Wednesday, October 15, 2025
Homeयशकथाझेप : ४

झेप : ४

“पुष्पलता देशपांडे”

त्या काळच्या अनेक आव्हानांना, अडी अडचणींना सामोरे जात जात कसबी सुईणीचे कार्य करणाऱ्या, त्या काळच्या परिस्थितीची जाणीव अन “मी नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलंय त्याचा जास्तीत जास्त फायदा महिलांना व्हायला पाहिजे या सद्भावनेने पंचवीस हजरांपेक्षा जास्त यशस्वी बाळंतपणं सुखरूप रित्या करणाऱ्या, बोलताना सहज “ईश्वर कृपेने आयुष्य चांगलंच गेलं, नशिबानं जे दिलं नाही त्याची कधीच खंत केली नाही आयुष्यामधे जे भाग्यात लाभलं त्यातच समाधान मानून जगले” असं मनापासून सांगणाऱ्या व वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी आजही समाधानी असणाऱ्या श्रीमती पुष्पलता रमाकांत देशपांडे सध्या पनवेल येथे रहातात.

स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच १९३२ साली कुलाबा (आजचा रायगड) जिल्ह्यातील माणगांव जवळच्या निजामपूर या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जगन्नाथ खळे हे स्वातंत्र्य सैनिक होते. देशासाठी काम करण्याची शिक्षा म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना हद्दपार करून कोकण प्रांतातून कोसो दूर असणाऱ्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथे पाठवले होते. बालपणातच वडिलांच्या मायेला पारखं व्हावं लागलं हे दुःख सोसतच त्यांनी शाळेत प्रवेश केला. सातवी (व्हर्नाक्युलर फायनल) पर्यंत शिक्षण घेतले.

विवाहानंतर पुष्पलता ताईंचे च् कुटुंब मुंबईला जे जे हॉस्पिटल निवास भागात वस्तीला होतं. मिलिंद हे त्यांचे चौथे अपत्य केवळ सोळा दिवसांचं असताना त्याला कुटुंबासोबत मागे सोडून १९५७ साली त्या नर्सिंगचा कोर्स करायला त्या सातारा जिल्ह्यातील भिलवडी या गावी गेल्या. तब्बल दोन वर्षांचा हा कोर्स जिद्दीने परिश्रमपूर्वक, जीवाभावाच्या नातलगांपासून दूर राहून पूर्ण केला .

नर्सिंगचा कोर्स पूर्ण होताच समाज कल्याण खात्याने पुष्पलताताईंची पनवेल येथील समुद्र किनाऱ्या नजिक असणाऱ्या गव्हाण या गावी नियुक्ती केली. गावोगावी जाऊन सुईणीचे काम करायचे, वाहने नव्हती रस्तेच नव्हते तर वाहने कशी असणार? कोकण भाग म्हणजे डोंगरच डोंगर, मजल दरमजल चालत जाऊन वा कधी बैलगाडीतून प्रवास करून बाळंतपणं करायला लागायची, असा तो अत्यंत खडतर काळ. तीन वर्ष तिथे नोकरी केल्यानंतर त्यांची बदली पनवेल जवळ पोयंजे या गावी झाली. त्या काळी त्यांना महिन्याला सत्तर रुपये पगार होता. इथून पुढे त्यांची बदली पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गंगापूर बुद्रुक येथे झाली. पोयंजे गावची काही मंडळी त्यांना तिथे जाऊन भेटली, तुम्ही आमच्या गावी या आमच्या पंचक्रोशित सुईणीची नितांत गरज आहे. मूळ घरदार, संसार यापासून गंगापूर खूपच लांब होते .आपण कुटुंबात असायला हवे या भावनेने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व पोयंजे गावात स्वतःचे प्रसूतिगृह सुरू केले. इथे स्वतंत्रपणे काम करताना त्या प्रत्येक बाळंतपणाचे अडीच रुपये फी घेत असत. त्यांच्या मदतीला एका आदिवासी समाजातील जिजाबाईला पगार देऊन ठेवले होते. डोंगरदऱ्या चढ उतार पार करत करत चार सहा मैलांची पायपीट करून, कधी दिवसा तर कधी रात्री बाळतपणं करायला लागायची. गरोदर महिला कधी प्रसूत होईल याचा पक्का अंदाज त्या सांगायच्या अन् तसं घडायचं.
त्या काळी लाईट नव्हते, कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात त्यांनी कित्येक बाळंतपणं केली. त्या काळी मोजकेच डॉक्टर होते पण त्यांची फी चौपट होती. गोर गरिबांना त्यांची फी परवडणारी नव्हती म्हणून महिला त्यांच्याकडे यायच्या. अठरा पगड जातींच्या हजारो गरिब महिला त्यांच्याकडे यायच्या, कुणाकडे पैसे नसतील तर विना मोबदला त्यांचे बाळंतपण करायच्या, कुणालाही त्यांनी पैशासाठी अडवून ठेवलं नाही, माणुसकीचे ते दिवस तसेच होते.

पुष्पलताताईंनी त्यांच्याच देशपांडे कुटुंबातील चक्क चाळीस महिलांची बाळंतपणं केली. कदाचित हा एक उचांक असू शकेल असं मला वाटतं. त्यांच्या सूनबाईंचं होणारं अपत्य तेरा पौंड वजनाचं होतं, डॉक्टरांनी सिझेरिअन करायला सांगितले होते परंतु पुष्पलताताईंनी हे जोखमीचे बाळंतपण स्वतः यशस्वीरित्या केलं, हे विशेष.

शेवटचं बाळंतपण कधी केलं ? या प्रश्नाला उत्तर देताना पुष्पलताताई म्हणाल्या, माझ्या मोठ्या मुलीचा नातू, म्हणजे माझा पणतु श्लोक हे शेवटचं बाळंतपण, त्यानंतर बाळंतपण केलं नाही, आज त्याला एकोणीस वर्ष झाली.

प्रत्येक बाळंतपण यशस्वी करणाऱ्या पुष्पलताताईंना पनवेल रोटरी क्लब ऑफ सिंफनी तर्फे व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू – पनवेल, तथा पनवेल महानगर पालिका यांनी सन्मानित केले आहे.

पुष्पलता ताईंच्या उभ्या पुऱ्या संपूर्ण आयुष्यातील अडतीस वर्षांचा प्रदीर्घ कालावधी केवळ बाळंतपणं करण्यात गेला अन थोडी थोडकी नव्हे तर पंचवीस हजारांपेक्षा जास्त बाळंतपणं त्यांनी केली. त्या एकाच ध्येय्याने प्रेरित होऊन निष्ठेने, कष्टाने, निस्वार्थीपणे केलेल्या या बहुमोल गौरवशाली सेवेची दखल घेऊन त्यांना “दि म्हसळा टाइम्स जीवन गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार रुक्मिणी पांडुरंग चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी नुकताच जाहीर केला असून ११ ऑक्टोबर २५ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

पुष्पलता देशपांडे त्यांच्या वयाच्या ९३ व्या वर्षीही अजून स्वतःचं स्वतःच करतात. उभ्या आडव्या डोंगरातून प्रचंड पायपीट केल्यामुळे म्हणा अजून त्यांचे पाय ठणठणीत आहेत. मी त्यांना विचारलं, आताच्या दवाखान्यांची परिस्थिती व सिझेरिअनची वाढती संख्या यावर तुम्ही काय भाष्य कराल? तात्काळ त्या म्हणाल्या, “सारथी बना स्वार्थी नको” हा केवळ चार शब्दांचा संदेश त्यांनी दिला परंतु सद्य परिस्थितीत तो अनमोल संदेश आहे, हे निर्विवाद सत्यच.
श्रीमती पुष्पलता रमाकांत देशपांडे यांना प्राप्त झालेल्या जीवन गौरव पुरस्काराचे न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या आयुष्यात शंभर वसंत ऋतूंचा बहारदार बहर असाच फुलत राहू दे.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Zep ha lekh पुष्पलता ताई देशपांडे यांच्या अफट आणि achat कार्याचा achambit करनारा लेख आहे. त्याना मनपासुन सलाम
    Shatayushi भव hich शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप