Sunday, January 25, 2026
Homeपर्यटननिसर्गरम्य भूतान : अंतिम भाग

निसर्गरम्य भूतान : अंतिम भाग

डोचुला पास :
चौथ्या दिवशी आम्ही थंडीचा बचाव करण्यासाठी तयारीसह डोचुला पास कडे रवाना झालो. पण स्वच्छ वातावरण व हवीहवीशी सूर्यकिरणे अंगावर पडल्याने थंडी बिलकुल जाणवली नाही. तेथे छोट्याश्या टेकडीवर मधोमध एक मोठा व सभोवताली तीन वर्तुळात १०८ असे एकूण १०९ स्तूप आहेत. देश संरक्षणासाठी प्राण अर्पण केलेल्या सैनिकांना अभिवादन व मानवंदना करण्यासाठी हे स्तूप बांधलेले आहेत. या ठिकाणाहून वातावरण स्वच्छ असल्याने हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वत रांगेच्या पार्श्वभूमीवर आम्हीं मनसोक्त फोटो काढले.

पूनाखा :
डोचुला पास येथून घाटमाथा उतरून आम्ही पुनाखा किल्ला येथे पोहोचलो.येथेच सन १९६८ पर्यंत भूतानची राजधानी होती. पुना चांगछु नदी किनाऱ्यावर हा किल्ला आहे. अर्धवर्तुळाकार भक्कम लाकडीपूल पार करून या किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. भुतानचा तिसरा राजा झीमी डोजी वांगच्छू याने १६३७ मध्ये हा किल्ला बांधलेला आहे. त्याकाळी वाहतूक टाळण्यासाठी नदी पात्रातून जंगलातील अजस्त्र ओंडके वाहत सोडले होते. हे ओंडके या ठिकाणी अडवून याचाच वापर करुन हा भक्कम लाकडी किल्ला बनवला आहे. सद्या राजधानी थिंपू असली तरीही राजाचे सर्व6 धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात. किल्याच्या भिंतीवर बुद्धाचा सर्व जीवनपट चितारला आहे. किल्याच्या भिंतीत सर्व गुरु व अनुयायांचे विविध पुतळे कोरलेले आहेत. दुपारपर्यंत हा भव्य लाकडी किल्ला पाहून नदी किनाऱ्यावर असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही भोजन केले. परतीच्या प्रवासात गाण्याचा भेंड्या म्हणत सायंकाळी थिंपूला पोहोचलो.

पारो :
थिंपू येथून सकाळी आम्ही पारो कडे रवाना झालो. वाटेत दोन नद्यांच्या संगमावर थांबलो. थिंपू येथून वाहत येणारी वांगच्छू नदी अन् पारो येथून वाहत येणारी पाचू नदी यांचा संगम होऊन तीच पुढे दामछू या नावाने फुंटशोलिंगला वाहत जाते. वितळलेल्या बर्फाचे स्वच्छ खळाळत्या पाण्याचा प्रवाह पुलावरून पाहताना अगदी लोभस दृश्य दिसते. येथील इंडो-भूतान फ्रेंडशिप हा ब्रीज एम बी घारापुरे इंजिनियर्स पूणे कंपनीने १९९० मध्ये बांधलेला आहे.या ठिकाणीच थिंपू,पारो, हा व फुंटशोलिंग या चार जिल्ह्याची हद्द सुरू होते.

पारो शहरांत पोहोचताच आम्ही तडक नॅशनल म्युझियम पहायला गेलो. हे म्युझियम म्हणजे पूर्वीचा किल्ला जो तेनझिंग ड्रुक्कड्रा यांनी बांधलेला आहे. गोलाकार भक्कम भिंतीचा हा किल्ला ज्याचे सहा मजली म्युझियम बनवले आहे. यात शस्त्रे, पेहराव, भांडी,चलन व कलाकुसरीच्या वस्तू मांडलेल्या आहेत. दुपारच्या जेवणानंतर शहराबाहेर नेमजो येथील निसर्गरम्य इको नेस्ट रिसॉर्टवर आमचा मुकाम होता. पारो शहरा सभोवती डोंगररांगा असून केवळ सुमारे तीन किमी रुंदीत हे वसलेले आहे.सभोवताली डोंगररांगा मधोमध अरूंद जागेत शहर, रस्ता अन् वाहणारी नदी असून या जागेत भूतानचे एकमेव २.६ किमी लांब धावपट्टीचे पारो विमानतळ आहे. सबब केवळ कुशल वैमानिकांनाच इकडे पाठवले जाते.

चेलेला पास :
पारो मुक्कामी दुसऱ्या दिवशी टायगर नेस्ट हिल ट्रेक भेटीचा पर्याय होता. पण आम्ही जेष्ठ पर्यटकांनी चेलेला पासला जाण्याचा निर्णय घेतला. समुद्रसपाटी पासून ३९८८ मीटर उंचीवरचे हे थंड ठिकाण जेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने थोड्याशा श्रमानेही धाप लागते. पण येथे वातावरण चांगले असल्याने एवढी थंडी जाणवली नाही. येथून तिबेट सीमा, हिमालयन पर्वत रांगा अन् हिरव्यागार डोंगरदऱ्या अनुभवताना मन प्रफुल्लित होते. येथून नजीकच्या टेकडीवरील स्तूपाचे दर्शन घेतले. तेथे एक भूतान भाविक कुटुंब होमहवन पूजा करत होते. परत येताना पारो विमान तळावरील टेक ऑफ पहायला मिळाले.

सांस्कृतिक कार्यक्रम :
सहलीच्या अंतिम टप्प्यात रिसॉर्टवर खास आमच्यासाठी पंधरा जणांच्या मुला मुलीच्या गटाने भूतान पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये पारंपरिक वेशात स्वागत गीत, मुखवटे नृत्य, याक नृत्य, धनुर्विद्या नृत्य अशी लक्षवेधी नाचगाणी सादर केली. शेवटी समारोपीय नृत्यात आम्हा सर्व पर्यटकांना सहभागी करून घेण्यात आले. भूतान सहलीच्या निसर्गरम्य वातावरणात हा अविस्मरणीय अनुभव आम्हाला मिळाला.

भूतान मध्ये राजेशाही असून राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याविषयी सर्व जनतेस अपार आदर आहे. प्रत्येकजण घो खिरा गणवेशावर राजाचा फोटो अभिमानाने लावतात. भूतान मध्ये सर्वत्र स्वच्छता आढळते. कोठेही अतिक्रमणं किंवा स्ट्रीट फूड,चहा टपरी नजरेस पडत नाही. रस्त्याला हॉर्नचा गोंगाट नाही. सर्वत्र भारतीय चलन चालते. येथील लोक विशेषतः गाईड पर्यटकांशी फार अदबीने वागतात. महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण सर्वत्र उपलब्ध असते.भूतान जनतेस येथे शिक्षण व दवाखाना मोफत उपलब्ध आहे.

दळणवळण रस्ते चांगले आहेत. केवळ दरडी कोसळल्यास वाहतूक कोंडी होते.भारताकडून संरक्षणासाठी आर्मी व इंधन पुरवठा होतो. कर कमी असल्याने पेट्रोल दर पासष्ट रुपये आहे. विशेष म्हणजे या देशावर कोणत्याही देशाने सत्ता मिळवली नसल्याने सुरवातीपासून हा स्वतंत्र देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन उद्योग अग्रस्थानी आहे.मात्र प्रेक्षणिय स्थळं दूरवर आहेत. घाटमाथ्याचा रस्ता असल्याने प्रवासात जादा वेळ जातो.मुंबई ते पारो व तेथून परत विमान प्रवास केल्यास रस्ते प्रवासाची दगदग टाळता येईल.पण हा विमान प्रवास तुलनेत महाग आहे. भूतान मध्ये आठवण म्हणून खरेदी करायची असल्यास पारो ऐवजी इतर शहरांत केल्यास स्वस्त पडते. याकच्या दुधापासून बनवलेल्या पनीर क्यूबच्या माळा रस्त्यालगत दुकानासमोर लटकलेल्या दिसतात. येथील मु:ख्य पीक भात असून सुमारे ७०% क्षेत्र जंगलाखाली असल्याने इमारतीसाठी लाकडाचा वापर मुबलक आढळतो.येथे धुम्रपान बंदी असली तरी बनारस पानास चुना व पाण्यात भिजवलेली सुपारी असा पानविडा चघळनारे शौकिन इकडे फार दिसतात.

असा हा स्वच्छ, शिस्तप्रिय, निसर्गरम्य, विनम्र लोकांचा भूतान आम्हाला खूप आवडला. येथील आठवणींचा खजिना जपत आम्ही मुंबईत पोहोचल्यावर सहप्रवाशांचा निरोप घेतला.
समाप्त

संजय फडतरे

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments