इ. स.पूर्व ५०९ च्या सुमारास एक महामानव आपल्या भारत वर्षात जन्माला आला आणि त्याने वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. त्यासाठी अपरिमित श्रम घेतले. विषम परिस्थितीत कणखरपणे तो कार्यरत राहिला. व आपल्या अल्प आयुष्यात तो यशोमंदिराच्या शिखरावर आरूढ झाला. हेच ते आदिशंकराचार्य. श्री शंकराचार्यांचे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे नानात-हांच्या पूजापद्धती आणि विविध देवदेवता यांच्यामध्ये विखुरलेल्या गेलेल्या हिंदूधर्मियांना त्यांनी एका सूत्रात गुंफले. मुख्य देवतांचे पंचायतन रूढ केले. हिंदू धर्म सुटसुटीत बनवला.
दुसरे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे जैन, बौद्ध मतांचे खंडन करून सनातन वैदिक हिंदू धर्माची प्रतिष्ठा परत प्रचंड प्रमाणात वाढवली.
हा पुरुषोत्तम भारताच्या दक्षिणेस, केरळमध्ये कालडी येथे जन्मला. आणि वैदिक धर्मप्रसारासाठी शृंगेरी, काश्मीर, पूर्व सागरावरील जगन्नाथपुरी आणि द्वारका येथे (हिंदुस्थानच्या चार दिशांना) शंकराचार्यांची चार पीठे त्यांनी स्थापन केली. आठव्या वर्षी संन्यास घेऊन, ३६ व्या वर्षी समाधी घेऊन इतक्या मोजक्या आयुष्यात हिंदू धर्मासाठी प्रचंड कार्य हा महापुरुष करून गेला.
बालक शंकराचे पिता शिवगुरु विद्याधिराज नंबुद्री सायंकाळी शिवोपासनेला बसले की हा दीड वर्षांचा सोनुला पित्याच्या बरोबरीने पुरुषसूक्त म्हणत असे. या बालकाचे लवकरच अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, शिवमहिम्नस्तोत्र, पवमानसूत्र मुखोद्गत झाले. सोमवती अमावस्येला संपूर्ण रुद्राभिषेक या बालमुखातून झाला. हे बालक पूर्वजन्मीचे ज्ञान घेऊनच जन्माला आले आहे, असे सगळ्यांच्या लक्षात आले.
स्वतःच्या पित्याच्या निधनानंतर आपल्या मातेला “आत्मा अविनाशी आहे, (नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः …श्री गीता २-२३) आपण वस्त्र बदलतो तसा हा आत्मा देह बदलतो. हे फक्त परिवर्तन आहे.” असा हा लहान बाळ उपदेश करतो, हे जाणून खरोखरीच आश्चर्यच वाटते.
या अभूतपूर्व बालकास गुरुकुलात पुढील उच्च शिक्षणाकरता पाठवावे, असे बालक शंकरच्या आईला पद्मनाभ गुरुजी, जगन्नाथ अय्यर, मार्तंड स्वामी यांनी समजावून सांगितले. गुरुकुलात छोटा शंकर सगळ्यांना त्याच्या सर्वगुणसंपन्नतेमुळे अतिप्रिय होतो . गुरुकुलाच्या नियमाप्रमाणे शंकर एके ठिकाणी भिक्षा घेण्याकरता गेला असताना एक स्त्री या बालकाला अतिकष्टाने फक्त आवळेच देऊ शकते. शंकरने श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न करण्याकरता कनकधारा स्तोत्र म्हटले आणि शेजारच्या धनिकाकडून भिक्षा घेण्यास नकार दिला. त्यांना स्पष्ट सांगितले, की “तुम्हांला शेजारच्या घरातले दारिद्र्य दिसत नाही तर तुम्ही वाढलेले अन्न स्वीकारणे मला बरोबर वाटत नाही.” या धनिकास त्याची चूक उमगली. त्याने या शेजारच्या बाईचे आवळे सोन्याचे केले आणि या बाईची गरीबी दूर केली. गुरुकुलात साधारण बारा वर्षांचा काळ व्यतीत करावा लागतो, पण तीन वर्षातच या बालकाचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यास घरी घेऊन जावे असा त्याच्या गुरुजींचा निरोप आला. सर्वात लहान असलेला शिष्य सर्वांच्या आधी विद्याभ्यास संपवून निघाला होता. हा वियोग तपस्वी गुरुदेव व इतरांना हृदयद्रावकच झाला होता. तपस्वी गुरुजींकडून शंकरला आचार्य ही पदवी प्राप्त झाली. गुरुजींनी म्हटले, “जो सर्व शास्त्रांचा अर्थ स्वतः जाणतो; व दुसऱ्याकडून असा आचार स्थापला जावा म्हणून अहर्निश प्रयत्न करतो, अर्थात असा आचार स्वतः आचरणात आणतो त्याला आचार्य म्हणतात.
कालडी गावात शंकराचे स्वागत अत्यंत उत्साहवर्धक परमानंदाने झाले. वेदमंत्रांच्या घोषात शंकरने देवदर्शन घेतले.
आता या बाल आचार्यांनी मात्यापित्याप्रमाणे घरातच गुरुकुल सुरू केले (गुरु अल्पवयीन व शिष्य प्रौढ). केरळाधिपती चंद्रशेखर यांनी आचार्यांना द्रव्य पाठविले. तर आचार्यांनी या द्रव्याचा विनियोग एखादे सुंदर देवालय बांधण्याकरता करावा, असे सुचवले.
पूर्णा नदीत श्रीकृष्णाची मूर्ती स्थानभ्रष्ट होऊन पडली होती . आचार्यांनी ती नदीतून काढून घराजवळ श्रीकृष्ण मंदिराची स्थापना केली. आणि पूर्णा नदीचे पात्र मातेच्या सोयीकरता बदलले.
त्याचप्रमाणे आचार्यांना जाणवत होते की त्यांची पारमार्थिक उंची वाढण्याकरता सद्गुरुला शरण जायला पाहिजे. त्यांचे मार्गदर्शन इहलोकी, परलोकी मुक्ती मिळवून देईल.
आचार्यांच्या मनात राहून राहून “नास्तिकवादी बौद्ध प्रतिष्ठा मिळवत आहेत. अनाचार, अनागोंदी कारभार चालू आहे हे सर्व सुधारण्याकरिता स्वतःच्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. वैदिक धर्माचे रक्षण करणे, म्हणजेच पिताजींच्या आत्म्याला शांती देणे आहे .” म्हणून आचार्यांनी मातेकडून संन्यासाश्रम स्वीकारण्यासाठी परवानगी घेतली. आणि संन्यासग्रहणापूर्वी या बाल आचार्यांनी स्वतःचा श्राद्धविधी स्वतःच उरकला. श्राद्धविधीमुळे स्वतःच्या जीवनमरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला. हा आश्रम स्वीकारल्यानंतर अखंड कार्यरत राहणे, कारण कार्याची व्याप्ती विशाल असते ; याचे या कुमार संन्याशाला भान होतेच.
एके रात्री आचार्यांना स्वप्नदृष्टांत झाला की त्यांचे गुरु परात्पर भगवन् गोविंद पूज्यपाद आहेत.
श्री गोविंद पूज्यपाद गुरुजींकडे जाताना वाटेत गुरुकुलातील विष्णूशर्मा या छात्राची प्रत्यक्ष भेट होते. आचार्य त्यांना म्हणतात, ” वैदिक धर्मात संन्यास दीक्षा आहे व ती बौद्ध धर्मापेक्षाही उच्च आहे. बौद्धांनी संन्यासाचे स्वरूप विकृत केलेले आहे, ते मला सुधारायचे आहे.” तसेच “नर्मदातीरावर एका अनुपम अरण्यात ब्रम्हवेत्ता गोविंदयतीचे वास्तव्य आहे. ते परमगुरु आहेत.”
श्रीरंगपट्टणमला आचार्यांना व गोविंदयतींना त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा दृष्टांत होतो. गोविंदयती विष्णूशर्मा यांस विधिपूर्वक संन्यासदीक्षा नर्मदामैयाच्या साक्षीने देतात. आचार्य मांडुक्यकारिका शिकवतात.
एकदा नर्मदा नदीस प्रचंड पूर येतो. आचार्य नर्मदाष्टक म्हणतात व जलाकर्षण यंत्राने त्यांच्या कमंडलूत नर्मदा मैयाचे पाणी घेतात. पूर ओसरतो.
आचार्यांना महर्षी व्यास आणि श्री शंकराचे दर्शन घडते. आचार्य अलकनंदेच्या वेगवान पाण्यातून श्रीकृष्णाची मूर्ती ईशकृपेने बाहेर काढतात.
अग्नीशर्मा आचार्यांकडे येतात. हिमालयातच आचार्यांच्या आईचा निरोप मागतात. तिने सगळी निरवानिरव केलेली असते. आचार्य मातेचे दर्शन घेतात. आचार्यांच्या मुखातून श्रीकृष्णअष्टक ऐकतानाच आर्यम्बा श्रीकृष्णदर्शन घेऊन ध्यानमग्न अवस्थेत अनंतात विलीन होते. संन्याशाने अस्थिस्पर्श करायचा नसतो आणि तेथले धर्ममार्तंड आचार्यांना दहनविधीकरता स्मशानभूमी देत नव्हते. तर आचार्यांनी परशु घेऊन मातेच्या देहाचे तीन तुकडे केले. योगसामर्थ्याने अग्नी निर्माण केला व वेदमंत्रांच्या उच्चाराने मातेस अग्नी दिला…!
आचार्यांच्या जीवनात गौरम्मा या स्त्रीचे स्थान वेगळेच आहे. बालपणी तिला आचार्यांसारखाच नवरा पाहिजे होता. मग तिचे लग्न. पतीची ओळख होण्यापूर्वीच तिला वैधव्य प्राप्त होते. आनंद, दुःख या भावनांविषयी गौरम्मा पूर्णपणे अलिप्त असते . आता गोरस व फलाहारावरच तिचे जगणे असते. गौरम्मास आचार्यांविषयी अत्यंत आदर, प्रेम असून तिला वाटत असे, की हा तरुण लोककल्याणाकरिता किती बरे नि:स्वार्थपणे कार्यरत आहे..? मला देवाने सर्वसंगपरित्याग करून जगण्याची संधी दिली आहे. तेव्हा या संन्याशाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याच्या पदकमलांचे स्मरण करीत लोकोपयोगी कार्याला वाहून घ्यायला हवे. हीच त्या संन्याशाची सेवा झाली म्हणायची.
शंकराचार्य म्हणत, प्रार्थना म्हणजे सर्वशक्तिमान भगवंतापुढे स्वीकारलेली नम्रता आहे. चित्सुखाचार्य (पूर्वीचे विष्णूशर्मा) यांबरोबर आचार्यांनी धर्मयात्रा सुरू केली. आपल्या पिता वैदिक धर्म- आपण एकमेकांशी सलोख्याने वागायला हवे हे आचार्यांचे तत्त्व होते.
हिमालयात गौडपादाचार्य यांच्या आज्ञेने आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले होते. तरी उपनिषदे, गीता, वेदांतसूत्रे या लेखनाचा व्याप मोठा होता. तो काशीक्षेत्री आचार्यांनी सांभाळला होता. त्यांचे स्तोत्रलेखन अखंडपणे चालू होते व आचार्यांची सोपी, अर्थगर्भ भाषा काव्यातील गेयता, यामुळे ही स्तोत्रे लोकांनी मुखोद्गत केली.
