“डॉ रघुनाथ शेवगावकर”
मध्य प्रदश राज्यातील ग्वाल्हेर शहरातील एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला पण यशाचे सोपान चढत कळसाला स्पर्श करू शकणारा म्हणजे रघुनाथ….
शिखर पादाक्रांत केल्यावरही पायथ्याशी उभा असलेला माणूस आपलाच आहे असे मानणारा म्हणजे रघुनाथ विज्ञानाची वादळी घोडदौड चालू असताना ही चित्रकला, वाद्य, संगीत आणि पाककलेत ही मुरब्बी असणारा म्हणजे ..रघुनाथ
हो, आज आपण जाणून घेणार आहोत असे एक व्यक्तिमत्व …जे अद्भुत, अजोड ,अतुलनीय आहे..स्वकष्टावर ,आर्थिक पाठबळ नसताना , शिष्यवृत्ती मिळवित शिकणे कधीही कौतुकास्पदच.
त्यांची उत्तुंग झेप बघून आपले काळीज आनंदाने भरून येते.त्यांचे वडील रेल्वे मध्ये होते .त्यामुळे इंजिन बघण्याचा योग या बाल रघुला अनेक वेळा आला. त्यावेळेस वय इतके लहान की इंजिन आणि इंजिनियर यात कोणता मोठा फरक आहे असेही कळत नव्हते पण त्याचमुळे त्या मुलाने ठरविले होते मी मोठा झाला की इंजीनियर च होणार. हळुहळू वय वाढले न इंजिनियर होण्यासाठी किती कष्ट करावे लागतील हे जाणवले .. शिक्षण महाग वाटत असले तरी घरचे प्रोत्साहन फार.
त्यामुळे त्यांनी दाखला मिळविलाच …त्या काळी बहुतांश मुले मेकॅनिकल हीच शाखा घेत पण यांच्या सुदैवाने त्याच सुमारास इलेक्ट्रॉनिक्स ही शाखा सुरू झाली ..आणि त्या पहिल्या बॅच मध्ये यांनी प्रवेश मिळवला.. जरी काही शिक्षक इलेक्ट्रीकलचेच असले तरी काही बाहेरून आले होते. कारण इलेक्ट्रॉनिक्स विषय नवीन होता ..श्री रघुनाथ अजून ही तेथल्या कॉलेजच्या शिक्षकांची नम्रपणे आठवण काढतात आणि गणितातील माझी रुची वाढविण्याचे श्रेय तेथील प्रो राम मोहन सक्सेना यांना देतात आणि इलेक्ट्रॉनिक्स बद्दलचे आकर्षण वाढविण्याचे श्रेय प्रो बोबडे जी यांना ..पूर्ण विश्वविद्यालयात ते प्रथम आले आणि सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. येथूनच सुरू होते त्यांच्या प्रतिभेची वाटचाल.
सहसा त्या काळात मुले पदवीधर झाली की नोकरी शोधत पण यांना उच्च शिक्षणाचे वेध लागले होते ..त्याला कारणे ही होती ..आय आय टी कानपूर सारख्या ठिकाणी यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि दाखला ही. ते सांगतात…”माझ्यासाठी तो टर्निंग पॉईंट होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही..” तेथेच ही जाणीव झाली की शिक्षण कसे असावे, इंजिनियरचे ज्ञान, त्याची मेधा, कुठल्या स्तराची असावी. तेथे त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि ज्ञान लालसेची पिपासा ही वाढली. तेथले माथुर प्रोफेसरांचे आदराने नाव घेत ते सांगतात .. बंगळूरुला रमण इन्स्टिटयूट मध्ये मोठा दीड किलोमीटरचा अँटेना तयार करण्याचे काम चालू होते, त्यांना या विषयात रुची असलेली, संशोधन करणारी, अशा प्रज्ञावंत मुलांची गरज होती..माथुर सरांनी रघुनाथ यांची निवड केली आणि त्यांना तेथे जाण्याबद्दल सुचवले. तेथे रमण यांचे सुपुत्र डॉ राधाकृष्णन् यांच्या संपर्कात खूप काम करता आले. ते नवीन विचारांचे होते. तेथेच सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ गोविंद स्वरूप उटी हून येत असत. यांच्या समवेत काम करण्याचे भाग्य लाभले आणि त्यांचा माझ्या मनावर, शिस्तीवर, कार्यावर खूप प्रभाव पडला असे रघुनाथजी नमूद करतात.

