Homeसाहित्यपाऊसधारा : काही कविता

पाऊसधारा : काही कविता

1) साजण भेटीस आला अन् पुलकित झाली धरा

साजण भेटीस आला अन् पुलकित झाली धरा
क्षण सजवत मिलनाचा सोहळा न्यारा साजरा ||धृ||

व्याकूळ प्रियतमा दाह साहे सोसून विरह झळा
कृष्ण मेघांचा रथ अवतरता लागतो जीवा लळा
स्वप्निल धरणीस करून दंग घेतो मिठीत बावरा
क्षण सजवत मिलनाचा सोहळा न्यारा साजरा ||१||

नाद करत रिमझिम रुणझुण साद घाली मंजुळ
भाव ओढाळ आतुर किती वाढवी उगाच खूळ
वाऱ्यावरती स्वार होऊन वेडावून जातो जरा
क्षण सजवत मिलनाचा सोहळा न्यारा साजरा ||२||

धुंद मृत्तिका बेफाम होते मोहरून कण कण
परिमल छेडते मृद्गंधाचा हर्षिल हिरवे कोंदण
रंग सांगतो सृजन सौख्याचा बंध बरवा खरा
क्षण सजवत मिलनाचा सोहळा न्यारा साजरा ||३||

साजण भेटीस आला अन् पुलकित झाली धरा
क्षण सजवत मिलनाचा सोहळा न्यारा साजरा ||

– रचना : मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ

2) तो आला…

तो आला, तो आला
विश्व पसारा, की विश्व पसारा
आनंदला, हरखला
नाचला, दंगला
मनमुराद चिंबला
चिंबला, थेंबथेंबे
भिजला, भिजला (तो आला…)

पानोपानी, पानोपानी
डोलला, डोलला
निसर्गराजा डोलला
वेल हासली, फुलं लाजली
मोहरली, ही धरा, ही धरा (तो आला…)

बळिराजा, बळिराजा
सुखावला, सुखावला
सज्ज जाहला, चालला
बैलजोडी, नांगर, घेऊनी
सोबतीला, सोबतीला
हासत, तो निघाला,
तो निघाला तो निघाला
भेटावया वावराला (तो आला…)

— रचना : सदानंद खोपकर. मुंबई

3) कृतज्ञता

कसं हिरवं झालंय रान
वान पेरलयं सोयाबीन
मोठ्या आनंदी मनाने
आम्ही फिरतोय दोघे जण !१!

पक्षी “पेर्ते” व्हाचा देतो नारा
नाद गुंजते कानात
गड्या भल्या पहाटे पहाटे
खुषी होतसे मनात !२!

मृगाच्या उत्तरार्धात
घाट घातला पेरणीचा
वरूण राजाच्या कृपेने
सा-या आसमंतात साचा !३!

सर्जा-राजाच्या गळ्यात
घुंगरू वाजे रुणुझुणु
शेतकरी राजाच्या घरी
मोठा सण आला जणू !४!

आनंदाला नाही तोटा
मन आलंया भरून
बरसतो मेघ राजा
सोबतीला काळे घन !५!

कृपा तुझी असू देरे राजा
लय पिकु दे धन-धान्य
धरती मातेलाही वाटेल
कृतकृत धन्य धन्य !६!
कृतकृत धन्य धन्य !!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments