शेवटचा भाग…
गिरनार परिक्रमेचा शेवटचा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत. गंधेकाकांनी ज्या जिद्दीने, तडफेने या वयात ही परिक्रमा पूर्ण केली, तो त्यांचा गुण निश्चितच घेण्यासारखा आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. परिक्रमेत त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सहकारी व ही परिक्रमा आपल्या पोर्टलवर प्रसिध्द होण्यासाठी समनव्यय साधणारे आपले मित्र श्री दिनेश पिंटो यांचे हार्दिक आभार….
सकाळी एकदम जाग आली सहा वाजता. बघतो, तर काय तीन जण गायब. पाटील साहेबांना विचारले तर ते म्हणाले, ‘ते तिघे गुरु शिखरावर गेले आहेत दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आणि मी थांबलोय तुमच्यासाठी, चला आवरा लवकर’.
मी खूप थकून गेलो होतो. म्हणालो नरेश, माझ्याच्याने एक पाऊल सुद्धा टाकवत नाहीये, मी नाही येऊ शकणार तू एकटा जा. नरेश म्हणाला अर्ध्यापर्यंत रोपवे, पुढे जमेल पायर्या चढून जाणं तुम्हाला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. शेवटी तो नाराजीनेच एकटा गेला.
अंग दुखणे म्हणजे काय हे मी त्यादिवशी अनुभवले. शरीराचा प्रत्येक भाग दुखत होता, मांड्या ठणकत होत्या, पाय टेकवत नव्हते, भरीस भर म्हणून बोटांवर आलेल्या काही फोडांची कातडी निघाली होती तर काहींची मी ओढून काढली होती.
सगळाच आनंद होता. गमतीची गोष्ट म्हणजे बँडेज, क्रीम, पायाला लावायचे औषध, किंबहुना कोणतंही औषध हे पानाच्या टपरीवरच मिळत होते, कारण संपूर्ण तलेटी गावामध्ये एकही मेडिकल स्टोअर नाहीये, कदाचित स्थानिक लोक आजारीच पडत नसतील बहुतेक !
मी पुन्हा एकवार छान पैकी जेवलो. औषध घेतले आणि मस्तपैकी ताणून दिली. जाग आली तेव्हा ५ वाजले होते आणि मंडळ दत्त महाराजांचे दर्शन घेऊन परत आले होते.
थोड्यावेळाने आम्ही सगळे बाहेर पडलो. दोनचार आश्रम फिरलो, देवतांचे दर्शन घेतले आणि भोजनास एका आश्रमात गेलो. अतिशय सुरेख व्यवस्था.
भोजनास, दालखिचडी, पुऱ्या, भाजी, कढी आणि मोहनथाळ. अत्यंत उत्तम बनविलेले अन्नपदार्थ. बसण्याची भारतीय व्यवस्था उत्तम, छान पैकी मोठा मांडव, साधारण ६० फूट बाय ५० फुटांचा, सतरंज्या अंथरलेल्या होत्या. एका बाजूस स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूस पुरुष अशी व्यवस्था. नीट रांगेत उभे राहून जेवढे आपल्याला हवे, तेवढेच डिशमध्ये घ्या, व्यवस्थित बसा आणि जेवा. अन्न वाया जाणार नाही, नासाडी होणार नाही, ह्याची काळजी घ्या, तशा सूचना स्वयंसेवक देत होते, कमी जास्त बघत होते. उत्तम भोजनाचा मनापासून स्वाद घेतला.
भोजन झाल्यावर स्वतःची ताटवाटी घासून, धुऊन पुसून ठेवणे हा नियम होता. व्यवस्था चोख. बाहेर ३ बाय ३ फुटाचे ६ स्टँड होते, त्यावर ट्रे होते, त्यात पाणी. साधे पाणी, गरम पाणी, साबणाचे पाणी, फडकी, आणि शेवटी भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ फडकी. समोर बसलेल्या माणसाजवळ ताटवाटी कोरडी करून देणे आणि बाहेरचा रस्ता धरणे. ह्याचे व्यवस्थापन साधू महाराजांकडे होते, त्यांना नमस्कार केला आणि आश्रमाबाहेर आलो.
बाहेर आल्यावर लगेच फोटोसेशन सुरू झाले. खूप लोकांनी, ग्रुपमधल्या बऱ्याच जणांनी, माझ्या बरोबर फोटो काढून घेतले. आनंद झाला. फिरत फिरत आम्ही पुन्हा रूमवर आलो.
गप्पाटप्पा झाल्यावर अंथरूणावर पडलो आणि लक्षात आलं की माझी आजची कमाई किती ? येताना प्रवासात एकच मित्र होता, नरेश पाटील, तिथेच अली भाई, त्यांचा परिवारही मित्र झाला. परिक्रमेत सहभागी झाल्यावर ग्रुप मधले ८० आणि चालताना झालेले ५० लोक म्हणजे जवळपास १२५ ते १५० नवीन मित्र झाले, थोडक्यात कमावले असे म्हणता येईल. मी श्रीमंत आहे हे जाणवले. “श्रीमंती ही फक्त पैशातच मोजता येते असे नव्हे हे त्रिकालाबाधित सत्य आहे.” असा विचार करता करता कधी झोप लागली ते कळले नाही.
सकाळ होताच, उठून प्रातर्विधी आटोपून, चहा नाश्ता करून, सोबत शिदोरी घेऊन आम्ही रिक्षाने निघालो. संयोजकांनी जुनागड रेल्वे स्टेशन पर्यंत सगळ्यांसाठी रिक्षा ठरवलेल्या होत्या, ही आणखीन एक संयोजन कौशल्याची बाब.पुन्हा एकदा जुनागड रेल्वे स्टेशनच्या बाहेर फोटोसेशन झाले. एकंदरीत प्रचंड मजा आली. तेवढ्यात रेल्वे स्टेशन मध्ये आली, आम्ही आमच्या बोगीत बसलो, प्रवास सुरू झाला. मी आणि नरेश ३-एसी मध्ये होतो आणि बाकीचे सगळे एस-१,६,९ अशा ठिकाणी होते.
संध्याकाळी एक एक मंडळी भेटायला यायला सुरुवात झाली. आमचा कुपे फुल होता, परंतु शेजारचा कुपे बराच रिकामा होता, त्यामुळे त्यांची परवानगी घेऊन, तिथे बसून मित्रांना भेटत होतो. मित्रांशी बोलताबोलता त्यांच्याशीही संभाषण सुरू झाले, ग्रुप छानच होता, अर्थात आपण चांगले वागलो तर समोरचाही चांगला वागतो यावर माझा विश्वास आहे. थोड्या वेळाने तर असे वाटले कि मी त्या कुटुंबाच्या बरोबरच आलो आहे आणि आता त्यांच्या बरोबरच परत चाललो आहे, इतके छान आमचे सूर जुळले .
आता अध्यात्मिक गप्पा सुरू झाल्या, कुठून कसा, पण रामरक्षा हा विषय निघाला. माझे रामरक्षेबद्दल चे मत मी प्रकट केले. तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकता वाढते हे केवळ रामरक्षेचे नित्य पठण केल्याने घडते हा माझा स्वानुभव सांगितला.
ते सगळे म्हणाले, आम्हीपण रामरक्षा म्हणतो परंतु त्यातील काही उच्चार आम्हाला जमत नाहीत, तुम्ही म्हणाल का ? आम्हीपण तुमच्या बरोबर म्हणू, यात नाकारण्यास सारखे काहीच नव्हते.मी रामरक्षा म्हणावयास सुरुवात केली, माझ्याबरोबर तेही म्हणू लागले आणि संपूर्ण डबा रामरक्षेच्या स्वर, मंत्र, अक्षरांनी भरून गेला, वातावरण बदलून गेलं. रामरक्षा संपल्यावर सगळे खुश झाले. म्हणाले, खूप छान वाटतंय, खूप मजा आली.
त्यांना मागच्या लॉकडाऊन मध्ये संस्कृत राम रक्षा मराठीमध्ये समश्लोकी, समछंदात आतलं पद्यानुवादीत केलेलं सांगितलं. विचारले असता, माझ्याकडे असलेल्या हस्त लिखित १४-१५ प्रति पैकी काही दिल्या, जवळपास संपल्याच. प्रति बघून माझ्या हस्ताक्षराचे खूपच कौतुक झाले, मीही नेहमीप्रमाणे लाजत, लाजत, कसचं, कसचं, म्हणून नम्रपणे हसलो.
रात्रीचे ९ll वाजले होते, म्हटलं आता उठावं आणि आपल्या जाग्यावर जावं, तोवर कुटुंबप्रमुख म्हणाले, काका, जरा थांबा ना पलीकडच्या डब्यात माझी बहिण आणि तिची मुलगी आहे, त्यांना तुम्हाला भेटायचंय, मी तुमच्याबद्दल आत्ताच त्यांच्याशी बोललो, त्या येत आहेत थांबा ना, थांबलो. पर्याय काय होता ? तेवढ्यात त्या मायलेकी आल्या, नमस्कार चमत्कार झाले. हास्यविनोद गप्पाटप्पा झाल्या आणि मी माझ्या जागेवर.
पहाटे ४ वाजता जागा झालो, थोड्याच वेळात बोरिवली स्टेशन येईल हे माहीत होते. फ्रेश झालो.
वाट बघत बसलो. स्टेशन आले. मी पायउतार झालो. नरेश पुढे जाणार होता. जिना चढून वरती आल्यावर पुन्हा मंडळ भेटलं. गुरुशिखरावर जाण्याचे वायदे झाले आणि मी माझ्या घराकडे परतलो.
अवर्णनीय, अलौकिक, प्रचंड काही मिळालेली ही यात्रा, माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अशी झाली. सर्व यात्रेकरूंचे, मित्रांचे, संयोजक, आयोजकांचे, जेवढे मानावेत, तेवढे आभार कमीच आहेत.
हा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा कायमचा ऋणी आहे.
जय गिरनार
जय गिरनारी
अवधूतचिंतन
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
इत्यलम्.

– लेखन : गंधेकाका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अभिनंदन गंधेकाका..
श्रद्धा ,भक्ती, निर्धार ,मनाचा विश्वास शक्ती याचे हे सुंदर फळ….