पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या “मन की बात” या कार्यक्रमात देशातील लेखक व कथाकारांनी पंचतंत्र सारख्या प्रेरणादायी कथांचा वारसा पुढे चालविण्याचे आवाहन केले होते.
त्या अनुषंगाने नाशिकच्या श्रद्धा कराळे या युवा लेखिकेने अशाच १९ कथांच्या संग्रहाची निर्मिती केली असून ई बुक स्वरूपातील या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
“चौकटीच्या बाहेर” हा ललित कथा संग्रह कॉफी टेबल बुक या प्रकारात मोडणारा आहे. रजनी कराळे यांनी रेखाटलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तकातील कथांना खूपच अनुसरून आहे. हातात बासरी घेतलेली महिला ही कलाप्रेमी भासते. पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध आकाशवाणी, दूरदर्शन निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी लिहिली आहे, तर मलपृष्ठासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांचा हा पहिलाच कथा संग्रह आहे. कोविड मुळे ई बुकच्या माध्यमातून हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचं मानस आहे. हे पुस्तक अमेझॉन वर, तसेच किंडल वर उपलब्ध आहे. पुस्तक प्रेमी अगदी घरबसल्या कधीही वाचू शकतात.
पुस्तकाच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेचा काही भाग हा मुख्यमंत्री सहायता निधी किंवा कोविड ग्रस्त लोकांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा मनोदय श्रद्धाने व्यक्त केला आहे. वाचकांनी मोठ्या संख्येने पुस्तकाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्रद्धा कराळे यांनी केले.
पुस्तकाविषयीच्या अभिप्रायात साहित्यिक, डॉ. विवेक बोंडे म्हणतात, “योगायोगाने झालेली ओळख, जुळून आलेली आवड आणि म्हणून मिळत गेलेली सवड असं काहीसं श्रध्दाच्या या ललित कथा संग्रहाच्या प्रक्रियेतील माझ्या सहभागाबद्दल म्हणता येईल”.
“कामाच्या गडबडीत, रोजच्या धावपळीत, सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत मनाला येणारी हतबलता आणि कोरोना काळात नाईलाजाने दैनंदिन जीवन एका चौकटीत अडकून पडलेले असतांना, मनाला अलगद त्या ‘चौकटीच्या बाहेर’ घेऊन जाणारा असा हा कथासंग्रह आहे”.
“प्रत्येक कथा वाचतांना ती स्वतःचीच वेगवेगळी रूपं आणि अनुभव उलगडत जाते, कधी अल्लड बालपण, एखादं प्रेमळ पत्र, कधी बालभारतीचा माहितीपूर्ण धडा तर कधी एखादं रंजक प्रवासवर्णन. मला सर्वात जास्त आवडलेली एक गोष्ट म्हणजे बऱ्याच कथांना शेवटी असलेली एक कारुण्याची झालर ज्यामुळे प्रत्येक कथा आपल्या मनाचा ठाव घेते आणि आपली उत्कंठा वाढत जाते. वाचत राहण्याची आणि जाणून घेण्याचीही”
“इतक्या तरुण वयात हेवा वाटावा, असं लिखाण आणि आतापर्यंतच्या वारली चित्रकार म्हणून असलेल्या उपलब्धी यामुळे हुरळून न जाता केलेल्या नवीन सुरवातीसाठी श्रद्धाला आणि तिच्या ‘चौकटीच्या बाहेर’ या पहिल्या ललित कथासंग्रहास खूप खूप शुभेच्छा.”
अतिशय समर्पक शब्दांतील अभिप्राय या पुस्तकाविषयीची उत्सुकता आपल्या मनात निर्माण करतो.
या पुस्तकाच्या निमित्ताने चित्रकार असलेली श्रद्धा आता लेखिका झाली असून साहित्य क्षेत्रातही ती नक्की यशस्वी होईल असा विश्वास वाटतो.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
व्वा. अगदी हटके व स्वागतार्ह आहे.