डॅा.स्वाती भाटवडेकर
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी हॅम्लेट डोकावतोच. “टू बी ॲार नॅाट टू बी..” अशा वेळी योग्य निर्णय, तुमचं भवितव्य ठरवत असतं.असाच एक निर्णय घेणारी व्यक्ती म्हणजे डॅा.स्वाती सतीश भाटवडेकर..
स्वाती ही पार्ले टिळक विद्यालयाची हुषार विद्यार्थिनी. ती १९९० च्या दहावीच्या परीक्षेत ९२% गुण मिळवून गुणवत्ता यादीत सोळावी आली होती.शाळेत असल्यापासून स्वातीला वाचनाचा प्रचंड नाद.. तेव्हा डॅा. बी. एन. पुरंदरे यांचे ”शल्य कौशल्य” हे आत्मचरित्र वाचून तिने वैद्यकीय शिक्षणच घ्यायचे असं ठरवल होतं. त्याप्रमाणे रूपारेल कॅालेज, मग नायर दंतमहाविद्यालयातून तिने दंत वैद्यकीय पदवी (BDS) संपादन केली. जेव्हा घरचे कोणी डॅाक्टर नसेल, आयती जागा, प्रॅक्टिस नसेल तर नवीन डॅाक्टरांना आपला जम बसवायला फार कष्ट घ्यायला लागतात. स्वातीच्या आई वडिलांनी स्वातीला प्रोत्साहन तर दिलेच पण अंधेरीला भाड्याने जागा घेऊन १९९९ मध्ये स्वतः ची प्रॅक्टीस करायची संधीही दिली.
त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. यथावकाश स्वातीची गाडी लग्न, मुलीचा जन्म, घर संसार, जबाबदाऱ्या सर्व स्टेशनं घेत चालू होती. तिने कांदिवलीला भाड्याची जागा घेऊन, जमेल तशी, धावपळ करत ,डेंटल प्रॅक्टिस चालू ठेवली होती.मुलगी तिच्यासारखीच हुषार होती. त्यामुळे स्वाती स्वतः तिचा अभ्यास घेत असे. ती थोडी मोठी झाल्यावर स्वातीने नवऱ्याच्या प्रोत्साहनाने आणि मदतीमुळे पार्ल्यात जागा घेऊन, स्वतःचं छोट्स क्लिनीक सुरू केलं. आता जेमतेम नाही तर जोमानी प्रॅक्टिस करायची ठरवत असतांनाच २०२० मध्ये कोरोना आला आणि परत स्वातीची प्रॅक्टिस ची स्वप्नं भंग पावली. त्याच काळापासून तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या की एक वेळ अशी आली की करियर की कुटुंब या पेचात ती अडकली. अगदी हॅम्लेट सारखे, टू बी ॲार नॅाट टू बी…! शेवटी कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देत तिने तिची परत सुरू केलेली प्रॅक्टिस थांबवली.
ह्या मधल्या काळात अचानक स्वातीच्या आयुष्यात चित्रकला आली. शाळेनंतर खरंतर डेंटिस्ट होईपर्यंत तिची चित्रकला मागे पडली होती. रंग, ब्रश, कॅनव्हास, पेपर हे त्या काळात तिने कधीच हातात घेतले नव्हते. पण प्रॅक्टिस करत असताना अचानक २०१३, २०१४ मधे चित्रकला तिच्या आयुष्यात आली आणि जणू तिला तिचं पॅशन मिळालं. आधी नुसता छंद म्हणून ती चित्रे काढत होती. तिच्या व्यस्त दिनक्रमात कुठला कोर्स, क्लास करायला वेळ नव्हता. पण फेसबुक, यू ट्यूब या समाज माध्यमातील व्हिडिओ बघून वाचून ती चित्रकलेचा सराव करू लागली. ती सांगते, “मला त्यात इतकी गोडी निर्माण झाली की, प्रत्येक दिवशी मी काहीतरी रेखाटत होते. मला लहानपणापासून पोर्ट्रेट पेंटिंगचे खूप आकर्षण वाटत असे. ते मी अधिक प्रमाणात काढू लागले. ग्रॅफाईट पेन्सिल, रंगीत पेन्सिल, अॅक्रिलिक, वॅाटरकलर्स अशी विविध माध्यमे मी हाताळू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा पहिल्यांदा ब्रश, पेन्सिल हातात घेतली तेव्हा माझी मावशी चित्रा मेहेंदळे (म्हणजे मी!) आर्टिस्ट प्रज्ञा राजे, चित्रा वैद्य यांच्याकडून थोडे मार्गदर्शन मिळाले. पुढे माझी मीच नियमित सराव करत, त्यात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करू लागले.

करोनाच्या कठीण काळात, जेव्हा मी प्रॅक्टिस बंद केली तेव्हा मला साथ दिली ती माझ्या कलेने. मला उभारी दिली. सरावाने हळूहळू हात चांगला बसू लागला. माझ्या चित्रांना, मला छोटी का होईना ओळख मिळू लागली. छंदाचे हळूहळू कलात्मक व्यवसायात रूपांतर होऊ लागले. छोट्या छोट्या प्रदर्शनात भाग घेऊ लागले. जानेवारी २०२३ मध्ये श्री आनंद भावे यांच्या ‘छंदोत्सव’ या दादर येथील छबिलदास शाळेत भरलेल्या प्रदर्शनात मी भाग घेतला आणि तिथे माझ्या या छंदाचे कौतुक झाले.नंतर सप्टेंबर २०२४ मध्ये आर्टिस्ट प्रज्ञा राजे हिच्या मार्गदर्शनाखाली ‘नेहरू आर्ट सेंटर वरळी’ येथे भरलेल्या ग्रूप शो मध्ये मला सहभागी होण्याची चांगली संधी मिळाली. मला भावलेली गणेश ही संकल्पना होती आणि मीही वेगळा गणपती काढण्याचा प्रयत्न केला. अनेक मोठमोठ्या कलाकारांकडून माझ्या चित्रांचे झालेलं कौतुक म्हणजे माझ्यासाठी प्रोत्साहनाची, शाबासकीची थाप होती. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. याशिवाय माझ्या आयुष्यात अतिशय आनंदाचे आणि कृतकृत्यतेचे काही क्षण आले, जेव्हा मी काढलेली काही सुप्रसिद्ध व्यक्तींची रेखाचित्रे त्या व्यक्तींकडे पोचली. मी काढलेले सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे रेखाचित्र त्यांच्या ९० व्या वाढदिवशी त्यांच्यापर्यंत पोचले, शिवाय दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात त्यांच्यावर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात, निवेदक विघ्नेश जोशी यांनी मी आशाताईंवर लिहिलेले पत्र नाट्यगृहात वाचून दाखवले. तसेच सुप्रसिद्ध गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांची रेखाचित्रे, त्यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने, रंगशारदा वांद्रे येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबियांना भेट म्हणून द्यायचे भाग्य मला लाभले. तसेच जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विजेता डी. गुकेश याचे मी काढलेले रेखाचित्र त्याच्या वडिलांपर्यंत पोचवले गेले.”

अशी कला क्षेत्रात मुशाफिरी चालू केल्यावर चित्रकलेबरोबर, इतरही काही कला कालांतराने स्वातीच्या आयुष्यात आल्या. लेखन कला, मिनीएचर आर्ट, फॅब्रिकचे दागिने, रेडी रांगोळी, लोकरीची रांगोळी आणि अशा इतर काही गोष्टी ती करायला लागली. मिनीएचर आर्ट मधला वडापाव सर्वांना आवडला. ती ह्या सर्वांच्या ॲार्डर्स घेऊ लागली. मुलांसाठी सुट्टीत चित्रकलेचे वर्ग घेऊ लागली.

चित्रांच्या अनुषंगाने तिने अनेक लेखही लिहीले आहेत. प्रवास वर्णनं, कधी पाहिलेल्या चित्रपट, नाटकाचं समीक्षण, कधी चित्र काढलेल्या व्यक्तिमत्वाविषयी आठवणी किंवा काही अनुभवलेल्या मजेशीर घटना तर कधी एखाद्या दिन महात्म्यानिमित्ताने अनुभवलेले किस्से, तर कधी एखाद्या रेसिपीची खुमासदार शैलीत सांगितलेली कृती इत्यादी.! त्यामुळे तिलाही निर्मितीचा आनंद मिळतो, व्यक्त होता येतं आणि लोकांना पण ते लिखाण भावतं.

ती म्हणते, “या सर्व कलांनी माझं जीवन आज समृद्ध केलं आहे. डेंटल प्रॅक्टिस थांबवावी लागल्याचं शल्य बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. जणू ह्या सर्व कला आता माझ्यासाठी इकेगाई ठरल्या आहेत. ज्या माझ्याबरोबर इतरांनाही आनंद देतात.सुप्रसिद्ध चित्रकार पिकासोचे वाक्य Art washes away from the Soul, the dirt of everyday life. हा आता माझा दैनंदिन मंत्र झाला आहे. कलेचा हा महासागर अथांग आहे, खोल आहे. आतातर माझी सुरुवात आहे, या महासागरात अजून खूप हात पाय मारायचे आहेत. आणि ते मी करत राहणार हे नक्की.”
स्वातीला दोन वेळा मासिकाच्या मुखपृष्ठावर चित्र काढण्याची संधी मिळाली. डॅाक्टर ते चित्रकार .. असा तिचा प्रवास.. दोन्ही क्षेत्रात तिचे प्राविण्य होतेच. जरी एक क्षेत्र सुटलं तरी घरात राहून, वेळेचा सदुपयोग करत, तिने तिच्यातल्या कलाकाराला, प्रयत्नांनी घडवले आणि रंगाच्या दुनियेत भरारी घेतली. तिला या क्षेत्रात उदंड कारकीर्द मिळो, अशा शुभेच्छा देऊ या !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
