अष्टपैलू सौ मेघना साने यांच्या “तिला काय हवय” या कथा संग्रहाचे, त्यांच्या कन्या, समुपदेशक सायली केळकर यांच्या “The Echos of Awakening” या इंग्रजी कविता संग्रहाचे प्रकाशन काल ठाण्यात एका शानदार कार्यक्रमात झाले. यावेळी श्री हेमंत साने यांनी त्यांच्या “मुल द्रव्यांच्या जादुई” या आगामी पुस्तकाची आकर्षक व्हिडिओच्या सहाय्याने माहिती दिली. हा दिवस साने दाम्पत्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचा असल्याने, त्यात पुन्हा पुस्तकांचे प्रकाशन, कवितांचे सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम म्हणजे जणू “कुटुंब रंगलय काव्यात” अशा स्वरूपाचा झाला. त्यात पुन्हा रसिकांची भरगच्च उपस्थिती आणि त्यांची मिळणारी दाद यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
कवयित्री सायली केळकर यांनी त्यांच्या कविता संग्रहाची निर्मिती कशी झाली, हे सांगताना त्यांना इंग्लंड मधील वास्तव्यात आलेले अनुभव छान उलगडून सांगितले. तसेच या कविता संग्रहातील त्यांची आवडती कविता प्रभावीपणे सादर केली.
मेघना साने यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करून हे पुस्तक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना भेट देतानाचा व्हिडिओ दाखवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, प्रमुख पाहुण्या अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी, लेखिका प्रतिभा सराफ यांनी “तिला काय हवय” या पुस्तकाविषयी आपापली मते मांडली. या पुस्तकात आजची स्त्री, पत्नी,आई, मुलगी, सासू यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा कथा असल्याबद्दल त्यांनी लेखिकेचे कौतुक केले. या पुस्तकाला अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाढ यांची प्रस्तावना लाभली असून मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी चितारले आहे.

यावेळी बोलताना न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी कोरोना काळात साने दाम्पत्याने निस्वार्थपणे लोकांचे मनोरंजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या, एका तुफानाला कुणी घर देता का घर… या काव्याचे; “कुणी तिकीट देता का तिकीट” हे आजच्या राजकारणाचे विदारक वास्तव मांडणारे विडंबन सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.

“गप्पागोष्टी” फेम आणि बरीच वर्षे मेघना साने यांच्या साथीने कार्यक्रम सादर करणारे जयंत ओक यांनी यावेळी काही अनुभव सांगून शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी बाल कलाकारांनी सुरेल आवाजात ओव्या गाऊन कार्यक्रमाची छान सुरुवात केली.
तपस्या नेवे यांनी सर्व कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन केले. प्रकाशक अशोक मुळे यांनी प्रास्ताविक केले. तर श्री हेमंत साने यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात साने परिवाराला सातत्याने सहकार्य करणार्या विविध व्यक्तींना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मेघना साने यांनी लिहिलेली सर्वच्या सर्व सतरा पुस्तके आकर्षकरित्या मांडून ठेवल्याने ती सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती.

एका रविवारची संध्याकाळ छान गेली, हे समाधान घेऊन रसिक परतले.

— लेखन : जगन्नाथ पाटील.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

धन्यवाद माननीय देवेंद्र भुजबळ सर आणि जगन्नाथ पाटील सर आपण माझ्या कार्यक्रमाला प्रेमाने उपस्थित राहिलात आणि त्याचे सुंदर वर्णन या लेखाद्वारे प्रकाशित केलेत.
न्यू द स्टोरी टुडेचे कुटुंब असेच बहरत राहो!
मेघना हेमंत साने