नमस्कार मंडळी.
“झेप” या सदरासाठी श्री सुनील चिटणीस हे लेखन करीत आहेतच. त्यांच्या जोडीला अन्य काही लेखक, लेखिका यांचे ही लेखन या सदरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. आजच्या भागात श्रीमती शोभा जोपुळे यांच्या कामगिरी वर श्री नंदकुमार रोपळेकर यांनी लिहिलेली यश कथा वाचू या.
— संपादक
बहुतांश लोकांना विशेषतः महिलांना शासकीय नोकरी सर्वार्थाने सोयीची वाटते. ते काही प्रमाणात खरंही आहे. कारण म्हणजे संसार सांभाळून नोकरी करीत करीत आपले छंदही जोपासता येतात. याचे ‘जीते जागते’ उदाहरण म्हणजे प्रस्तुत यश कथेची नायिका शोभा जोपुळे या होत.
मुंबई विद्यापीठाची बी.एस.सी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर शोभा जोपुळे या महाराष्ट्र शासनाच्या विमा संचालनालयात नोकरीस लागल्या. कर्मधर्म संयोगाने त्यांचे विमा संचालनालयाचे कार्यालय मुंबईतील नरीमन पाँईट परिसरात होते. याच परिसरात मंत्रालय, आकाशवाणी असल्यामुळे शोभाला विविध छंद जोपासण्यासाठी सुलभ अन् सोयीस्कर झाले.
शोभाची आकाशवाणीचे माधव कुळकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यांना तिने बालकांसाठी लिहिलेली कथा दाखविली. त्यांना ती कथा आवडली. तिथून शोभाचा आकाशवाणीचा अनोखा प्रवास सुरू झाला. मग ‘बाल दरबार’, ‘गंमत-जंमत’, ‘युववाणी’, ‘वनिता मंडळ’ असं करत करत ती ‘सायन्स सेल’ ला कशी जोडल्या गेल्या हे तिलाही कळले नाही.
भारतातील सर्वात ख्यातनाम मुंबई ‘आकाशवाणी’ साठी शोभा ने माननीय श्री. हेमचंद्र प्रधान यांची मुलाखत घेतली. नभोनाट्यासह म्युझियमच्या संचालकांची मुलाखत तेथे समक्ष जाऊन रेकॉर्ड केली.
ही मुलाखत लंच ब्रेक मध्ये (फक्त १५ मिनिटात) रेकॉर्ड शकले हे ती अभिमानाने सांगते. तिच्यासाठी १९८५ ते १९९३ हा आठ वर्षाचा सर्वार्थाने सुखकारक होता. मात्र १९९३ या वर्षी तिचे कार्यालय बांद्रा पूर्व येथे आले.
ज्या ज्या वेळी शोभाला संधी मिळेल तशी तिने पदभ्रमण, भटकंती केली. ‘युथ हॉस्टेल‘ आयोजित ‘लडाख’ पदभ्रमण मोहिमेत तिने भाग घेतला. त्या अनुभवांवर आधारित लिहिलेला ‘लडाख ट्रेक‘ हा लेख दै. लोकसत्ता मध्ये छापून आला. सा.’लोकप्रभा’ मध्ये तिच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

शोभाने नोकरी करीत करीत एस.एन.डी.टी. विद्यापीठाचा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार श्री रामकृष्ण बाकरे हे त्यावेळी या अभ्यासक्रमाचे समन्वयक होते. या अभ्यासक्रमात तिच्या समवेत आकाशवाणीचे निर्माते भूपेंद्र मिस्त्री, ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी, प्रभा नवांगूळ, विलास पाटील आणि मी देखील होतो.
शोभाने पदभ्रमण, भटकंती या छंदाला छायाचित्रणाची जोड दिली. ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकांत मलुष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्यामुळे ती फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया ची सभासद झाली. त्याचा फायदा तिला लडाख ट्रेकिंग मध्ये झाला. त्यावेळी तिने तिच्या नवीन कॅमेऱ्याने काढलेल्या छायाचित्राला बक्षीस मिळाले. याचा परिणाम म्हणून तिचे फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया वरील वर प्रेम वाढत गेले.मग सांज दै. महानगर मधील ‘कलादालन‘ या सदरात तिने जहा़गिर आर्ट गॅलरी, मॉडर्न वेव्ह, एनसीपीए,पंडोल आदी मुंबईतील कलादालनात भरणाऱ्या कला प्रदर्शनांची माहिती, संबधित चित्रकारांच्या मुलाखती छायाचित्रांसह प्रसिद्ध केल्या. या सदराला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः ज्येष्ठ कलाकार वासुदेव कामत, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्त्याने तिची रंगाची ओळख झाली. हे छंद जोपासत, जोपासतच तिने १९९६ मध्ये कायद्याची पदवी घेतली. पुढे ती २०१० मध्ये निवृत्त झाली.

शोभाची काही स्वप्नं ही स्वप्नंच राहिली. उदा. वकिली करायची वा फोटो स्टुडिओ टाकायचा आदी काही. पण तिला भटकंती, पदभ्रणात नैसर्गिक वातावरणातील पक्षी निरीक्षणाचा छंद जडला. कॅनव्हासवरील मानव निर्मित रंगाच्या दुनियेतून विधात्याने निर्मिलेल्या रंगाच्या दुनियेची आवड लागली. मुक्त वातावरणातील हवेत विहार करण्याऱ्या विविध पक्षांना कॅमेरात कैद केले. ‘कोरोना’ काळ हा तिच्यासाठी वरदान ठरला असं म्हणायला हरकत नाही. त्याकाळात घरातील खिडकीतून तिने काढलेल्या पक्षांचे निरिक्षण व त्या़ंची छायाचित्रे हा खरोखर अनमोल खजिना आहे. यामागे तिचा उद्देश होता तो पर्यावरण जागृतीचा. साहजिकच ठाणे येथील ‘तलाव’ बचाव मोहिमेत तिला सक्रिय सहभाग घेता आला.

सध्या शोभा लोकविज्ञान संघटनाद्वारे समाजात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ रुजवावा यासाठी कार्यरत आहे. या बरोबरच ती “सुशिक्षितांना सुसंस्कृत” कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत.
शोभा जोपुळे ही चाकरमानी असून सुद्धा आपण समाजाचे काही देणे लागतो या कृतज्ञतेने आजही वयाच्या ७४ व्या वर्षी सुध्दा तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत आहे.
ही यश कथा लिहिण्यासाठी शोभा ने मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, याचा मला आनंद झालाय. तिला मनःपूर्वक धन्यवाद.
शोभाला निरोगी, निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना.

— लेखन : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
