Monday, September 1, 2025
Homeयशकथाजिचे तिचे आकाश : १५

जिचे तिचे आकाश : १५

“डॅा. आसावरी बापट”

५०/६० वर्षांपूर्वी मुली पदवीधर तर होत होत्या, पण लगेच लग्न करून संसारात रमत होत्या. अर्ध्याहून जास्त मुली नोकरी करत नव्हत्या आणि जर संसारातून मेाकळा वेळ मिळाला, तर मग आपली करियर जपणाऱ्या, फारच थोड्या होत्या!

डॅा.आसावरी ताई बापट ह्या त्यातल्याच एक ! वेगळ्या क्षेत्रात काम करून आपला ठसा जनमानसात रूजवणाऱ्या. माहेरच्या त्या पद्मजा केळकर ! लग्न झालं तेव्हा त्या एम् ए.भाग १, समाजशास्त्र विषय घेऊन पास झाल्या होत्या. लग्नानंतर १० वर्ष त्या पूर्ण गृहिणी होत्या.
त्यांना संस्कृत भाषेची खूप ओढ होती आणि शिकायची इच्छा होती . १९९४ मध्ये, संसारातल्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्यावर, त्यांनी सोमय्या कॅालेज मध्ये “स्टडी ॲाफ इंडियन कल्चर” ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि तिथे त्यांना संस्कृतच्या प्रचंड साठ्याची एक झलक मिळाली.

मग त्यांनी संस्कृत डिप्लोमा आणि एम.ए . चा अभ्यास केला. संस्कृतची एकेक दालनं त्यांच्या समोर उलगडत गेली आणि संस्कृत हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय झाला. त्यात त्यांनी प्राविण्यही मिळवले. एम.ए. करतांना त्यांना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यांना पुढे शिकायचे होते. पण काही संसारीक जबाबदाऱ्यामुळे, त्यांनी पी.एच.डी. करायचा विचार पुढे ढकलला. त्या सांगतात, “आयुष्याला कलाटणी मिळणारी एक घटना या काळात घडली. माझ्या संस्कृतच्या प्राध्यापिका डॅा.गौरी माहुलीकर ह्यांनी मला अभ्यागत अध्यापिका म्हणून, काही लेक्चर्स घेण्यासाठी बोलाविले. याकाळात अनेक व्यासंगी सहकार्यांबरोबर काम करायला मिळाले. अनेक नविन संधी मिळत गेल्या. अभ्यासाला वेळ मिळत गेला. आणि ५ वर्षानंतर डॅा.माहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मी पी.एच.डी करायला सुरवात केली“

आसावरीताई मुळातच अभ्यासू वृत्तीच्या ! चाणक्य ही व्यक्तीरेखा त्यांना लहानपणासून आवडणारी! आणि त्यात त्यांच्या हाती कौटिल्य अर्थशास्त्राचा ग्रंथ आला. त्या ग्रंथाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्या स्वतः तर ह्या ग्रंथाच्या प्रेमात पडल्याच , पण त्यातल्या विविध विषयांवर भाषणं देऊन, श्रोत्यांनाही त्यांनी मंत्रमुग्ध केले.

आसावरी ताई उत्तम वक्त्या आहेत. सौम्य पण ठाम शब्दात त्या विषय सहज उलगडून स्पष्ट करतात. त्या बोलायला लागल्या की आम्ही मराठी संस्कारातले त्यांचे सात्विक रूप, विद्वतेच्या तेजाने जास्तच भावते.

मुंबई पोलिस गुप्तचर विभाग, पोलिस अकादमी, फोर्सवन,आर्मी वॅार कॅालेज महू, नरसारी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अशा मोठ्या संस्थांमध्ये त्यांची व्याख्याने होऊ लागली.

लोकसत्ता, लोकप्रभा मध्ये त्यांच्या साप्ताहिक लेखमाला येऊ लागल्या. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांचे या विषयावर कार्यक्रम होऊ लागले.संस्कृत साहित्य, संस्कृति संबंधित साक्षात्कार अशा कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. दूरदर्शन च्या “एपिक वाहिनी” वरच्या ‘अदृश्य’ मालिका मध्ये जीवसिध्दि भाग आणि “सुराज्य संहिता“ या मालिकेत त्या विषय तज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहीली आहेत.

अनेक ठिकाणी त्यांना मुलाखती साठी आमंत्रण येऊ लागली आणि हे सर्व चालू असतांना त्यांना स्वामी विवेकानंद केंद्राच्या संचालकपदाची जाहिरात दिसली आणि त्यांनी अर्ज केला. त्यांना मुलाखतीसाठी दिल्लीला जावे लागले आणि २०१८ साली त्यांची नियुक्ती म्यानमार येथे झाली.

