“सुखदा प्रधान सिंग”
भावनांचा अन् वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्यांच्या असतात त्यांनाच कळतात, हे जरी सत्य असलं तरी ‘सुखदा प्रधान सिंग’ त्याला अपवाद आहेत.
दुसऱ्यांच्या व्यथा, वेदना समजून घेण्याची आंतरिक उर्मी, ओढ, मिळालेल्या प्रेरणेमुळे सुखदा प्रधान सिंग यांनी दुसऱ्यांच्या वेदनांना आपलसं केलं. स्वतःच्या जीवनातील रोजची दगदग, पळापळ याला सामोरे जात असतानासुद्धा पीडित महिलांच्या पुनर्वसनाचे कार्य करायला मुळातच तसं मोठं मनोधर्य असावं लागतं, तितकंच सोशिक असावं लागतं. आपल्यावर तसे संस्कार घडवले गेलं असणंही तितकच महत्वाचं असतं तसे संस्कार त्यांच्या आई कै. मीनाताई प्रधान यांच्याकडून त्यांना लाभले आहेत.
सुखदा प्रधान सिंग यांची आणि माझी तशी ओळख नव्हती. परंतु जुलै २५ मधे आमच्या व्हाटस् अप ग्रुपच्या एका गप्पाष्टकाच्या कार्यक्रमाचे श्री हेमंत गुप्ते यांच्या ‘वसिष्ठ सृष्ठी सोसायटी मिरा रोड’ येथे आयोजन केले होते. काही परिचित होते काही अपरिचित. त्या दिवशी सुखदा यांची प्रथम भेट झाली. त्यांनी त्यांचा परिचय करून देताना त्या पीडित मुला मुलींसाठी जे समाजकार्य करतात त्याची माहिती थोडक्यात सांगितली, ती ऐकून मी हादरून गेलो इतकं ते कठीण कार्य होतं. कारणही तसंच विस्तवास हात घालण्यासारखंच होतं. मी त्यांना तसं म्हणालोही त्यानी त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितलं की, वास्तवात अन् विस्तवात हात घालायचा असेल तर चटके सहन करण्याची तयारी तर ठेवलीच पाहिजे ना! हे तुमचं कार्य खरंच तुम्हांला बहुमानाचा एखादा पुरस्कार मिळायला हवा असंच आहे हो! त्यांचं मत असं, मी हे खरंतर कुठेच जाहीरपणे सांगत नाही पण तुम्ही जिवाभावाचे मित्र आहात म्हणून सांगितलं आणि तसं पुरस्कारासाठी मी हे काम करतच नाही मुळी. एका प्रेरणेने मी हे कार्य करायचे स्विकारले आहे. मी दि म्हसळा टाइम्स दैनिकाचा सल्लागार संपादक आहे यंदा १४ वा वर्धापन दिन साजरा करायचे औचित्य साधून समाजातील काही कर्तृत्ववान मंडळींना पुरस्कार देणेचे ठरवले आहे मी तुमचे नामांकन पाठवतो. शेवटी मी त्यांचं मन वळवण्यात यशस्वी झालो आणि नामांकन पाठवले. ही सुखदाची अन माझी झालेली पहिली भेट.

‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असं मी म्हणतो कारण, कारणच तसं आहे. पीडित मुली, महिला, जबरदस्तीने वेश्या व्यवसायाच्या दलदलीत लोटलेल्या मुली, मतीमंद मुले मुली यांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळावी, त्यांच्यात आत्मनिर्भरता निर्माण व्हावी, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना कसं सामावून घेता येईल या ध्येय्याने प्रेरित होऊन २००८ सालापासून सुखदा यांनी काम करायला सुरवात केली. सोप्पं नसलेल्या या अवघड कार्याचं शिवधनुष्य त्या पेलत आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या पीडित मुली महिलांपैकी ज्यांना शिक्षणात रस आहे त्यांना त्यांना महाविद्यालयीन शिक्षण देणेसाठी त्या प्रयत्नशील असतात. कौतुकाची बाब म्हणजे त्यांच्यापैकी एक महिला आयुर्वेदिक डॉक्टर झाली, एक शिक्षिका तर एक नर्सिंगचा अभ्यासक्रम शिकून नर्स झाली. काही पीडित मुलींचे लग्न करून देऊन त्यांना व्यवस्थित संसाराला लावण्याचे पवित्र कार्य केले आहे. ज्यांना अशा प्रकारचे शिक्षण घेण्यात रस नसतो त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचे कोर्सेस उदाहरणार्थ चॉकलेटस्, केक, बेकरी, कन्फेक्क्षनरी, टेलरिंग इत्यादी प्रकारचे शिक्षण देऊन स्वावलंबी केले जाते. इतकंच नाही तर सुरवातीला व्यवसाय सुरू करायला आर्थिक सहाय्यही दिले जाते. काही गरजू मानसिक दृष्ट्या विकलांग असणाऱ्या मुला – मुलींना त्यांना आवडेल, झेपेल अशा प्रकारचे ट्रेनिंग देऊन स्वबळावर उभं रहाण्यासाठी मदत करतात. सोसायटीतील लोकांकडून ऑडर्स घेऊन मुलामुलींकडून बनवून विक्री करून येणारे पैसे त्यांचे त्यांना देतात. हे सर्व म्हणजे जिद्दीचा एक प्रवासच आहे, या प्रवासात शांतता, संयम, धैर्य, चिकाटी खूप महत्वाची असते त्याचे पूर्ण भान राखून त्या मदतीचा हात पुढे करत असतात. शिक्षणाचा अभाव तसेच सामाजिक परिस्थितीमुळे देहविक्रीच्या दलदलीत पडणाऱ्या पीडित मुलींना बाहेर काढून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे सुखदाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
त्यांनी मागील सतरा अठरा वर्षांच्या कालावधीत ८० – ८५ पेक्षा जास्त पिडित महिलांना सन्मानाने जगता येईल असे महत्कार्य केले आहे. दहा पेक्षा जास्त मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका करून त्यांना आत्मनिर्भर बनवले आहे.

हे कार्य करायची प्रेरणा तुम्हांला कशी मिळाली ? यावर सुखदा सांगतात, माझी आई कै. मीना प्रधान शिक्षिका होती. तिला अशा मुला – मुलींसाठी काहीतरी ठोस कार्य करायचं होतं. परंतु माझ्या आईला जमलं नाही ते कार्य मी करायचं ठरवलं. प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली अन् या कार्याचा वसा मी अखेरपर्यंत सुरू ठेवणार आहे. अन् महत्वाचं म्हणजे कोणत्याही सामाजिक संस्था किंवा वैयक्तिक इतरांकडून मी आर्थिक सहाय्य घेत नाही .
मी, माझा मुलगा, माझे पती आमच्या उत्पन्नातून तीस टक्के रक्कम दर महिना या कार्यासाठी राखीव ठेवतो. नुसतीच समाज सेवा नव्हे तर स्वतः पदरमोड करून हे कार्य करणे हे खरंच कौतुकास्पद आहे तसेच अनुकरणीयही आहे.
जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींची सुटका करताना काही धोके, अडथळे जाणवले का ? असे विचारल्यावर सुखदा सांगतात, भरपूर, भरपूर अडथळे आले. त्या महिलांचे दलाल, गावगुंड, दादालोक फार त्रास देतात. पण तो त्रास सोसूनही काम सुरूच ठेवते. कसं आहे ना, मुलींना आणि त्यांच्या घरच्यांनाही वेश्या व्यवसायातून मिळणारा पैसा हवा असतो. पण मुलींच्या तारुण्याचा बहर ओसरल्यावरच्या गंभीर, वाईट परिस्थितीची जाणीव त्यांना करून देण्यात अगदी दमछाक होते. त्यांच्या घरचे वेळ प्रसंगी भांडायला, मारायलाही येतात पण निभावून न्यायचं. स्विकारलंय ना हे कार्य! हे धोके विस्तारितपणे सांगितले तर इतर लोकं घाबरून पुन्हा कोणाला मदत करायला धजावणार नाहीत ही भीती असतेच.
माझ्या आयुष्यात एक जीवघेणा तसंच माझी प्रतिष्ठा पार रसातळाला जावी असा प्रयत्न झालाच. माझ्या घरी एक मोठा समारंभ सुरू होता. अनेक नातेवाईक जमले होते अन नेमक्या त्याच दिवशी अशाच एका वेश्या व्यवसायातून बाहेर काढून तिला प्रशिक्षण देऊन एका सुसंस्कृत कुटुंबात मुलं संभाळायची चांगली नोकरी लावून दिलेल्या मुलीचे नातेवाईक मोठा जमाव घेऊन माझ्या घरी आले. त्यात गावगुंड – दादा – दलाल यांच्याबरोबर पन्नास साठ माणसांचा जमाव माझ्या घरात घुसला मला घराबाहेर खेचायचं काम सुरू झालं अत्यंत अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला लागले. आजूबाजूचे कित्येक जण माझ्या घराजवळ जमले, नुसता गोंधळ निर्माण झाला. काय झालं, त्या मुलीनेच घरच्यांना फोन करून मला ही नोकरी करायची नाहीये असं सांगितलं अन तिच्यामुळेच हा सारा तमाशा घडला होता. मीच गुन्हा केलाय असा त्यांनी माझ्यावरच उलटा आरोप केला होता. मीच मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेते, असे आरोप केले .प्रकरण पोलिस स्टेशनमधे गेलं, शेवटी पोलिसांची खात्री झाली मी असला उरफाटा उद्योग करीत नसून खरंच पीडित मुलींसाठी समाजकार्य करते. माझी सुटका झाली पण, ती मुलगी अठरा वर्षांची सज्ञान झाल्यामुळे तिने पुन्हां वेश्याव्यवसाय करायचे ठरवले, पोलिसांनीही तिचे खूप समुपदेशन केले पण तिने काही ऐकलेच नाही. ती पुन्हा वेश्याव्यवसाय करू लागली.पुढे दोन वर्षानंतर ती मुलगी पुन्हा माझ्याकडे आली तेंव्हा ती एच आय व्ही बाधित झाली होती,पण आता तिला स्विकारण्याचा प्रश्नच उरला नव्हता.

अशा या खडतर प्रसंगांना तोंड देणाऱ्या सुखदा यांचा जन्म ठाण्याचा. त्या उच्च विद्याभूषित असून हैदराबाद येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीमधे सिनिअर व्हाईस प्रेसिडेन्ट (कार्पोरेट अफेअर्स) या पदावर कार्यरत आहेत. सुखदा निवृत्ती नंतर गाझियाबाद येथे त्यांच्या मुळ घरी जाऊन हाच वसा पुढे सुरू ठेवणार आहेत. त्यांच्या घराचा तिसरा मजला या पीडित महिलांच्या निवासाकरिता वापरणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एक प्लॉट विकत घेतला असून त्यावर गरजू महिलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल बांधणार आहेत ज्यायोगे अशा पीडित महिला त्यांच्या देखरेखीखाली4 सुरक्षित राहू शकतील, HATS OF TO SUKHADA…….. !
सुखदा प्रधान सिंग यांच्या या निस्सिम, कष्टप्रद, अवघड समाज कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा दि म्हसळा टाइम्स समाज भूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या परिवारातर्फे त्यांना अनेक अनेक प्रकारचे शुभेच्छा !!

— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल – रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Sukhada Tai,
आपण घेतलेले व्रत हे महान देश कार्य आहे. आपण घेतलेले कष्ट, त्यातील धोके हे सगळे फार भयावह आहे. आपल्या ह्या कार्याला सलाम. आपल्याला शक्तीचा अखंड स्रोत मिळावा ही देवाकडे प्रार्थना.
सुखदा ताईंना सलाम .
खूप सुंदर,अत्यंत हृदयस्पर्शी कार्य,खूप मोठे धाडस आणि आर्थिक पदरमोड करून ,मोठ्या हस्ती आणि त्यांचा प्रत्यक्ष अपत्यक्ष होणारा अडथळा पार करून हे सर्व पूर्णत्वास नेले खूपच कठीण कार्य आहे.तरीही त्यामध्ये सातत्याने n डगमगता पुढेच जात राहणे खूपच चॅलेंजिंग टास्क आहे.सलाम त्याच्या या कार्याला आणि तुमच्या या निवडीला कुठेही कोणताही देखावा n करता समाजकार्य करणाऱ्या अशा व्यक्तीचा तुमचा शोध खरोखरच अतिशय स्तुत्य आहे.आपणा दोघांनाही या निमित्त मनाचा मुजरा.
सुखदा मॅडम यांच्या कार्याला सलाम