वर्णिली संतांनी, देवांनी
ज्या नदीची गाथा
त्या माझ्या गोदावरीची
कशी वाणू कथा
शंकराच्या जटेतून
सोडविले तुज गौतमाने
मान मिळे तुजला, गंगेस
जसे आणले भगीरथाने
ब्रम्हगिरी पर्वती नाशकात
आलीस तू अलगद
गंगेचे पावित्र्य, तसेच
टिकवून जनामनात
डोईवर निळसर, काळे
ढगांचे मुकुटासम डोंगर
त्याखाली तुझा संथ
वाहणारा उगम, त्र्यम्बकेश्वर
गंगे आधी आली म्हणूनी
तुज म्हणती ज्येष्ठ गंगा
गौतम ऋषींनी आणली
म्हणूनी तू गौतमी गंगा
गौतम ऋषींच्या तपश्चर्येने
झाला प्रसन्न शंकर
आज्ञा केली गंगेला तू
ये जटेतून बाहेर
गंगा तयार नव्हती
म्हणूनी जटा आपटून
केले तांडव त्याने, तत्क्षणी
प्रवाह आला तेथून
ज्योतिर्लिंग बनुनी तेथे
शंकर स्वतः ही राहिला
गंगेचे पाणी गायीवर टाकून
जीवन दिधले तिजला
भगीरथाची गंगा ती
झाली भागीरथी
त्या पाण्याने गाय वाचली
तू झाली गोदावरी
जटेतून निघाली म्हणूनी
नाव जटाफटक पर्वत
कुश गवताने नदी बांधली
ते झाले कुशावर्त
महादेव देवळात त्र्यंबकेश्वरी
तीन छोटी छोटी लिंग
ब्रह्मा, विष्णू, महेश तिघेही
गोदाकाठी झाले एकरूप
अशी माझी गोदामाय
वाहत आहे नित्य
कुशावर्त, नाशिक, पैठण
आपेगाव ते राजमुंद्री आंध्र
वनवासी राम ही येथेच
राहिला दीर्घ काळ
तपोवन आणि पंचवटी
या पुण्यक्षेत्री हो सकाळ
अशी गौतमी गंगा
झाली माझी महानदी
तिची गाथा गाऊनी
होऊ या सारे स्वानंदी

— रचना : स्वाती वर्तक. खार (प), मुंबई ५२.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
