टीव्ही सिरीयल्स मधील लोकप्रिय कलाकार
श्री शशिकांत गंधे उर्फ गंधे काका सांगताहेत, त्यांच्या गिरनार परिक्रमेचे दिव्य अनुभव….
फार पूर्वी, कधी तरी मला वाटलं होतं की, आपण गिरनार पर्वतावर असलेल्या श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा करावी… आणि हे कधीतरी वाटणं, प्रत्यक्षात येईल असं मात्र मला वाटलं नव्हतं !
एक दिवस अचानक आमच्या भक्तराज महाराज संप्रदायातील एका मित्राचा, नरेश पाटील याचा फोन आला, म्हणाला, “काका, गिरनार पर्वत दर्शन आणि परिक्रमा आहे, येताय का ?” एका दीर्घ पॉज… नंतर मी ताबडतोब “होय येतोय” म्हणालो ! अणि फोन ठेवला.
वय वर्षे ७०, गुडघे दुखतात (वेगात गाडी चालविण्याची सवय, ५० एक आपट्या खाल्ल्यावर दुसरं काय होणार ?) बाकी आजार कोणताही नाही ही स्वामींची कृपा…
हां, एकदा कधीतरी तीव्र हृदय विकाराचा झटका येऊन गेला. त्यावर उपचार झाले, अँजिओप्लास्टी झाली आणि त्यानंतर मी ती घटना पूर्णपणे विसरूनही गेलो व पूर्णपणे निरोगी असल्याच्या थाटात मी वावरतो ही देखील स्वामींची कृपा…!
नरेश माझे मागील जन्माचे देणे फेडतो आहे असे मला वाटले. तिकीट काढणे, सर्व खर्च करणे, ही बहुतेक त्याचीच जबाबदारी असल्यामुळे, एकही रुपया न देता, मी 16 नोव्हेंबर 2021 ला शांतपणे थ्री टायर एसी कोचमध्ये त्याच्या शेजारी विराजमान झालो. अर्थातच मला ट्रेन मध्ये बसवून देण्यासाठी विद्यानंद कामत आणि सुयोग असे माझे जिवलग मित्र आले होतेच.
कदाचित मी नक्की गिरनारला जातोय की भलतीकडे कुठेतरी जातोय ? याची खात्री करण्यासाठी दोघे आले असावे. माझी लहरी प्रवृत्ती त्यांना तसे करण्यास भाग पाडत असेल. असो… त्यांनी मला नरेशच्या ताब्यात दिले आणि नरेशनेही आता काका माझ्या ताब्यात आहेत काळजी करू नका असे सांगून त्यांना टाटा, बाय बाय केला आणि अशा प्रकारे गिरनार प्रवासाला सुरुवात झाली.
नरेशच्या मनमिळावू वृत्तीमुळे लगेच सहप्रवाशांशी ओळख झाली, बोहरी कुटुंब होते. अतिशय सज्जन आणि मृदू संभाषण हे त्यांचे वैशिष्ट्य. अली साहेब ! ह्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे आणि मुख्य म्हणजे अपंग, मूकबधिर अशा मुलांसाठी त्यांनी एक निवासी शाळा सुरू केली आहे, त्यामध्ये मुलांना वैद्यकीय मदत देऊन हळूहळू बोलते करतात, लिहायला, वाचायला शिकवतात आणि स्वतःच्या पायावर उभे करतात.
त्यांचं आयुष्य सर्वसामान्य माणसासारखं घडविण्याचा प्रयत्न करतात, अर्थातच हे फार मोठं समाज कार्य आहे. नरेश गोड बोलणारा असल्यामुळे (?) आमच्या गप्पा रंगल्या, शेरोशायरी ची देवाण-घेवाण झाली, त्याच बरोबर अध्यात्मिक चर्चाही झाली, प्रवासाचा आनंद प्राप्त झाला आणि यथावकाश निद्राधीन झालो…😴
… क्रमशः !
इति भाग पहिला…
लवकरच दुसरा येतोय…
– लेखन : गंधेकाका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800