Homeपर्यटनपक्ष्यांकडून काही शिकू या !

पक्ष्यांकडून काही शिकू या !

एक कॉलेजकुमार नुकताच आमच्यासोबत पक्षीनिरीक्षणाला आला होता. सकाळची वेळ होती आणि वातावरण एकदम प्रसन्न होते. मैना, सातभाई, चिमण्या, माळमुनिया आणि सुगरणींचे घोळके एकत्र येऊन दाणे-किडे आणि अळ्या टिपत होते. एका झाडावर कावळे गोळा झाले होते, तर दुसरीकडे दयाळ, होला, भारद्वाज, खाटिक, कोतवाल आणि वेडे राघू आपापल्या धुंदीत किडे पकडण्यात मग्न होते. झाडाच्या एका उंच शेंड्यावर तांबट पक्षी आपल्या नावाला साजेसा ‘पुक-पुक/टुक-टुक’ असा सूर लावून बसला होता, तर विजेच्या तारेवर खंड्या अगदी शांतपणे ध्यानस्थ होता.

हे निरामय दृश्य त्या कॉलेजकुमाराला दाखवत मी म्हणालो, “हे बघ दोस्ता, यालाच म्हणतात पक्ष्यांचे शांततापूर्ण सहअस्तित्व… म्हणजेच निसर्गातले खरंखुरे सहिष्णू जीवन!”माझ्या या बोलण्यावर तो ताडकन म्हणाला, “सर, मला या ‘सहिष्णुता’ शब्दाचा फार राग येतो! ही सहिष्णुता म्हणजे निव्वळ दुबळेपणा आहे!”

तो असे बोलतो न बोलतो, तोच विरुद्ध बाजूला पंख पसरवून बसलेली एक घार शिकारीसाठी झेपावली. ती फांदीवरून उठली मात्र, आणि एका क्षणात इतका वेळ शांत असलेल्या सर्व पक्ष्यांची वेगाने हालचाल सुरू झाली. संपूर्ण वातावरणात एकच कलकलाट झाला. याच सुमारास कावळे आणि कोतवाल या लढाऊ पक्ष्यांनी एकत्र येत त्या घारीचा हवेतच पाठलाग केला आणि तिला तिथून दूर पळवून लावले.


ते विहंगम दृश्य पाहताच मी त्याला म्हणालो, “पाहिलीस ही सहिष्णुता? जोवर सर्व काही सुरळीत चालले होते, तोवर निसर्गात गुण्यागोविंदाचे वातावरण होते. मात्र, जशी घार शिकारीसाठी उडली, तसा सर्वांनी एकत्र येत प्रतिकार केला. कावळे आणि कोतवालांसारख्या आक्रमक पक्ष्यांनी घारीला पळवून लावले आणि इतरांचे प्राण वाचवले. दोस्ता, सहिष्णुता ही काही दुर्बलांची किंवा लाचारांची नसते, हे आता तरी तुझ्या लक्षात आले की नाही? आज या पक्षीजगाने सहिष्णुतेचा खरा अर्थ प्रामुख्याने दाखवून दिला आहे!”

निसर्गाचा नियमच आहे की, जोपर्यंत सर्वजण आपापल्या मर्यादेत राहून निसर्गाचा आनंद घेत आहेत, तोपर्यंत पूर्ण सहिष्णुता असते. पण जेव्हा या सहअस्तित्वावर, स्वातंत्र्यावर किंवा अस्तित्वावरच संकट येते, तेव्हा ‘मूक’ राहणे हा विवेक नव्हे, तर तो मृत्यू ठरतो. तिथे एकत्रितपणे प्रतिकार करणे हाच निसर्गाचा खरा नियम आहे.

मी पुढे त्याला समजावून सांगितले, “सहिष्णुता म्हणजे विवेक आणि तारतम्य! दुसऱ्यासोबत सहजीवन जगणे म्हणजे शरणागती पत्करणे नव्हे. सहजीवन म्हणजे लाचारीने केलेली तडजोड नसून, एकमेकांना समजून घेत केलेले संवादात्मक समायोजन असते. प्रत्येकाचे आचार-विचार, खानपान, रंग आणि आकार वेगवेगळे असलेले हे पक्षी जसे एकत्र शांततेने राहतात; तसेच मानवी समाजानेही प्रगल्भतेने सहिष्णू जीवन जगणे गरजेचे आहे.”

“तू तर समाज कार्याचे शिक्षण घेत आहेस, त्यामुळे आधी तू स्वतः सहिष्णुता म्हणजे काय हे सैद्धांतिक पातळीवर नीट समजावून घेतले पाहिजेस. तुझ्या मनात जो गैरसमज निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी तू या संकल्पनेचा सखोल अभ्यास करावा, असा माझा तुला आग्रह आहे. आजच्या नव्या पिढीला ‘गूगल’ करण्याची सोय आहे, तिथे जाऊन जरा याबद्दल अचूक माहिती शोध.”