स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, रंगून, म्यानमार, भारतीय राजदूतावास (ॲागस्ट २०१८ ते डिसेंबर २०२१) आणि स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, भारतीय राजदूतावास, काठमांडू मध्ये संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या. (मार्च २०२२ ते मे २०२४)

आसावरी ताईं च्या संशोधन श्रेणी मध्ये स्मृती साहित्य, प्रचिन वास्तुकला, कौटिलीय अर्थशास्त्र, प्रचीन वास्तुकला आणि स्थापत्य अभियांत्रिकी आणि आर्थिक व्यवस्थापन यांचा समावेश आहे. त्यांनी विविध संशोधन प्रकल्प राबविले आहेत. संरक्षण आणि सुरक्षा, मूल्य शिक्षण, संस्कृत नाटक, वैदिक अभ्यास, आयुर्वेद, भूकंप विज्ञान असे त्यांचे विषय होत. प्रधान धर्मसूत्रे आणि मनुस्मृतीसाठी मुंबईच्या ब्राह्मण सभा येथील कुलगुरू शिष्यवृती त्यांना मिळाली होती. रॅायल एशियाटीक सोसायटीची सन्मानिय न्यायमूर्ती के.टी. तेलंग शिष्यवृती त्यांनी प्राप्त केली होती. विविध राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट संशोधन पेपरची पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत.

त्यांनी पांडुलिपी मध्ये पदवी घेतली आहे आणि त्या प्रमाणपत्र व पदवी अभ्यावर्गावर पांडुलिपी शिकवतही होत्या. (पांडुलिपी म्हणजे हस्तलिखित कागदपत्रे किंवा ग्रंथ जे प्राचीन काळी लेखकांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले असतात. या पांडुलिपींमध्ये विविध विषयांवरील माहिती असते, जसे की साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, धार्मिक ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवज.
पांडुलिपींसाठी प्राचीन काळी विविध प्रकारच्या पानांचा वापर केला जात असे.
ताडपत्रे भोजपत्रे,.. (बर्च वृक्षाची पाने, व नंतर कागद वापरला जाई) रंगून आणि काठमांडू इथे अतिशय वेगळ्या वातावरणात त्या राहिल्या.

एक सांस्कृतिक केंद्राची प्रमुख म्हणून आणि तेही दुसऱ्या देशात फार विचारपूर्वक कृती करावी लागते. काळजीपूर्वक विचार मांडावे लागतात.

कुठल्याही कार्यक्रमातून दोन्ही देशांच्या भावनांना कुठेही तडा जाणार नाही, याची फार काळजी घ्यावी लागतें. जगभरात अशी ३५ स्वामी विवेकानंद केंद्र आहेत. सर्व केंद्रात योग, भारतीय नृत्य, संगीत, ह्यांचे वर्ग अल्प शुल्क घेऊन चालविले जातात. विविध कार्यक्रम, व्याख्याने, सांस्कृतिक परिषद, स्पर्धा, शिष्यवृती अशा सर्व आकर्षक गोष्टी ह्यात असल्यामुळे शेकडो विद्यार्थी जोडले जातात.

आसावरी ताईंनी अनेक कार्यक्रम तिथे आयोजित केले. म्यानमार मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले. तिथल्या एका प्राध्यापकाला लोकमान्य टिळकांच्या विषयी शिकवून, म्यानमारच्या भाषेत, लोकमान्य टिळकांवर व्याख्यान आयोजित केले. महत्वाचे म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहीलेल्या गीतारहस्याचे म्यानमार भाषेत रूपांतर करण्याचे काम त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुरू केले. म्यानमार मध्ये १४० वर्षे जुनी रामायणाची परंपरा आहे. तिथल्या कलाकारांना त्या भेटल्या. त्यांच्या रामायणाबद्दल जाणून घेतले. त्यांच्याकडे १०० वर्षाची जुनी रामायणाची प्रत होती. ती जतन करण्यासाठी, त्यांच्यावरील विश्वासामुळेच त्यांनी ती प्रत मिळविली.. व ती स्कॅन करून, त्यांची मूळ प्रत व स्कॅन केलेली नवी प्रत परत केली. काठमांडू मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी राज्यांच्या किल्ल्यांवरचे प्रदर्शन भरविले व सर्व माहिती सांगण्यासाठी तज्ञ व्यक्तींना बोलाविले. त्यांनी स्वतः ही महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात इथे अनेक ठिकाणी शिवाजी महाराज, सावरकर ह्यांच्यावर व्याख्याने दिली होती. आपला इतिहास, संस्कृती ह्यांची ओळख करून देण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेत आल्या आहेत.

त्यांच्या आई कडून हा वारसा त्यांना मिळाला आहे. त्यांच्या आईंचे समाजकार्य मोठे आहे. आईंचा सेवाभाव व कार्यतत्परता हे गुण त्यांच्यातही आले आहेत. माहेरच्या सर्वांचा, यजमान आणि मुलांचा भक्कम पाठींबा होता म्हणून एवढी मोठी जबाबदारी पार पाडता आली, असं त्या नम्रपणे सांगतात.

डॅा. आसावरीताई अशाच कायम कार्यरत राहोत, स्वतः बरोबरच आपल्या भारताचं नांवही उंचावत राहोत, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments