व्यर्थ न हो बलिदान / अमर रहे बलिदान
३ वर्ष पूर्वी पर्यंत आपण १४ फेब्रु. मोठ्या आनंदात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करत होतो. पण आता मात्र हा दिवस पुलवामा शहीद दिन म्हणून शहीदांना श्रद्धांजली देऊनच व्यक्त करावा असे वाटते.
१४ फेब्रु. २०१९ रोजी भारताच्या अस्मितेला धक्का लागला. जम्मू काश्मीर च्या सीमावर्ती भागात सीमेचे रक्षण करण्यात तत्पर असलेले ४० CRPF जवान आतंकवाद्यांच्या घातपाती हल्यात हकनाक प्राणांना मुकले. जवानांना युद्धात मृत्यू येण्याची भीती वाटत नाही. पण इथे मात्र आतंकवादाने मृत्यू यावा, तोही अनपेक्षित यासारखे दुर्दैव नाही.
त्याचे असे झाले, जवानांनी भरलेल्या मिलिटरीच्या गाड्यांचा convoy एका ठाण्यावरून दुसऱ्या ठाण्याकडे जात होता. आणि अचानक त्यांच्या वाहनांवर आत्मघातकी बॉम्बचा (suicide bomber) हल्ला झाला. बॉम्ब फुटले, कानठळ्या बसवणाऱ्या कर्कश्श आवाजाने आसमंत भेदला. अनेक वाहने उद्धवस्त होऊन ठिकर्या ठिकऱ्या झाल्या. जवानांचे जागीच प्राणोत्क्रमण झाले. शरीराच्या चिंधड्या चिंधड्या होऊन, अवयव इतस्ततः विखुरले. आपण कल्पनाही करू शकत नाही इतके भयाण, दारुण दृष्य होते ते. दूरदर्शन वरील दृष्ये, वर्तमानपत्रातील फोटो आपल्याही मनावर खोल जखमा करून गेले.
कोणीही भारतीय हे बलिदान विसरणे शक्य नाही. खेदाची गोष्ट इतकीच की हा मृत्यू प्रत्यक्ष युद्धात, समोरून आलेल्या बंदुकीच्या गोळीने झाला नव्हता. घातपाताचे बळी ठरले आपले बहादूर CRPF
चे जवान.
हा दिवस भारतीय आर्मीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला.
थोडयाच दिवसात सर्जिकल स्ट्राईक करून भारताने ह्या निर्घृण कृत्याचा बदला घेतला. तोही रक्ताचा एक थेंब न सांडता !
हीच खरी श्रद्धांजली .🙏🙏🙏
सैनिकहो मी तुमच्या असीम त्यागापुढे नतमस्तक आहे. तुमचे हे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही.
अमर रहे हमारे बहादूर जवान.
जयहिंद.
भारतमाता की जय ! –
– लेखन : सुलभा गुप्ते. सिडनी, ऑस्ट्रेलिया.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
पूलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद ४० जवानांचे पुण्यस्मरण!
जयहिंद!