आता पर्यंत महाराष्ट्र राज्य हे आर्थिक, शैक्षणिक, उद्योग, कृषि, व्यापार, सांस्कृतिक, कला, क्रिडा, साहित्य, पत्रकारीता अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे.
कै.यशवंतराव चव्हाण, कै. वसंतराव नाईक, कै.वसंतदादा पाटील, कै. शंकरराव चव्हाण यांच्या सारखे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक असलेले मुख्यमंत्री, बाळासाहेब भारदे यांच्या सारखे वारकरी संप्रदायाचे सभापती, जयंतराव टिळक असे अनेक अभ्यासु मंत्री, आमदार, केशवराव धोंडगे, मृणाल गोरे, एन्. डि.पाटील, दि.बा. पाटील, दत्ता पाटील असे लढाऊ बाण्याचे नेते, महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषदेत होते. महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य व्हावे यासाठी प्रसंगी पक्षभेद विसरुन अनेकांनी काम केले.
परंतु दुर्दैवाने आता सर्वच चित्र बदलत चाललय. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अर्थात विधान भवनात नुकताच २ आमदारांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला. धक्काबुक्की, हाणामारी, शिविगाळ केली.

ज्यांनी हे पराक्रम केले त्यांच्यावर अनेक गुन्हे, केसेस दाखल आहेत, असे समजते. तरी मग त्यांना विधान भवनात प्रवेश कसा मिळाला ? सामान्य माणसाला पोलिस प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला सुद्धा फिरकु देत नाहीत मग हे तथाकथित गुंड कसे काय आत जातात ? असे प्रश्न पत्रकारही का विचारत नाही ? आचार्य अत्रे असते तर आता अक्षरशः तुटुन पडले असते सरकार आणि कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर.
पत्रकारिता हि आता विकाऊ झाली आहे. महाराष्ट्राचा आता उत्तर प्रदेश, बिहार करुन टाकला आहे. जेव्हा मतदार (सर्व नव्हे) पैसे, दारू, मटण, चिकन पार्ट्या घेऊन मतदान करतात, तेव्हा याच लायकीचे लोक प्रतिनिधी निवडून येतात. दुर्दैव आहे महाराष्ट्राचे ! प्रश्न आहे, हे कोण, कधी, कसे बदलणार ? की पुढे आणखी अवनती होत जाणार ?

— लेखन : गणेश जोशी. व्यंगचित्रकार, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800