सहिष्णुता या संकल्पनेचा प्राथमिक पाया प्रख्यात विचारवंत जॉन लॉक यांनी १६८९ मध्ये लिहिलेल्या ‘अ लेटर कन्सर्निंग टॉलरेशन’ या ग्रंथात विस्ताराने मांडला. त्यांनी धार्मिक संदर्भात व्यक्तीच्या वैचारिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. पण जेव्हा तू याचा सखोल अभ्यास करशील, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की, ‘विवेकपूर्ण सहिष्णुता’ या संकल्पनेचा पाया केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. हा विचार पुढे शतकानुशतके वेगवेगळ्या उदारमतवादी, विवेकवादी आणि मानवतावादी विचारवंतांच्या सखोल मंथनातून आकाराला आला आहे. या वैचारिक मंथनात व्हॉल्टेअर , जॉन स्टुअर्ट मिल आणि मायकेल वॉल्झर या विचारवंतांचे योगदान मोलाचे आहे.

फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअर याने आपल्या ‘ट्रीटाइज ऑन टॉलरेशन’ या ग्रंथाद्वारे सहिष्णुतेला सामाजिक चळवळीचे रूप दिले आणि विवेक व सहिष्णुता या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, हे दाखवून दिले. तर ज्याला आपण आज विचारपूर्वक सहिष्णुता म्हणतो, त्याचे सर्वात स्पष्ट प्रतिबिंब मिल यांच्या ‘ऑन लिबर्टी’ या ग्रंथात आढळते. विरोधी मते दडपण्याऐवजी ती ऐकून घेतल्यानेच सत्याचा शोध घेता येतो, हा विचार त्यांनी रुजवला. आधुनिक काळातील राजकीय तत्त्वज्ञ मायकेल वॉल्झर यांनी त्यांच्या ‘ऑन टॉलरेशन’ या पुस्तकात सहिष्णुतेच्या विविध पातळ्या स्पष्ट केल्या आहेत. केवळ सहन करण्याच्या प्राथमिक टप्प्यापासून ते थेट समोरील व्यक्तीच्या संस्कृतीचा आदरपूर्वक स्वीकार करणे, हाच सहिष्णुतेचा खरा प्रवास असल्याचे त्यांनी मांडले.या सर्वांच्या सखोल विश्लेषणातून ‘विवेकपूर्ण सहिष्णुता’ म्हणजे काय ? हे खालील चार महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट होते.

१. सहिष्णुता म्हणजे भित्रेपणा, लाचारी नव्हे. डोळे मिटून सगळं अन्यायकारक सहन करणे आणि “मी तर खूप सहनशील आहे” असं म्हणून गप्प बसणं म्हणजे सहिष्णुता अजिबात नाही. समाजात चुकीचे, अन्यायकारक, विवेकहीन किंवा अमानवी घडत असताना मूक संमती देणे ही केवळ ‘भीरुता’ (भित्रेपणा) ठरेल. खरी सहिष्णुता अन्यायासमोर नतमस्तक व्हायला शिकवत नाही, तर व्यक्तीला विवेकाचा आवाज उठवण्याचे धाडस देते.

२. सहिष्णुता म्हणजे विरोधी मतांचा आदर. विवेकपूर्ण सहिष्णू व्यक्ती समोरच्याचे ऐकून घेताना आपल्या बुद्धीचा पूर्ण वापर करते. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळे मत मांडत असेल, तर लगेच आक्रमक न होता, “समोरील व्यक्ती असे का बोलत आहे?” त्यामागची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा बाजूला ठेवून विचार करणे हाच या सहिष्णुतेचा गाभा आहे.

३. सहिष्णुतेत सहन करण्यापेक्षा ‘समजून घेणे’ महत्त्वाचे असते. सहिष्णुतेचा अर्थ फक्त ‘सक्तीने सहन करणं’ असा घेतला, तर त्यात लाचारी येते. परंतु, खऱ्या सहिष्णुतेत आदरपूर्वक संवाद महत्त्वाचा असतो. सुसंवादामुळेच दोन भिन्न टोकांच्या विचारांमध्ये सामंजस्याचा पूल बांधला जाऊ शकतो.

४. सहिष्णुता म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याचा स्वीकार. सहिष्णुता म्हणजे समोरच्याचे मत आपल्याला ‘मान्य असलेच पाहिजे’ असे नाही. आपल्याला समोरचे मत पूर्णपणे अमान्य असू शकते, तरीही त्याला ते मत मांडण्याचा लोकशाही अधिकार आहे हे स्वीकारणे म्हणजेच सहिष्णुता.

माझ्या मित्रा थोडक्यात सांगायचे तर जॉन लॉक यांच्या विचारांपासून सुरू झालेला आणि अनेक उदारमतवादी विचारवंतांच्या चर्चेतून तावून-सुलाखून निघालेला हा विचार आज एका व्यापक मानवी मूल्यामध्ये रूपांतरित झाला आहे. ‘विवेकपूर्ण सहिष्णुता’ ही समाजाला जोडणारे अमूल्य माध्यम आहे. ही संकल्पना आपल्याला केवळ शांत बसायला शिकवत नाही, तर बुद्धी आणि विवेकाच्या प्रकाशात जगातील विविधतेचा आदर करण्यास शिकवते आणि अन्यायाविरुद्ध जागरूक राहण्याची वृत्ती देते. आजच्या अशांत काळात वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी या मूल्याची नितांत गरज आहे.

राजेंद्र गाडगीळ

— लेखन : पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ. जळगाव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments