Homeसाहित्य"गुरु माहात्म्य"

“गुरु माहात्म्य”

आषाढपोर्णिमा अर्थात गुरुपोर्णिमा ! गुरुपोर्णिमे चे अनन्यसाधारण महत्त्व…! भारतीय संस्कृतीत गुरुपोर्णिमा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. संतांच्या मांदियाळीत गुरूला पवित्र पावन स्थान आहे. गुरू शिवाय ज्ञान व्यर्थ म्हटले जाते. ही गुरू परंपरा कशी विकसित होत गेली हे पाहणे मोठे रंजक आहे.

विठू माझा लेकूरवाळा
संगे गोपाळांचा मेळा…!!!
संत जनाबाईंचा हा अभंग ! सर्व संतांचे वर्णन करतांना तिने हे रुपक योजले आहे. विठ्ठलाला तिने लेकूरवाळा म्हंटले आहे. ही सारी संत मंडळी त्या विठ्ठलाची लेकरं आहेत. निवृत्तीनाथासारखे अधिकारी संत त्यांच्या खांद्यावर आहेत.

बंका बंका हे बरोबरीने चालले आहेत. गोरोबा कुंभार सारखा अधिकारी संत मांडीवर घेतलेला आहे. ‘पुढे चाले ज्ञानेश्वर’ ज्ञानदेव पुढे चालले आहेत. कारण, “मार्ग दावोनि गेले आधि ! दयानिधी संत ते !” ज्ञानेश्वरीच्या रुपाने ज्ञानोबा माऊलींनी मार्गदर्शन केलंय आपल्याला म्हणून ते पुढेच पाहिजेत. त्यांच्यामागे आपल्याला जायचे आहे.
“मागे मुक्ताई सुंदर !” मागे मुक्ताई चालली आहे. सर्वात लहान पण तिचा अधिकार मोठा आहे. म्हणून विठू लेकूरवाळा !! किती सुंदर आणि मधूर संकल्पना…!!

संतांनी गुरू परंपरा कशी विकसित केली हे ही मोठं मनोरंजक आणि बोध घेण्यासारखे आहे. विठ्ठलपंत आणि रूक्मिणी माता यांची चार मुलं ! निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई ! त्यात मुक्ताईचा अधिकार खूप वेगळा आहे. ती सगळ्यात धाकटी आहे, पण या धाकटीचा अधिकार सगळ्यांनी मान्य केलेला असतो. मुक्ताई अधिकारी संत होत्या. त्यांचा अधिकार खूप मोठा होता. या भावंडांच्या बालपणीच आईवडिल गेले. त्यांनी प्रायश्चित म्हणून देहत्याग केला. लहान वयात पोरकी झालेली ही भावंडं ! निवृत्तीनाथ वयाने लहानच पण त्यांच्यावर गहिनी नाथांची कृपा झाली आणि त्यांनी नाथ संप्रदायात प्रवेश केला. निवृत्ती नाथांनी ज्ञानदेवांना अनुग्रह दिला. ज्ञानदेवांनी सोपानदेव व मुक्ताईला उपदेश करीत अनुग्रहीत केले.

छोट्या मुक्ताईची परंपरा फार मोठी आहे. तिचा अधिकार पाहून तिला ‘ब्रम्हज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा’ असे संबोधिले आहे. ती साक्षात ब्रम्हाची शक्ती, शिवशक्ती असे अमृतानुभवात म्हंटले आहे. ती शिव आणि शक्ती दोन नाही. ती शिवाची शक्ती मुक्ताई आहे.

संत नामदेव त्यांची महती वर्णावी तितकी कमीच आहे. त्यांचा अधिकार इतका मोठा होता की, साक्षात विठ्ठलाला “नैवेद्य हातीचा मुर्ती जेवी !” साक्षात विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या हातचा नैवेद्य खात होती. पांडुरंगालाही नामदेवा शिवाय करमायचं नाही. विठ्ठलाचे मजवर सगुण प्रेम आहे म्हणणारे नामदेव मोठे कीर्तनकार होते. पण नामदेवांना गुरु नव्हता. पांडुरंग नेहमी नामदेवास सांगायचे, “अरे नामदेवा, माझा ज्ञानोबा, चोखोबा, बंका, निवृत्ती आहेत, त्यांच्याकडे तू एकदा जा, माझा गोरा कुंभार पाहिलास का तू ? त्यांच्याकडे जा !” “हा जुनाट म्हातारा. याला गाडगी मडकी भाजायचं माहिती आहे. तू जा एकदा त्यांच्या सहवासात !”
नामा म्हणायचा, “पांडुरंगा मला त्यांच्या सहवासात जाऊन मिळवायचं काय ? माझ्याशी तर तू साक्षात बोलतोस. भगवत् प्राप्ती करायची तर तू प्रत्यक्ष साक्षात भगवंत बोलतो आहेस ना ! आणखी काय मिळवायचंय ?”
‘नाही रे नामदेवा ! मी कळतोय पण ते एकदिशी आहे. व्यापक ब्रम्हाचं ज्ञान गुरू शिवाय कळणार नाही.