एका वयोवृद्धांस ‘डुकृञ करणे’ हा धातू पाठ करताना पाहून आचार्यांना त्यांचा उगीचच शक्तीक्षय होत आहे, असे वाटून आचार्य म्हणाले,
“भज गोविन्दं भज गोविन्दं,
गोविन्दं भज मूढ़मते।
संप्राप्ते सन्निहिते काले,
न हि न हि रक्षति डुकृञ् करणे ॥१॥”
अर्थात् गोविंदाचे स्मरण करा.. मृत्यूकाळ जवळ आल्यानंतर व्याकरण मदतीला येणार नाही.
हे वृद्ध गृहस्थ म्हणजे साक्षात वेदव्यास ऋषीच होते.
“पुनरपि जननं, पुनरपि मरणं,
पुनरपि जननीजठरे शयनं”
या जन्ममरणाच्या फे-यांतून माणसाने मुक्त व्हावे, यासाठी आचार्य काव्यात्म भाषेतून उपदेश करत होते.
एका चांडाळाच्या अंगी असलेल्या नम्रतेमुळे आचार्य आणखीच विनम्र होतात. तर चांडाळाच्या रूपाने आचार्यांना साक्षात शिवशंकराचेच दर्शन झालेले असते.
शंकराचार्यांनी कोणावरही गुरुत्वाचा दबाव आणलेला नाही. आचार्यांच्या फक्त हस्तस्पर्शाने एकजणाचा कुष्ठरोग नाहीसा झाला.
आचार्यांनी श्रुती, स्मृती यातील ज्ञानमार्गास पोषक अशा वाक्यांचा अर्थ सांगून कर्मकांडापेक्षा ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे हे पटवून दिले. आचार्य वैचारिक, मानसिक परिवर्तन घडवून आणणारे धन्वंतरीच होते. कुमारील भट्टाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या अखेरच्या क्षणी आचार्य व त्याची भेट झाली. त्याने चितेवरूनच स्वतःची भगिनी सरस्वती व तिचे पती मंडनमिश्र राजा यांच्यासंबंधी आचार्यांना सांगितले. यामुळे धर्मयात्रेला पुढील दिशा मिळाली.
मंडनमिश्र व शंकराचार्य यांचा वाद सुरू होतो. आचार्यांचा राजा अपरुकाच्या देहात प्रवेश हा भाग तर अतिअद्भुत आहे. राजदरबारातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना मात्र राजा अपरूक एवढा बदलला कसा याबद्दल आश्चर्यच वाटत होते.
आचार्य विजयी होतात. ते मंडनमिश्रांना विधीपूर्वक संन्यासदीक्षा देतात. आता मंडनमिश्रांचे नाव ‘सुरेश्वराचार्य’ होते.
आचार्य कोणत्याच देव-देवतांचे खंडन करत नव्हते. लोकांच्या श्रद्धांची जपणूक करत होते. इतरांच्यातही चांगले बघण्याचा प्रयत्न करा असा त्यांचा उपदेश असे.
आचार्य सपरिवार श्री पांडुरंगाच्या देवळात आले. त्यांना पांडुरंगाष्टक स्फुरले. (परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम्)
“वेद खोटे” असा प्रचार जैन, बुद्ध करत. त्यास आचार्यांचा विरोध होता. “दुर्गुणांचा बळी द्या. तुमचे स्वकर्म निष्ठेने करा. स्वकर्म हे सत्य आहे. यशापयश हे मिथ्या आहे. निष्क्रिय राहणे हे महापाप आहे. कर्ताकरविता परमेश्वर आहे. आपण सारे निमित्त मात्र आहोत.” असे आचार्य म्हणत असत.

शंकराचार्यांना जगद्गुरु पदवी प्राप्त होते. त्यांचे शरीर कर्मयोगात पण मन भक्तीयोगात रमत असते.
आचार्यांनी कामाक्षीदेवीला नरमांसभक्षणापासून परावृत्त केले. तिच्या सख्यांचेही उग्ररूप शांत केले.
