“देवेंद्र भुजबळ”
सर्वच क्षेत्रात काळानुसार बदल होत असतात. त्याचा परिणाम म्हणून हुषार, करियर माईंडेड अन् ओरिएंटेड तरूणवर्ग हा कॉर्पोरेट क्षेत्राकडे बॅंकिंग क्षेत्राकडे आणि काही तर चक्क परदेशांकडे वळू लागला. अशा परिस्थितीतही काही ध्येयवेडे तरूण शासकीय नोकरीकडे समाज सेवेची संधी म्हणुन पाहतात आणि त्याच भावनेने आपली सेवा बजावित असतात. याचं ‘जितं जागतं’ उदाहरण म्हणजे प्रस्तुत लेखाचे नायक माझे स्नेही श्री.देवेंद्र भुजबळ हे होत. शासकीय माध्यमांद्वारे जनसेवा करण्याची अधिक चांगली संधी मिळते अन् त्या निमित्ताने साहित्य शारदादेवीची सेवा घडते असा देवेंद्रजीचा सश्रद्ध, भाव व ठाम विश्वास आहे. अशा या ध्येय वेड्याच्या कष्टप्रद, धगधगत्या, संघर्षमय जीवनाचा यथार्थ असा मागोवा या लेखात घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे.
देवेंद्रजीनी प्रतिकूल परिस्थितीतही आपले ‘जीवनध्येय‘ निव्वळ जिद्द, महत्त्वाकांक्षा, अपार कष्ट करण्याची तयारी या भांडवलावर अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला सहनशीलतेची जोड असल्यावर ते त्यांनी कसे गाठले याचा हा आत्मकथनात्मक यथार्थ असा त्यांच्या समग्र जीवनावर टाकलेला हा प्रकाशझोत होय.
देवेंद्रजीचे वडील त्रिंबकराव दामोदर भुजबळ हे मूळ मलकापूर येथे राहणारे होते. त्यांच्या घरी खाजगी बस गाड्यांचा व्यवसाय होता. स्वतः च्या मालकीची मॉरिसन कार होती. पण दुर्दैवाने त्यांचे वडील आणि दोन्ही थोरले बंधू अल्पायुषी ठरल्याने घरातील व्यवसाय बंद पडला आणि त्यांना नोकरीकडे वळावे लागले. त्या काळात त्यांचे मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाले होते. इंग्रजीवर फार प्रभुत्व होते त्यामुळे ते बर्मा शेल कंपनी, नागपूर मग बिर्ला कंपनी, अकोला आणि शेवटी कर्नाटकातील दावणगिरी येथील रवि व्हेजिटेबल ऑईल या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते.फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना दोनदोन महिने दौऱ्यावर जावे लागायचे. त्यांची राहणी आकर्षक असायची. नेहमी सूट + बुट + नेक टाय हा त्यांचा नेहमीचा आकर्षक असा वेष असायचा. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे, महानुभाव पंथाचे कट्टर उपासक होते. त्यामुळे कामाव्यतिरिक्त इतर वेळी त्यांचा वेष नेहमी धोतर, फूल शर्ट , पांढरी टोपी असा असायचा. सामाजिक बांधिलकी मानून सोमवंशी क्षत्रिय कासार समाज मंडळाच्या कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असे.
या समाजाच्या शंभर वर्षांपूर्वी सुरू केलेल्या “समाजोन्नती” या मासिकाच्या तीन संस्थापकांपैकी ते एक होते. तसेच अमरावती येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले होते.
देवेंद्रजी यांच्या आजोळी; संगमनेर येथे भांडी विकण्याचा पिढीजात व्यवसाय होता. त्यांचे आजोबा गंगाधरपंत रासने आणि त्यांचे भाऊ यांच्या भांड्याचे दुकान त्यांचे मामा कै. सोमनाथ गंगाधरपंत रासने हे बघायचे. त्यांच्या पश्चात आता हे दुकान त्यांचे मामेभाऊ गोरख रासने हे चालवित आहेत.
