Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्यनव्या कवयित्रीच्या काही कविता

नव्या कवयित्रीच्या काही कविता

नमस्कार मंडळी.
आज आपल्या पोर्टल वर  कोल्हापूर येथील कवयित्री – लेखिका सेवानिवृत्त प्राचार्या रेखा दीक्षित यांच्या काही कविता प्रसिद्ध करीत आहे. आशारेखा या टोपण नावाने त्या कविता लिहितात. त्यांची दीपज्योती, मनांतली देवळी, मौनातील चाफा, स्मरणगंध ही पुस्तके प्रकाशित झाली असून सैलानी हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात  प्राचार्या रेखा दीक्षित यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक               

१. आठवणींचा ताज

दृष्टी आड होता तू राज
आठवणींचा उभा हा ताज
पहाते वेडी मागे वळून
कोणाचं अस्तित्व नाही म्हणून
निराश होवून बसते मनी
हळूच तुझी आठवण येई ॥१॥

आठवतो नदीचा काठ
झाडांची जेथे गर्दी दाट
गावाकडे थेट पाऊल वाट
पहात रहाते आपुली  वाट
सुगंध सुमंद वारा वाहे
मूर्ती तुझी उभी राहे ॥२॥

हसत  खेळत संदेश देई
त्यागातच आहे जीवन बाई
आयुष्यात सुखाच्या क्षणी 
आठवण झाली एखादे वेळी
फुलेल माझा पारिजात
आठवणींचा उभा हा ताज ॥३॥

२. अतर्क्य

प्रसन्न पहाट, गंधित वारा
सुस्नात ओलेती हसरी धरा
मन वसंती फुले मोगरा
मम हृदयी फुलला फुलोरा ॥१॥

अचानक अशी किमया झाली
गाली माझ्या आली लाली
अबोली पण बोलू लागली
रातराणी ही दिनी दरवळली ॥२॥

मधुमालती कशी  लाज लाजली
कोरांटी अशी मस्त सुगंधली
सदाफुली प्रभूपदी विराजली
जास्वंदीही गंधित  झाली ॥३॥

सृष्टीत अद्भूत न्यारी  किमया 
मिळाली मला माझी दुनिया 
सखा माझा भेटला अवचित
अद्वैताचा आनंद अकल्पित ॥४॥

३. कट्टी-बट्टी

काही नाती असतात खूप  प्रेमळ
मन अन ह्रदय नेहमीच निर्मळ॥१ll

खूप भारी क्षण असतात
जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जुळतात ॥२॥

हक्क, विश्र्वास नेहमीच भारदस्त
एकमेकांसाठी जीव टाकणे जबरदस्त ॥३॥

जेव्हा जेव्हा भेट होते
दिवाळीच असते
जळी स्थळी काष्ठी
पाषाणी मूर्ती तुझी दिसते ॥४॥

ह्रदयी उतरलास अलगद,
अलवार नकळत
ह्रदयच नवे जाहले
नव्याने धडकत ॥५॥

नाते गोड सुखद
निर्मळ मनाचे
खूप दूर असूनही
अगदी जवळचे ॥६॥

कट्टी कशी जीवा
हुरहूर लावते
बट्टीची मजा काही
औरच असते ॥७॥
                        
४. पाऊस आठवणींचा

तनमन फुलविणारा
पहिला पाऊस सुखावताना,
आनंदाची सुंदर आगळी पर्वणीच असतो
उरी जपलेल्या तुझ्याच हळव्या आठवणींना,
उगाच ओलेचिंब पुन्हा पुन्हा करतो ॥१॥

पहिल्या सरीने, मन रानोमाळ होते,
अनंत आठवणीत तुझ्या चिंबचिंब नहाते.
पावसाची संततधार अविरत बरसत रहाते,
तुझ्याच स्वप्नात मनपाखरू नभी भिरभिरते ॥२॥

बरसणारा रिमझिम पाऊस,
खोडकर अन् खट्याळ,  
ठेवा घेऊन येई आठवणींचा लडिवाळ
आठवांच्या झुल्यावर मन बेधुंद होई,
नीरस आयुष्य पुन्हा चैतन्यमय होई ॥३॥

असा पहिला पाऊस भावतो मनी,
साजनाचे हितगूज हळूच सांगे कानी
नकळतच मी लाज-लाजते क्षणोक्षणी,
दाटून येतात नयनी तुझ्या आठवणी ॥४॥

आशारेखा

— रचना : आशारेखा. कोल्हापूर

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम