“गीता कांटावाला”
अनेकांना ओरिगामी म्हणजे काय हेच माहित नसते, तिथे गीताबेन म्हणतात, “ओरिगामी हा माझ्यासाठी जादुई शब्द आहे. माझे मन रमवणारा, माझे सगळे दुःख विसरायला लावणारा आणि मला माझी ओळख मिळवून देणारा हा शब्द आहे”
ओरिगामी ही अशी कला आहे की जिथे एका सपाट कागदातून, फक्त कागदाला घड्या घालून, कात्री किंवा डिंक न वापरता, त्रिमितीय वस्तू तुम्ही बनवू शकता. अगदी छोट्या किटकापासून मोठ्या हत्तीपर्यंत, निसर्गातल्या पानाफुलांपासून ते मनुष्य आकृती, आणि सर्व वस्तूपर्यंत, तुम्ही काहीही या कागदांतून बनवू शकता. तुम्ही वापरता तुमचे दोन हात, तुमचे पूर्ण लक्ष आणि तुमची इच्छा ! ह्यातून तुम्ही स्वतः निर्मिलेल्या वस्तू तुम्हाला आनंद तर देतातच, पण पुस्तकांसारखी तुम्हाला कुठेही एकटं न सोडता, साथ देतात.
सध्या मुंबईत शिवडीला रहाणाऱ्या गीता कांटावाला ह्यांचे शिक्षणक्विन मेरी शाळेत झाले. सेंट झेवियर्स कॅालेजमधून त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र विषय घेऊन, बी.ए ही पदवी घेतली. त्या पहिल्यापासूनच शाळेतही सर्व उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यायच्या. कॅालेजातही त्या जनरल सेक्रेटरी होत्या, अनेक कार्यक्रम त्यांनी तिथे राबविले आणि आदर्श विद्यार्थिनीचे बक्षिसही पटकावले. त्या गुजराती असल्या तरी मराठी वाचू, लिहू शकतात आणि मराठीतून संवादही साधू शकतात.
लग्नानंतर तरूणपणीच गीताबेन यांच्यावर दोन मुलांना एकटे सांभाळायची वेळ आली. अकस्मात अंगावर पडलेल्या ह्या जबाबदारीने त्या दुःखी आणि निराश झाल्या. अशावेळी त्यांची ओळख ओरिगामी ह्या कलेशी झाली.
आज त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. गेली ४५ वर्ष त्या ओरिगामी करत आहेत. १९७६ सालची सुरवात त्या सांगतात,“त्यावेळी रस्त्याच्या कडेला पुस्तक विकणाऱ्याकडच्या एका माणसाकडे, मला ओरिगामीचे पुस्तक, ५ रूपयाला मिळाले. ते भाग ३ असलेले पुस्तक कठिण होते. घड्या घालणे फारसे जमत नव्हते. पण लवकरच मला भाग १ मिळाला. जो जरा सोपा होता. त्यामुळे माझा उत्साह वाढला. जुने, कंपनीच्या अहवालातले पेपर वापरून मी वस्तू, ओरिगामीच्या भाषेत मॅाडेल्स बनवायला सुरवात केली. माझे मन ते करत असतांना शांत होत असे. घड्या घालण्याकडे पूर्ण लक्ष दिल्यामुळे, थोडा वेळ मी आपल्या सर्व चिंता, दुःख विसरत होते. ओरिगामी मेडिटेशन सारखे काम करत होती.”
त्यावेळी दूरदर्शन वर सांताकुकडी नावाचा मुलांसाठी कार्यक्रम होता. त्यात अनेक गोष्टी दाखवल्या जायच्या. त्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गीताबेननी कार्यक्रमाच्या निर्मातीशी संपर्क केला आणि तिथे ओरिगामी दाखवायची संधी त्यांना मिळाली आणि त्यांची ओरिगामीची आवड वाढली. तेव्हा आपल्या इथे ओरिगामीची पुस्तकं मिळायची नाहीत. “छोट्या मुलांना शिकवायची हस्तकला“ म्हणून काही साध्या गोष्टी तेव्हा माहित असायच्या. उदा. बोट, फोटो फ्रेम, कंदील, पवन चक्की वगैरे.पण १९८० साली “इंदू टिळक“ ह्यांचे एक पुस्तक त्यांच्या पहाण्यात आले. त्या पुण्याला असतांना त्यांना भेटायची इच्छा गीताबेनना झाली. दुकानदाराला त्यांनी इंदूताई टिळक कोण आहेत ? कुठे भेटतील ? असे विचारले. दुकानदारांनी इंदूताईंना ओळखत नाही म्हटल्यावर आश्चर्य व्यक्त केले. इंदूताई ह्या लोकमान्य टिळकांच्या नात सून होत्या त्यामुळे पुणेकरांना परिचित होत्या. गीताबेन त्यांना भेटल्या, आपली ओरिगामी दाखवली. त्यांचे इंदूताईंनी, स्वागतच केले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे पति जयंतराव हे मंत्री झाले आणि ते सर्व मुंबईला राहायला आले.

गीताबेन आणि इंदूताई वरचेवर भेटू लागल्या आणि ओरिगामी मॅाडेल्सची, एकमेकींशी देवाण घेवाण करत खूप वेळ आनंदात घालवू लागल्या. त्यातून ओरिगामीचे प्रदर्शन भरवून, तिचा प्रसार व्हावा ह्या साठी प्रयत्न करण्याची इच्छा दोघींच्याही मनांत आली आणि सप्टेंबर १९८१ साली पहिले ओरिगामीचे प्रदर्शन त्यांनी मुंबईत भरविले. ओरिगामी जपानी कला म्हणून प्रसिध्द असल्यामुळे, आपल्या इथे असलेल्या, जपानच्या राजदूतांना त्यांनी उदघाटनाला बोलाविले. ह्या प्रदर्शनाला त्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोघींनी अनेक शाळा कॅालेजात, क्लब मध्ये ओरिगामीच्या कार्यशाळा घेतल्या. विशेषतः इन्डो जपानी संस्था आणि एस.एन.डी.टी.विद्यापीठामध्ये प्रौढांसाठी प्रमाणित अभ्यासक्रम आयोजित केले.

गीताबेन मुळातच खूप प्रेमळ आणि बोलक्या. त्यामुळे त्यांनी ओरिगामीची आवड असणाऱ्या अनेकांशी संपर्क करून त्यांना एकत्र आणले आणि “ओरिगामी मित्र” नावाचा ग्रूप सुरू केला. आज ४५ वर्ष झाली ह्या ग्रूपला. दर वर्षी अनेक कार्यशाळा ह्या ग्रूप तर्फे घेतल्या जातात. एक वर्ष मुंबईत आणि एक वर्ष पुण्यात, ओरिगामीचे प्रदर्शन भरविले जाते. १९९९ साली इंदूताई टिळकांचे निधन झाले. त्यानंतर गीताबेन ओरिगामी मित्र ह्या ग्रूपला एका परिवारासारख्या सांभाळत आहेत.
“ओरिगामी कला ही मुलांसाठी आहे“ हा गैरसमज “ओरिगामी मित्र”नी खोटा ठरवला आहे. ह्या ग्रूपमध्ये अनेक जेष्ठ डॅाक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, कलाकार, आर्किटेक्ट आहेत. दर पंधरा दिवसांनी ते दादरच्या एका शाळेत भेटतात. अनेक परदेशी पुस्तके, इतक्या वर्षात मिळवून, त्यातली मॅाडेल्स ते एकमेकांना शिकवतात. अनेकांनी स्वतः ची “मॅाडेल्स” केली आहेत. दरवर्षी खूप कल्पकतेने कलाकृती करून, प्रदर्शन भरवून, अनेक कार्यशाळा घेऊन, नविन ओरिगामीस्ट, ते तयार करतात.
ओरिगामी मेडिटेशन सारखी आहे. मन शांत आणि एकाग्र होते, म्हणून थेरपी सारखा त्याचा उपयोग होतो. “ओरिगामी मित्र”तले काही जण, हॅास्पिटल मध्ये पेशंटना, कारागृहातल्या कैद्यांना , वृध्दाश्रमात ज्येष्ठांना ओरिगामी शिकवतात. ही एक प्रकारे समाजसेवाच आहे.

जगभर ओरिगामी कला शिकवणारे, करणारे खूप जण आहेत. जागतिक शांततेसाठी “ओरिगामी पीस ट्री” या नावांनी प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी भरते. परदेशातल्या अनेक नामवंत लोकांना मुंबईत प्रदर्शनाच्यावेळी, उदघाटनाच्या वेळी गीताबेननी बोलावले आहे. गीताबेन अनेक वेळा अमेरिकेतल्या प्रदर्शनाच्यावेळी तिथे गेल्या आहेत. तिथल्या अनेकांच्या त्या संपर्कात आहेत.

सतत ओरिगामी करणे हा गीताबेनचा छंद आहेच पण त्यांनी भारतात ओरिगामीचा प्रसार करण्याचे काम मन लावून केले आहे. १९६५ साली त्यांना सर फ्रॅन्क वॅारेल ह्याच्या हस्ते रोटरी अवॅार्ड मिळाले होते. मागच्या वर्षी जपान कडून त्यांना पुरस्कार देण्यात आला. इतकी वर्षे जपान आणि भारत ह्यांच्यातील सांस्कृतिक संबंध, ओरिगामीचा प्रसार करून जपल्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, ही खूप गौरवाची गोष्ट आहें
ओरिगामी मित्र मधल्या कमलेश गांधी, मणिलाल, विश्वास देवल, रविंद्र केसकर, नागराजन, पागे, पाठारे, माला रामदोराई, हिमांशु अग्रवाल, निखिल सुर्यनारायन, भिडे, आशा, पद्मजा, क्रिती, चारुल, मिमांनससा, लिना, शुभांगी, अशा कितीतरी जणांशी त्यांचे जिव्हाळ्याचा संबंध आहेत. कोणी गैरहजर असले, तर त्यांची प्रेमाने चौकशी करणे, कोणाला घड्या घालणे जमत नसेल, तर न चिडतां समजावून सांगणे, शिस्तीत सर्व कार्यक्रमांचे आयोजन करणे ह्या मुळे गीताबेन ग्रूप मध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्यामुळेच खरंतर मी काही वर्षे “ओरिगामी मित्र” मध्ये सामिल होते, आणि त्यांच्यामुळेच अजून ओरिगामी करते आहे. २००६ पासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांचा उत्साह जवळून पहात आहे.
गीताबेन सध्या इतर अनेक गोष्टीतही रमत आहेत. त्या रविंद्र संगीत शिकत आहेत. त्यांचा एक जाहीर कार्यक्रम कलकत्यात आणि २ कार्यक्रम मुंबईत झाले आहेत. सिनीयर क्लब मध्ये त्या उत्साहाने भाग घेतात. अगदी मॅाडेल बनून स्टेजवर वावरतात. पोहणे, पत्ते, कॅरम खेळणे, वाचन हे ही त्यांचे चालू असते. त्या उत्तम वक्त्या आहेत. दर वेळी प्रदर्शनाच्या वेळी अध्यक्ष म्हणून त्या भाषण करतात. समाजसेवा ही त्या करत असतात. दृष्टीहिन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाचन केले आहे.
गीताबेन अशाच कार्यरत राहोत. ओरिगामी जगतात, त्यांचे हे कार्य सतत चालू राहो या साठी त्यांना खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800