नमस्कार,
वाचक हो,
नारळ, केळी, साखर, तांदूळ किंवा सोने, चांदी, तांबे काहीही ज्याच्या त्याच्या इच्छेने दान करतात. पण काही लगेच खराब होणारे पदार्थ, फुले, फळे असतील तर अगोदर कल्पना द्यावी लागते जेणेकरून त्या वस्तू खराब होऊ नयेत, वाया जाऊ नयेत म्हणून ..
गुरुवायूर देवस्थानचे अजून एक आकर्षण म्हणजे मंदिराचे हत्ती. इतर वस्तूंसोबत हत्तीही दान म्हणून मंदिराला दिले जातात. मंदिराचे वैयक्तिक हत्ती साधारण पन्नासपेक्षाही जास्तच आहेत.
केरळमध्ये मंदिरामध्ये, धार्मिक कार्यक्रमासाठी हत्तींचा वापर केला जातो. अर्थात त्यांची तशी काळजीही घेतली जाते. मंदिरात दर्शन झाल्यावर जेवण करून तुम्ही या हत्तींना पाहायला जाऊ शकता.
मंदिरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरतीच जगातील सर्वात मोठी हत्तींचे अभयारण्य आहे – Anakotta Elephant sanctuary
केरळला हत्तींचे घर का म्हणतात ते इथे गेल्यावर समजते. ११ ते १२ एकर मध्ये हे अभयारण्य आहे. प्रवेश करताना तिकीट काढून जावे लागते.
छोटे मोठे हत्ती, एखादा शांत तर एखादा दंगा करणारा काही आराम करणारे तर कोण खात असणारे हत्ती दिसतात. अगदी महाराजांसारखीच त्यांची काळजीही घेतली जाते बर का..
हत्तींचे राज्य पाहून झाले की मग समुद्राच्या पाण्यात खेळायला जायचे ते ही अगदी लगेच.
Anakotta पासून साधारण १० ते १२ किलोमीटर अंतरावर चावकाड – chavakkad beach आहे. इथे येईपर्यंत संध्याकाळ होत आलेली असते.
शांत सुंदर अशी ही जागा..
या समुद्र काठावर पर्यटक पाण्यात खेळत असतात, काही मुलांसोबत पतंग उडवत असतात, काही रेतीत घर बांधायची मज्जा घेतात तर काही निवांतपणे नजारे पाहत असतात.
मासेमारीसाठी गेलेल्या नावा मासेमारी करून किनारीला परत येत असतात. त्यांची लगबग, गोंधळही बघण्यासारखी असते.
एक एक नावा परत आल्यावर बोटीतून मासे काढल्यानंतर पुन्हा गडबड सुरु होते ती माश्यांच्या लिलावासाठी. पटपट बोली लावून कागदावर काहीतरी आकडेमोड करत लिलाव सुरू होतो आणि अगदी थोड्या वेळातच लिलावाचा कार्यक्रम संपतोही..
यामध्ये स्थायिक नागरिकही मासे खरेदी साठी आलेले असतात. ताजी ताजी मासळी घेऊन जायची त्यांचीही मध्येच गडबड चालू असते..
आणि याबरोबरच मित्राचीही अस्ताला जाण्याची गडबड चालू होते. केशरी रंगाचा मोठा गोळा जाता जाता डोळे दिपवून जातो …

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूप छान माहिती मनीषा