आत्मज्ञानी असले तरी आचार्य मानवी मनानुरूप कधीकधी भावनिक होत असत. मग त्यांना आपल्या शिष्यांची, त्यांनी केलेल्या स्वार्थत्यागाची, त्यांच्या झोकून दिलेल्या जीवनसमर्पणाची तीव्रतेने आठवण यायची. त्यांची माझ्यावर केवढी श्रद्धा आहे..! पद्मपादाचार्य, एवढे अध्ययन केलेला, ईश्वरकृपेस प्राप्त झालेला, पण माझ्या आज्ञेत असण्यात त्याला समाधान वाटते. जन्मास आल्यानंतर भोवतालच्या माणसांचे प्रेम संपादन करणे, यापेक्षा दुसरं सुख ते काय ?
आचार्यांचे विवेकचूडामणी लेखनाचे कार्य चालूच असायचे.
सुरेश्वराचार्य म्हणालेच की, “माझी फजिती झाली. ज्ञान हे वयावर अवलंबून नसते. आचार्यांमुळे मला ज्ञान मार्ग दिसू लागला. ईश्वरी अनुग्रहाचे तेजोवलयच आचार्यांभोवती फिरत आहे.”
सर्वत्र आचार्यांचा दिग्विजय होता. पण आचार्य मात्र स्थितप्रज्ञ होते. लेखन-प्रवचनाद्वारे ते सतत प्रबोधन करून लोकसंपर्क साधत होते. नंतर नंतर शंकराचार्य स्वतःचे ईहलोकीचे कार्य संपल्याची त्यांच्या शिष्यगणांना जाणीव देत असत. श्री शंकराचार्यांना श्री केदारेश्वराच्या दत्तात्रय गुहेची ओढ लागली होती. त्यांची प्रकृती बरी नसूनही ते देह प्रारब्धाच्या स्वाधीन करून अलिप्त परंतु सुप्रसन्न राहत असत.
आचार्यांनी धर्म संमेलन आयोजित केले. कारण वैदिक धर्माबद्दल लोकांच्या मनात जागृती व्हावी, कार्य कळावे, ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचा परिचय व्हावा व वैदिक धर्माचा अभ्युदय व्हावा. कारण आपला सनातन वैदिक धर्म सर्व जगाला सुख , समृद्धी, शांती देणारा धर्म आहे.
जगद्गुरु शंकराचार्य सिंहासनावर बसले होते. त्यांनी ज्ञानमुद्रा करून, कुंभक करून, आपला प्राण शक्तीदेवीशी संलग्न केला. एका देहात वावरणारा आता सर्वव्यापी झाला. तेज:पुंज चैतन्याचा तेजोगोल मातृदर्शनाकरिता कालडीच्या दिशेने निघाला. गौरम्माने हे दृश्य पाहिले. दूर जाणाऱ्या तेजोगोलामागे गौरम्मा रिकाम्या कलशासहित धावत सुटली. तिचा देहकलशपण विकाररहित झाला होता. पूर्णा नदीने मोठ्या प्रेमाने तिला चटकन आपल्यात सामावून घेतले.
तो तेजोगोल वेगाने श्री केदारनाथाच्या जवळ असलेल्या गुहेकडे निघाला. शंकराचार्य हिमागिरीला सत्यतत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक मानत होते. आपले जीवित कार्य संपताच अवतारसमाप्तीची जाणीव ठेवून ही आत्मज्योत धर्माला ग्लानी येईल तेव्हा उदयाच्या निश्चयाने गुहेत शिरली ; व ही महाविभूती आनंद साम्राज्याची धनी झाली…
कैवल्याचे लेणे कैवल्याशी एकरूप झाले ..!!
संदर्भ : कैवल्य लेणे(लेखिका कै. लीला गोळे )
मार्गदर्शन : श्री. भास्कर हरी जोशी

— लेखन : जयश्री शंकरन्. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आदिशंकराचार्यांविषयी अत्यंत उद्बोधक, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती देणारा लेख..! मनापासून धन्यवाद…!!