जेष्ठ कलाकार श्री मधुकर घोडविंदे हे उद्या,18 जानेवारी रोजी 73 वर्षे पूर्ण करून 74 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने त्यांच्या संगीत साधनेचा घेतलेला हा मागोवा. श्री मधुकर घोडविंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
ठाणे येथील जेष्ठ कलाकार श्री.मधुकर घोडविंदे हे सुरेल, सुश्राव्य सुगम संगीत गायक, संगीत संयोजक, संगीतकार आणि गायनगुरू म्हणून लोकप्रिय आहेत. ते निवडक गीतांना, सुमधुर, गेय, श्रवणीय चाली बांधून ती गाणी विविध कार्यक्रमात सादर करतात. याचबरोबर ते निरनिराळ्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, दिग्गज गायकांना उत्तम संगीत मैफीलिंमध्ये गाण्याची संधी देत असतात. शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्यांनी गायन शिकविले आहे. नवोदित गायकांनाही ते आवर्जून व्यासपीठ उपलब्ध करून देतात.
तसं पाहिलं तर संगीत क्षेत्रात पूर्ण हयात वेचणार्या मधुकरजी यांचा जन्म एखाद्या शहरात झालेला नाही, तर तो झाला आहे, ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा मलवाडे या आदिवासी गावात. त्यावेळी या गावात लाईटसुद्धा नव्हती. वडिलांचे किराणा मालाचे छोटेसे दुकान होते.या दुकानात काम करत, कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत, त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.उपजतच संगीताचा कान असल्यामुळे घरातील ओटीवरच्या कोनाड्यात असलेल्या रेडिओवर वाजणारी गाणी ते मन लावून ऐकत असत. आपल्यात म्हण आहेच, “इच्छा तिथे मार्ग”, त्या प्रमाणे गावात संगीत शिकण्याची काहीही सोय नसताना रेडिओलाच त्यांनी गुरू मानले आणि नकळत त्यांची संगीत साधना सुरू झाली.

प्राथमिक शिक्षण झाल्यावर मधुकरजी माध्यमिक शिक्षणासाठी, त्यांच्या गावापासून सहा मैल दूर असलेल्या वाडा येथे चक्क सहा मैल पायी जात आणि पायी येत. पण कधी शाळा बुडवित नसत. नाही म्हणायला, कधी दुकानाला लागणारा किराणामाल आणण्यासाठी बैलगाडी निघे त्या दिवशी मात्र त्यांची ही पायपीट वाचत असे. अशा परिस्थितीत त्यांनी जुन्या मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले.
दरम्यान गायनाची आवड जोपासत राहिल्याने, स्वतःच स्वतःला घडवत राहिल्याने मधुकरजी चांगले गातात, असा लौकिक पंचक्रोशीत व्हायला लागला होता. त्यामुळे काही घरगुती कार्यक्रमात त्यांना गाणी गाण्यासाठी बोलावत असत.
त्याकाळी जव्हार हे सरदार मुकणे ह्यांचे संस्थान होते. त्यांना संगीताची आवड असल्याने ते त्यांच्या राज दरबारात संगीताच्या मैफिली भरवित असत. मधुकरजी यांची कीर्ती ऐकून त्यांनाही या राज दरबारात गाण्यासाठी निमंत्रित केल्या जायचे. कार्यक्रमानंतर त्यांचा शाल, श्रीफल, भेटवस्तु, बिदागी देवून सन्मान केला जायचा. त्यानंतर राजेशाही पक्वान्नाचे भोजन असायचे. त्यांच्या या थाटामुळे ते जणू राज गायकच झाले होते.
मधुकरजीच्या गोड आवाजामुळे संगीत प्रेमी त्यांना “प्रति सुधीर फडके” म्हणत असत. या भागात त्याकाळी वाहनाची सुविधा नव्हती. त्यामुळे पेटी तबला, पखवाज, ई. संगीत साधने त्यांना चक्क बैलगाडी मधून घेऊन जावी लागत. नंतर गावात एसटी बस सुरू झाली. ही बस रात्रीला गावातच मुक्कामाला थांबे. या बसचे ड्रायव्हर, कंडक्टर, क्लीनर, हे मधुकरजीच्या घराच्या ओसरीवर वस्ती करत असत. अशा वेळी मधुकरजीचे गाणे ऐकायला मिळणे म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच असायची.
असे सर्व काही ठीक चालू होते. पण मधुकरजीना उच्च शिक्षणाची आस गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली. हॉस्टेल वर राहून बांद्रा स्कुल ऑफ आर्ट या संस्थेत त्यांनी कला शिक्षण घेतले.
पुढे मधुकरजीना ठाणे शहरात ड्रॉईंग आर्ट मास्टर ची नोकरी मिळाली. 1982 मध्ये त्यांचा पूर्वाश्रमीच्या मीना वनगे यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी त्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नर्स होत्या. अशा प्रकारे एकमेकांना साथ संगत करत त्यांचा संसार सुरू झाला. सोबतच त्यांना ठिकठिकाणी स्वतंत्र बैठकीचे गायनाचे कार्यक्रम मिळू लागले. शिवाय मंदिराचा जीर्णोद्धार, सणवार, सार्वजनिक उत्सव, शालेय वार्षिक स्नेहसंमेलने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सत्यनारायण पूजा, सरकारी कार्यालयांद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मान्यवरांतर्फे आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी त्यांना आवर्जून निमंत्रित केल्या जाऊ लागले.
मधुकरजीनी आपली गाण्याची आवड स्वतः पुरतीच मर्यादित ठेवली नाही. तर ते ही कला इतरांना शिकवू लागले. हे त्यांचे मोठेच योगदान म्हणावे लागेल. त्यांच्या संगीत साधना क्लासमधे विद्यार्थी, विद्यार्थिनी अवघ्या सहा महिन्यातच गायनासाठी उत्तम होतात. त्यांच्या 501 विद्यार्थ्यांनी ठाणे येथे दादोजी कोंडदेव मैदानात “एकसूर, एक ताल” कार्यक्रम सादर करून आपल्या गुरूला अनोखी मान वंदना दिली.
मधुकरजीनी श्रीसमर्थ विद्यालयासाठी मनाच्या श्लोकांची कॅसेट स्वतः स्वरबद्ध केली. ती पुढे बरीच वर्षे प्रार्थना म्हणुन विद्यार्थ्यांना ऐकवली जायची. तसेच त्यांनी गायनाच्या स्पर्धांसाठी बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणून काम केले आहे.

काही गंभीर प्रसंगीसुध्दा मधुकरजीना गाण्यासाठी पाचारण केले जायचे. उदा. ठाण्यातील स्व पट्टेकर महाराज यांच्या निर्वाण वेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे अंत्यदर्शनासाठी येईपर्यंत फुलांनी सजविलेल्या महाराजांच्या शवाशेजारी बसुन तबल्याशिवाय पेटीचे सूर धरून त्यांनी भजने गाऊन वातावरण धीर गंभीर ठेवले होते. तेव्हा पण त्यांना अनेक मान्यवरांनी गौरविले होते. अशा कितीतरी विशिष्ठ वेळी त्यांना गायनासाठी ताडतडीने बोलावणे येत असे. कोणावरही अशी काही वेळ आली की ते कधीही नाही म्हणाले नाहीत की गायनाचा कधी कंटाळा केला नाही.
मधुकरजी त्यांच्या संगीत साधनेचे सर्व श्रेय वडिलांना देतात. जन्मजात गायन कला लाभली ही ते परमेश्वरी कृपा समजतात. आजही ते गायनाचे कार्यक्रम त्याच उत्साहाने, अन आवडीने सादर करतात. मध्ये एकदा हृदय विकाराचा झटका येऊन गेल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना काही काळ विश्रांती घ्यावी लागली होती. पण परत ईश्वरी कृपेने त्यांचे गायन पुन्हा सुरू झाले. आता त्यांनी गायलेल्या, संगीत दिलेल्या गीतांचे ऑडिओ, व्हिडीओ, बनवण्याचे कामकाज सुरु आहे. त्यातील काही गाणी तयार झाली आहेत. ही गाणी यू ट्यूब वर गाजत आहेत. कलेला दैवत मानून जगणारे मधुकरजी आपले बोनस आयुष्य कलेची सेवा करत याही वयात उत्साहाने आत्मानंद मिळवत आहेत.
मधुकरजी गायक, गाण शिक्षक आहेत. तर त्यांच्या सहचारिणी सौ मीना घोडविंदे या लेखिका, कवयित्री म्हणुन प्रसिद्ध आहे. अतिशय निष्ठेने परिचारिकेची सेवा बजाविलेल्या मीनाताईंचीही प्रेरणादायी जीवन कथा मी या पूर्वी शब्दबद्ध केली आहे. हे दोघेही एकमेकांना समजून घेऊन, घराची कर्तव्ये, जबाबदार्या पार पाडून आपापल्या कला जोपासत, एकमेकांना छान साथ संगत करीत जीवन जगत आले आहेत. आजकाल बारीकसारीक कारणांनी घटस्फोट घेऊन स्वतःच्या आणि प्रसंगी आपल्या मुलांच्या जीवनाची वाट लावत चाललेल्या, आपापल्या आई वडिलांना मनस्ताप देणार्या जोडप्यांनी त्यांच्याकडे पाहून हे शिकले पाहिजे की, पतीपत्नी हे एकमेकांचे स्पर्धक नसतात तर एकमेकांना पूरक ठरूनच ते स्वतःची आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती साधू शकतात. समाजात मान, मान्यता मिळवू शकतात.

अशा या एकमेकांना तारक ठरलेल्या घोडविंदे दाम्पत्याची दोन्ही मुले उच्चशिक्षित आणि माझ्या दृष्टीने त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे उच्च संस्कारित आहेत. थोरले चिरंजीव मयूर हे महाराष्ट्र शासनाच्या एका अंगीकृत महामंडळात तर दुसरे चिरंजीव मंथर हे एका खाजगी कंपनीत अधिकारी आहेत. दोन्ही सुना देखील उच्च शिक्षित असून चांगल्या सेवेत आहेत. दोन्ही मुलांना एकेक अपत्य आहे.
जन्माला येताना आपण सोबत काही घेऊन येत नाही किंवा हे जग सोडून जाताना सोबत काही नेऊ शकत नाही. पण आपल्या कलेचे आविष्कार हे रसिक श्रोत्यांचे मन जिंकून त्यांच्या हृदयावर अधिराज्य मात्र गाजवतात, असे कायम ध्यानात ठेवून कलासक्त जीवन जगणारे, इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे मधुकरजी शतायुषी होवोत, या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
