थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांना पाचगणी आवडते त्याचप्रमाणे उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या शाळांसाठीसुद्धा ते नावाजलेले आहे.
याच अनुषंगाने पांचगणी नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने “बियॉन्ड द बिन” पाचगणीतील घन कचरा व्यवस्थापनात शाळांची भूमिका या विशेष कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेत ३५ पेक्षा जास्त शाळांनी आणि ६० पेक्षा जास्त शिक्षकांनी भाग घेतला होता.
सुरुवातीला पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी श्री पंडित पाटील यांचे स्वागत करण्यात आले. कार्यशाळेसाठी उपस्थित लगान फेम श्री आमीन हाजी, डॉ पंकज दास व श्री सोहम कुळकर्णी यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.

यावेळी आरोग्य निरीक्षक श्री सागर बडेकर, आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सहायक स्वच्छता निरीक्षक श्री गणेश कासुर्डे, शहर समन्वयक श्री ओंकार ढोले, पंचायत समिती, महाबळेश्वर शिक्षण विभागाचे श्री भिलारे साहेब उपस्थित होते.
उद्घाटनादरम्यान श्री अमीन हाजी यांनी नगरपालिकेच्या कामाचे कौतुक करत पांचगणी शहरात हिलदारी अभियान सुरु झाले याबाबत समाधान व्यक्त करत एक खूप चांगली संधी आपल्या शहराला हिलदारी अभियानामुळे मिळाली आहे व आपण सर्वांनी याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
त्यानंतर हिलदारीचे डॉ मुकेश कुळकर्णी यांनी उपस्थितांना हिलदारीच्या कार्याची ओळख करून देत हिलदारी मार्फत पाचगणीतील शाळासोबत राबविण्यात येवू शकणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात सातारा येथील डॉ पंकज दास यांनी वातावरण बदल याविषयी विविध पैलू उलगडत आपल्या प्रत्येक कृतीद्वारे आपण वातावरण बदलासाठी कसे जबाबदार आहोत व यावर काय उपाय आहे याबाबत सादरीकरण केले.
शेवटच्या सत्रात श्री सोहम कुळकर्णी यांनी घन कचरा व्यवस्थापनात त्यांच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देत शाळांची व विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्वाची आहे हे उपस्थितांना पटवून दिले.

कार्यशाळेत कांताबेन जे.पी.मेहता ज्यू.कॉलेज चे प्राध्यापक श्री एस. जी. कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत सदर कार्यशाळेत मिळालेल्या माहितीद्वारे अनेक नवनवीन बाबींची माहित मिळाली व यापुढे आम्ही आमच्यापरीने पालिकेच्या हिलदारी अभियानात सहभाग नोंदवून आम्ही सुद्धा जबाबदारी पार पडू असे म्हणाले.
त्याचप्रमाणे विस्डम स्कूल चे जयदीप कांबळे, विद्यानिकेतन स्कूल व ज्यू.कॉलेज चे रंजन गाडेकर व इतर शाळांच्या शिक्षकांनी सदर कार्यशाळेबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी व हिलदारी टीम ने अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेस शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक शाळांनी हिलदारी अभियाना अंतर्गत पालिकेच्या सहकार्याने विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा व घन कचरा व्यवस्थापनात सहकार्याची तयारी दर्शवली. स्वच्छ आणि जबाबदार पंचगणीच्या दिशेने ही कार्यशाळा एक सकारात्मक पाऊल ठरली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800