अशा संपन्न घरात देवेंद्रजीचा त्यांच्या आजोळी; संगमनेर येथे दि.४ जूलै, १९६० रोजी जन्म झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण अकोला येथील अनुक्रमे नॉर्मन स्कूल, (१९६६- १९७०) व न्यू इरा हायस्कूल (१९७० ते १९७६) येथे झाले. पहिल्यापासूनच आपला कल ‘गणित‘ आणि ‘विज्ञान‘ या विषयांकडे नाहीये याची त्यांना जाणीव होती. पण तरीसुद्धा ते विषय त्यांना शिकावे लागले. दरम्यान ते शाळेत असताना वडिलांचे निधन झाले. सर्वच थोरले भाऊ शिकत होते. घरात दुसरी कमावती व्यक्ती कुणी नव्हती. ना उत्पन्नाचे दुसरे काही साधन होते. परिणामी आर्थिक, कौटुंबिक, भावनिक परिस्थिती खालावत जाऊन ते दहावीत नापास झाले. गावात तोंड दाखवायची लाज वाटू लागल्याने त्यांनी अकोला सोडून पुणे गाठले. पुण्याच्या मोठ्या भावाकडे राहून पडेल ते काम करीत ते १९७७ साली ऑक्टोबर महिन्याच्या पुरवणी परीक्षेत दहावी पास झाले. त्यावेळी गोळे सरांनी काहीही फी न घेता परीक्षेच्या आधी महिनाभर गणित आणि विज्ञान विषयांची तयारी करून घेतल्यानेच आपण दहावी पास होऊन पुढे जाऊ शकलो, अशी कृतज्ञता देवेंद्रजी आजही व्यक्त करतात.

देवेंद्रजीची आई, त्याकाळी व्हर्नाक्युलर फायनल पर्यंत शिकलेली होती. त्यांच्या वडिलांप्रमाणे ती देखील शिक्षणाचे महत्त्व जाणून होती. त्यामुळे तिचे देवेंद्रजीना सारखे सांगणे असायचे की, तू किमान पदवीधर तरी हो. म्हणुन त्यांनी पुणे येथील पौड रोड वर असलेल्या भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कॉलेज मध्ये १९७८-७९ या वर्षात ११ वी केले.नंतर हडपसर येथील कॉलेज मधून १२ वी व एफ. वाय. बी.कॉम, अहमदनगर कॉलेज मधून एस.वाय व टी वाय बी.कॉम. केले. त्यांची “परिस्थिती”च अशी होती की, कुठल्याही एका कॉलेज मध्ये ते पदवीचे शिक्षण घेऊ शकले नाहीत.
देवेंद्रजीनी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युट मधून १९८३-८४ या वर्षात बॅचलर ऑफ कम्युनिकेशन ॲन्ड जर्नालिझम ची पदवी घेतली. पुणे विद्यापीठाच्या प्रा. ल ना गोखले फेलोशिप चे ते सर्व प्रथम मानकरी ठरले. या विद्यापीठात मास्टर्स कोर्स सुरू होईल, म्हणुन त्यांनी तीन वर्षे वाट पाहिली. तरीही तो कोर्स सुरू न झाल्याने त्यांनी १९८८ ते १९८९ या वर्षात मराठवाडा विद्यापीठात मास्टर ऑफ कम्युनिकेशन ॲंड जर्नालिझम साठी प्रवेश घेतला.ही पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत, पहिल्या क्रमांकाने मिळविली. ते दोन पारितोषिकांचे मानकरी ठरले आणि महत्वाचे म्हणजे आयुष्यात एकदा तरी प्रथम श्रेणी मिळवायची, हे त्यांचे स्वप्न साकार झाले.
पुढे भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असताना देवेंद्रजीनी ‘फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’, पुणे ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॉस कम्युनिकेशन’, नवी दिल्ली, ‘महाराष्ट्र शासनाच्या, यशदा या संस्थांचे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले.
