“महागौरी माता”
आज २९ सप्टेंबर ! नवरात्रीतील सर्वांत महत्वाचा दिवस म्हणून अष्टमीचे विशेष महत्व आहे. दुर्गा मातेचे आठवे रूप ‘महागौरी’ नावाने ओळखले जाते. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीने आपल्या पार्वती रूपात भगवान शंकरच पती मिळावेत म्हणून खूपच कठोर तपश्चर्या केली होती. तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
जोपर्यंत शंकर शंभु पती होण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याच नावाने कुमारी राहून तपश्चर्या, व्रत करेन असा तिने निश्चयच केला होता आणि त्याप्रमाणे तिने कुमारी राहुन अत्यंत घोर तपश्चर्या केली.या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ, स्नान घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते.
महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.
महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलाप्रमाणेच तिचे रंग रूप शुभ्र आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षा भवेद् गौरी।’ तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.
देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे. नवरात्रीमध्ये अष्टमीला विशेष महत्व आहे. सगळीकडे वातावरण आनंदी असते. यामुळेच हळूवार प्रीतीचा रंग असलेल्या गुलाबी रंगाची वस्त्रे या दिवशी परिधान करतात. गुलाबी भावनांचा, प्रणयाचा, एकमेकांप्रती असलेल्या ओढीचा, काळजीचा आणि निरपेक्ष समर्पणाचा हा गुलाबी रंग. हा रंग स्त्रीच्या कोमलतेशी जोडला गेला आहे.
सकारात्मकतेचा, आशेचा, उबदार सेवा भावनेचा असा हा रंग आहे. जीवनात आश्वासन देणारा, आरोग्यदायी मानला जाणारा, सगळं काही ठिक होईल असा आशादायी असा गुलाबी, स्त्री चा प्रेमातल्या निरपेक्ष समर्पणाचा रंग. मग, तिचं ते प्रेम प्रिया प्रती असेल नाही तर आपल्या समाजसेवी कार्याप्रती. चराचराप्रती, मानवतेप्रती असलेल्या या सर्वांच्या निखळ प्रेम भावनेचा हा गुलाबी रंग. म्हणुनच सर्व स्त्रिया अष्टमीदिवशी गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करतात.
नवरात्रातील अष्टमीला घरोघरी मानाने कुमारीकांचे पूजन केले जाते. त्याना सन्मानाने आमंत्रण देऊन, पाट, चौरंगावर बसवून कोमट पाण्याने त्यांचे कोमल पाय धुवून, पुसून त्यावर हळद, कुंकू, गंध, फुले अक्षता, वाहून त्यांचे पूजन केले जाते. त्यांना दूध, फळे देऊन, भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरली जाते. यामुळे खूप पुण्य मिळते असे मानले जाते.
या महागौरीला प्रसन्न करण्यासाठी पुढील मंत्र म्हणावा .
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:। महागौरी शुभं दान्महादेवप्रमोददा ।।
महागौरी नक्कीच आपल्यावर कृपा करेल.
आजचा शुभ रंग मोरपंखी हिरवा आहे. त्यामुळे हा सर्वांसाठी लाभदायक आहे.
महागौरीला दूध, नारळ, पांढरे पेढे किंवा पांढऱ्या शुद्ध, सात्विक पदार्थांचा नैवेद्य आवडतो. म्हणून यांचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे महागौरी नक्कीच कृपा करेल. शुभंभवतु !
क्रमशः

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800