Homeलेखजीवन म्हणजे काय ? - 21

जीवन म्हणजे काय ? – 21

“भावनांचा कोंडमारा”

जीवन जगण्याचा अर्थ आणि जगत असताना येणाऱ्या व्याधीला न घाबरता डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार घेऊन आनंदाने कसे जगावे हे इतरांना उलगडुन सांगणाऱ्या डॉक्टरने स्वतः भूलीचे इंजेक्शन घेऊन केलेल्या आत्महत्येने समाज मन ढवळून निघाले.

लातूरमध्ये नुकतीच घडलेली ही घटना ! डॉ.मेहूल राठोड हे एक प्रथितयश हृदयरोग तज्ञ. वय अवघे 45 वर्ष, मृदूभाषी, मनमिळाऊ अन् रुग्णांशी हसत हसत संवाद साधणाऱ्या एका उमद्या डॉक्टरने उचललेले हे पाऊल संपूर्ण शहर व पंचक्रोशीला हादरवून गेले. विचारी, अभ्यासू समंजस डॉक्टरने हे पाऊल का उचलले असेल….?

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी ! लोकलमधील भांडणं ही मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. या प्रवासात कधी ‘अरे ला का रे’ म्हणताना हातघाईवर येणे हे साहजिक आहे. ही भांडणे केवळ जागेवरुन नव्हे तर दाराजवळ वा खिडकीजवळ कोणी उभे रहावे, कोणी कोणासाठी बाजूला सरकावे यावरुन अथवा धक्का लागणे, शिवीगाळ करणे अशा अनेक कारणांवरुन होत असतात. अशावेळी आवाज चढला किंवा माणसं एकमेकाला भिडली की आसपासचे लोक मध्यस्थी करुन ती थांबवण्याचा प्रयत्न करतात. आपापलं स्टेशन आलं की उतरुनही जातात. पण अशा किरकोळ कारणावरुन भांडण झाल्यास एखाद्याने चाकू सूरा काढून एखाद्याचा खून करावा ? हे मात्र अनाकलनीय ! 23 जूनच्या पावसात अंधेरी ते विरारच्या दरम्यान लोकलचा दरवाजा लावण्यावरुन झालेल्या भांडणात एका 22 वर्षीय तरुणाचा दुसऱ्याने भोसकून खून केला. सहा महिन्यापूर्वी एका 33 वर्षीय प्राध्यापकाचीही अशाच किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली होती. आपलं जगणं इतकं माणूसकी शून्य होत आहे का ? साध्या गोष्टीवरुन भोसकून मारण्याइतपत असंवेदनशील होत आहोत का ?

क्रुरतेला काळिमा फासणारी घटना पुण्याजवळच्या लोहगडावर नुकतीच घडली. प्रेम एकाबरोबर तर लग्न दुसऱ्या बरोबर होतं आहे हे पाहून त्या तरुणीने नियोजित वराला कड्यावरुन दरीत ढकलून देत त्याचे जीवन संपवले. ते ही नियोजनबद्ध पद्धतीने ! का केलं असेल त्यांनी हे भयानक कृत्य ?

प्रि प्रायमरी स्कूल मधील घटना ही अशीच अंगावर शहारे आणणारी ! एक छोटा मुलगा त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलास बेदम मारहाण करतोय. ते ही एका रिकाम्या हाॅलमध्ये थांबून थांबून त्यांच्यावर घाव घालतोय. ते दृष्य पाहवत नव्हते. लहान लहान मुले ही इतकी आक्रमक का होत असावित…?

बागेत बाकड्यावर एक मध्यमवयीन बाई बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. ‘काय झालं ताई ! बरं वाटत नाही का ? त्या स्वतःला सावरत म्हणाल्या, नाही, काही नाही ! मी ठीक आहे. असं काय करताय ताई ! सांगा ना ! बोला, मन मोकळं होईल. तुम्हाला बरं वाटेल ! पण बाई बोलायला तयार नव्हत्या. ‘कुणाला काही झालंय का ? आम्ही काही मदत करू शकतो का ! प्लीज बोला, किती मनस्ताप करुन घेणार आहात ! रडतच त्या बोलू लागल्या. काय सांगू अन् कशी सांगू ! माझी सून नांदायला तयार नाही. तिला घटस्फोट हवा आहे. पाच वर्षाचा नातू आहे. आमच्याकडे यायचं म्हणून रडत असतो. काय करावं काही कळत नाही. ‘ती कशासाठी घटस्फोट मागत आहे ? तिला आमच्या सोबत राहायचं नाही. सासू सासरे नकोत. वेगळं घर करण्यासाठी हट्ट करीत होती. मुलाने नकार देताच माहेरी निघून गेली. घटस्फोटासाठी कोर्टात दावा केला आहे. तीन बेडरुमचं स्वतः चं घर सोडून कुठं जायचं ? आम्ही काय करावं तेच कळत नाहीय.’

या सर्व घटना मन विशिन्न करणाऱ्या आहेत. प्रत्येक घटनेमागील कारणे वेगवेगळी असल्याने निश्चित निष्कर्ष काढणे अवघड आहे. इथे एक बाब नमूद करण्या सारखी आहे. यात मिलेनियम, जेन झी आणि जेन अल्फा पिढीतील ही सारी तरुणाई आहे. डिजिटल जगात जन्मलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढत असलेली ही पिढी ! शिकली सवरलेली,
सुसंस्कृत म्हणवून घेणारी ! पण तिची असंवेदनशीलता थरकाप उडविणारी आहे.
इतक्या झटपट तिच्या सहनशक्तीचा अंत का होतोय ? आम्ही संस्कारहिन झालो आहोत का ? पालकांचं काही चुकतंय का ? मुलांवर संस्कार करण्यात कमी पडत आहेत का ? मनाचं आरोग्य बिघडत चालले आहे का ? असे नानाविध प्रश्न मनात येतात. रुग्ण सेवेचा वसा घेऊन अनेकांना जीवदान देणारा डॉक्टर, कौटुंबिक जबाबदारी बरोबरच सामाजिक बांधिलकी यांना एका क्षणात मूठमाती कसा काय देऊ शकतो ? सध्याच्या पिढीचं विश्वच संकुचित होताना दिसत आहे. विवाहाच्या वेदीवर चढतांना नववधूंना वेलसेटेल पती हवा असतो पण सासू सासरे किंवा इतर नातेवाईक नको असतात. असले तरी त्यांना सोबत घेऊन राहायची तयारी नसते. वडिलोपार्जित संपत्ती हवी असते पण जेष्ठ जसे आहेत तसे स्वीकारण्याची तयारी नसते. त्यामुळे जेष्ठांचं जगणं कठीण होत चालले आहे.

आपण स्वतःला प्रगत म्हणवून घेत आहोत. पण खरंच प्रगत झालो आहोत का ? आर्थिकदृष्ट्या माणूस सक्षम झाला आहे परंतु मानसिकदृष्ट्या असुरक्षित होत चालला आहे. एक काळ असा होता तेव्हा माणूस आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता पण मानसिकदृष्ट्या सक्षम होता. कुटुंब मोठं असायचं. आजीआजोबा, काका मामा, आत्या, मावशी अशी बक्कळ माणसं कुटुंबात असायची. घरात खंडीभर लेकरं असायची. एखाद्याचं खेळणं असायचं, पण सर्वांनी मिळून खेळायचं असा दंडक असायचा. त्यामुळे मुलांमध्ये आपोआप संयम, समंजसपणा अन् समूहात रहायची सवय लागायची. काही संकटं आली किंवा दु:ख कोसळलं तर सावरायला संपुर्ण कुटुंब असायचं. शेजारी, मित्रमंडळी धावून यायची. मन मोकळं करायला हक्काची, विश्वासाची माणसं असायची. त्यामुळे मनाचा निचरा व्हायचा. जीवनात संकटं ही येतच असतात पण ती पेलण्याची ताकद मिळायची. प्रत्येकाच्या आयुष्यात नातेसंबंधाला अनन्यसाधारण महत्व होतं. हे नातेसंबंध, मित्र मैत्रिणी सर्वात मोठं आउटलेट होतं.