‘ईशावास्यमिदम् सर्वम! यत्किंचित जगत् त्यांजगत् !
तेन त्यक्तेन भुज्जिता या कस्यचित धनम् !
अशा या व्यापक ब्रम्हाला जाणून घेण्यासाठी गुरू कृपा असावी लागते. त्यासाठी तुला संतांकडे जावे लागेल. त्याशिवाय तुला कळणार नाही. माझ्या ज्ञानोबा कडे जा’ असं भगवंताने वारंवार सांगितल्यानंतर नामदेव आळंदीला आले. तिथे सगळ्या संतांचा मेळा जमला होता. सावता माळी, गोरोबा काका, ज्ञानोबा, निवृत्ती सारेच होते.
नामदेवांना पाहताच,
‘उठीले महाराज संतांच्या दर्शना ! पंढरीच्या प्रेमा घरा आला !’
प्रथम निवृत्तीनाथ उठले.
‘केली प्रदक्षिणा वंदिले चरणा !
जाला अभिमान नामयासि !
आदराने वंदन केले. मोठी माणसं वेगळी असतात. नम्र असतात.

‘उठिले ज्ञानेश्वर ! केले ते वंदन ! मस्तकी चरण नमस्कारिले !
नामदेवांच्या मनी गर्व उत्पन्न झाला. ज्ञानदेवासारखा महात्मा मला वंदन करतो. हा अहंकार त्यांची देहबोली सांगून गेला. निवृत्तीनाथ मुक्ताईला म्हणाले, ‘अगं मुक्ते ! नामदेव महाराज आलेत. त्यांचं दर्शन घ्यावं, पाया पडावं.!’ मुक्ताईने निवृत्ती नाथांना सांगितलं, ‘नमस्कार करून समाधान झालं नसेल, तर दंडवत घाला. मी पाया पडणार नाही. ती म्हणाली, ‘अहंकार रुपी सर्पाने वेढलंय तुला. गोड कीर्तन करतोस पण अहंकार टाकीत नाहीस.’
करिता कीर्तन न होती संत !
संताचे ते आप्त न होती संत ! मुक्ताई रोखठोक होती.
पंढरीचं भूषण जगाला सांगतो पण अंतःकरणात बोध नाही. गुरूज्ञान नाही काय उपयोग त्याचा ? गोरोबा काकांना उद्देशून म्हणते, ‘काका तुम्हाला गाडगी भाजायची माहिती आहे. यांना भाजून काढा. नामदेव असा बिन गुरूचा कसा राहिला ? याला काकाच्या आव्यात भाजल्याशिवाय याचा उपयोग नाही.’

मुक्ताई चा आदेश मानून, हातात कुंभाराचे थापटणे घेऊन परीक्षा घेण्यास काका गेले असता नामदेव रागावले. ‘माझा अपमान करता का ? हे चालणार नाही’ म्हणत रागारागाने पांडुरंगाकडे येऊन तक्रार करु लागले. ‘देवा, तू माझी मुक्ता म्हणतोस ! पण माझ्या वयाचा, अधिकाराचा विचार न करता मला भडाभडा बोलली. माझं दर्शन तर घेतलंच नाही पण मला
एरंड म्हणाली. गोरोबा काकाच्या आव्यात घाला म्हणाली. गोरोबा तर थापटणं घेऊन मारायला आले. ही तुझी संत मंडळी कपटी दुष्ट आहेत. मला कच्चा म्हंटले. ‘देवा मी काय करु ? तूच सांग’.

पांडुरंगाने नामास परत संताकडे जाण्यास सांगितले. नामदेव माघारी आले. ज्ञानोबा माऊलीस शरण गेले. ज्ञानदेवांनी नामदेवास मुक्ताई कडे धाडले, आणि ‘पदरात घ्या’ अशी विनवणी ही केली. मुक्ताईचे शिष्य विसोबा खेचर ! मुक्ताई ने विसोबांना अनुग्रह दिला होता. नामदेव मुक्ताबाईकडे गेले. मुक्ताई ने त्यांना विसोबा खेचर यांच्याकडे जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिथे गेल्यावर त्यांना विसोबाकडून अनुग्रह प्राप्त झाला.
अनुग्रह प्राप्त होताच नामदेवांची अवस्था बदलली. नामदेव पांडुरंगाला एकदेशी मानत होते त्यांना सर्वत्र पांडुरंगच दिसू लागला. विठ्ठलाची प्रातिभ अनुभूती नामदेवांना आली आणि ते संतपदास पोहोचले. ही सारी संत मुक्ताबाईची कृपा…!

असाच प्रसंग चांगदेवाच्या बाबतीत ही घडून आला. चांगदेव महाराज चौदाशे वर्ष त्यांनी आपले शरीर जतन केले होते. मरण जवळ आले की सहा महिने समाधी लावत. ज्ञानेश्वरादी भावंडं पैठणहून पुणतांब्यास आली असता चांगदेवाविषयी चौकशी केली. मुक्ताई म्हणाली, ‘दादा बघू तरी चौदाशे वर्ष हा काय करतोय ते ? हे सारे भेटायला गेले तेव्हा चांगदेव समाधी अवस्थेत होते आणि समोर दोन चार प्रेते पडली होती. गावकऱ्यांनी सांगितले, महाराज जेव्हा समाधीतून बाहेर येताच त्यांची दृष्टी प्रेतावर जाते आणि त्यातलं एखादं जिवंत होतं. मुक्ताईचं लक्ष बाहेर जातं, तिथे कुत्र्यांचं हाड पडलं होतं ते आणण्यास सांगितले. ते हातात घेऊन मुक्ताईने सर्व प्रेतावरुन फिरविले व बाहेर फेकून दिले. त्या मेलेल्या हाडाचं कुत्रं झालं अन् ते पळून गेलं आणि प्रेतं ही जीवंत झाली. चांगदेवाची समाधी उत्थान झाल्यावर समोर एक ही प्रेत नव्हते. लोकांनी झालेला प्रकार महाराजांना सांगितला. त्यांचा अहंकार दुखावला गेला. ज्ञानेश्वर भावंडांना भेटण्याचा विचार केला. पण तत्पूर्वी पत्र लिहावे असा विचार करुन पत्र लिहू लागले. पण मायना काय लिहावा हेच त्यांना कळेना.
चिरंजीव लिहावे की आदरणीय…! हे न समजल्याने त्यांनी कोरं पत्र पाठवले. सगळेच बसलेले असतात, मुक्ताई निवृत्तीनाथांना म्हणाली, ‘दादा आता तुम्हीच वाचून दाखवा.’
निवृत्तीनाथांनी पत्र बघितलं आणि गोरोबा काकांना दिलं. गोरोबा काका म्हणाले, “कोरा राहिला गे माये ..!’ ही सारी मंडळी आणि ज्ञानदेवांनी पार्थिव भिंत चालवून चांगदेवाच्या भेटीस गेले. या छोट्या मुक्ताईने चांगदेवांना अनुग्रह दिला. त्यानंतर चांगदेव पासष्टी जन्मास आली.

अशी ही मुक्ताई वयाने लहान पण कर्तृत्ववाने खूप महान आहे. मुक्ताई आपल्या अभंगात म्हणते,
‘शांती क्षमा चित्त हरिभजनी !
मुक्ताईचे ध्यान हरिनाम उच्चारू !
अवघाची संसारू मुक्त केला…!!
संतांचं हेच वैशिष्ट्य आहे, स्वतः मुक्त होणं याला महत्व नाही. तर, ‘आपण जेवून जेववी लोका ! संतर्पण घाली तुका ! एकटे जेवण्यात स्वार्थ आहे. स्वत:ची मुक्ती साधून जग मुक्त करणे हे विशेष आहे. म्हणूनच संत महिमा अपार आहे. त्याची गोडी उत्तरोत्तर अवीट होत जाते हे सत्य आहे.

डाॅ. प्रभा वाडकर

— लेखन : प्रा डॉ प्रभा वाडकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments