Homeपर्यटनमाझी जीवन नौका : २०

माझी जीवन नौका : २०

जिलबी बिघडली…..!

मदुराई आणि रामेश्वरला जाऊन आलो. सुंदर देवळं आणि देवदर्शन झाले. खरंच तो विलक्षण योग होता. रात्री शिप वर परत आलो. सकाळी लवकर जाग आली. सुचित्रा, चिऊ अजूनही केबिनच्या बाहेर आल्या नव्हत्या. चिऊताई झोपली असावी.

मुकुंद इंजिन रूमला गेले होते.माझ्यातली सुगरण सकाळ-सकाळी जागी झाली. फ्रिजमध्ये भरपूर फळे शिल्लक होती. त्यात प्रसादाच्या आलेल्या केळ्यांची भर ! ती केळी आणि सर्व फळं  चिरायची आणि फ्रुट सॅल करायचं असं ठरवलं.

मला विळीवर चिरायची सवय.
पण इथे कुठे विळी होती ?
मग केबिन मधल्या कटलरी, क्रोकरी ठेवलेल्या कपाटात शोधलं. जहाजावर जेवण खाण्याचा सगळा साहेबी थाट. त्यामुळे तिथल्या ड्रॉवर मध्ये जेवणात वापरायचे अनेक प्रकारचे चमचे, काटे, सुऱ्या होत्या.
त्यातलीच एक सुरी घेतली. त्या सुरीने फळं चिरताना भरपूर वेळ गेला. जेवणासाठी वापरायच्या काट्या-सुऱ्यातील ती सुरी ! तिला किती धार असणार ?
चिरणं संपता संपेच ना. तेवढ्यात हरी आला.
“ये क्या बना रही हो ? ऍप्पल, केला, संत्रा.” त्याने विचारलं.
मी म्हटलं, “तुम सब लोगों को नैवेद्य चढा रही हूं, हरि |” म्हणाले
हरी हा एक प्रधान असल्यामुळे त्याला नैवेद्य हा मराठी शब्द माहिती होता.

आज सगळा पसारा घेऊन मी खाली कार्पेटवर बैठक मारली होती. केळी पटपट चिरून झाली. सफरचंदांनी वैताग दिला. संत्री सोलून हात सगळे बरबटून गेले. मोठ्या तीन-चार प्लेट्स शिगोशीग भरून फळांच्या फोडी झाल्या.

तेवढ्यात मुकुंद केबिनमध्ये प्रवेशते झाले. एकीकडे चिरलेली सफरचंदे, दुसऱ्या प्लेटमध्ये चिरलेली केळी, तिसऱ्यात संत्र्याच्या फोडी, चिकू. मोठ्या पेपर वर टाकलेले सालींचे ढीग आणि मधे  बायको…..!

माझा अवतार बघून मुकुंद चकित झाले. म्हणाले,” हे काय गं ? हा उद्योग कशासाठी मांडलाय ? “
म्हटलं, तरी “अहो, रोज इतकी फळं करवालो फ्रीजमध्ये ठेवून जातो.ती संपत नाहीत. त्यात ही प्रसादाची केळी पण आलेली आहेत. मग ठरवलं की सगळ्यांसाठी फ्रुट सॅलड करायचं.”

हे पुढे काही बोलणार इतक्यात इंजिन रूम मधून फोन आला. बहुतेक काहीतरी गडबड होती. मुकुंद धावतच इंजिनरूमला गेले.

कपाटात बरणीत भरपूर ड्रायफ्रूट्स होतीच. ती पण घातली. मग करवालोला सांगून पॅंट्री मधून एक मोठा बाऊल आणला. आता त्यात घालायला दूध हवं. त्यानं कंडेन्सड मिल्कचा एक डबा आणून फोडून दिला.वते सगळं बाऊलमध्ये कालवलं. सढळपणे साखर घातली आणि कंडेन्सड मिल्कचा अख्खा डबा त्यात मिसळला.
आणि…
अरे देवा….. नारायणा !
फ्रुटसॅलड सॉलिड गोडगट्ट झालं होतं.
कंडेन्सड मिल्क मध्ये साखर असते हे कुठे माहीत होतं? झालं !
आता काय करायचं ? एकूण हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली….
इतकी मेहनत केली ती फुकट जाणार काय ? अक्षरशः रडकुंडीला यायला झालं.

ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन करवालो आला. मी काय उद्योग करून ठेवले आहेत ते त्याला सांगितले.
तो हसला. म्हणाला, “मेमसाब डरिये मत | ये सब कुक के पास देता हूं | वो सब बराबर करके सबको खाने मे देगा.”
हुश्श ! ते फ्रुटसॅलड सर्वांना वाढण्यासाठी डायनिंग रूम मध्ये पाठवून दिलं.

आता ओटीत आलेल्या एवढ्या नारळाचं काय करायचं? करवालोला सांगून त्यातले तीन नारळ गॅलीत पाठवून दिले. कुकला स्वयंपाकात वापरायला सांगितले. नॉनव्हेज डिश मध्ये हे खोबरं वापरायचं नाही असं आवर्जून कळवलं ! एक भला थोरला नारळ मला मुकुंदांनी केबिनमध्येच हातोड्याने फोडून दिला. असं जाड रसरशीत खोबरं होतं.पण आता खोवणार कसं ?

संध्याकाळी तुतीकोरीनच्या बाजारातून थोडी भाजी आणि नव्या कोऱ्या विळीची खरेदी झाली. संसाराची ही आणखी एक नवी खरेदी. खोबरे खवून भाजीत, आमटीत घातलं.

चिऊ बरोबर खेळणं सुरू होतंच. आमच्या केबिन मधून सुचित्राकडे, तिकडून आमच्याकडे अशा चिऊच्या फेऱ्या सुरूच असायच्या.

“पहिली बायको लाडाची !”
त्यादिवशी सकाळीच चिऊचा बाबा अजित तिला कडेवर घेऊन शिप वर फेरी टाकायला गेला होता. तरीच आज तिची जाग नव्हती.
आज खूप वेळ झाला तरी मुकुंद इंजिन रूम मधून ब्रेकफास्ट किंवा चहासाठी आले नव्हते. इंजिन रूम मध्ये काहीतरी जोरात काम सुरू असणार ! माझी आंघोळ कपडे धुणं सगळं आवरलं.शेवटी अकराच्या सुमाराला सरबत प्यायला मुकुंद हाश्श-हुश्श करत आले. मागोमाग हरी पण आला.
मुकुंद म्हणाले, मगाशी फोन आला होता ना, तो एक ब्रेकडाऊन आला होता. ते सगळं दुरुस्त करून इंजिन नीट करण्यात इतका वेळ गेला. त्यातून उद्या आपण sail out होतो आहोत.”
मी म्हटलं,” हा असा अचानक ब्रेकडाऊन कसा आला ?
हरी म्हणाला,“अरे वो चिऊ आज इंजिन रूम मे आई थी ना | कल्याणपूर उसको लेके आया था”
चिऊ इंजिन रूम मध्ये येण्याचा आणि इंजिनच्या ब्रेकडाऊनचा काय संबंध ? मला समजेना.
माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य बघून मुकुंदना हसू आलं. म्हणाले,व“अगं, मी तुला सांगितलं नव्हतं का, की मर्चंटनेव्ही मध्ये एक समजूत आहे. कुठलीही स्त्री इंजिनरूम मध्ये आली की त्या दिवशी ब्रेक डाऊन ठरलेला ! इंजिनरूमला स्त्रीचं वावडं असतं. आणि आज तर केवढी मोठी, महत्त्वाची स्त्री…. चिऊ….. इंजिन रूम मध्ये येऊन गेली !”
हास्याच्या कल्लोळात केबिन बुडून गेली.

एखादी स्त्री इंजिनरूम मध्ये गेली की ब्रेकडाऊन होणारंच !
श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा…. पण हा अनुभव प्रत्येक वेळेला मुकुंदाना आलेला आहे. मी जहाजावर असताना पण आलेला आहे.

बरोबरच आहे ना. शिप किंवा इंजिनरूम ही मरीन इंजिनियरची पहिली पत्नी. दुसरी कुठलीही स्त्री आपल्या पतीच्या महालात आलेली तिला कशी सहन होणार ? सवती मत्सर जागा होतो आणि ती अशी काही रुसून बसते की तिची समजूत काढायला… रिपेअर करायला इंजिनियर धावलाच !
केबिनमध्ये बायको रुसली तरी चालेल पण इंजिनरूम रुसून चालत नाही.
पहिली बायको लाडाची !

आता सेलिंग सुरू झालं ! हलदीयाकडे प्रवास सुरू झाला.

समुद्र शांत होता. शरद ऋतुतले दिवस. २५ डिसेंबरची ख्रिसमसची पार्टी जहाजावर जोरदार झाली. क्रू मधला जवळजवळ सर्वच स्टाफ गोव्याचा  होता.ख्रिश्चन होता. त्यामुळे बडा खाना, निरनिराळ्या प्रकारचे केक्स यांची नुसती रेलचेल उडाली होती.

मुकुंदांनी ख्रिसमसची भेट म्हणून करवालोला रितीप्रमाणे  व्हिस्कीची बाटली दिली. पैसेही दिले. तो खुश झाला.

३१ डिसेंबरला हल्दियामध्ये होतो. किनाऱ्याला असल्यामुळे जहाजावरची जास्तीत-जास्त मंडळी shore leave घेऊन पार्टी  करायला बाहेर गेली होती.

नेहमीप्रमाणे हल्दियाची बिहारी पाणीपुरी… फुचका मात्र मनपसंत खाऊन घेतली. तिथल्या बाजारातून ताज्या ताज्या भाज्या घेऊन आले. चिरायला नवी-नवी धारदार विळी होतीच. (आजही माझी जहाजावरची ती विळी माझ्याकडे आहे. त्यानंतरच्या प्रत्येक जहाजावर मी ती बरोबर घेऊन गेले होते) त्यामुळे ताज्या भाज्या बनवणे सुरू होतं.

मी आणि सुचित्रा मिळून खूपदा एकत्र स्वयंपाक करायचो. निशाचं केबिन भर रांगणे, हाताला मिळेल ते उचलून तोंडात घालणे असे उद्योग सुरू झाले होते. तिला सांभाळणं एक मोठंच काम होतं.
एरवी खाली खेळत असायची. पण मुकुंद केबिनमध्ये आले की तिला उचलून घेतलंच पाहिजे ! आणि काका पण तिला उचलून घेऊन एक फेरी टाकून आणायचा.

तुतीकोरीनच्या दिशेने
एरवी खूप मस्ती करणारा बंगालचा उपसागर त्यामानाने फारच शहाण्यासारखा वागत होता. अर्थात ते दिवसही समुद्र शांत असायचेच होते. पण हा समुद्र जरा खोडकरच ! त्याच्या कधी अंगात येऊन घुसळायला लागेल सांगता येत नाही.

सेलिंग सुरू असताना क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्यातून दूर दूर दृष्टीपथात कुठेही जमीन नसते.या अथांग पाण्याची कायम सोबत. नुसतं पोर्टहोल मधून बाहेर नजर टाकली तरी पाणीच पाणी !

डेकवर फेरी मारायला गेलं की  सूर्याच्या उन्हात तळपणाऱ्या लाटांशी लडिवाळपणे खेळणारा समुद्र दिसायचा. उन्हं उतरणीला लागली की संध्याकाळच्या तिरप्या किरणांचा केशरी लाल शिडकावा झालेला समुद्र फार मोहक दिसायचा. धरणीवर हळूहळू सांज उतरू लागली की तो जास्त भारदस्त गंभीर पण उत्सुक वाटायचा.
दिवसभरची कामांची घाई गर्दी संपून जहाजावर शांतता पसरायची.
फक्त duty officers आणि कामावरची खलाशी मंडळी जागी असायची. आवाज न करता त्यांची कामं सुरू असायची.
हळूहळू निद्रेची चादर पेंगुळलेल्या जगावर पसरायला लागायची.

जहाजाच्या कडेवर हलकेच येऊन धडकणाऱ्या लाटांचा किंचित खळाळ आवाज, मधुर संगीतासारखा इंजिनांचा येणारा मंद लयबद्ध  आवाज, जहाजाच्या कडेवर हलकेच विसावून परत दूर दूर पसरत जाणाऱ्या त्या  काळसर लाटांच्या पिसाऱ्यांवर चांदण्याची कलाबूत चमकायची
आणि त्यांच्यावर  लोकपालक – माझी जीवन नौका !  संथपणे, शांतपणे  चालत राहायची. वेगाला असलेला एक गूढ मधुर ध्वनी ऐकायचा तर रात्रीच्या वेळी तो जहाजावरच ऐकावा !

रात्री चांदण्यांनी भरून गेलेलं निरभ्र आकाश. खाली  गडद होत जाणाऱ्या निळ्या-काळ्या समुद्राचा मखमली गालीचा, त्यावर काळ्या आकाशाची ही चमचमती, नाजूक, तरल ओढणी ! आकाश-धरा यांना एकाकार करणारी.
क्षितिजापर्यंत उसासून वाकलेल्या स्वर्गाला आणि त्याला अनंत हातांनी कवटाळणाऱ्या पृथ्वीची ही  पडलेली बेभान चांदण-मिठी !
विलोल चांदण्यांनी आकाश-पाणी एक करणारं निसर्गाचं हे विलोभनीय रूप !

जन म्हणती सावळी
तुज सगळे !
करुणार्ह विचारे
ते आंधळे.
नवमीची गे
रात्र सावळी
चंद्रकोर
बिजवरा कपाळी
शालूवरी
ताऱ्यांची जाळी
ज्या न मोहवी
त्या काय कळे ?….

कविवर्य भा.रा. तांब्यांनी वर्णन केलेली तीच चांदण्याने धरेचं अंग अंग माखून टाकणारी चंद्रोत्सवाची, प्रणयाच्या अत्तरात दरवळणारी नवमीची रात्र….

त्या साऱ्याच रात्री नवमीच्याच होत्या !

शिपची केबिन :
माझं औटघटकेचं घर !
सेलिंग मध्ये मुकुंद आणि कल्याणपुर यांना पहाटे चार ते सकाळी आठ, परत दुपारी चार ते रात्री आठ असं watch keeping असायचं.
या बाहेर जहाजावरची त्यांची नेहमीची कामं सुरूच असायची.

एका संध्याकाळी मी आणि सुचित्राने रात्रीच्या जेवणासाठी सर्वांना आलू पराठे करायचे ठरवले. सर्व ऑफिसर्स खुश !
अर्थात कणिक भिजवून ठेवणं. बटाटे उकडून सोलून ठेवणे.आम्ही दोघींनी ठरवला तसा मसाला वाटून देऊन बटाट्याचे सारण तयार करणे हे सगळं कुकने करून दिलं.
दोघी दुपारी तीन वाजता खाली गॅलीत उतरलो. कल्याणपूरनी चिऊला कसंबसं दोन तास एकट्याने सहन केलं. त्यात त्यांचं watch keeping ही सांभाळलं.

त्यादिवशी दोघींनी मिळून सर्व पराठे केले. खाली गॅलीत त्या धगीजवळ पराठे करणं सोपं काम नव्हतं. दोघी घामानी चिंब भिजून गेलो होतो. अर्थात उंडे भरून द्यायला, पराठे भाजायला सेकंड कुक होताच.
सर्वजण घरके पराठे खाऊन तृप्त झाले.

रोजचा स्वयंपाक तर गॅलीत कुकने  केलेला असायचाच. फक्त आमच्या केबिनमध्ये पदार्थ आले की माझे संस्कार त्याच्यावर व्हायचे. सुचित्रा पण ते करत होती. यूआम्ही बनवलेल्या पदार्थांची देवाण-घेवाण सुरूच असायची. चिऊ साठी तिला डाळ तांदुळाची खिमटी वगैरे तयार करायला लागायची.

खरंतर वाचन, अभ्यासाची खूप आवड असलेली मी अचानक पूर्ण बदलूनy गेले होते. मिळतील ती पुस्तकं वाचत होते.
पण स्वयंपाक, आमचं घर म्हणजे केबिन आवरणं, छान साडी नेसून तयार होणं या सगळ्याची खूप अपूर्वाई होती. त्यात मी रमून गेले होते.

सेलिंग सुरू होतं. हे नेहमीप्रमाणे पहाटे साडेतीनला उठून, वॉचकीपिंगला गेले होते.

सकाळी जाग आली. चहा पिऊन झाल्यावर उगाचच ड्रॉवर धुंडाळताना मला एका ड्रॉवरमध्ये ब्रासो पॉलिश सापडलं. यांच्या ऑईलचे हात पुसायच्या rags, त्या खास चिंध्या होत्याच. केबिनच्या दारांच्या सर्व कड्या, केबिनचा मुख्य दरवाजातला रुंद उंबरा चकचकीत पितळ्याचा होता. मी त्या रॅग्ज वरती ब्रासो घेऊन आतल्या दाराच्या सर्व कड्या घासून अगदी चकचकीत केल्या. मग उत्साह आणखी वाढला. अंगावर नाईट गाऊन. केबिनचं मेन दार सताड उघडलं आणि ब्रासोने तो पितळी उंबरा चांगला चकचकीत पॉलिश करायला सुरुवात केली.
ड्युटीवर असणारे एक दोन ऑफिसर्स ऍली वे मधे इकडून तिकडे जाताना हळूच बघून गेले.आमच्या डेक वर काम करणारे deck topaz – सफाई कामगार, आश्चर्याने बघत होते.
पण माझं कुठे लक्ष होतं !

इतक्यात पहाटेची ड्युटी संपवून सव्वा आठ वाजता मुकुंद केबिन कडे आले.
त्या अवतारात दरवाज्यात बसून हा सफाई उद्योग करणाऱ्या मला बघून काही न बोलता आत गेले आणि आतून जोरदार हाक मारली…… वेदवतीsss !
बापरे, अशी हाक मी पहिल्यांदाच ऐकत होते.
मी म्हटलं, “काय झालं.?”
हे म्हणाले, “पटकन आत ये आणि दार लाव .”
मी आत येताच यांचा तडक आणि कडक प्रश्न,
“दरवाज्यात बसून हे काय करत होतीस ? “
मी उत्साहात म्हणाले,
“अहो बघा ना, आपला उंबरा मी कसा मस्त ब्रासोने चकचकीत केला आहे !”
मुकुंद म्हणाले, “हे बघ, बीही आपली केबिन आहे.पण हे आपलं घर नव्हे.ही साफसफाई करण्यासाठी जहाजावर स्वतंत्र माणसं नेमलेली असतात.ती त्यांची ड्युटी असते. ती कामं तू करायला लागलीस त्यामुळे ते क्रू मेंबर्स कानकोंडे झाले. ऑफिसरची बायको हे काम करते आहे म्हणून त्यांना अपराधी वाटतं. जहाजावर   formal  – औपचारिक वागण्याचे अलिखित संकेत असतात. ते पाळावे लागतात. तुला जी साफसफाई करायची आहे ती केबिनच्या आत कर.”

माझा चेहरा रडवेला झाला. बापरे,आपण हे काय भलतंच करून बसलो असं वाटलं. माझ्या डोळ्यातलं पाणी बघून मुकुंदाने मला जवळ घेतलं, समजावलं. म्हणाले, “काही भयंकर घडले नाही आहे. फक्त या गोष्टी लक्षात ठेव.”

जहाजाच्या आयुष्यात माझं असं खूप नवनवीन  गोष्टी, रीतीभाती शिकणं…. एकूण शिक्षण सुरू होतं.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात New year ची पार्टी झाली. पहाता पहाता जानेवारी संपला. फेब्रुवारी सुरू झाला. आमच्या हल्दिया – तुतिकोरीन फेऱ्या सुरूच होत्या‌.

सूर्यग्रहण : एक अनोखा अनुभव
आम्ही तुतीकोरीनकडे निघालो होतो. १९८० चा फेब्रुवारी महिना. अनेक वर्षांनी भारतातून सूर्यग्रहण दिसणार होतं. पोर्ट मधे असलो की या सगळ्या बातम्या सविस्तर समजायच्या. अर्थात शिपच्या रोजच्या व्यवहारात हवामान अंदाज, ग्रहगोल स्थिती तर काटेकोरपणे पाहिल्या जायच्या.

आकाशात रंगणाऱ्या या नाट्याची निसर्ग देवतेने धरलेली तारीख धरली होती १६ फेब्रुवारी १९८०.

खग्रास सूर्यग्रहण
आम्ही तुतीकोरीनला पोहोचलो जहाज जेट्टीला उभे राहिलं. या दिवशी खग्रास सूर्यग्रहण भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे दुपारी होणार होतं. भारताच्या दक्षिणेतील काही भागातून ते पूर्णपणे पाहायला मिळणार होतं.

तुतीकोरीन मधून ते पूर्णपणे नाही, पण सुमारे 70 टक्के एवढे दिसणार होतं. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. त्यासाठी वेल्डिंग ग्लासचाच उपयोग करायचा. पोर्टहोल मधून ही नुसत्या डोळ्यांनी पाहायचं नाही. अशा स्पष्ट सूचना सर्वांनाच देण्यात आल्या होत्या. जहाजाचे सर्व पडदे व्यवस्थित आहेत की नाही याची तपासणी केली गेली.

भारतात जिथून हे खग्रास सूर्यग्रहण पूर्ण दिसणार होते त्या  समुद्रकिनाऱ्यांवर ग्रहण पाहणाऱ्या शौकिनांची, अभ्यासू  संशोधकांची आणि खगोल शास्त्रज्ञांची गर्दी उसळली होती.अनेक ठिकाणी कॅमेरे लावून ठेवलेले होते. जगभरातले शास्त्रज्ञ गोळा झाले होते. या सगळ्या बातम्या रेडिओवर ऐकायला मिळत होत्या. किनाऱ्याच्या जवळ असलो की रेडिओ वरचे कार्यक्रम आणि बातम्या ऐकायला मिळायच्या.जे कुठलं स्टेशन लागेल….. ज्या कुठल्या भाषेत त्या भाषेत ऐकायचं !
हिंदी आणि इंग्लिश बातम्या मधून हे सगळं समजत होतं.

सकाळपासूनच हळूहळू हवा बदलत होती. साधारण दुपारी बाराच्या सुमाराला अचानक वातावरण बदललं, थंड वारे वाहू लागले. लखलखणारा सूर्य अचानक निस्तेज व्हायला लागला. प्रकाश कमी होत चालला.हळूहळू अंधार व्हायला लागला. पक्ष्यांचा किलबिलाट विचित्र  ऐकू येऊ लागला. ते बिचारे घाबरले. हे अचानक काय घडतंय त्यांना समजेना. आणखीन काळोख वाढला तसे सगळे  घरट्यात जाऊन चिडीचूप बसले. सारं सामसूम !

ग्रहणाचे वेध केंव्हाच सुरू झाले होते. आकाशात घडणाऱ्या अग्नी नृत्याची नांदी होत होती. आम्ही दोघेजण जेवणखाण आवरून तो अपूर्व नजारा बघायला तयार होऊन बसलो होतो. दुपारी साधारण अडीच ते पावणेचार हा पूर्ण ग्रासाचा काळ होता. एकीकडे त्या सर्व बातम्या रेडिओवर येतच होत्या.

चंद्राने सूर्य झाकला जात असताना उरलेली सूर्याची तेजस्वी कोर

आम्ही लहान असताना आजी गोष्ट सांगायची की, अमृता मंथनातून अमृत बाहेर आल्यावर स्वरभानू नावाचा राक्षस अमृत प्यायला सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पंक्तीत जाऊन बसला. पण भगवान विष्णूंच्या ते लक्षात येताच त्यांनी मोहिनीचे रूप घेतलं आणि सुदर्शनाने त्याचे मुंडके कापले. घशातून खाली उतरणारा घोट मध्येच कापला गेला. वरचा डोक्याचा भाग राहू नावाचा राक्षस झाला आणि खालच्या राहिलेल्या शरीराच्या भाग केतू नावाचा राक्षस झाला. म्हणून तर त्या राक्षसाचा सूर्य चंद्र यांच्यावर राग. ग्रहणात तो त्यांना खायला धावतो. त्याने सूर्याला   गिळले की ग्रहण लागते. पण खालच्या कापलेल्या उघड्या  घशातून तो बाहेर पडतो आणि त्याची सुटका होते. ग्रहण सुटते.

चंद्राने झाकळलेल्या सूर्यातून बाहेर दिसणाऱ्या अग्नी ज्वाला

खरंच राहूने सूर्याला खाऊन टाकलं तर? आम्हाला फार भीती वाटायची. पण महाविष्णू तारणहार असल्यामुळे ग्रहण सुटलं की ‘सुटलो बुवा’ असं वाटायचं. त्यानंतर घरातल्या सगळ्यांना आजी आंघोळ करायला लावायची.

सूर्याची न झाकोळलेली दीप्तीमान कोर

ग्रहणात जे काही तुम्ही शिकाल, जी साधना कराल ती सिद्ध-मंत्र होते असं तिने सांगितलं होतं.
सिद्ध मंत्र म्हणजे काय ? विचारलं तर
“अगं, ग्रहण सुरू असलेल्या वेळी माणूस ज्याचा अभ्यास कhरतो त्या विषयात तो हुशार होतो.” असं तिने सांगितलं. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या एकेका धड्यातल्या निदान पाच तरी ओळी आम्ही ग्रहणाच्या काळामध्ये मनोभावे वाचून काढायचो.
गणित तर माझा शत्रुपक्ष. त्याची मला जाम भीती वाटायची. त्यामुळे बाकी विषय राहू देत, पण पाच गणितं तरी मी नक्की सोडवत असे. असो.

आकाशातलं अग्नी शिखांचं…. रुद्र रमणीय नृत्य
आम्ही दोघेही जाड वेल्डिंग ग्लास डोळ्यांना घालून डेकवर गेलो. इतरही काही ऑफिसर्स वेल्डिंग ग्लास घेऊन डेकवर आले होते. पण बरेच जण बाहेर आले नाहीत.

तुतीकोरीन मधून हे खग्रास सूर्यग्रहण संपूर्ण दिसणार नव्हतं. सूर्य पूर्णपणे झाकला गेलेला दिसणार नव्हता. पण चंद्र पुढे सरकत असताना सूर्याचा बराच मोठा भाग झाकोळला गेला. उरलेला थोडा भाग तेजस्वी कोरी सारखा दिसायला लागला. सूर्याच्या त्या झाकोळलेल्या भागाच्या कडेला दिसणारे प्रभामंडल डोळ्याला सहन होणार नाही इतकं दीप्तीमान होतं. त्यातून सूर्याच्या कडा तप्त उकळत्या सुवर्णासारख्या लाल केशरी  तेजस्वी रंगाच्या ज्वाळा ओकत आहेत असं वाटत होतं. त्याच्या कडांवर मधूनच चमकणारे प्रकाशकण हिऱ्यांचा चुरा टाकावा तसे तळपत होते.

देहभान विसरून ते अलौकिक दृश्य आम्ही दोघेही डोळ्यात साठवून घेत होतो. आकाशाच्या भव्य पटावर हे सूर्याच्या झाकोळलेल्या काळ्या भागा भोवतीचं ज्वाळानृत्य जवळजवळ दोन तास सुरू होतं.

एरवी आकाशात गुण्यागोविंदाने नांदणारे हे सूर्य, चंद्र,पृथ्वी आपापल्या मार्गाने निमुटपणे फिरत असतात. पण एखाद्या दिवशी हा चंद्र अडमोठ्यासारखा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जाऊन उभा राहतो. सूर्याचा प्रकाश अडवून पृथ्वीवर सावली पडतो. त्याची सावली पृथ्वीवर पडते तिथे काळोख पसरतो. तिथला सूर्याचा भाग काळा दिसतो जणू काही कोणीतरी सूर्याचा घासच घेतला आहे.
हा सगळा उपद्व्याप चंद्राचा !
लोक मात्र बिचाऱ्या राहूला दोष देतात की यानेच सूर्य गिळला म्हणून !

चंद्राची सावली हळूहळू सरकत होती तसा सूर्याचा   आकार कमी होत चालला आणि सूर्याची गोलाकार प्रतिमा अर्धवर्तुळासारखी आणि नंतर कोरीव चंद्रकोरीसारखी पण अतीव तेजस्वी दिसायला लागली. आपल्याला चंद्राची आडवी कोर बघायची सवय ! पण ही सूर्याची तेजोमय उभी कोर फारच रमणीय होती, अद्भुत होती.

इथून पूर्ण ग्रास दिसणार नव्हता. हळूहळू ग्रहण मोक्ष काल जवळ येत चालला. अंधार कमी होऊ लागला. चंद्राच्या सावलीतून सूर्यबिंब पडद्यामागून पुढे यावं तसं हळूच पुढे सरकत होतं. त्याचा चंद्रकोरी सारखा आकार मोठा मोठा होत चालला आणि पाहता पाहता लख्ख प्रकाश सूर्य पूर्ण बाहेर पडला. आपल्या लखलखत्या तेजाने परत तळपू लागला.

पण खरोखर काळ्या दिसणाऱ्या सूर्याच्या कडेने काही क्षण दिसलेला तो उसळत्या ज्वाळांचा नाच गूढरम्य होता.

चिऊ अगदी छोटी असल्यामुळे सुचित्राला आणि चिऊला केबिनच्या बाहेर यायची कल्याणपूरने बंदी केली होती. ते पिल्लू पण नेमकं ग्रहण काळात मस्त झोपलं होतं.
सुचित्रा म्हणाली, यार, मै ने भी अच्छे से नींद लेली | कभी नही, लेकिन आज भगवान की कृपा से ये लडकी भी अच्छी तरह से सोयी थी |

त्यादिवशी आम्ही दोघेही डिनरला खाली मेस मध्ये गेलो. केबिनमध्ये जेवण मागवलं नव्हतं. त्या दिवशी मेस मध्ये सगळे भेटले.

मी पण डेक वर जाऊन चक्क ग्रहण पाहिलं याचं काही जणांना फार आश्चर्य वाटलं. “अरे मॅडम वह एक्लिप्स देखना अच्छा नही होता है | औरत लोगो ने नही देखना चाहिए | आप नही समझोगी |”
असेही बोलून काहींनी मी केवढं मोठं पाप करून बसले आहे याची मला जाणीव  करून द्यायचा प्रयत्न केला.

भाभीजी,आपने कुछ व्रत रखा था या नही ग्रहणकाल में ? नही तो अब किसी मंदिर जा के दर्शन करके आना | ये एक्लिप्स बहुत डेंजरस होता है |

काही मंडळी आपल्या केबिनमध्ये अंघोळी पांघोळी करून, पूजा पाठ करके, भगवान के लिए दीप अगरबत्ती जला के जेवायला आली होती.
चर्चेचा विषय एकच होता….. आजचं ग्रहण !
क्रमश:

वेदवती कुलकर्णी

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments