Friday, August 8, 2025
Homeबातम्याकुमार कदम यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

कुमार कदम यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड करण्यात आली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. शाल, श्रीफळ, रुपये ११,०००/-, आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अल्प परिचय :
कुमार कदम यांनी विद्यार्थी दशेत असतानाच आपल्या पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. पुढे कुमार कदम यांनी रत्नागिरी येथून प्रसिद्ध होणार्‍या ‘रत्नभूमि’ या दैनिकातून १९७२ मध्ये पूर्णवेळ पत्रकारितेचा आरंभ केला. मुंबई वार्ताहर म्हणून त्यांनी दहा वर्षे रत्नभूमिसाठी काम केले. याच काळात ‘साप्ताहिक मार्मिक’मधून महापालिकेत ‘एक नजर’ हे सदर त्यांनी अनेक वर्षे चालविले. आणिबाणीनंतर ‘हिन्दुस्थान समाचार’ या भाषिक वृत्तसंस्थेत त्यांनी १२ वर्षे वार्ताहर म्हणून काम केले.

कुमार कदम हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे १९८३ साली अध्यक्ष असताना, १९८३ साली त्यांनी मुंबई दूरदर्शनवर मराठी कार्यक्रमाची होणारी गळचेपी रोखण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात सुधीर फडके यांच्यापासून अनेक दिग्गज सामिल झाले होते. परिणामी सह्याद्री वाहिनीवरून मराठी कार्यक्रमांना प्राधान्य मिळू लागले.

कुमार कदम यांनी महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त) या संस्थेची १९९९ मध्ये स्थापना केली. त्यानंतर त्यांनी या संस्थेचे तसेच संस्थेच्या ‘महावृत्त डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे मुख्य संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. दैनिक पुढारी (कोल्हापूर), दैनिक तरुण भारत (बेळगाव) यांचा विशेष प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी मुंबईत दहा वर्षे काम पाहिले.

दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधील ‘मराठी मुलखात कोकण’ हे कोकणातील विविध विषयांवर सडेतोड भाष्य करणारे कुमार कदम यांचे सदर प्रचंड गाजले. जुलै २००१ ते सप्टेबर २०१४ अशी सलग १३ वर्षे स्तंभलेखक म्हणून त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले. इतक्या दीर्घकाळ एकाच प्रांतिक विषयावर सातत्याने लिखाण करण्याचा महानगरातील मोठ्या वृत्तपत्रातील एक विक्रमही त्यांच्या नावावर आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर आपल्या सडेतोड आणि रोखठोक लेखणीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणाऱ्या कुमार कदम यांनी कोकणातील रायगड येथे येऊ घातलेल्या सेझ प्रकल्पाच्या धोक्याविषयीची माहिती महाराष्ट्र टाइम्सच्या २२ ऑगस्ट २००५ च्या अंकातील सदरात ‘महामुंबईचे महाजाल’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध करून या विषयाला सर्वप्रथम वाचा फोडली होती.

रविवारच्या ‘लोकसत्ता’ मध्ये ‘ज्ञान मंदिरातील लाचखाऊंना आवरा’ अशा शिर्षकाखाली सणसणीत लेख लिहून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार त्यांनी चव्हाट्यावर आणला होता. शाळांतून प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या सक्तीच्या देणग्यांविरोधात सर्वप्रथम आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले होते.

कुमार कदम सध्या अवयवदान विषयक जनजागृती करण्याचे काम करत आहेत. शिवाय, अनेक सामाजिक उपक्रमांची धुराही ते सांभाळत आहेत.

कुमार कदम यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ६०
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on पांढरी काठी : प्रशिक्षण संपन्न
Dr.Satish Shirsath on अनुवादित कथा
सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना