कोणतीही नवीन सुविधा ही अत्यंत उपयोगी, विकासाभिमुख असते, फक्त त्या सुविधेचा तसा उपयोग करून घेता आला पाहिजे, तशी दूरदृष्टी पाहिजे. आजकाल सकारात्मकते पेक्षा नकारात्मक भूमिकांचे प्रमाण भरपूर वाढले आहे. परंतु, काही व्यक्ती या स्वतःसाठी नव्हे तर इतरांना मदत व्हावी अशा प्रामाणिक भावनेतून सुविधांचा उपयोग करतात. अशी एक व्यक्ती म्हणजे सेवानिवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन तथा न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलचे संपादक आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ !
सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न भुजबळ सरांनी अत्यंत सक्रिय राहून सोडविला असून त्यांचे कार्य इतरांना मार्गदर्शक ठरते आहे. श्री भुजबळ यांनी २२ जुलै २०२० रोजी ‘न्यूज स्टोरी टुडे’ या पोर्टलची सुरुवात केली. पोर्टलने पाच वर्षे पूर्ण करून सहाव्या वर्षात प्रवेश केला आहे.आज समाज माध्यमांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. करमणुकीची साधन म्हणूनच पाहिले जाते. परंतु समाज माध्यमांचा वापर विधायक दृष्टिकोन समोर ठेवून, कल्पकतेला अनुसरून आणि गांभीर्याने केला तर एक फार मोठे कार्य होऊ शकते, देश-विदेशातील असंख्य लोकांना एकत्र आणून समाज प्रबोधन, वैचारिक मंथन होऊ शकते हे भुजबळ सरांनी या पोर्टलच्या माध्यमातून सिद्ध केले आहे.
श्री देवेंद्र भुजबळ यांनी पोर्टलवर दैनंदिन राजकारण, गुन्हेगारी, बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध न करण्याचा केलेला प्रण ते आजही कटाक्षाने पाळतात. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, पर्यटन, सेवा, उद्योजक विकास, यशकथा लोक शिक्षण,वैचारिक लेखन, कविता, अनुभव कथन अशा वैविध्यपूर्ण नि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी देण्यासाठी पोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे केवळ देशातील नव्हे तर विदेशातील प्रसिद्ध लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडले गेले आहेत आणि जोडले जात आहेत, ते केवळ श्री भुजबळ यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि मदतीचा हात पुढे करण्याची वृत्ती यामुळे !
न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवर दररोज एक लेख, बातमी, साहित्य, दिनविशेष लेख, कविता प्रसिद्ध होत असतात. आता पर्यंत १३०० हून अधिक कविता, तर वाचक लिहितात.. या सदरातून वाचकांची असंख्य पत्रे प्रसिध्द झाली आहेत.
माझा आणि श्री देवेंद्र भुजबळ सर यांचा परिचय अलिबाग येथे श्री विवेक मेहेत्रे यांनी आयोजित केलेल्या दोन दिवसीय साहित्य संमेलनात झाला. तिथे भुजबळ सर यांच्या कल्पनेतून आम्ही आमच्या दोघांची पुस्तके एकमेकांना भेट म्हणून दिली. नंतर श्री भुजबळ यांनी स्वतः संपर्क साधून माझा ‘सदाबहार : सदाशिव पाटील’ हा ग्रंथ मागवून घेतला, त्यावर उत्कृष्ट समीक्षण लिहिले. पुढे चालून मला त्यांनी श्री विलास मराठे, संपादक दैनिक हिंदुस्थान, अमरावती यांचा क्रमांक दिला, मी त्या दैनिकात माझे लेखन पाठवावे ही त्यांची प्रांजळ इच्छा होती. त्यानुसार मी गेली चार वर्षे श्री मराठे यांचेकडे राजकीय, सामाजिक लेख, पुस्तक परिचय पाठवत आहे, ते सातत्याने प्रकाशितही होत असतात. तसेच ‘भारतरत्नाचे मानकरी’ ही त्रेपन्न लेखांची मालिका वर्षभर दै. हिंदुस्थानमध्ये प्रकाशित झाली.

न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवर माझे पुस्तक परिचय, विविध विषयांवरील लेख आणि ‘धम्माल प्रवासातील’ तसेच ‘निवडणुकीची हास्यजत्रा’ या दोन हास्य लेखमाला प्रकाशित झाल्या आहेत. माझ्या काही लेखांवर देश, विदेशातील वाचकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचबरोबर श्री देवेंद्र भुजबळ सर यांनी लिहिलेल्या ‘अभिमानाची लेणी’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचे भाग्य मला लाभले. ‘भारतीय राजकारणाचे भीष्माचार्य: लालकृष्ण अडवाणी’ हे माझे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे, या पुस्तकाला भुजबळ सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना दिली आहे.
न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवर आतापर्यंत स्व. प्रा डॉ किरण ठाकूर, पुणे; डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका; सौ वर्षा भाबल. नवी मुंबई; निवृत्त डीवायएसपी सुनीता नाशिककर; प्रा विसुभाऊ बापट. मुंबई; टिव्ही कलाकार गंधे काका. मुंबई; डॉ भास्कर धाटावकर. मुंबई; प्रतिभा चांदूरकर. ठाणे; श्री हेमंत सांबरे. पुणे; प्रा डॉ विजया राऊत. नागपूर; तनुजा प्रधान. अमेरिका; तृप्ती काळे. नागपूर; श्री प्रवीण देशमुख. कल्याण; श्री विकास भावे. ठाणे; प्रिया मोडक. मुंबई; प्रतिभा चांदूरकर. ठाणे; मेघना साने; डॉ. शार्दुल चव्हाण. मुंबई; क्षमा प्रफुल्ल. नवी दिल्ली; प्रकाश चांदे. डोंबिवली; सुप्रिया सगरे. मुंबई; विलास कुडके. मुंबई; देवेंद्र भुजबळ. मुंबई; सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक; संगीता कुळकर्णी. बंगलोर; सौ अरुणा गर्जे. नांदेड; डॉ राणी खेडिकर. पुणे; डॉ राणी खेडीकर. पुणे या मांदियाळीत वाचकांच्या लक्षात येईल की, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश- विदेशातील लेखकांना पोर्टलने लिहिते करण्यात आणि वाचकांना वाचण्यासाठी प्रवृत्त केले आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी श्री व सौ. भुजबळ स्वतःची वैयक्तिक दुःख, अडचणी विसरून दररोज नियमितपणे पोर्टलचे भाग प्रकाशित करतात. एखादे दिवशी पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे प्रकाशित होणार नसेल तर लगेच तसे निवेदन प्रकाशित करतात, हे विशेष.
न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवर सध्या पुढील लेखमाला प्रसिद्ध होत आहेत…
सोमवार : जडण घडण : सौ राधिका भांडारकर पुणे,
मंगळवार : “पद्मश्री”: नीला बर्वे सिंगापूर,
बुधवार : जर्मन विश्व, प्रा आशी नाईक, पुणे
गुरुवार : स्नेहाची रेसिपी: सौ स्नेहा मुसरीफ, पुणे
शुक्रवार : हवाईदलातील माझ्या आठवणी : विंग कमांडर शशिकांत ओक, पुणे
शनिवार : जिचे तिचे आकाश : चित्रा मेहेंदळे अमेरिका, अनुवादित कथा : उज्ज्वला केळकर, नवी मुंबई.
यावरून एक गोष्ट लक्षात येते की, पोर्टलवर किती विविधांगी, माहितीवजा साहित्य प्रकाशित होत असते.
पोर्टलवर ज्या विषयावर लेखन प्रसिद्ध होत असते ते विषय असे…
वैचारिक लेख, पुस्तक परिचय, पर्यटन, हलकं फुलकं, चित्रसफर, आठवणीतील व्यक्ती, दिन विशेष, यश कथा, सामाजिक संस्था परिचय, “माहिती”तील आठवणी, ललित, पाककला, अनुभव कथन !
श्री व सौ. भुजबळ इथेच थांबत नाहीत तर काही दिन विशेष, व्यक्ती विशेष समोर ठेवून विशेषांकही प्रकाशित करण्यात आले आहेत. ते वाचकप्रिय ठरले आहेत. डॉक्टर म्हणजे देव, आषाढी एकादशी, स्वातंत्र्यदिन, डॉ बाबासाहेब आंबेडकर : ३ विशेषांक, सिंधुताई सकपाळ, डॉ अनिल अवचट, लता मंगेशकर, मराठी भाषा, महात्मा फुले, सुरेश भट, तंबाखू विरोधीदिन, बालदिन, संविधानदिन, पर्यावरण, गुरू पौर्णिमा हे विशेषांक संबंधित चरित्र नायकाची गौरव गाथा असून ते वाचनीय तसेच मार्गदर्शक आहेत.
महत्त्वाचे म्हणजे न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेखमाला पुस्तकाच्या स्वरुपात वाचकांच्या भेटीला आल्या आहेत…
‘समाजभूषण’ लेखक : देवेंद्र भुजबळ भरारी प्रकाशन, मुंबई. ‘मराठी साता समुद्रापार’ लेखिका : मेघना साने ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. ‘जीवन प्रवास’ लेखिका : सौ वर्षा महेंद्र भाबल न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई. समाजभूषण २ लेखिका : सौ रश्मी हेडे न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई. ‘मी, पोलीस अधिकारी’ लेखिका : सुनीता नाशिककर. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई. तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मध्ये प्रकाशन संपन्न. ‘माझी कॅनडा, अमेरिका सफर’ लेखक : डॉ भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, चैतन्य प्रकाशन, मुंबई.’पौर्णिमानंद’ काव्य संग्रह कवयित्री: सौ पौर्णिमा शेंडे, मुंबई. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई. ‘मराठी इथे, मराठी तिथे’ – ई बुक मेघना साने उद्वेली प्रकाशन, ठाणे. ‘आम्ही अधिकारी झालो : लेखक : देवेंद्र भुजबळ. न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन, नवी मुंबई तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन,मुंबई येथे प्रकाशन. या ग्रंथसंपदेतील अनेक पुस्तकांना पुरस्कार लाभले आहेत.
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल मार्फत पुढील विविध उपक्रम राबविण्यात येतात…
स्नेहमिलन : लेखक, कवी, अन्य सर्व संबधित यांचे अनौपचारिक स्नेहमिलन हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. या स्नेहमिलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अनौपचारिक, एखाद्या लेखक, कवी यांच्या घरीच असते. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्र संचालक असे काहीही नसते. निखळ एकमेकांची ओळख, अनुभव, विचारांची देवाणघेवाण, गप्पागोष्टी असे लोभसवाणे स्वरूप असते. आजवर संगमनेर, नाशिक, पुणे,विरार, नवी मुंबई, सातारा न्यू जर्सी, अमेरिका, ठाणे, लातूर येथे असे स्नेहमिलन झाले आहे.
न्यूज स्टोरी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक पर्यटन हा एक समाजोपयोगी उपक्रम घेतला जातो. पर्यटन म्हणजे केवळ मौज मजा या गोष्टीला महत्त्व न देता त्यातून सामाजिक आशयाचे पर्यटन व्हावे, संबंधित संस्थांचे कार्य समक्ष पाहता यावे, त्यांच्या कार्यात सहभाग निर्माण व्हावा, त्यांच्या कार्याला हातभार लावावा अशा हेतूने सामाजिक पर्यटन आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. असे पहिले पर्यटन नवी मुंबईतील आनंदवन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, नागपूर या ठिकाणी नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित करण्यात आले होते.या उपक्रमात २८ जण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे श्री प्रकाश आमटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना यावेळी भेटीत ७५ हजार रुपये भेट त्यांच्या कार्यामध्ये फार मोठा सहभाग घेतला, जो अनुकरणीय आहे.
मानवाच्या जीवनात आनंद, समाधान, सकारात्मक वृत्ती किती महत्त्वाची आहे हे रुजविण्यासाठी पोर्टलच्या माध्यमातून ‘आनंदाची गुरुकिल्ली’ हे विशेष शिबिर उरळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर २०२४ मध्ये विशेष शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात २५ जण सहभागी झाले होते.

तीन वर्षापूर्वी सौ. अलकाताई भुजबळ यांनी न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन सुरू केले असून पुढील पुस्तके प्रकाशित केली असून अनेक पुस्तके पुरस्कार प्राप्त ठरली आहेत …
जीवन प्रवास लेखिका : सौ वर्षा भाबल. समाजभूषण २ लेखिका : सौ रश्मी हेडे; मी, पोलीस अधिकारी लेखिका : सुनीता नाशिककर, निवृत्त पोलिस उपअधीक्षक; “पौर्णिमानंद” काव्य संग्रह कवयित्री : सौ पौर्णिमा शेंडे. निवृत्त उपमहाव्यवस्थापक, एमटीएनएल; अजिंक्यवीर : आत्म चरित्र. राजाराम जाधव, निवृत्त सहसचिव, महाराष्ट्र शासन; अंधारयात्रीचे स्वप्न: वडिलांचे चरित्र : राजाराम जाधव; चंद्रकला कादंबरी : राजाराम जाधव; हुंदके सामाजिक वेदनेचे : वैचारिक लेख संग्रह : राजाराम जाधव; “आम्ही अधिकारी झालो”: लेखक : देवेंद्र भुजबळ निवृत्त माहिती संचालक,; करिअरच्या नव्या दिशा लेखक : देवेंद्र भुजबळ; मी शिल्पा….चंद्रपूर ते केमन आयलँडस आत्मचरित्र, शिल्पा तगलपल्लेवार गंपावार,; सत्तरीची सेल्फी : व्यक्ती चित्रणे चंद्रकांत बर्वे निवृत्त दूरदर्शन संचालक; माध्यमभूषण व्यक्तिचित्रणे देवेंद्र भुजबळ.
सतत कार्यप्रवण, नवनिर्मितीचा ध्यास हे जणू न्यूज स्टोरी पोर्टलचे ब्रीदवाक्य आहे. त्यांची आगामी प्रकाशने…
कोवळी उनं: कथा संग्रह नीला बर्वे, सिंगापूर. मनातील कविता : डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका. नर्मदा परिक्रमा : मानसी चेऊलकर, अलिबाग. महानुभाव पंथाचे मराठीत योगदान : प्रा डॉ विजया राऊत, नागपूर. प्रतापगडची स्वारी, विंग कमांडर शशिकांत ओक. माध्यमभूषण २. देवेंद्र भुजबळ.
श्री देवेंद्र भुजबळ आणि सौ.अलका भुजबळ यांच्या नियोजनानुसार झालेले कार्य, त्याची महती, त्यांची प्रामाणिक भूमिका हे लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महत्त्वाचे पुरस्कार… चौथा स्तंभ पुरस्कार, एकता पुरस्कार, विशेष सन्मान पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, माणुसकी सेवा गौरव पुरस्कार, सर्वद पुरस्कार, रोटरी इंटर नॅशनल विशेष पुरस्कार इत्यादी अनेक ! याबाबत श्री भुजबळ म्हणतात, “या पोर्टलला मिळालेले व मिळत असलेले यश हे सर्व लेखक, कवी, वाचक आणि पोर्टलशी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे, असे म्हणणे योग्य ठरेल.सर्वांचे स्नेह, सहकार्य पुढेही मिळत राहील, असा विश्वास वाटतो.” या वक्तव्यातून त्यांचा विनय लक्षात येतो.
निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते, माजी पत्रकार देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या पोर्टलची कल्पकतेने निर्मिती करीत असतात.
न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचा प्रवास पाच वर्षांचा आहे, तो सर्वांसाठी आनंददायी आहे. यानिमित्ताने श्री देवेंद्र भुजबळ, सौ.अलका भुजबळ यांना त्यांच्या आगामी स्वप्नपूर्तीसाठी भरपूर शुभेच्छा !

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नागेश सर आपण खूप छान विस्तृत अशी न्युज पोर्टल बद्दल माहिती लिहिली आणि पोर्टलच्या भुजबळ सर आणि अलका मॅडम बद्दल तुम्ही खरंच खूप छान लिहिल आहे. या पोर्टलमुळे खरंच अनेक हात लिहिते झाले. तर कित्येक नवनवीन व्यक्तींचं कार्य या पोर्टल मार्फत त्यांनी पोहोचविण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या व्यक्तींचा एकमेकांशी, व एकमेकांच्या कार्याशी परिचयही करून दिला. न्यूज पोर्टलला यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आणि आपल्याला एवढा सुंदर लेख लिहिण्यासाठी मनापासून धन्यवाद🙏