एन्टेना आणि रेडिओ टेलिस्कोप वरील कार्य यांनी व्यवस्थित सांभाळले आणि एस्ट्रॉनोमी विषयाचे दहा वर्ष काम करताना शास्त्री प्राध्यापकांची आठवण काढताना ते विनम्र झालेले दिसतात. माणसाने कितीही मोठे झाले तरी आपल्याला मोठे करणाऱ्या व्यक्तींच्या ऋणात राहणे मनःपूर्वक पसंत करावे हे श्री रघुनाथजी कडून शिकण्यासारखे आहे. जे प्रज्ञावंत असतात त्यांच्यासाठी नवनवी दालनं उघडत असतात, हेच दिसते, बंगळूरु ला मेरीलँडचे प्रो. कुंडू आले होते, त्यांना संशोधनात रस असणाऱ्या स्कॉलर्सची गरज होती. ते स्वतः सोलर एस्ट्रॉनोमी मधील सर्वोच्च मान्यता प्राप्त वैज्ञानिक होते. अर्थात रघुनाथजींची निवड झाली आणि ते मेरीलँडला रवाना झालेत. शिकण्याची अदम्य इच्छा, प्रामाणिकपणा, सातत्य, सराव हे सगळे गुण असले की झेप उत्तुंगच होणार. श्री रघुनाथ यांना तेथे जाणवले कार्यक्षमता जास्त म्हणजे उत्पादकता जास्त. तेथली कार्य संस्कृती शिकण्यासारखी आहे ..तेथे आठ तास काम म्हणजे आठ तास कार्य .त्यांना अतिशय दुःख होते की आपल्या येथे आठ तास काम म्हणजे सहा तास टंगळ मंगळ.. हे कधी बदलेल ?
तेथे दोन वर्षात बरेच शिकता आले, पण काहीतरी नवे शिकण्याची जिद्द, मानस, देशप्रेम, देशाची तरुण पिढी रचनात्मक कार्यासाठी तयार करण्याची ओढ मनाला एक हुरहुर लावीत असे. ते अमेरिकेत असतानाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रो फिजिक्स ही संस्था सोडून मुंबईच्या आय आय टी येथे प्रोफेसर होण्याचे ठरवले .त्यासाठी बंगळुरु स्थित त्यांची सुविद्य पत्नी, डॉ.सौ सरिताजी यांना ते सर्व श्रेय देऊ इच्छितात.
आय आय टी मध्ये शिकविण्याचा आनंद वेगळाच होता …अशी हुशार मुले मिळणे, त्यांचे प्रश्न, त्यांची चर्चा आपल्याला अधिकाधिक शिकण्यासाठी उद्युक्त करतात .ते मानसिक समाधान भरपूर मिळाले. पण आताची परिस्थिती बघता वाईट वाटते…आता तेथेही खूप मुले असतात. प्रत्येकाचा दर्जा उत्तमच असतो असे नाही, असे त्यांचे मत.
त्यांना या बाबत पृच्छा केली असता ते म्हणतात… आता शिक्षणाचा दर्जा खालावतोय निःसंशय, त्याची अनेक कारणं आहेत, लोकसंख्या विस्फोट तर आहेच पण या क्षेत्रातील खाजगीकरण आणि राजकारण्यांची नको तेवढी लुडबुड. पूर्वी आय आय टी च्या वर्गात ४० मुले असत तर आता ती संख्या १५० पर्यंत गेली आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण कठीण झाले. खाजगीकरणामुळे उद्योजकांना यात पैसा दिसू लागला आणि भरमसाठ देणग्या, प्रवेश, भ्रष्टाचार वाढीस लागला.त्यात प्रवेश परीक्षा संपूर्णपणे ऑब्जेक्टिव असल्याने मुलांची खरी बौद्धिक क्षमता समजणे कठीण झाले. पण त्या करणे गरजेचे ठरले होते कारण या परीक्षेत पारदर्शीपणा अपेक्षित होता, परीक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग नको होता, संगणकाकडूनच तपासणी झाल्याने मुलांच्या संशोधनात्मक किंवा स्वतःच्या विचारांचा कस लागत नाही. मुलाने काहीही विचार न करता उत्तरं दिली, एकच पर्याय निवडत उत्तरावर “टीक“ केले तरीही ती पात्र ठरू लागली.
या शोकांतिकेबद्दल मी फारसे न लिहिता श्री रघुनाथजींच्या कार्याकडे वळते. आय आय टी मुंबई मध्ये ही त्यांनी विविध पदं भूषविली. रजिस्ट्रार, डीन ते डेप्युटी डायरेक्टर पर्यंतची मध्ये ते नेब्रास्काला व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून दीड वर्षे राहिले. तेथेच त्यांची पत्नी डॉ.सौ. सरिताजी या ही प्रोफेसर होत्या, हे विशेष.
त्यानंतर रघुनाथजींची झेप होती ती तडक पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर. एखादी व्यक्ती कुलगुरू पदावर बसते याचाच अर्थ त्यांची अर्हता केवढी असेल ! म्हणतात राज्यपाल जर बघायला गेले तर त्यांच्या गुणांची, कार्याची यादी, तर ती एका पुस्तकाएवढी भरेल ..
ते सांगतात, विद्यापीठात आय आय टी ची भव्यता, देणग्यांची मुबलकता नसते. विद्यापीठ हे अगदी तळागाळाच्या पातळीवरून काम करण्याचे क्षेत्र खूप महत्त्वाचे निर्णय घेतले, पुणे, अहमदनगर, नाशिक येथील किमान साडे सहा लाख रजिस्ट्रेशन. विद्यापीठात टेक्नॉलॉजी विभाग सुरू करणारे हे पहिलेच. आणि ते देखील उद्योग क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे म्हणून अधिक वेगळे, अद्वितीय.

विद्यापीठाचे काम करताना अनेक संघटनांशी सामना करावा लागतो .पण तुमचे काम जर निष्पक्ष, पारदर्शी असेल तर प्रत्येक संघटनेशी तुम्ही संवाद साधू शकता. तुम्ही जर एक दोन संघटनाशी बांधील राहिलात तर कार्य वेगाने पुढे नेणे कठीण होते. तेच श्री रघुनाथजींनी केल्याने त्यांची कामे सुरळीतपणे झालीत. हाताखालच्या स्टाफचे, लोकांचे, कॉलेजच्या प्राचार्यांचे, प्रोफेसर यांचे समर्थन तर लाभलेच पण दीड वर्षात पाहिजे असलेल्या सर्व मंजुऱ्या मिळविण्यातही ते यशस्वी ठरले. लहानलहान गावात जाऊन गरीब विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास संपादन केला. त्यांच्या कारकीर्दीत विद्यापीठाने आपला ग्रेड वन दर्जा सतत राखला.

आता उंच उडी घ्यायची होती ती आय आय टी च्या संचालक पदी …पुण्याहून थेट दिल्ली…डायरेक्टर …पदावर.. त्यांचा प्रगतीपथावर चौखूर दौडणारा रथ स्थिरावला. पण ते अनवरत चालत होते . त्यांच्या येण्याने व्यवस्थापनात सुधारणा झाली, गतिशीलता आली, आधी इंटरनेशनल रँकिंग मध्ये नसणारी दिल्ली आय आय टी नंबर वन ठरली … हा प्रथम क्रमांक आधीही नव्हता आणि त्यांनी दिल्ली सोडल्यावर पुन्हा मिळाला नाही. तेथे त्यांनी सुपर कॉम्प्युटर आणला, कॅम्पस चा विस्तार आणि तेथे नवीन प्राध्यापक वृंदांचे प्रशिक्षण कार्य सुरू केले. त्यांची इच्छा होती जेव्हा आपला देश विकसनशील होता तेव्हा जसे इतर देशांनी मदत केली तसे आता आय आय टी सारख्या संस्थांनी इतर देशांना करावी त्यासाठी मॉरिशस सारख्या देशाने मदत मागितली आणि यांनी त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले. त्यांचे शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी आता आपले कर्तव्य आहे हीच त्यांची भावना होती.

तेथून निवृत्त झाल्यावरही ते स्वस्थ बसले नाहीत ..टाइम्स ऑफ इंडिया च्या बेनेट विश्विद्यालयाच्या स्थापने पासून तिला नावारूपास आणण्याचे श्रेय ही त्यांना जाते. त्यांचे प्रेयसच त्यांचे श्रेयस झाले होते हे भाग्य फार कमी लोकांना मिळते. त्यांनी सुरवात केली तेव्हा विधी, इंजिनियरिंग, माध्यमं आणि व्यवस्थापन अशा चारच शाखा होत्या, ४००, ५०० विद्यार्थी संख्या त्यांच्याच कारकिर्दीत ३००० पर्यंत पोचली आणि आता १५,००० पर्यंत गेली आहे. तेथून निवृत्ती घेऊन सध्या ते मुंबईत स्थायीक झाले आहेत ..पण वेगवेगळी महाविद्यालये, विश्वविद्यालय यांच्या बोर्डावर असल्याने ते सतत व्यग्र असतात. व्यवस्थापकीय परिषद आणि शैक्षणिक परिषद येथे नवीन कल्पना, विचार मांडतात. स्वतः इलेक्ट्रॉनिक या विषयावर पुस्तक लिहिण्यात ही गुंग असतात..
तसे मूळचे ते प्रसिद्धी पराङ्मुख-…आपले काम, संशोधन यातच व्यग्र. त्यांच्या पुरस्कार, बक्षीस, गौरव, सत्कार, प्रशंसा याबद्दल काहीही विचारले तर त्यांचे मंद स्मित फक्त जाणवते. भरभरून सांगणे तर दूरच.अशा सतत कार्यरत राहणाऱ्या व्यक्तिंना ताण दूर करणाऱ्या गोष्टींची नितांत गरज असतेच .. त्यात त्यांनी सतार वाजवण्याचे शिक्षण घेतलेले.. संगीताची परीक्षा दिलेली, चित्रं काढायला ही आवडतात..सवड मिळेल तसे याचा ही आनंद ते घेतात.

त्यांचे एक पुस्तक.. Electromagnetic waves .. हे पुस्तक अनेक महाविद्यालयात अभ्यासाला आहे. त्यांना मिळालेली बक्षिसं, ट्रॉफीज, पुरस्कार, सत्कार यांची यादी फारच मोठी आहे ती सर्व देणे अशक्य तरीही काही सांगण्याचा मोह आवरत नाही
1…..
इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग नावाच्या या संस्थे तर्फे मेंबर, सिनियर मेंबर किंवा फेलो अशा तीन श्रेणी दिल्या जातात. अर्थात त्याची फेलोशिप मिळवणे फार गौरवास्पद . पूर्ण जगात एकाला दिली जाते. तुमच्या जुन्या विद्यार्थ्यांना तुमच्या बद्दल विचारले जाते,तुमचे कार्य बघितले जाते आणि नंतरच याची मान्यता मिळते. श्री रघुनाथजी हे प्रथम भारतीय होते ज्यांना ही फेलोशिप दिली गेली त्या आधी सर्व अमेरिकन च होते.
2…
इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियर्स तर्फे दिले जाणारे विज्ञान क्षेत्रातील एस एन मित्रा मेमोरियल अवॉर्ड मिळवणारे देखील ते मोठे वैज्ञानिक ठरले… .त्यात तुमचे इंजिनियरिंग क्षेत्रातील योगदान, तुमचे संशोधन, एकूण तुमचे सर्वसमावेशक कार्य बघितले जाते..इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स अँड रेडिओ या विषयावरील कार्यासाठी त्यांना हे अवॉर्ड दिले गेले.
3….
पुणे विद्यापीठातील अतुलनीय कार्यासाठी त्यांना …सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे काही वानगी दाखल पुरस्कार..लेख विस्तार भयास्तव फार लिहीत नाही कारण त्यांचे हे सर्व पुरस्कार ठेवण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ सरिताजींना अतोनात कष्ट पडत असतील. त्या सांगतात त्यासाठी वेगळे कपाट केले तरी ते अपुरे ठरले . खाली आपण त्यांची फक्त महत्त्वपूर्ण गौरवाची यादी बघूया.

EDUCATION HONORS, AWARDS AND DISTINCTIONS
Fellow IEEE
Fellow Indian National Academy of Engineering Fellow National Academy of Science, India Fellow Institute of Electronics and Telecommunication Engineers
Fellow Institution of Engineers
Fellow Optical Society of India
Fellow Maharashtra Academy of Science, India SN Mitra Memorial Award 2019 of Indian National Academy of Engineering (INAE). This is the second highest award conferred by the INAE every year for outstanding achievements in Electrical and allied engineering.
IEEE William Sayle Education Award 2014: Only one award is given annually across the world for leadership in electrical engineering education.
IEEE UG Teaching Award 2011: For the first time since its inception, the award was given to a Professor outside the USA. The citation of the award reads “For contributions to inspirational classroom teaching and development of outstanding textbooks and elearning material for electromagnetic waves and transmission lines.”
Institution of Electronics and Telecommunication Engineers – CEOT94 Award for outstanding contribution in the field of Photonics and Optoelectronics.
Excellence in Teaching Award of IIT, Bombay
VASVIK Award in Information and Communication Technology. Only one award is given every year across the country. Ram Lal Wadhawa Award of IETE for achievements in Radio Astronomy, Fiber Optics and Electromagnetics.
Excellence in Education Award’ by Top Management Consortium, Mumbai for leadership in higher education.
Dewang Mehta Business School Award for Outstanding contribution to Education, Mahaganapati Award for Excellence in Academics and Research. Hon. Editor
IETE Special Issue on ‘Next Generation Networks’, 2008. Advisor, Sixth International Infrastructure Business Summit and Expo, TELECOM India. Editor,
IETE Journal of Education. Programme Chair for International Conference Photonics-
Member of Technical Programme Committees for many International and National conferences.
PROFESSIONAL MEMBERSHIPS
- Member International Astronomical Union. •
Member Astronomical Society of India. •
Graduate Fellow University of Nebraska, Lincoln, USA
काही जे महत्वाचे वाटले ते नमूद केलेत.
पण एका लहानशा घरातून उडालेले हे पाखरु कशी गरुड झेप घेते ..हे बघून थक्क होतोच ना आपण.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

— लेखन : स्वाती वर्तक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

प्रा. शेवगावकर ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या जीवनपटावर सौ स्वाती वर्तक ह्यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखिकेने लिहिलेले वाचायला मिळणे म्हणजे खरे तर हा दुग्ध शर्करा योग असेच म्हटलं पाहिजे. शेवगावकरांची माहिती वाचून थक्क व्हायला होते. आणि ती माहिती समर्थपणे स्वातीताई ह्यांनी लिहिली आहे. त्यांचे लिखाण उच्च दर्जाचे असून त्यात “प्रेयसच त्यांचे श्रेयस झाले होते ” ह्या सारख्या उत्कृष्ट मराठी वाङ्मयाची रेलचेल सौ स्वाती ताईंच्या लिखाणात वाचायला मिळाली त्याने खूप बरे वाटले. स्वाती ताई आणि प्रा शेवगावकर सर ह्या दोघांना खूप खूप शुभेच्छा.
प्रा. शेवगावकर यांचे चरित्र वाचताना ऊर अभिमानाने भरून आला . खरंच एवढ्या प्रतिभावान आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाशी वाचकांची ओळख करून दिल्याबद्दल स्वातीताईंचे मनापासून आभार .
स्वातीताईंचा दांडगा अभ्यासही या लेखातून जाणवतो . त्यांनी अतिशय नेमक्या शब्दात समर्पक असा हा माहितीपट वाचकांसमोर उलगडला आहे .
धन्यवाद स्वातीताई !!
प्रा. शेवगावकर हे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांच्या यादीतील एक महत्त्वाचे नाव! या लेखातून स्वाती वर्तक यांनी त्यांची सुरेख ओळख करून दिली आहे. ज्या करिअरमधील सर्व टप्पे त्यांनी बारकाईने टिपले आहेत त्याचबरोबर त्या त्या टप्प्यात त्यांचे योगदानही व्यवस्थित पुढे आणलं आहे.
स्वाती वर्तक यांची भाषा आणि लिखाण शैली ओघवती आहे त्यामुळे हा लेख अजूनच वाचनीय झाला आहे. स्वाती वर्तक आणि प्राध्यापक शेवगावकर दोघांनाही खूप शुभेच्छा!