नमस्कार मंडळी.
आज जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिन असा दुग्धशर्करा योग आला आहे. त्यामुळे या दोन्ही दिन विशेषाच्या काही रचना पुढे देत आहे.
आपल्याला जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
जन्माष्टमी
१. श्रीकृष्णजन्म
मध्यरात्रीला उषःकाल झाला
माता देवकीला पुत्र जाहला
श्रावण अष्टमी मुहुर्त गाठला
कारागृही सुत जन्मा आला
वर्षाव श्रावणसरींचा हा
दुधडी भरूनी वाहे यमुना
डोई घेऊनी तान्हुला कान्हा
मथुरानगरीत आला कान्हा
यशोदामाईच्या कुशीत कान्हा
‘श्रीकृष्ण’ नामाने विसावला
गर्जति दुंदुभी चौघडा झडला
फुले उधळिती स्वागताला
बाळकृष्ण आता मथुरेत रमला
गोपगोपिकांचा मेळा जमला
दहीहंडीचा खेळ खेळतांना
मौजमस्ती करी नंदलाला
राधा येतसे जलभरणासि
कुंभ घेऊनी कुक्षी, डोईवरी
अवचित कान्हा खडे मारुनी
चिंब भिजवितो खट्याळ भारी
साद घालितो वेळूबनातुनी
अलगद वाजे अलगूज कानी
गूढ,रम्य ते गूज परिसुनी
अंगावरी आणि गोड शिरशिरी
जन्मा आला कान्हा कंसमामाला मारण्या
कौरव पांडव युध्द झेलण्या
अर्जुनाच्या पाठी उभा राहण्या
द्रोपदी भगिनीस वाचविण्या
श्रीकृष्णा तुझी अगाध लीला
शिकविसी आम्हां मैत्री जपण्याला
बुध्दीचा वापर कसा करावा
आलेली संकटे दूर सारण्याला
— रचना : स्वाती दामले.
२. कृष्ण जन्म …
रात्रीच्या गर्भामधूनी
येई लखलख ज्वाळा
बंदिवासात देवकीला
अद्भूत प्रसूति कळा
क्रुरकंसाच्या छाताडा
रक्त रंजीत तो टिळा
स्नेह वाटाया जगाला
आलाआला घननिळा
यमुनाआईचा ऊर दाटे
पदस्पर्श नाजूक केला
श्रावणात दिवाळीसण
सुखआनंद गोकुळाला
धेनुस्तन झरझर वाहे
पान्हा फुटे भाकडाला
माझेचं हे बाळ गोजीरे
स्वप्न हर एक आईला
भगिनी निश्वास सोडी
आला बंधु रक्षणाला
दुष्ट शक्ती कापु लागे
यम आला भक्षणाला
गोपीकालाजून लपती
आला द्वाड छळायला
खुशीत्या बालगोपाळा
सवंगडी ये खेळायला
व्यासलेखणी पाझरली
नायक महा भारताला
सुख सांगू कुणा कुणा
अहो कृष्णजन्म झाला
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
स्वातंत्र्यदिन…
१. स्वातंत्र्यदिन
पारतंत्र्याची बेडी तुटली l
मुक्त जाहली भारत माता ll
स्वातंत्र्याचा उत्सव मिरवावा l
१५ ऑगस्ट हा दिन आता ll
आनंदाचा रवी उदेला l
आशेचा लख्ख प्रकाश ll
स्वातंत्र्य वीरांना जाहले l
जणू ठेंगणे ठुसके आकाश ll
संसाराचे रेशीम धागे l
तोडून झुंजती वीर असे ll
सुंदर स्वप्न स्वराज्याचे l
हृदयी त्यांच्या नित्य वसे ll
स्वातंत्र्य लढ्यात देती झोकूनी l
भोगती कष्ट हाल तुरुंग ll
स्वतंत्रता देवी खुलवी l
नित तयाचे अंतरंग ll
स्वतंत्रता देवी झाली प्रसन्न l
लाभले आम्हा स्वराज्य ll
स्वराज्याचे व्हावे आचंद्र सूर्य l
सुखमय शांत सुराज्य ॥
— रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर
२. देशप्रेम ओतप्रोत
तिरंगा माझा महान
जगात त्याचा सन्मान
फडकतो तो डौलाने
भारताचा स्वाभिमान -१-
संघर्ष केला जाणून
स्वातंत्र्य हवे म्हणून
कित्येकांचे बलिदान
गुलामी नको म्हणून -२-
क्रांती कधी चळवळ
आंदोलनासाठी बळ
स्वातंत्र्य प्रेमींनी कधी
साहिला तो क्रूर छळ -३-
कारावास पत्करला
आमिषाला ठोकरला
केवळ या देशासाठी
संसार दूर सारला -४-
वज्र मुठ एकतेची
निर्धार त्यांचा एकच
शपथ संविधानाची
इरादा त्यांचा नेकच -५-
तिरंगा नव्हेच ध्वज
रक्षणा सदैव सज्ज
तो आमचा अभिमान
गगनी उंचावू आज -६-
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
३. स्वातंत्र्य
अनेकप्रकारे उपभोगतो आम्ही हे स्वातंत्र्य,
आमचे काही देणे आहे, भान पसरवू नित्य,
सैनिक लढती सीमेवरती, त्यांना सतत स्मरू,
जिथे तिरंगा, राष्ट्रगीत तेथे, जयकार करू,
शिकवू मूल्ये अशी मुलांना, राष्ट्रभक्ती कळेल,
प्रत्येक ठिकाणी देशभक्त, देशरक्षण करेल,
मुली होतील लढवय्या, कित्येक ठिकाणी झाशी,
सारे काही ठरवून होईल, प्रत्येक ठिकाणी सरशी,
प्रत्येक स्तरावर काही निवडक ठेऊ ते संन्यासी,
राष्ट्रासाठी सतत जागरूक, शक्ती ही अविनाशी,
काही शिक्षक शिष्य घडवती, कौशल्ये बहुमोल,
लक्ष्य असे, देशाची प्रगती, सेवा, कर्तव्य सखोल,
सुज्ञ नागरिक स्वयंस्फूर्तीने समाज कार्ये करती,
जपती ते वृद्धांना, येता कोणतीही आपत्ती,
काही विविध सेवा देती, देशा ज्याचे मोल,
फडकेल तिरंगा घरोघरी, स्वातंत्र्य हे अनमोल…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
