काही संस्था आणि व्यक्ती म्हणजे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात ! असेच काहीसे “ग्रंथाली” म्हणजे “सुदेश” असे म्हणावेसे वाटते. सुदेश म्हणजे अर्थातच सुदेश हिंगलासपुरकर. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा परिचय. सुदेशजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
महाराष्ट्रात मराठी लेखक आणि वाचकांची नवीच चळवळ उभारणाऱ्या ग्रंथाली ने नुकतीच ५० वर्षे पूर्ण केली आहेत. या वाटचालीचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर असे दिसून येते की, आतापर्यंत ग्रंथाली ने १२०० पुस्तके प्रकाशित केली आहेत. यापैकी १६० पुस्तकांच्या चार आवृत्त्या, २५० पुस्तकांच्या दोन आवृत्त्या, १२५ पुस्तकांच्या दहा आवृत्त्या, १८० पुस्तकांच्या तीन आवृत्त्या, २५ पुस्तकांच्या दहाहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
ग्रंथालीने प्रकाशित केलेली रोबो, बलुतं, क्लोरोफॉर्म, उपरा, संकल्प, सनद, ज्वालामुखीच्या तोंडावर, वैद्यकसत्ता, आभरान, अखेरचे आत्मचरित्र, मोहीम इंद्रावतीची, स्त्री-पुरुष, गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका, पडघम, गांधी ही पुस्तके पुरस्कार प्राप्त ठरली आहेत. तर ‘ग्रंथाली’ १९८४ सालचा वि.पु. भागवत स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
ग्रंथाली १९७७ सालापासून रुची / शब्द रुची मासिक प्रसिद्ध करीत आहे. बराच काळपर्यंत वाचक- सभासदांना ते विनामूल्य देण्यात येत असे. जानेवारी १९८८ पासून ते नियमित, भरगच्च आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध होत असून त्यात मान्यवर नियमितपणे लेखन करीत असतात.

पुस्तक प्रकाशन, वितरण या बरोबरच ग्रंथप्रसार, विज्ञानधारा, ग्रंथपाने, कोलाज साहित्यरंग, दिवाळी पहाट २०२१, अरुण साधू स्मृती पाठ्यवृत्ती, ग्लोबल साहित्य सफर, ग्लोकल लेखिका, साहित्याच्या पारावर असे विविध सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम ग्रंथाली तर्फे राबविण्यात येतात.
अशा या ग्रंथाली ची धुरा गेली १५ वर्षे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून सुदेश हिंगलासपूरकर समर्थपणे सांभाळीत आहेत. तसे तर ते ग्रंथालीशी १९७७ सालापासून जोडल्या गेले आहेत. सध्या पाकिस्तानच्या अखत्यारीत असलेला बलुचिस्तान प्रदेश त्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामुळे गाजत आहे. रोज तिथे पाकिस्तानी सैन्याबरोबर बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलुच लोक लढत आहेत. अशा या बलुचिस्तान मध्ये हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ म्हणजे हिंगलास देवीचे प्राचीन मंदिर होय. हे इथे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे या कथेचे नायक ज्यांच्या आडनावात हिंगलास नाव आहे, असे सुदेश हिंगलासपूरकर यांचे पूर्वज हे बहुधा हिंगलास देवीशी संबंधित असे असावेत. पण कधी काळी ते तिथून महाराष्ट्रात आले असावेत.
सुदेश यांचे वडील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील मिल मध्ये कामाला होते. पण ती मिल बंद पडल्यामुळे ते मुंबईत आले. प्रारंभी ते चुनाभट्टी येथील खानोलकर चाळीत राहत असत. लग्नानंतर मात्र त्यांनी मालाड येथे पुष्पा पार्क मध्ये घर घेतले. सुदेश यांच्या मोठ्या भावाचा जन्म अंजनगाव सुर्जी येथे झाला. मोठ्या बहिणीचा जन्म मुंबईत झाला. तर सुदेश यांचा जन्म अंजनगाव सुर्जी येथे १९ जानेवारी १९६१ रोजी झाला. त्यांच्या धाकट्या बहिणीचा जन्म मुंबईत झाला. हिंगलासकर कुटुंब ५ वर्षे मालाड मध्ये राहिले. त्यानंतर ते कुर्ला येथील नेहरूनगर मध्ये राहायला आले.
वयाच्या सहाव्या वर्षापासून सुदेश यांची जडणघडण नेहरूनगर मध्येच झाली. घरच्या बिकट परिस्थितीमुळे आई दूध केंद्रावर काम करीत असे. तर सुदेश घरोघरी पेपर टाकण्याचे काम करीत असत. त्यामुळे त्यांचे शिक्षण बारावी नंतर थांबले.
१९७७ सालातील एका दिवशी १६ वर्षांच्या सुदेशची आई, त्यांना घेऊन तेव्हा महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात पत्रकार असलेले दिनकर गांगल यांच्या घरी घेऊन गेली आणि तिने सुदेश यांना नोकरी लावण्याची गांगल यांना विनंती केली. हाच जणू सुदेश यांच्या जीवनातील “टर्निंग पॉईंट” ठरला ! तत्पूर्वी महाराष्ट्रात वाचक चळवळ रुजावी, उत्तमोत्तम पुस्तके वाचकांना उपलब्ध व्हावीत यासाठी दिनकर गांगल, कुमार केतकर, अशोक जैन आदी मंडळींनी १९७४ साली ‘ग्रंथाली’ ही संस्था स्थापन केली होती. त्यामुळे छोट्यामोठ्या कामांसाठी गांगल यांना मदतनिसाची गरज होतीच. त्यामुळे जुजबी चौकशी करून त्यांनी सुदेश यांना लगेच कामावर ठेऊन घेतले. तिथे सुदेश कार्यालयीन स्वरूपाची तसेच ग्रंथाली ची पुस्तके संबंधितांकडे पोचविणे, बँकेतील कामे करणे,पत्रे पोस्टात टाकणे, लेखकांकडून लेख आणणे या स्वरूपाची कामे करू लागले.
बऱ्याचदा दिनकर गांगल यांच्या घरी किंवा क्वचित प्रसंगी इतरत्र ‘ग्रंथाली’ च्या बैठका होत असत. अशावेळी या बैठकातील चर्चा, विचार विनिमय सुदेश यांच्या कानावर पडत. हे एक जणू त्यांच्यासाठी शिक्षणच ठरले. कळत नकळत त्यांचे प्रात्यक्षिक शिक्षण होऊ लागले. काही महिन्यांनंतर एक दिवस गांगल यांनी सुदेश यांना “प्रभात चित्र मंडळात कार्यकर्त्यांची गरज आहे. तू तिथे जाशील का ?” अशी विचारणा केली. सुदेश त्यांच्या शब्दाबाहेर कधी नव्हतेच. त्यामुळे ते ‘प्रभात’ मध्ये जाऊ लागले. सोबतच ते पूर्वीप्रमाणे “ग्रंथाली”ची कामे देखील करीतच होते. अशी कामे करीत असतानाच १९७९ साली गांगलांनी सुदेश यांना विचारलं, ‘तू साहेबराव चवरे यांच्याबरोबर चंद्रपूर येथे होणा-या साहित्य संमेलनाला जाशील का ?’ सुदेश यांनी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ते सुदेशचं पहिलं साहित्य संमेलन ठरले. विशेष म्हणजे तेव्हापासून झालेल्या सर्व, म्हणजे ४४ साहित्य संमेलनात सुदेश ग्रंथालीच्या पुस्तकांचा स्टॉल लावण्याच्या निमित्ताने हजर रहात आले आहेत. या शिवाय विद्रोही साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, अन्य विविध साहित्य संमेलने, नागपूर येथील दीक्षाभूमी, मुंबई येथील चैत्यभूमी येथेही ते पुस्तक प्रदर्शने भरवित असतात. केवळ देशातच नाही तर परदेशात देखील ते जात असतात. अमेरिकेत दर दोन वर्षांनी भरणाऱ्या बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात १९९३ पासून ते “ग्रंथाली”च्या पुस्तकांसह उपस्थित राहिले आहेत. या अधिवेशनांच्या निमित्ताने त्यांनी ग्रंथालीच्या रुची मासिकाचे विशेषांक प्रसिद्ध केले आहेत. तसेच अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या २५ लेखकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत.
पुस्तक प्रदर्शने आणि विक्री यासोबतच सुदेश यांनी विपुल ग्रंथयात्रा, बहुजन यात्रा, नेहरू सेंटर आयोजित “भारत की खोज मे”, यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीनिमित्त महाराष्ट्रात १०० ठिकाणी ग्रंथयात्रांचे नेतृत्व केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुवर्ण महोश्चवा निमित्ताने, १९९८- ९९ या वर्षात विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात स्पर्धा विविध कार्यक्रम,पुस्तक प्रदर्शने आयोजित केली आहेत.
मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुदेश यांनी युनिसेफ या जागतिक स्वयंसेवी संघटनेच्या सहकार्याने सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, गडचिरोली, भंडारा, या जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा आणि पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. ग्रंथाली साठी किंवा ग्रंथाली बरोबर सुदेश यांनी किती काम केले आहे, हे आकड्यात सांगायचे झाले तर, असे सांगता येईल की, त्यांनी आतापर्यंत पुस्तकांची २ हजार प्रदर्शने आयोजित केली आहेत.
‘ग्रंथाली’ २०१० साली ३५ वर्षांची झाल्यावर दिनकर गांगल यांनी ‘ग्रंथाली’ची सूत्रे नव्या दमाच्या व्यक्तीकडे सोपविण्याचे ठरविले आणि साहजिकच त्यांच्या डोळ्यापुढे सुदेश यांचे नाव आले. तेव्हापासून ते आजतागायत सुदेश आणि ग्रंथाली या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे समीकरण निर्माण झाले आहे.
सुदेश यांनी ग्रंथाली ची सूत्रे हाती घेतल्यापासून नवनवीन प्रयोग, उपक्रम सुरू केले. मराठीचे वैशिष्ट्य असलेल्या १३ प्रमुख बोलींवर त्यांनी दूरदर्शनवर १३ भागांची मालिका प्रसारित केली आहे. समाज माध्यमांचे वाढते महत्व लक्षात घेऊन त्यांनी ग्रंथाली चे ॲप तयार केले आहे. ग्रंथाली चे ई मासिक ते प्रसिद्ध करीत आहेत. तसेच विविध मान्यवरांच्या मुलाखती आयोजित करून त्यांचे फेसबुक वर थेट प्रक्षेपण करणे, यूट्यूब वर या मुलाखती, अन्य कार्यक्रम उपलब्ध करून देणे, पुस्तक प्रकाशने, लेखन, संपादन अशा सर्व एक ना अनेक बाबींनी ते जणू झपाटलेले असतात.

‘थेंब भर तुझे मन’ अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांच्या सीडीची निर्मिती त्यांनी केली आहे. २००४ पासून प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने ते सलग दहा वर्षे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे संयोजन करीत असतात. दिनकर गांगल यांच्या पंचात्तरी निमित्त ‘गांगल ७० : ग्रंथाली ३५’ ह्या पुस्तकाचे संपादन व निर्मिती त्यांनी केली आहे. सलग १० वर्षे खोडके मेमोरिअल ट्रस्ट साठी अमरावती येथे ग्रंथप्रदर्शन आणि कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. प्रेमानंद रामाणी यांची सत्तरी व पंचात्तरी निमित्त त्यांनी तसेच सारस्वत बँक ब्रँड ॲम्बेसेडर कार्यक्रमाचे संयोजन ते करीत आले आहेत. सिद्धिविनायक मंदिरात १९ ते २८ सप्टेंबर २००४ या कालावधीत ५१ गणपतींचे प्रदर्शन, एकनाथ ठाकूर यांच्या बहिणीचा कुडाळ येथे सत्तरीचा कार्यक्रम असे विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम त्यांनी यशस्वीरीत्या राबविले आहेत.
सुदेश यांच्या आजपर्यंत इ-टीव्ही च्या संवाद कार्यक्रमात, दूरदर्शन बातम्यांमध्ये, झी मराठी (न्यूज), एबीपी माझा (न्यूज), साम टीव्हीच्या मधुरा कार्यक्रमात, आकाशवाणी मुंबई व औरंगाबाद केंद्र-मुलाखत अशा विविध कार्यक्रमातून मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. याशिवाय त्यांनी झी मराठी मनोरंजन वाहिनीबरोबर ‘उत्सव नात्यांचा’ या तीन अंकांची आणि ‘खाली डोकं वर पाय’ या मुलांच्या दोन अंकांची निर्मिती देखील केली आहे. “एबीपी माझा” बरोबर सुदेश यांनी २०२१, २२, २३ अशी तीन वर्षे ‘माझा दिवाळी’ अंकाची निर्मिती केली आहे.
गेल्या वर्षीच ‘ग्रंथाली’ ने ५० वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने विविध ठिकाणी, विविध प्रकारचे उपक्रम झाले. दूरदर्शन चे निवृत्त सहायक संचालक, माझे मित्र श्री जयू भाटकर आणि त्यांची पत्नी सौ पद्मा यांनीही “ग्रंथालीची पन्नाशी” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात बोलताना मी, “ग्रंथालीने वाचकांना नवी दृष्टी दिली” असे सांगितले होते. हे माझे विधान प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. यानंतर ठाण्यातच स्वतः ग्रंथालीने ३ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या सर्व कार्यक्रमातील सुदेश यांचे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तिशी इतके अगत्याचे वागणे बोलणे होते की, जणू हे त्यांच्या घरचेच कार्य आहे. खरं म्हणजे, आजकाल बऱ्याच ठिकाणी ज्यांच्या घरचेच कार्य असते अशी मंडळी देखील येणाऱ्या जाणाऱ्यांशी नैसर्गिक अगत्याने वागतील बोलतील, असे नाही ! सांगायचा मुद्दा म्हणजे ग्रंथाली आणि सुदेश इतके एकजीव झाले आहेत.
सुदेशजीचा एक दुर्मिळ गुण म्हणजे, कुणाला काही अडचण आली आहे, काही गोष्टींची गरज आहे, असे दिसले, कळाले तर ते स्वतःहून पुढे येतात आणि हे काम आपले नसून त्यांचेच आहे, इतक्या आत्मियतेने झोकून देऊन ते काम मार्गी लावतात. इथे माझाच अनुभव देणे उचित ठरेल. आमच्या न्यूज स्टोरी टुडे प्रकाशनाची सुरुवातीची दहा पुस्तके काढणारा डिझायनर, प्रिंटर अपघाताने जायबंदी झालेला होता. तो बरा होण्याची वाट पहात दोन महिने उलटले. आमचे सर्व कामकाज ठप्प पडले होते. एका कार्यक्रमात आमची भेट झाल्यावर, त्यांनी विचारले, नवीन काय करताय ? यावर मी माझी अडचण सांगून, त्यामुळे सर्व कामकाज बंद पडले असल्याचे सांगितले. हे ऐकताच ते उस्फूर्तपणे म्हणाले, अरे.. काळजी कसली करताय ? ग्रंथाली आहे ना ! आणि तेव्हापासुन बोलता बोलता ग्रंथाली ने आमच्या माध्यमभूषण, A Romance for Ruby, कला साहित्य भूषण या तीन पुस्तकांचे निर्मिती, त्यांच्या लौकिकाला साजेशी केली आहे. आता आणखी काही पुस्तके त्यांच्या कडून निर्मितीच्या मार्गावर आहे.

अशा या सदा हसतमुख राहून सतत सक्रिय असलेल्या, इतराना शक्य ते सर्व सहकार्य करणाऱ्या सुदेशजीना काही पुरस्कार मिळाले नसते तरच ते आश्चर्य ठरले असते. त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत :
२००६ : मुंबई दूरदर्शनवर ‘मायबोलींचा जागर’ तेरा भागातील मालिकेच्या उत्कृष्ट संकल्पने बद्दल प्रथम क्रमांकाचा ‘मटा सन्मान’.
२००८ : संत रोहिदास सामाजिक न्याय पुरस्कार.
२०११ : उत्कृष्ट संपादना बद्दल आशीर्वाद पुरस्कार.
२०१३ : रुची अंकासाठी रामशेठ ठाकूर पुरस्कार.
२०१५ : डॉ. द.ता. भोसले सार्वजनिक वाचनालयाचा साहित्य सेवा पुरस्कार.
२०१७ : मुंबई मराठी साहित्य संघाचा कै. मधुकाका पंडित स्मृतीप्रतिष्ठान, कै. यशवंत पंडित पुरस्कार वाशी.
२०२१: मराठवाडा साहित्य परिषद रा.ग. देशमुख स्मृती पुरस्कार.
२०२३ : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुरस्कार.
२०२५ : पै फ्रेण्ड्स लायब्ररी आदान-प्रदान पुरस्कार.
वैयक्तिक पुरस्कारांबरोबर सुदेश यांनी ग्रंथालीसाठी पुढील पुरस्कार स्वीकारले आहेत…
२०२३ : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक .
महाराष्ट्र शासनाचा श्री. पु. भागवत पुरस्कार.
२०२३ : मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार.
अर्थात सुदेश यांना या पुढेही पुरस्कार मिळत राहतील, यात काही शंका नाही. पण जाता जाता एक सूचना करावीशी वाटते, ती म्हणजे आजवर शेकडो जणांची चरित्रे, आत्मचरित्रे, पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या सुदेशजीनी स्वतःचे आत्मचरित्र प्रकाशित करावे. या आत्मचरित्राच्या निमित्ताने खुद्द ग्रंथाली, महाराष्ट्रातील वाचक चळवळ, साहित्यिक बदल असा सर्व धांडोळा एकत्रितरित्या जतन होईल. त्याच बरोबर हे आत्मचरित्र आताच्या आणि पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील, यात काही शंकाच नाही.
सुदेश यांना यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800

अतिशय सुंदर व्यक्ति परिचय करून दिला आहेत. सुदेश सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💐
ग्रंथप्रेमी , साहित्य आणि संस्कृतीचे उपासक सुदेशजींच्या कार्याचा उचित गौरव व आढावा