काय आहे भावना का चोरतो तू सांग ना
५.
जखमा उरातल्या ह्या बंदिस्त ठेवते मी
काट्यासवे फुलाला विकसीत पाहते मी
नयनात साठलेले अश्रू कसे लपावे
स्मित हास्य ठेवुनीया नजराच चोरते मी
आशा मनात आहे सुखस्वप्न पाहण्याची
नवपालवी तरूची बघताच हर्षते मी
गेले जरी सुखाचे दिन आज ते निघोनी
सुकल्या फुलातला तो मधुगंध शोधते मी
शब्दांतुनी कितीही झाला अखंड मारा
उठल्याच वादळाचा समतोल साधते मी
एका क्षणात येते आभाळ हे भरून
दुसर्या क्षणी मनाला कैह्यात आणते मी
काही नकोच मजला मी एकटी बरी हो
मौनात राहुनीया शांतीत नांदते मी

— रचना : अरुणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अरूणा मुल्हेरकर यांच्या वृत्तबध्द रचना अप्रतिम आहेत.