Homeलेख"नीट"ची परीक्षा नीट करू या !

“नीट”ची परीक्षा नीट करू या !

“नीट” च्या गोंधळाबद्दल मिडिया मध्ये खूप लिहून, दाखवून, पाहून झाले.आपली शिक्षण व्यवस्था किती किडली आहे हेच यावरून सप्रमाण सिद्ध होते. शिवाय सामाजिक नैतिकता देखील किती खालच्या पातळीवर पोहोचली आहे हेही दिसून येते. इथे शासन, शिक्षण विभाग, परीक्षा घेणारी संस्था, एकूणच परीक्षेचे नियोजन करणारी उच्चस्तरीय कमिटी (ज्यात आय आय टी, एन आय टी चे निदेशक,आय ए एस अधिकारी असतात) हे सगळेच दोषी आहेत. त्यांचा निष्काळजीपणा, त्यांचा गुन्हा हा भयंकर आहे. कारण लाखो तरुण तरुणीच्या भविष्याशी, जीवाशी निर्घृण खेळ चालला आहे. हे टाळता येण्यासारखे नव्हते का ? तर निश्चितच टाळता आले असते. त्यासाठी डोळ्यात तेल घालून प्रामाणिकपणे काम करणारी निष्ठावंत यंत्रणा लागते.

गेली अनेक दशके आय आय टी ची प्रवेश परीक्षा होते आहे. त्यातही अनेक बदल झालेत. एकाऐवजी प्रीलिम अन् अँडव्हान्स अशा दोन परीक्षा होतात. इथे तर आय आय टी त काम करणाऱ्या प्राध्यापकाची मुले देखील परीक्षेला बसतात. अयशस्वी होतात पेपर नीट लिहिला नाही तर ! पण या परीक्षेचा पेपर लीक होणे असे आजपर्यंत घडले नाही. प्रश्न पत्रिकेच्या की विषयी किंवा रँकिंग लिस्टच्या नियमाविषयी गोंधळ झालाय. एकदा प्रकरण कोर्टात नेले गेले. जे काम आय आय टी च्याच प्राध्यापकाने केले. पण कधीच पेपर लीक झाले नाहीत. मग उद्याचे डॉक्टर घडविणाऱ्या परीक्षेच्या बाबतीतच असे का घडते ? ही गांभीर्याने सखोल संशोधन करण्याची बाब आहे.

इथे केवळ परीक्षा घेणारी यंत्रणा, शासन च दोषी नाही. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस चे नियोजक सगळेच दोषी आहेत. पालकच मुलांना वाम मार्गाने जाण्यासाठी आधी पासून प्रवृत्त करताहेत. मग यातून उद्याचे जबाबदार नागरिक, प्रामाणिक, नैतिक डॉक्टर् कसे निर्माण होणार, हा प्रश्न आहे. मन की बात मध्ये परीक्षेविषयी मार्गदर्शन करणारे माननीय नेते याविषयी कुणाला उपदेश केल्याचे ऐकीवात नाही !

सध्याचे पेपर फुटी प्रकरण बघता आपली एकूणच भ्रष्ट यंत्रणा आता एका वर्गापुरती, एका. प्रदेशापुरती मर्यादित राहिलेली नाही. तिची विषारी पालेमुळे देशभर पसरली आहेत. रोजच्या रोज जी नावे प्रसिद्ध होताहेत ती बघता, त्यांचे अधिकार, संस्था बघता एकूणच देशातील तपास यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, कायदा सुव्यवस्था किती तोकडी, पोकळ आहे हेही लक्षात येते.
मुळात या व्यवसायिक शिक्षणाच्या (इंजिनियरिंग, मेडिकल, अन् तत्सम), प्रवेश परीक्षासंबंधी, मेरिट लिस्ट संबंधी बदलत्या काळानुसार नव्याने विचार करण्याची गरज आहे. मुळात मेरिट, गुणवत्ता कोणत्या निकषावर ठरवायची याचाही नव्याने विचार करावा लागेल.

या बहुतेक परीक्षा ऑब्जेक्टिव टाईप असतात. बहु पर्यायी उत्तरातून एक उत्तर शोधताना त्यामागे बुद्धिमत्ता, तर्क याचा वापर असेलच याची खात्री नसते. अभ्यास केलेला नसतांना, खरे उत्तर माहिती नसताना देखील अशीच टिक केलेली उत्तरे बरोबर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक तर आय आय टी सारखे दोन परीक्षांचे मॉडेल वापरता येईल. त्यामुळे पहिल्या चाचणीत बरेच जण गळून पडतील. अर्थात ही प्रोसेस देखील विचार पूर्वक अंमलात आणावी लागेल. दुसरे म्हणजे या परीक्षांसाठी एक दोन प्रश्न पत्रिका तयार करण्याऐवजी खूप मोठी क्वेश्चन बँक तयार करावी. त्यातून ठराविक विद्यार्थ्यासाठी ठराविक प्रश्न संगणक निवडेल. त्याच्या जवळ असलेल्या की प्रमाणे संगणकच गुण पत्रिका तयार करेल. या परीक्षा ठराविक महिन्यात विशिष्ट डेटा सेंटर्स मध्ये विद्यार्थ्यांना सोयीनुसार देता येतील. या सेंटर मध्ये असलेले व्हिडिओ कॅमेरे विद्यार्थ्यावर नजर ठेवतील. काहीही अयोग्य आढळून आल्यास ती परीक्षा रद्द झाल्याचे सिग्नल संगणकच देईल. आजच्या डिजिटल युगात, ए आय आय चा वापर केला तर हे सहज शक्य आहे. याला बरीच पूर्व तयारी करावी लागेल. विशेष करून उत्तम प्रश्नाची बँक तयार करणे, त्यात सिक्रेट कोड द्वारे गुप्तता पाळणे, त्या प्रश्नांची अचुक की तयार करणे..हे काम एकदा नीट केले, त्यात सुसूत्रता आली की पुढचे सगळे सोपे जाईल.

सध्याची जी कोणती नॅशनल टेस्ट एजन्सी आहे त्यातील लूप होल्स शोधून त्या दूर करणे, अन् वरील नवे बदल तद्न्य प्राध्यापक,अभ्यासक यांच्या संमतीने अंमलात आणणे फारसे कठीण नाही.त्यासाठी इच्छाशक्ती हवी. मुख्य म्हणजे व्यवसायिक उच्च शिक्षण ही हलक्या ने घेण्याची गोष्ट नाही हे गांभीर्याने ठरवावे लागेल. मान्य करावे लागेल. उत्तम डॉक्टर्स, उत्तम इंजिनिअर्स तयार करायचे तर त्याची प्रवेश परीक्षेपासूनची पूर्व तयारी देखील राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडावी लागेल. तसेच केवळ सरकारवर अवलंबून चालणार नाही. इथे नैतिकतेचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. पेपर लीक करणारे जितके दोषी तितकेच, किंबहुना अधिक पेपर विकत घेणारे विद्यार्थी, त्यांना लाखोंनी पैसे पुरवणारे पालक हे सुद्धा दोषी आहेत. त्यांचा शोध घेऊन, त्यांनाही कडक शिक्षा होणे, त्यांची नावे समाजा समोर येणे महत्वाचे आहे. त्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही.

जो विद्यार्थी प्रवेश घेतानाच अनैतिकतेचा आधार घेतो तो डॉक्टर झाल्यानंतर काय दिवे लावेल याची आपण कल्पना करू शकतो. आपली देखील सामाजिक जबाबदारी आहे की असा भ्रष्टाचार करणाऱ्याचे समुपदेशन करणे, वेळ पडल्यास त्यांना धडा शिकवणे, खड्या सारखे बाजूला करणे.. हे आपणा सर्वांचे देखील नैतिक कर्तव्य आहे. हे झाले नाही तर अशा गुन्हेगारांची संख्या वाढत जाईल. जागतिक बाजारात आपली किंमत कमी होईल. जागतिक गुरू वगैरे होणे राहिले बाजूला.. अनैतिक गुन्हेगारांची गुंडगिरी वाढत जाईल. या प्रकाराला वेळीच आळा बसायला हवा. वर जे उपाय सुचवले ते करून बघावे.याही पेक्षा उत्तम काही सुचले तर सोने पे सुहागा !!

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments