मुठीतून लाटा निघाल्या दुधाच्या
मधुर लाळ झाल्या भुक्या बालकाच्या
विदूषक खरा वाटतो रंगकर्मी
खुणा झाकतो कोंडलेल्या जिवाच्या
जवळचा मला वाटला तोच कायम
अहंकार शिवला मनाला न ज्याच्या
मला शांततेचा जिथे स्त्रोत दिसतो
तिथे खोल लहरीत रुळते मनाच्या
जरी उंच डोंगर दिमाखात दिसतो
न जागा कधी सोडतो पायथ्याच्या
जिने संस्कृतीची खरी जाण जपली
गुणी सून ती आवडीची घराच्या
मुठीतील वाळू निसटणार असते
मनालाच स्वाधीन करते यमाच्या
— रचना : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800