आज माणसाजवळ पैसा आलाय. पण समाधान हरवलंय. कुटुंब संकुचित झाले आहे. मन मोकळं करण्यासाठी हक्काचं, विश्वासाचं एकही खांदा नाही. आजीआजोबा,काका, मामा, आत्या, मावशी ही नाती विरळ आणि दुर्मिळ होत चालली आहेत. चुलतभाऊ, बहीण ही नाती आजच्या मुलांना कळत नाहीत. आईबाबाकडे कामामुळे मुलांना देण्यासाठी वेळ नाही. मुलांचा संवाद खुंटला आहे. खेळणी भरपूर आहेत पण गप्पा मारण्यासाठी, मनातलं बोलण्यासाठी ‘आपलं असं’ कुणीच नाही.

मुलं आणि पालक ही सतत स्क्रीनवर आहेत. भवताली मुंग्यासारखी माणसं आहेत. अशा गर्दीत असूनही तो एकटा आहे. केवळ आभासी दुनियेत मग्न आहे. संवाद नसल्याने मनातल्या भावना मनातच दाबल्या जातात. मनातली वेदना व्यक्त करणं कमीपणा वाटतो आहे. कारण प्रतिष्ठा आड येते. स्टेटस महत्त्वाचे वाटते. यशाचा मुखवटा कायम ठेवायचा असतो. त्यामुळे मनात अश्रू आले तरी डोळ्यात यायच्या आधीच सुकून जातात. यातूनच मनावरचा ताण वाढत जातो. एक असा क्षण येतो, तोच जीवघेणा ठरतो, अन् टोकाचं पाऊल उचललं जातं. मनासारखं होत नसेल, मिळत नसेल तर हिंस्र रुप धारण करुन दुसऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. ही असंतुलित मानसिकता अतिशय घातक रुप घेते. आज मानसिक आरोग्याचा प्रश्न वैयक्तिक राहिला नाही. एक फार मोठी सामाजिक समस्या बनली आणि आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी ही वाढली आहे.

मानसिक आरोग्याची समस्या केवळ शहरी भागातच आहे असे नाही तर ग्रामीण भागात ही अस्वस्थता वाढली आहे. पूर्वीसारखा मोकळेपणा आणि आपलेपणा राहिला नाही. नातेसंबंधापेक्षा संपत्तीला प्राधान्य दिले जात आहे. पैशापुढे माणूस गौण झाला आहे. माणुसकीच्या नात्याने जवळ गेल्यास त्यालाच संपवला जात आहे. पद, प्रतिष्ठा, यश याची नशा चढते आहे. जमिनीवरचे पाय हवेत गेल्याने अशा व्यक्ती सामान्य अन्य नातेवाईकांन पासून अंतर ठेवून वागू लागते. मनामनात अंतर पडल्याने माणूस एकाकी होऊ लागतो. शारीरिक फिटनेस साठी जागोजागी जीम, योग, प्राणायामची केंद्रे उभी आहेत पण मनाच्या आरोग्याचं काय..? सुदृढ मन सुदृढ शरीर घडवत असते.

आपण शरीराच्या फिटनेसची काळजी घेतो. पण सुदृढ, सक्षम, खंबीर मन घडविण्याकडे दुर्लक्ष करीत असतो. त्यासाठी आपल्या मनाची खिडकी सदैव उघडी ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.

कारखान्यात अनेक यंत्रे असतात. त्या यंत्रात अतिरिक्त दाब निर्माण झाला तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक झडप असते, तसेच मनाचं ही आहे. मनाचा ताण, नैराश्य, भावना, एकटेपणा, दूर करण्यासाठी एखादी तरी आपलं मानणारी, समजून घेणारी जवळची व्यक्ती असावी तरच मन स्वच्छ, मोकळं राहिल. मनाला असं एक आउटलेट हवंच…!

डाॅ. प्रभा वाडकर

— लेखन : प्रा डॉ प्रभा वाडकर. लातूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments