Thursday, November 21, 2024
Homeपर्यटनचला पर्यटनाला ….!

चला पर्यटनाला ….!

आज २७ सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिन. यानिमित्ताने हा विशेष लेख.पर्यटनदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

स्वामी समर्थ रामदासांनी सांगितले आहे की “केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेत संचार” अर्थात नव्याचा परिचय करून घेणे, नवी माणसे जोडणे आणि नवे विचार ग्रहण करणे म्हणजेच आजच्या भाषेत पर्यटन म्हणता होय.

आपला देश विशाल आहे आणि विश्व तर त्याहून अधिक विशाल आहे. पर्यटनाच्या माध्यमातून विविध प्रांतात असणारी, भाषा, परंपरा, चाली-रिती तसेच जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती याची ओळख आपणास होत असते.

हल्लीच्या काळात नोकरीमागे धावताना सर्वांचीच दमछाक होते यातून काही काळ बाजूला होवून पर्यटन केल्याने मन ताजेतवाने अर्थात आजच्या भाषेमध्ये ‘रिचार्ज’ करता येत असते. धकाधकीच्या आणि रुटीनच्या वैतागाने आत्महत्त्या केलाच्या बातम्या अधून मधून कानावर येत असतात. अशा प्रकारच्या होणाऱ्या घटना घडू नये यासाठी देखील पर्यटन हा उत्तम पर्याय आहे.

पर्यटन हे काळानुसार आणि सुविधांसोबत बदलत आले आहे. आजच्या काळात विस्तारलेले रस्ते आणि रेल्वेचे जाळे, विमान व समुद्र प्रवासासाठी ‌ क्रुझची व्यवस्था यामुळे पर्यटनाला असलेल्या भौगोलिक मर्यादा आता संपल्या आहेत. त्यामुळे पर्यटनाचा विस्तार होत याचे रुपांतर आता पर्यटन उद्योगात झालेले आहे आणि हा उद्योग जगभरातून कोट्यवधींच्या उदरनिर्वाहाचे साधन आणि छंदासोबत उत्पन्न असाही विस्तार आपणास दिसतो.

पर्यटनाचे प्रकार देखील वेगवेगळे आहेत. केवळ सहलीच्या उद्देशाने आणि छोटया कालावधीची सुटी अर्थात ज्याला Long weekend म्हणता येईल असे पर्यटन महानगरासोबत आता छोटया शहरांमध्येही बाळसे धरताना दिसत आहे. या प्रकारच्या पर्यटकांची संख्या सर्वत्र अधिक आहे यात विशेष नियोजन करण्याची गरज लागत नाही सोबतच ‘वन डे’ पर्यटनाचा देखील यात पर्याय आहे.

सामजिक पर्यटन (आनंदवनला भेट)

पर्यटन एक व्यवसाय म्हणून बघताना याचे वर्गकिरण केल्यास अधिक स्पष्टता येईल. पूर्वीच्या काळी मुख्यतः धार्मिक पर्यटन होत असे. धार्मिक पर्यटनाचे सर्वात जुने आणि भव्य असे स्वरूप आपल्या राज्यात ‘वारी’ च्या रूपाने बघायला मिळते.
राज्याच्या विविध भागांमधून आषाढीच्या वारीत वारकरी सहभागी होतात. मोठया प्रमाणावर पायी होणारी ही वारी राज्याच्या संस्कृतीचा एक मोठा ठेवा आहे हे नक्की.
धार्मिक पर्यटनात शिर्डी, शेगाव तसेच तिरुपती बालाजी, अष्टविनायक, वैष्णोदेवी यात्रा, चार धाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा, मुस्लीम बांधवांची हज-उमरा यात्रा अशी अनेक उदाहरणे समोर आहेत.

पर्यटनाचा दूसरा प्रकार म्हणजे निसर्ग पर्यटन आहे. हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ साताऱ्यातील कास पठार यात्रा, ताडोबा उद्यानासह इतर ठिकाणी होणारी टायगर सफारी, भिमाशंकर मधील काजवा यात्रा, सह्याद्री पर्वत तर निसर्ग पर्यटनाचे उत्तम उदाहरण आहे.

निसर्ग पर्यटन

सागर किनारी पर्यटन हा देखील महत्वाचा प्रकार आहे. महाराष्ट्राला 720 किमी चा विस्तीर्ण सागरी किनारा लाभल आहे. रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि लगतचे गोवा राज्य ही पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत. समुद्रातील विविध साहसी खेळ आणि खास कोकणी-मालवणी सी-फूड यासाठी हा भाग पर्यटकांना कायम खुणावत असतो.

निसर्ग पर्यटनासोबतच गड-किल्ले पर्यटन हा खास महाराष्ट्रीयन पर्यटकांचा आवडता पर्यटनाचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना या गडकिल्ल्यांवर आपली पताका फडकवली. यातील प्रत्येक किल्ल्याला स्वतंत्र असा इतिहास आहे.
प्रत्येक किल्ल्याची स्वतंत्र अशी कहाणी आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना देखील या पर्यटनात अधिक आनंद मिळत असतो.

आपला देश पूर्वी राजे-महाराजे आणि संस्थानांचा देश होता. स्वातंत्र्यानंतर संस्थाने भारतात सामिल झाली असली तरी त्या काळचा इतिहास किल्ल्यांनी जपलेला आहे. लाल किल्ला, आगऱ्याचा किल्ला आणि राजस्थानातील चित्तोडगड सह संपूर्ण किल्ल्यांची मालिका तसेच देशातील इतर प्रांतामधील किल्ले हे देखील आवडत्या पर्यटन स्थळाच्या यादीत येतात.

काळानुसार बदल झाल्याने पर्यटन स्थळे विस्तारीत झाली यात आता सामाजिक पर्यटन आणि कृषी पर्यटन असेही नवे प्रकार सुरु आले आहे.
अजिंठा- वेरुळ सारखी विश्व वारसा स्थळ असलेल्या लेण्या जागतिक स्तरावरील 7 आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल ही विदेशी पर्यटकांची भारतातील पर्यटनाची आकर्षण केंद्र राहिलेली आहेत. यासोबतच गोव्याला देखील विशेष पसंती ही विदेशी पर्यटक देतात.

मध्यंतरीच्या काळात पर्यटन मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘अतिथी देवो भव’ उपक्रमांत पर्यटन व्यवसायाशी निगडीत विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रशिक्षण देताना मला या व्यवसायाला जवळून बघता आले.

पर्यटन स्थळे आपल्या सोबत स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करतात आणि यातून कोट्यवधींची उलाढाल व कोट्यवधी हातांना काम मिळताना दिसते. ट्रॅव्हल एजन्सी, विमान कंपन्या, रेल्वे, हॉटेल व्यवसाय, बुकींग एजन्टस्, टुरिस्ट गाईड आदींना यातून आर्थिक लाभ होतो आणि पर्यटनामुळे अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होते.

आर्थिक गणितांपेक्षा माझ्या दृष्टीकोणातून या पर्यटनांशी निगडीत असलेला मानसिक बाबींचे महत्व अधिक वाटते. कुणाला भक्तीभावातून ऊर्जा मिळते तर कुणाला इतिहासात रमण्याचा आनंद प्राप्त होतो. निसर्ग आणि प्राणी बघून सर्वांच्याच चित्तवृत्ती फूलतात.

कामाच्या ताणाने ‘बर्नआऊट’ झालेल्या नव्या पिढीला पर्यटनातून मानसिक उभारी मिळू शकते. नकारात्मकता संपवून जगण्याचा आनंद द्विगुणित करणाऱ्या पर्यटनाला यामुळेच महत्व आहे आणि त्यासाठीच पर्यटन करा..
चला बॅगा भरा आता !

— लेखन : प्रशांत विजया अनंत दैठणकर.
जिल्हा माहिती अधिकारी, बीड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869454800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments