मानवी जीवन ही माणसाला मिळालेली अमुल्य देणगी आहे. आपले जीवन हे वास्तव आहे. कारण निसर्ग नियमानुसार पृथ्वीच्या निर्मितीनंतर पाणी अर्थात जलसंपदा उपलब्ध झाल्याच्या अनेक वर्षानंतर जलस्रृष्टी निर्माण झाली असा दावा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने सजीव सृष्टीच्या निर्मिती संदर्भात केला आहे. त्याचवेळी त्यांनी SURVIVAL Of the FITTEST – हा सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांताच्या माध्यमातून सर्व निसर्ग नियमानुसार जगण्यासाठी जे सशक्त ठरले ते टिकले, बाकी प्राणी-मात्रा, जीव-जंतु नष्ट झाले. जे टिकले त्यामध्ये पशु, पक्षी आणि मनुष्य टिकले. त्यामध्ये मनुष्य हा सर्वात महत्त्वाचा बुद्धीवान तसेच संस्कारक्षम प्राणी आहे.
प्रत्येक प्राणी मात्रा ही पंचतत्वानुसार म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या तत्व प्रणालीने आकार घेत जन्माला येते. त्याचबरोबर त्याला काया, वाचा, मन, आणि बुद्धी अशी बहुमूल्य वैभवशाली देणगी मिळालेली आहे. या चारही नैसर्गिक देणग्या फक्त मानव प्राण्यालाच मिळाल्या आहेत. मात्र इतर पशुपक्ष्यांना “वाचा” म्हणजे “बोलण्याची शक्ती” वगळून इतर तीन गोष्टी मिळाल्या आहेत. म्हणूनच मानव प्राणी सर्वश्रेष्ठ ठरला आहे. “वाचा” ही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मिळालेली मोठी देणगी आहे. तथापि, इतर प्राणी मात्राकडे काया म्हणजे शरीर, मन, बुद्धी असली तरी “वाचा” बोलणे – आपल्या भाव-भावना व्यक्त करण्याची शक्ती त्यांच्याकडे नसल्याने ते पशुच राहिले.
खरं म्हणजे आईच्या गर्भातील वाढ झाल्याच्या ९ महिन्यांनंतर बाळ जन्माला येते. या ९ महिन्यात बाळाची वाढ तिळागणिक होते. या काळात हा गर्भावस्थेतील जीव आईच्या गर्भात कसा नी काय खाऊन जगत असेल ? हा प्रश्न आपल्याला पडतो की नाही ? नक्कीच पडतो. मात्र, निसर्गाची किमया काही औरच असते, त्यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राणी – मात्रांची काळजी घेणारी अनाकलनीय ईश्वरी शक्ती आहे की नाही ? ती नक्कीच आहे ?
आता बाळाच्या जन्मानंतर ते मृत्यूपर्यंत १६ संस्कार असतात. या १६ संस्कारातून तो घडत जातो. त्यात पहिला संस्कार म्हणजे जन्माला येतो तेंव्हा त्याची “नाळ कापणे”. दुसरा संस्कार त्याला आंघोळ घालून अंग पुसणे. १२ व्या दिवशी बारसे करणे हा संस्काराचा भाग आहे. यानंतर बाळाची जसजशी वाढ होते तसे “जावळ काढणे” वर्षानंतर “वाढदिवस साजरा करणे” आणि पुढे काही समाजात “मुंज” हाही संस्कार करतात. मुलगा, मुलगी मोठी झाली की, विवाहापूर्वी मुलगा – मुलगी पाहणे – पसंत करणे आणि सोयरीक – साखर पुडा करणे हा सुद्धा संस्काराचा भाग आहे. शेवटी माणुस मेल्यावर सुद्धा जे विधी करतात तो सुद्धा समाजातील प्रथेनुसार संस्कार करतात. अशाप्रकारे ह्या सर्व संस्काराच्या माध्यमातून मानवी जीवनात पुर्णता येते.
या जीवन चक्रामध्ये जगात असतांना अनेक गोष्टी कराव्या लागतात. यासंदर्भात एक संस्कृत पंडित सांगितले आहे की,
“संस्कारात द्विज उज्जयते”
आपल्या लहान मुलांना जसे संस्कार देण्यात येतात, तसा तो बनत असतो. लहान मुले ही मातीच्या गोळ्यांप्रमाणे असतात. ज्या प्रमाणे कुंभार मातीवर विविध संस्कार करून वेगवेगळ्या आकाराचे मडके बनवतो, त्याप्रमाणे मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक असते. जसे की मुलांनी कोणासोबत कसे बोलावे, कसे चालावे, थोरा मोठ्यांचा मान सन्मान राखणे, आई वडीलांची सेवा करणे, इत्यादी विचारांचे संस्कार आई – वडील करतात. जेणेकरून आपला मुलगा समाजातील एक चांगला माणूस – नागरिक म्हणून घडला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते.
यासंदर्भात एक संस्कृत पंडित सांगतात,
“सत्संगात भवती, साधुता खलानाम !!
साधुनाम नही खल संगमात खलत्वम् !!
आमोदंम कुसुम भवम, मृदगंधंम !!
मृदगंधम कुसुमाणी नही धारयंती !!”
अर्थात, जर माणूस सज्जन लोकांच्या संगतीत राहत असेल तर तो कितीही वाईट असला, तरी तो सज्जन म्हणूनच समजला जातो. आणि माणूस कितीही सज्जन असला परंतु तो दुर्जन म्हणजे वाईट विचारांच्या लोकांबरोबर राहत असेल तर तो कितीही सज्जन वा चांगला असला तरी तो दुर्जन म्हणूनच ओळखला जातो.जसे गुलाबाचे, पारिजातक, केवडा प्रकारची फुले मातीत पडल्यानंतरही – मिसळूनही ही फुले मातीला सुगंध देतात मात्र मातीच्या गंध ते स्विकरत नाही.याचा अर्थ असा की, आपण आपल्या मुलांनी कशा लोकांची संगत धरावी याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचे मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे.
आणखी एक संस्कृत पंडित सांगतात की,
“यथा कनकं परिक्षयते
निघर्षण, ताप ताडनैही
तथा मनुष्यं परिक्षयते
ज्ञानेन, शीलैन, गुणेन, कर्मण:”
अर्थात, ज्याप्रमाणे शुद्ध सोन्याची परीक्षा सोनार त्याला घासून, भट्टीत तापवून आणि आपल्या हातोडीने ठोकून घेतो, त्याप्रमाणे चांगल्या, गुणवंत आणि संस्कारीत माणसाची परीक्षा त्याचे ज्ञान, शील, त्याचे गुण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की तो कोणत्या प्रकारचे कर्म करतो, त्यावरून त्याची पात्रता ठरते. म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार देणे महत्त्वाचे आणि आवश्यक ठरते.
शेवटी मला एकच सांगायचे आहे की, आपल्या मुलांनी आपल्या जीवनात मिळालेल्या “काया, वाचा, मन आणि बुद्धी” हे आपले जे अमुल्य वैभव आहेत, त्यांचा वापर आपला परिवार, गांव, समाज, राज्य आणि देशाची मान उंचावेल अशी वैभवशाली परंपरा चालवून एक चांगला इतिहास घडविणारा नागरिक बनण्यासाठी आई – वडीलांनी चांगल्या संस्काराची शिदोरी बांधून आपल्या परिवारास आजच्या आधुनिक – वैज्ञानिक काळात चांगले संस्कार देण्याची गरज आहे.
सगळ्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया !!
धन्यवाद !!

— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर जीवन म्हणजे काय श्री राजाराम जाधव यांनी या सुंदर जीवनाबद्दल जे विवेचन केले ते अतिशय शास्त्रीय व अनुभवावर आधारित आहे त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि प्रकाशित केल्याबद्दल भुजबळ सरांचे धन्यवाद व आभार
खूप सुंदर आणि बोध घेण्यासारखा लेख 🙏👌👌👌👌