देवेंद्रजीनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी पडतील ती कामं केली. त्यांचे पहिले काम होते, अकोला येथील केळकर गॅरेज मध्ये. तिथे त्यांना आठवड्याला ₹ २/- मिळायचे. त्यांना मेकॅनिक व्हायचे होते. पण ते काम शिकण्यासाठी आधी सहा महिने गाड्या पुसण्याचे काम करावे लागेल असे सांगितले गेल्याने त्यांनी ते काम सोडून बिर्ला कंपनीत मजुरीचे काम पकडले. तिथे रोजचे ८ तासांसाठी 3 रु ४० पैसे आणि त्याच्यासाठी पुढील ८ तासांसाठी ₹ ४/- मिळायचे म्हणुन ते सलग सोळा तास काम करायचे.
अकोला सोडून पुण्यात आल्यावर देवेंद्रजीनी दर्शन फ्रूट ज्युस बार मध्ये वेटर म्हणून, कूपर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत एप्रिल १९७७ ते ऑगस्ट १९७७ पर्यंत फाईलिंग क्लार्क म्हणुन, रिचर्डसन हिंदुस्थान लिमिटेड (विक्स कंपनी) फिल्ड प्रमोशन डेमोनस्ट्रेटर म्हणुन काम केले. या कामाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला.
देवेंद्रजीनी नगर कॉलेज मध्ये शिकत असताना, स्वीट होम आईस्क्रीम पार्लरचे मालक तथा संगीत रसिक छगनशेठ बोगावत यांचे पी ए म्हणुन काम करता करता दै.‘समाचार’ मध्ये विनावेतन उपसंपादक कम वार्ताहर म्हणुन काम केले.
पुढे पुणे विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रम करीत असताना, कमवा आणि शिका योजनेअंतर्गत रोज दोन तास काम करायचे. जोडीला एका शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी केले.
पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळाल्यानंतर देवेंद्रजीच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली. ते पुणे ‘केसरी‘ मध्ये उपसंपादक म्हणुन रुजू झाले. त्यानंतर ते फेब्रुवारी १९८५ – फेब्रुवारी १९८६ साप्ताहिक सह्याद्रीचे विशेष प्रतिनिधी राहीले. १ मार्च,१९८६ रोजी ते मुंबई दूरदर्शन केंद्रात सहायक निर्माता म्हणून रूजू झाले. ती नोकरी करीत असतानाच ते विविध स्पर्धा परीक्षा देत होते.
याची फळे म्हणुन त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आकाशवाणी / दूरदर्शन मधील निर्मात्यांच्या तीन पदांसाठी, भारतीय माहिती सेवेसाठी, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात अधिव्याख्याता म्हणुन आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग 1 यांना म्हणुन निवड झाली. म्हणजेच एक नोकरी करीत असताना, त्यांच्या हातात अन्य सहा राजपत्रित पदांच्या ऑर्डर होत्या ! सर्व साधकबाधक विचार करून त्यांनी महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि ते जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग 1 म्हणुन अलिबाग येथे रुजू झाले. पुढे मंत्रालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक, पदोन्नती झाल्यावर उप संचालक, कोकण विभाग, वृत्त विभाग (मंत्रालय) नाशिक आणि नंतर संचालक अशा विविध पदांवर काम करीत असताना, नियमित कर्तव्ये आणि जबाबदार्या पार पाडत असताना काही तरी नावीन्यपूर्ण, लोकोपयोगी, वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याचा ते सतत प्रयत्न करीत असत. मोठ्या सन्मानाने ते सात वर्षांपूर्वी नोकरीतून निवृत्त झाले .
देवेंद्रजीनी त्यांच्या सहा वर्षाच्या दूरदर्शन च्या कालावधीत विविध माहितीपट, दूरदर्शन वृत्तांत, कार्यक्रमांची निर्मिती केली. दूरदर्शनची नोकरी सोडली तरी त्यांनी हे माध्यम सोडले नाही. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असताना त्यांनी दूरदर्शन वर प्रसारीत झालेल्या ‘शिवशाही आपल्या दारी’ (२४ भागांची मालिका) माय मराठी (आठवड्यातून पाच दिवस प्रसारण) मराठवाडा विद्यापीठ नामांतर मोहीम, महाचर्चा कार्यक्रमासाठी चार वर्षे रिसर्च आणि रिसोर्स पर्सन, काही कार्यक्रमात सहभाग, काही कार्यक्रमांसाठी संहिता लेखन अशा पद्धतीने ते योगदान देत राहिले. तर महाराष्ट्र शासनाच्या आकाशवाणी वर प्रसारीत होणार्या दिलखुलास कार्यक्रमाच्या पहिल्या पाचशे भागांचे ते टीम लीडर होते.

देवेंद्रजीनी आतापर्यंत दहा प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. देशविदेशात भाषणे दिली आहेत. विविध विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. आतापर्यंत त्यांना शंभरहून अधिक पुरस्कार, मान सन्मान मिळाले आहेत.

देवेंद्रजी मुळातच कामसू, धडाडीचे, नाविण्याचा ध्यास घेणारे असे प्रसन्न व्यक्तिमत्व असल्याने ते निवृत्ती नंतरही स्वस्थ बसले नाहीत. कोरोनाच्या भयंकर काळात पाच वर्षांपूर्वी पत्रकार कन्या देवश्रीने सुरू केलेल्या न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलचे ते संपादक म्हणुन कार्यरत आहेत. या पोर्टलच्या निर्मितीचे काम, त्यांच्या पत्नी; सौ अलका भुजबळ या बघतात. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखमाला पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याची गळ त्यांना एकेक करून लेखिका सौ वर्षा भाबळ, निवृत्त पोलीस उपअधीक्षक सौ सुनीता नाशिककर, सौ रश्मी हेडे यांनी घातली आणि बघताबघता त्यांच्या पुस्तकांबरोबरच निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांची चार पुस्तके, खुद्द देवेंद्र भुजबळ यांची चार पुस्तके, शिल्पा तगलपल्लेवार आणि नीला बर्वे या दोन परदेशस्थ लेखिकांची पुस्तके आणि अन्य पाच अशी सोळा पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.


याशिवाय ऑगस्ट 2025 ला सौ अलका भुजबळ यांनी यू ट्यूब चॅनल वर @newsstorytoday1 या नावाचे पॉडकास्ट सुरू करून, वेगवेगळे विषय घेऊन 13 एपिसोड प्रसारित केले आहेत आणि 4 एपिसोड काही दिवसात प्रसारित होतील. गेली चारेएक दशकं सौ. अलकाजी यांची देवेंद्रजीना जी साथ आहे त्याला तोड अन् जवाब नाही. दोघेही एकमेकांना शोभून दिसणारा असा लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. त्यांची लेक देवश्री भुजबळ ही द्विपदवीधर असून तिने अमेरिकेच्या प्रख्यात कोलंबिया विद्यापीठातून जर्नालिझमचा मास्टर्स कोर्स केला आहे. सध्या ती एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रिन्सिपल कॉरस्पॉडंट म्हणुन काम करीत आहे.
देवेंद्रजी यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते पोर्टल द्वारा नवोदित लेखक, कवी- कवयित्रीना नेहमी प्रोत्साहन देतात आणि मार्गदर्शनही करतात. त्यांचे साहित्य ते आवर्जून प्रसिद्ध करीत असतात.
हा लेख लिहिण्यासाठी देवेंद्रजीनी मला जे सहकार्य केले याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

— लेखन : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

सुंदर……
योग्य आणि सुंदर माहिती एका हुशार व्यक्तिमत्त्वाची👌👌🙏